ज्ञानेश्वर- तुकाराम, शिवाजी महाराज, फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या आणि त्यामुळेच पुरोगामी, सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांमध्ये तू जास्त अर्वाच्च, शिवराळ बोलतोस की मी, अशी जणू काही स्पर्धा सुरू असावी, ही खरोखरच शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब. अब्दुल  सत्तार या गृहस्थांनी भरदिवसा तोडलेले तारे आणि रामदास कदम यांनी उधळलेली मुक्ताफळे या दोन्ही यातील अगदी अलीकडच्या गोष्टी. हे सगळे नेमके चालले आहे तरी काय? स्त्रियांना समाजात कसे वागवले जाते यावरून त्या समाजाची लायकी कळत असते. त्याबाबतीत आधीच आपली यत्ता फारशी वरची नाही. त्यात आपले लोकप्रतिनिधी जाहीरपणे स्त्रियांबद्दल बाष्कळ आणि बेताल विधाने करत असतील तर ते खासगीत काय बोलत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. आपल्याला लोकांनी का निवडून दिले आहे, आपल्याला काय करायचे आहे, आपले काम काय याचे भान सोडून लोकप्रतिनिधी असे का वागत आहेत? गेल्या काही महिन्यांत दोनचार पक्षांमधले राजकारण, फोडाफोडी, सरकारची पाडापाडी हे सगळे झाले. करता येईल तेवढय़ा गलिच्छ भाषेत एकमेकांवर टीका करून झाली. आता तरी पुढे चला, आपापल्या खात्याच्या कामाला लागा. तर ते राहिले बाजूला. जनतेने  हे सगळे उघडय़ा डोळ्यांनी पाहून घेतले आहे आणि त्याचा हिशेब ती निवडणुकीत करतच असते याचे भान बाळगाल की नाही? तिकडे अतिवृष्टीत हातची पिके जाऊन हवालदिल झालेला शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे. त्याला उमेद देण्याची, त्याला उभे करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि याचे आपल्याला भान आहे याची जाणीव व्यक्त होणे अपेक्षित असताना कृषिमंत्री करतात काय तर सार्वजनिक पातळीवर स्त्रियांबद्दल अनुदार विधाने करतात. शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. अजूनही कित्येक महाविद्यालये सुरूच झालेली नाहीत.  सरकारी भरती प्रक्रियेमधल्या घोळांनी बेरोजगार परीक्षार्थीचा पारा चढतो आहे. हे सगळे आता खूप झाले.

  अब्दुल  सत्तारांनीच नाही तर सगळ्याच पक्षांमधल्या सगळ्याच पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी हे लक्षात घ्यायला हवे की ते महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून आलेले असले तरी ते फक्त त्यांच्या विभागापुरते पुढारी  किंवा त्यांच्या मतदारसंघापुरते लोकप्रतिनिधी नसतात. ते महाराष्ट्राचे प्रतिनिधी असतात. आपल्या पुढारलेल्या, प्रगत राज्याचा वारसा त्यांच्यामागे असतो. ते त्यांच्या घराबाहेर पडतात, तेव्हापासून त्यांच्यावर कॅमेरे रोखलेले असतात. आजच्या समाजमाध्यमांच्या विस्फोटाच्या काळात कोणतीही गोष्ट एका सेकंदात जगजाहीर होत असते. त्यामुळे स्त्रियांबद्दलच नाही, तर कुणाहीबद्दल सभ्य आणि सुसंस्कृतपणे वागणे, बोलणे ही फक्त लोकप्रतिनिधींचीच नाही, तर प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींकडून याबाबत जास्त अपेक्षा असणे स्वाभाविक आहे कारण ते राजकीय व्यवस्थेचा चेहरामोहरा आहेत. यशवंतराव चव्हाण, मधु दंडवते, रामभाऊ म्हाळगी, मधुकरराव चौधरी.. अशा अनेक नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आपल्या वागण्याबोलण्यातून तो घडवला आहे. तो वारसा पुढे नेणे ही आता त्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्यांची जबाबदारी आहे. तेव्हा आता हा सगळा बाष्कळ  आणि बेतालपणा सोडा आणि झडझडून कामाला लागा. एकमेकांविरोधातील गलिच्छ राजकारण आणि खालच्या पातळीवरची टीका करण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलेले नाही, तिने निवडून दिले आहे ते तिची कामे करण्यासाठी. ती कराल तरच पुढच्या निवडणुकीत तुमची गय केली जाईल.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा