scorecardresearch

अन्वयार्थ : अर्जेटिनाच्या पराभवाचे महत्त्व..

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी ‘क’ गटातील पहिल्याच सामन्यात बलाढय़ अर्जेटिनाचा सौदी अरेबियाकडून १-२ असा धक्कादायक पराभव झाला.

अन्वयार्थ : अर्जेटिनाच्या पराभवाचे महत्त्व..
सौजन्य-फिफा विश्वचषक २०२२ (ट्विटर)

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी ‘क’ गटातील पहिल्याच सामन्यात बलाढय़ अर्जेटिनाचा सौदी अरेबियाकडून १-२ असा धक्कादायक पराभव झाला. अर्जेटिना या स्पर्धेचे एक संभाव्य विजेता गणला जातो. फुटबॉल विश्वचषकासारख्या दीर्घ आणि महत्त्वाच्या स्पर्धामध्ये विजेते ठरण्यासाठी सातत्याने चांगले खेळावे लागते. एखादे वेळी एखाद्या सामन्यात पराभव झालाच, तरी त्या धक्क्यातून सावरत पुढे वाटचाल करत राहणे यातूनच खऱ्या अनुभवी आणि गुणवान संघांचा कस दिसून येतो. यापूर्वीही बलाढय़ संघांचा पहिल्या सामन्यात पराभव झालेला आहेच. १९९०मध्ये कॅमेरूनने अर्जेटिनाचाच धक्कादायक पराभव केला होता. तरीदेखील अर्जेटिना त्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाच. २०१० मध्ये स्विर्त्झंलडकडून स्पेनचा पराभव झाला, तरी स्पेनने ती स्पर्धा जिंकून दाखवली. लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिना कदाचित त्या प्रकारे स्पर्धेत पुनरागमन करेलही. पण त्यामुळे सौदी अरेबियाच्या अविस्मरणीय, अभूतपूर्व विजयाची खुमारी कमी नक्कीच होणार नाही. तुल्यबळ संघांमधील लढती रंगतदार होतात. पण त्यांचा निकाल हा प्रत्यक्ष लढतीइतका थरारक असत नाही. कोणीही जिंकला, तरी त्यात विस्मयजनक फारसे काही नसते. बलाढय़ संघ आणि तुलनेने दुबळे संघ यांच्यातील लढतीत, बलाढय़ संघाची हार होणे हे दुर्मीळ असले, तरी तसे होणे खेळाडूंसाठी विश्वासमूलक आणि रसिकांसाठी रससंवर्धक असते. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा इतिहास अशा सामन्यांनीच समृद्ध केलेला आहे. अन्यथा म्हणायला ‘विश्वचषक’ असूनही ही तशी बंदिस्त म्हणावी अशीच स्पर्धा. ९२ वर्षांच्या इतिहासात अवघे आठ विजेते आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्यांची संख्या जेमतेम १३. यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा मुस्लीम आणि अरब देशात भरवली जात आहे. विजेते आठ, धक्कादायक निकालांची संख्याही सात ते आठ इतकीच. अमेरिका वि. इंग्लंड (१९५०), उत्तर कोरिया वि. इटली (१९६६), अर्जेटिना वि. कॅमेरून (१९९०), फ्रान्स वि. सेनेगल (२००२), दक्षिण कोरिया वि. इटली (२००२), दक्षिण कोरिया वि. जर्मनी (२०१८) आणि यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत सौदी अरेबिया वि. अर्जेटिना, असे दाखले देता येतील. युरोप आणि लॅटिन अमेरिका या दोनच खंडांतून आजवर या खेळातील विश्वविजेते निर्माण झाले. आफ्रिका खंडाविषयी विशेषत: गतशतकात ९०च्या दशकात आणि विद्यमान शतकाच्या सुरुवातीला आशादायक परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्यांच्यापैकी एकाही संघाची मजल जगज्जेतेपदापर्यंत गेली नाही. आशिया खंडात तुलनेने पश्चिम व उत्तर आफ्रिकेइतकी गुणवत्ता नसली, तरी कुठे तरी ही दरी कमी होत असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. सौदी अरेबियाने परवा पिछाडीवर पडूनही अवघ्या पाच मिनिटांत दोन गोल करत बाजी उलटवली. मेसीने या स्पर्धेतला त्याचा पहिला गोल केला. पण ही स्पर्धा किंवा खरे तर कोणतीही स्पर्धा म्हणजे निव्वळ मेसी किंवा इतर वलयांकित खेळाडूंच्या कामगिरीपुरती सीमित नसते. फुटबॉल हा खऱ्या अर्थाने सांघिक खेळ असतो आणि सर्वानी योगदान दिल्यावरच एखादा संघ यशस्वी ठरत असतो. तेव्हा मेसीच्या अर्जेटिनाचा धक्कादायक पराभव हा त्या दृष्टीनेही वलयपूजकांसाठी खणखणीत संदेश ठरला. तो झिरपणे हे खेळाच्या उत्थानासाठी महत्त्वाचे ठरते.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या