गिरीश कुबेर

‘जगाचा कारखाना’ हे आपलं स्थान चीन वेगाने गमावतो आहे. पण मग ते उद्योग आपल्याकडे येताहेत का? आपला फायदा होतो आहे का? चीनचा तोटा तो आपला फायदा अशी परिस्थिती आहे का?

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

‘आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हे व्यक्तिगत पातळीवर धोरण म्हणून ठीक. देशोदेशींच्या परराष्ट्र व्यवहारांतही याचा अंमल दिसतो. तो योग्यच. पण या विधानाचा पुढचा भाग ‘शत्रूचं वाईट ते आपल्यासाठी चांगलं’ हा तितकाच खरा असू शकतो का? म्हणजे पाकिस्तानचं वाईट होण्यात आपलं भलं असतं का, हा यातला प्रश्न. आपल्याकडे असं मानलं जातं म्हणून हा प्रश्न. पाकिस्तानात दहशतवादी हल्ला झाला की, त्या देशातल्या लष्कराचं काही काळंबेरं उजेडात आलं की किंवा तिथल्या राजवटी उलथून पडल्या की आपल्याकडे अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित झळकतं. गंमत म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर केवळ आपणच नाही तर अन्य कोणीही पाकिस्तानला धूळ चारली की आपल्याकडे अनेकांच्या अंगावर विजयाचा मूठभर मेद जमा होतो. असो. पण शत्रूच्या वाईटात आपलं चांगलं कसं.. हा प्रश्न काही पाकिस्तानच्या अनुषंगानं पडलेला नाही. तसा पाकिस्तान हाताळायला अगदीच सोपा. अगदी ‘घर मे घुस के मारेंगे..’ अशी फिल्मी आणि तितकीच निरुपयोगी धमकी दिली तरी फारसं काही बिघडत नाही असा देश. तेव्हा मुद्दा पाकिस्तानचा नाही.

तो चीनचा आहे. हा देशही असा की त्याचा विचार निघाला रे निघाला की ‘घर मे घुस के मारेंगे’ वगैरे दूरच राहिलं. पण भल्या भल्यांना एकदम दातखीळ बसते. पाकिस्तानविरोधात हवेतल्या हवेत घुमणाऱ्या तलवारी चीनचा विषय निघाला की एकदम म्यान होतात. चीन आपल्याला अजूनही किती तरी भारी आहे, हेच यातून दिसतं. त्यामुळे आपण प्रत्यक्ष थेटपणे चीनचं काही(ही) वाकडं करू शकलो नाही तरी अन्य कोणाकडून ते तसं होत असेल तर आपल्याला आनंद होतो. साहजिकच ते. त्यामुळे करोनाची न आवरणारी साथ, त्यानंतरचं आर्थिक आव्हान, बिघडलेले आंतरराष्ट्रीय संबंध वगैरेमुळे चीनचं काही वाईट होत असेल तर आपल्याला आनंद होणं तसं काही अनैसर्गिक नाही. पण यातला प्रश्न त्यापुढचा आहे. चीनचं काही वाईट होणं म्हणजे त्यात आपलं काही भलं होणं दडलेलं असतं का?

या प्रश्नाचं निमित्त आहे ते अलीकडच्या काळात चीनमधून मोठय़ा प्रमाणावर उद्योग बाहेर पडत असल्याच्या बातम्या. वर उल्लेखलेली कारणं आणि त्या जोडीला थिजलेली अर्थव्यवस्था यामुळे त्या देशातनं अनेक परदेशी उद्योग मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडू लागल्याची चर्चा अलीकडे मोठय़ा जोमात आहे. एरवी तिची दखल घेतली गेली असतीच असं नाही याची. पण या चीनच्या वाईटात आपलं भलं कसं होणार आहे.. असंही मानलं जाऊ लागलंय आपल्याकडे, म्हणून हा मुद्दा दखलपात्र. चीनमधून उद्योग बाहेर पडला रे पडला की लगेच तो भारतात येणार असं अनेकांना वाटतंय. ज्यांना ते तसं वाटत नाही त्यांना ते तसं वाटावं यासाठी मोठे प्रयत्न होतायत. ज्यांना ते तसं वाटतं ते उद्योगांची चिनी गच्छंती म्हणजे त्यांचा भारतप्रवेश असं समजून त्यांचं आगमन साजरं करू लागलेत. हा असा विचारांधळा वर्ग फार मोठा आहे. त्यांच्यासाठी जाऊ द्या; पण इतरांसाठी टी. एन. नैनन यांच्यासारखे बुद्धिमान आणि विचक्षण अर्थ विश्लेषक, ‘फायनान्शियल टाइम्स’सारखी वर्तमानपत्रं हे चीनत्यागी उद्योग भारतगमनी नाहीत हे वास्तव उत्तमपणे दाखवून देतात. उदाहरणार्थ..

