अरुण मणिलाल गांधी यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. महात्मा गांधी यांचे ते पाचवे नातू होते. आजोबांचा सहवास लाभलेले ते अखेरचे नातू. सेवाग्राममधील या सहवासातच त्यांच्यावर गांधीवादाचा प्रभाव पडला. पुढे दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर त्यांनी यातूनच वर्णभेदाविरुद्धच्या चळवळीत स्वत:ला लोटून दिले. यात त्यांना अनेकदा अटकही झाली. या साऱ्यामागे गांधीजींच्या विचारांचीच प्रेरणा असल्याचे ते सांगतात. या प्रभावावर आधारितच त्यांनी ‘लीगसी ऑफ लव्ह’ हे पुस्तक लिहिले आहे. यात ते लिहितात ‘माणसामाणसांमधले भेद नाहीसे व्हायला हवेत असा गांधीजींचा कायम आग्रह असायचा. हेच उद्दिष्ट साधण्यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले. बापूजींनी शांततेसाठी आणि न्यायासाठी उभारलेल्या चळवळीमागे आपण ठामपणाने उभे राहायला हवे.’ गांधीजींनी दिलेल्या या विचारातूनच पुढे त्यांच्या कार्याची दिशा ठरत गेली.

वर्णभेदाविरुद्धची चळवळ, भारतीय स्थलांतरितांवरील अत्याचार याबद्दल लढा देतानाच त्यांनी भारत -अमेरिकन फौंडेशन, गांधी पीस फौंडेशनच्या माध्यमातून गांधीवादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुरू केले. दक्षिण आफ्रिकेतील गांधी आश्रमाची व्याप्ती वाढवली. भारतात परतल्यावर ते समाजकार्यासोबतच लेखन आणि पत्रकारितेकडेही वळले. त्यांनी लिहिलेल्या एका लेखावर संपादकांनी परिचय देताना ‘लेखक महात्मा गांधींचे नातू आहेत’ असा उल्लेख केला. त्यावर या नातवाने थेट संपादकांना ताळय़ावर आणण्यासाठी ‘आजोबांच्या नावाचे भांडवल का करता?’ अशी विचारणा केली. आम्ही नात्याने जरी गांधाजींचे वारस असलो तरी आम्हाला त्यांचा वैचारिक वारसाच अधिक प्रिय असल्याचे सांगितले. त्यांच्या आईचा विचारही ते अनेकदा बोलत, ‘आपले आजोबा सर्वासाठी आदरणीय आहेत. त्यांच्या मोठेपणाच्या छायेत तुम्ही आयुष्यभर जगू शकता. पण या प्रसिद्धीत जगायचे की नवे कार्य उभे करायचे हे तुमचे तुम्ही ठरवा!’ आईने दिलेला हा विचार अरुण गांधी यांनी कायम जपला.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

अरुण गांधी यांनी ‘द गिफ्ट ऑफ अँगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ या स्पॅनिश, तुर्की, डॅनिश, फिनिश, इटालियन आदी भाषांतही अनुवादित झालेल्या पुस्तकासह अनेक पुस्तके लिहिली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकात काही काळ स्तंभलेखनही केले. आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. मात्र ते स्वत:ला शांती पेरणारा शेतकरी (पीस ऑफ फार्मर) असे संबोधत. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ते अनाथ मुलांच्या संगोपनकार्याकडेही वळले. ‘गांधी वल्र्डवाइड एज्युकेशन इन्स्टिटय़ूट’च्या माध्यमातून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी मोठे काम उभे केले. यातूनच कोल्हापुरातील ‘अवनि’ संस्थेशी त्यांचे नाते जुळले. इथे दाखल होणाऱ्या शेकडो अनाथ, वंचित मुलांचे आजोबा होऊन, त्यांच्या प्रगतीसाठी अखंड झटत राहिले. गेली २६ वर्षे हे कार्य करताकरताच या संस्थेतच त्यांनी नुकताच शेवटचा श्वास घेतला. अरुण गांधी हे नात्याने जरी महात्मा गांधी यांचे नातू असले तरी त्यांनी त्यांच्या कार्यातून ते वैचारिक वारसदारही असल्याचे सिद्ध केले.