पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या सहा वर्षांमध्ये अब्जावधीची संपत्ती जमवल्याचे वृत्त तेथील एका वृत्त संकेतस्थळाने दिले आहे. जनरल बाजवा यांच्या पत्नी, स्नुषा, सासरे आणि खुद्द जनरल साहेबांच्या कर विवरणपत्रांतील तपशील ‘फॅक्ट फोकस’ नामे संकेतस्थळाने जगासमोर आणला. हा तपशील गोपनीय होता आणि तो फोडलाच कसा, असा पवित्रा पाकिस्तानच्या सरकारने घेतला आहे. या कृत्याचा छडा लावण्यासाठी उच्चस्तरीय समिती वगैरे सोपस्कार पार पाडण्यात आले. खरे तर लष्करप्रमुखांना याविषयी जाब विचारण्यासाठी नामी संधी तेथील शाहबाझ शरीफ सरकारसाठी चालून आली होती; परंतु अजस्र बेनामी मालमत्ता आणि विद्रूप धनसंचयाच्या मुद्दय़ावर तेथील विशेषत: पंजाबी राजकारणी आणि लष्करी उच्चाधिकारी यांची अवस्था ‘इस हमाम में..’ अशीच असते. शिवाय बाजवा नोव्हेंबरअखेर निवृत्त होत असून, त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजीच सुरू झाली आहे. त्यांचा कार्यकाळ यापेक्षा अधिक असता, तर कदाचित सरकार आणि त्यांच्यात संघर्षांची शक्यता होती. पाकिस्तानला पुरेसे शुचिर्भूत राजकारणी लाभत नाहीत, अशी तक्रार तेथील लष्करी यंत्रणेमार्फत जनतेमध्ये पेरली जाते. तेथील लष्करासाठी हा सोयीस्कर मार्ग ठरतो. कारण यातून लष्करी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराकडून इतरत्र लक्ष वळवणे सोपे जाते. पाकिस्तानी जनतेसाठी तेथील लष्कर हेच तारणहार. एकीकडे भ्रष्टाचारी राजकीय नेते आणि दुसरीकडे ‘आक्रमक’ भारत यांच्यापासून वाचवण्यासाठी तेच तर सदातत्पर नसतात का? या दाव्यामागील नेहमीची चलाखी ठाऊक असलेल्यांचेदेखील बाजवा यांनी जमवलेल्या संपत्तीचा तपशील पाहून डोळे पांढरे होतील. गेल्या सहा वर्षांमध्ये बाजवा आणि त्यांच्या सासरचे कुटुंब अब्जाधीश बनले. त्यांनी देशात आणि परदेशात मोठय़ा मालमत्ता खरेदी केल्या. यात इस्लामाबाद, लाहोर, कराची अशा मोठय़ा शहरांतील व्यावसायिक संकुले, गृहसंकुले, शहराबाहेरील मोठी शेतघरे अशा मत्तांचा समावेश आहे. या सगळय़ाची एकत्रित किंमत १२७० कोटी पाकिस्तानी रुपये (जवळपास ६५० कोटी भारतीय रुपये) इतकी भरते. २०१६ मध्ये बाजवा पहिल्यांदा लष्करप्रमुख बनले. तत्पूर्वी २०१३ आणि मग २०१७ मध्ये बाजवा यांनी काही तपशील नव्याने दाखल केला. यात लाहोरमधील व्यावसायिक संकुलाचा समावेश आहे. पुढे किमान चार वेळा ‘विसरलेला’ तपशील त्यांनी सादर केला. त्यांच्या स्नुषेची कहाणी आणखीनच रंजक. ऑक्टोबर २०१८ च्या शेवटच्या आठवडय़ात त्यांची संपत्ती कागदोपत्री शून्य होती. परंतु २ नोव्हेंबर रोजी, विवाहाच्या आधी एक आठवडा ही संपत्ती १०० कोटी रुपयांनी वाढली! ‘फॅक्ट फोकस’ने हा स्फोटक तपशील प्रसृत केल्यानंतर काही वेळातच त्यांचे खाते पाकिस्तानात दिसेनासे झाले. परंतु पाकिस्तानबाहेर लाखोंसमोर लष्करप्रमुखांच्या लीला प्रकट झाल्याच. ‘फॅक्ट फोकस’ने यापूर्वीही पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या बेनामी आणि बेहिशेबी मालमत्तांची लक्तरे चव्हाटय़ावर आणलेली आहेत. पण सध्या पाकिस्तानात चर्चा बहुधा जनरल बाजवा यांचा उत्तराधिकारी कोण, याचीच सुरू आहे. स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेल्यानंतरही पाकिस्तानातील लष्करशहा संस्थानिकांच्या मानसिकतेतून बाहेर येण्यास तयार नाहीत. मुशर्रफ गेले काय, बाजवा आले काय नि बाजवा जाऊन आणखी कोणी आले काय, हे दुष्टचक्र कधीही थांबणारे नाही.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
Mohammad Muizzu
सैनिक नकोत पण कर्जमाफी हवी; मैत्रीचा हवाला देत मालदीवची भारताकडे याचना