सॅमसंग ही आपल्यालाही परिचित अशी दक्षिण कोरियाची बलाढय़ कंपनी. गेल्या काही महिन्यांत तिनं चीनमधला आपला संसार गुंडाळलाय. पण नवा घरोबा केलाय तो व्हिएतनाममध्ये. गूगलनंही चीनमधून काढता पाय घेतलाय. पण त्यानंही व्हिएतनामला जवळ केलंय. नाईकी, आदिदास कंपन्यांनीही याच कंपन्यांच्या पावलावर पाऊल टाकत व्हिएतनामला आपलं म्हटलंय. याखेरीज चीनमधनं बाहेर पडलेल्या पण थेट मलेशियात जाऊन आपलं बस्तान बसवलेल्या कंपन्यांची संख्या आहे ३२. ह्युंदाईसारख्या मोटार कंपनीनं तर चीनमधनं थेट अमेरिकाच गाठलीये. चीनमधला विजेवर चालणाऱ्या मोटारींसंबंधित उद्योग ह्युंदाई अमेरिकेत घेऊन गेलीये. अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी विजेवर चालणाऱ्या मोटारींसाठी काही सवलती जाहीर केल्यात. त्यामुळे चीनशेजारच्या देशांपेक्षा ह्युंदाईला अमेरिका जवळची वाटलीये. आपल्याला परिचित एलजी आणि होंडा यांनीही याच कारणांसाठी आणि याच उद्योगांसाठी अमेरिकेला जवळ केलंय. दूरचित्रवाणी संचनिर्मितीतल्या अव्वल सोनी कंपनीनं काही प्रमाणात चीन सोडलाय. पण हे उद्योग हलवलेत थायलंडमध्ये.

जपान सरकारनं तर चीनमधून उद्योग आपल्या देशात खेचून घेण्यासाठी विशेष योजनाच आखलीये. विविध अशा १४ क्षेत्रांचा यात अंतर्भाव आहे. यातला कोणताही उद्योग चीनमधून निघून जपानमध्ये येत असेल तर त्याला विशेष मदत दिली जाते. जपाननं यासाठी जवळपास २५० कोटी डॉलर्सची तरतूद केलीये. पाठोपाठ दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या देशांनीही आक्रमक अशा योजना आखल्यात. चीनमधनं येणाऱ्या उद्योगांना आपल्याकडे आकर्षून घ्यायचं हे या योजनांचं उद्दिष्ट. शेकडय़ांनी जपानी आणि अन्य काही कंपन्या या नंतर चीनमधून बाहेर पडल्यात आणि या देशांत गेल्यात. व्हिएतनाम या देशातलं उद्योगस्नेही धोरण, तिथल्या सरकारची कार्यक्षमता आणि नियमनातलं सातत्य यामुळे अनेक कंपन्यांची त्या देशाला पसंती आहे. चीनमधला दुचाकी उद्योग तर जवळपास संपूर्णपणे व्हिएतनामला स्थलांतरित झालाय. गेल्या काही महिन्यांत, वर्षभरात थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम या देशांतल्या परकीय गुंतवणुकीत चांगलीच वाढ झालीये. त्यामागचं कारण अर्थातच हे उद्योगांचं चिनी स्थलांतर.

मोठय़ा संख्येने चीनमधनं उद्योग बाहेर पडले हे सत्य. पण म्हणून ते आपल्याकडे येतायत/आले/येतील हे असत्य.

आणि गंमत अशी की चीन आपलं ‘जगाचा कारखाना’ हे स्थान गमावतोय, त्या देशातनं उद्योग बाहेर पडू लागलेत, पडणार आहेत अशा बातम्या येऊ लागल्या त्याला आता तीन वर्ष झालीयेत. ‘फोर्ब्स’सारख्या मासिकानं २०२० साली उद्योगांचं चीनमधलं स्थलांतर यावर भाष्य केलं होतं. पण त्यापुढचीही गंमत अशी की या तीन वर्षांनंतर आणि तीन वर्षांत इतके सारे उद्योग बाहेर पडूनही चीनच्या उद्योगक्षमतेवर त्याचा अजिबात परिणाम झालेला नाही. या विधानाचा आधार काय?

तर २०२२ साली विविध देशांत झालेल्या परदेशी गुंतवणुकीचा तपशील. त्यानुसार चीन हा(च) जगातला सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षणारा देश ठरलाय. अमेरिकी वाणिज्य खात्याच्या आकडेवारीनुसार चीनमधल्या परदेशी गुंतवणुकीत गेल्या वर्षी ८ टक्क्यांची वाढ झालीये. त्यामुळे जवळपास १८,९०० कोटी डॉलर्स इतकी अगडबंब गुंतवणूक या देशात आताही होतीये. आणि त्यातली सर्वाधिक गुंतवणूक ही कारखानदारीत (मॅन्युफॅक्चिरग) आहे. या क्षेत्रातल्या गुंतवणुकीतली वाढ सणसणीत ४६ टक्के इतकी आहे. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातली वाढ आहे २८ टक्के इतकी. आणि महत्त्वाचं म्हणजे ही गुंतवणूक करणारे देश तेच आहेत ज्यांच्या कंपन्या चीनमधले आपले कारखाने हलवतायत. त्याखेरीज जर्मनी, इंग्लंड, अन्य युरोपीय देशांतल्या किती तरी कंपन्या नव्यानं चीनमध्ये जातायत.

आणि या सत्याचा कटू जाणीव करून देणारा दुसरा तपशील म्हणजे चीन आणि आपण यातली वाढती व्यापारतूट. म्हणजे चीनमधनं आपल्या देशात येणाऱ्या उत्पादनांचं मूल्य आपल्या देशातनं चीनमध्ये जाणाऱ्या उत्पादनांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असणं. ताज्या आकडेवारीनुसार ही व्यापारतूट गेल्या वर्षभरात तब्बल ४५ टक्के इतकी वाढून १०,१०० कोटी डॉलर्स इतकी झाली आहे. गेल्याच्या गेल्या वर्षी आपण चीनला २८०० कोटी डॉलर्सची निर्यात केली. गेल्या वर्षी ती फक्त १७०० कोटी डॉलर्सची झालीये.

तात्पर्य : आपलं वाईट करणाऱ्याचं वाईट झालं म्हणजे त्यात आपलं चांगलं दडलेलं असतं असं मुळीच नाही. हा समज आता सोडायला हवा!

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber