ली चाइल्ड (कादंबरीकार)
फोर्सिथ यांनी ‘थ्रिलर’चा पारंपरिक साचा मोडीत काढला, पण तरीही ते वाचकांना थरारक अनुभूती देत राहिले. त्यांनी या संपूर्ण साहित्य प्रकारालाच नवे वळण दिले.
जानेवारी १९७२ च्या पहिल्या आठवड्यातल्या दोन गोष्टी मला स्पष्ट आठवतात. सोमवारी मी ड्रायव्हिंगची चाचणी उत्तीर्ण झालो आणि शुक्रवारी वाचनालयात जाऊन फ्रेडरिक फोर्सिथ यांचं ‘द डे ऑफ द जॅकल’ हे पुस्तक आणलं. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी एके दिवशी लेखक होईन. त्यावेळी मी फक्त नवनव्या साहित्याच्या शोधात असणारा उत्सुक वाचक होतो. तो शुक्रवार एका वाचकातून एक लेखक घडविण्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होता, असं आज वाटतं.
मी पुस्तक आधाशासारखं वाचून काढलं. ते विलक्षणच होतं. त्यातली वर्णनं वेगवान, रोमांचकारी, उत्सुकतावर्धक होती. तपशील जिज्ञासा जागवणारे होते आणि मग अचानक प्रश्न पडला, हे पुस्तक नेमकं काय करतंय? ही एकाच वेळी दोन मार्गांनी जाणारी थरारकथा आहे. एक मारेकरी त्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे आणि त्याच वेळी तपास यंत्रणा मारेकऱ्याच्या मागावर आहेत. पण खरे लक्ष्य आहेत- जनरल द गॉल- वास्तवात अस्तित्वात असणारी खरीखुरी व्यक्ती! गॉल हे फ्रान्सचे अध्यक्ष होते आणि १९७० मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत, ते जवळजवळ रोजच बातम्यांमध्ये होते. त्यामुळे वाचकांना आधीच समजलेलं असतं की मारेकऱ्याचा कट फसला. तरीही ‘मारेकरी यशस्वी ठरेल का, की नाही ठरणार,’ ही कोणत्याही थरारकथेसाठी आवश्यक असलेली उत्कंठा कायम कशी राखली गेली?
मुख्य पात्र हे एक अजिबातच न सुटलेलं कोडं होतं. त्याची पाटी कोरी करकरीत होती. कोणतीही पार्श्वभूमी नाही, इतिहास नाही, स्पष्टीकरण नाही, कारण नाही, समर्थनही नाही, वर्णन तर नाहीच, पण नावही नाही. तरीही आपण सर्वजण त्याच्या बाजूने उभे राहतो. मनातल्या मनात आपल्याला त्याचं कौतुक वाटत राहतं. त्याला यश यावं, असं वाटत राहतं.
बहुतेकदा पुस्तकं त्यातल्या विचित्र पात्रांविषयी आपल्या मनात सहानुभूती निर्माण करतात. नंतर त्या पात्रांना एखाद्या मोठ्या धोक्यात घालतात आणि अखेरच्या पानापर्यंत अनिश्चितता कायम ठेवतात. पण फोर्सिथ यांनी हा साचा नाकारला आणि वाचकांना दाखवून दिलं की ‘कसं’ हा प्रश्न कोण, का, कुठे आणि केव्हा या प्रश्नांइतकाच प्रभावी आहे. त्याने दाखवून दिलं की, विचारप्रवृत्त करणारे तपशील आणि आतल्या गोटातली माहिती मुळातच अतिशय आकर्षक असते. त्यांनी या साहित्य प्रकाराचा खेळ पूर्णपणे बदलून टाकला.
मी २०१०च्या सुरुवातीला त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर सहज म्हणून अधुनमधून भेटत राहिलो. एकमेकांना वरचेवर पत्र पाठवत राहिलो. ते टाइप करून ‘स्नेल-मेल’ने पत्र पाठवत. मी ईमेल पाठवत असे आणि त्यांची पत्नी प्रिंटआउट काढून त्यांना देत असे. ‘मी बेरोजगार होतो आणि कंगालही झालो होतो,’ म्हणून लेखन सुरू करावं लागलं, असं ते सांगत. पण सुरुवातीला जम बसवताना अडथळे आले, असं त्यांचं म्हणणं होतं. पत्रकारिता हा त्यांचा पेशा होता. तत्कालीन घटनांबद्दल एका पुस्तकाएवढ्या लांबीचं वास्तव आणि गुन्हेगारीसंदर्भातलं लेखन करण्याची कल्पना, हा त्यांच्यासाठी साक्षात्काराचा क्षण होता. त्यातून त्यांनी एक अशी कादंबरी लिहिली जिने त्यानंतरच्या सर्वांसाठीचे साचेच बदलून टाकले. (‘द गार्डियन’मधून साभार)
व्यक्ति(छाया)चित्र
फ्रेडरिक फोर्सिथ यांच्या मृत्यूनंतर जगभरात त्यांच्यावर वाचनीय मृत्युलेख छापून आले. पण फर्स्ट पोस्टने ‘रिपोर्टर हू सोल्ड सेव्हेण्टी फाइव्ह मिलियन नॉव्हेल्स’ हे व्यक्तिछायाचित्र सादर केले. छायाचित्र आणि अल्पओळींतून तयार झालेले हे व्यक्तिचित्र. फोर्सिथ यांचा आयुष्यपट थोड्या काळात भरपूर माहिती देत मांडणारे.
https://tinyurl.com/bdmdp7nr
खूपविक्या वाचनाचा भारतीय इतिहास…
वामसी जुलौरी हे सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठात माध्यम अभ्यासाचे प्राध्यापक. त्यांचा जन्म आणि उमेदीची वर्षे भारतातली. अर्थातच भारताविषयीची पुस्तकेही नावावर. पैकी हनुमानावरील ‘किश्किंदा क्रॉनिकल्स’ ही वाचक समुदायात बऱ्यापैकी परिचित, तर या जुलौरी यांनी या आठवड्यात ‘ग्रोइंग अप विथ फ्रेडरिक फोर्सिथ’ हा लेख लिहिला. हैदराबादमधील पुस्तक दुकानांपासून सुरू होणारा या लेखाचा प्रवास पुढल्या काळात बदलत जाणाऱ्या भारतीयांच्या इंग्रजी वाचनाचे टप्पे सांगतो. लेख फोर्सिथबद्दलचाच. पण त्याबरोबरच कोणत्या काळात तो भारतीय वाचकांनी कवटाळून धरला, त्याची ही रंजक गोष्ट.
https://tinyurl.com/3b2b6b4v
पत्रकारितेतून घडण्याची गोष्ट…
‘जीबी न्यूज’ या ब्रिटिश वृत्तसेवेने फोर्सिथ यांच्या अलीकडेच घेतलेल्या मुलाखतीचा दुवा तीन दिवसांपूर्वी यूट्यूबवर पुनर्प्रकाशित केला. यात त्यांनी स्वत:च्या लेखनघडणीत पत्रकारिता किती महत्त्वपूर्ण ठरली, हा मुद्दा मांडला आहे. आपल्या पुस्तकांच्या निर्मितीकथा सांगितल्या आहेत.
https://tinyurl.com/2veby4ch