एल. के. कुलकर्णी

पृथ्वी नेमकी कशी निर्माण झाली याबद्दलचे शास्त्रीय विवेचन आणि वेगवेगळ्या धर्म-पंथांमधल्या पुराणकथा ही दोन्ही टोके ज्ञान आणि मनोरंजनाच्या ध्रुवांदरम्यान झुलत आहेत.

Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
nude painting
अन्वयार्थ: असभ्य, म्हणून अश्लील!
reviews of held by anne michaels
बुकरायण : युद्धांनी माणसांवर लिहिलेला इतिहास…
chip industry Chinese
चिप-चरित्र: ड्रॅगनची राक्षसी महत्त्वाकांक्षा!
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

कल्पनेला स्वप्न पडले

चेतनेला जाग आली

काळाच्या काळजात

झंकार उमटला

जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला…

आलोक

पृथ्वीच्या जन्मासंबंधी प्राचीन काळापासून जगभर विविध कथाकल्पना प्रचलित होत्या. उदा. भारतीय पुराणात पृथु नावाच्या राजाने तिला मुलगी म्हणून स्वीकारले म्हणून तिला ‘पृथ्वी’ म्हणतात. एका कथेनुसार दुर्गादेवीने मधु आणि कैटभ या राक्षसांचा संहार केल्यानंतर त्यांच्या मेदापासून पृथ्वी निर्माण झाली म्हणून तिला ‘मेदिनी’ म्हणतात. आणखी एका कथेनुसार विष्णूंच्या नाभीपासून उत्पन्न झालेल्या कमळावरील ब्रह्मदेवाने त्या कमळाची विभागणी तीन भागांत केली. स्वर्ग, आकाश आणि पृथ्वी. ग्रीक पुराणकथेनुसार सृष्टीच्या आरंभी फक्त अंधार होता. त्यात निक्स नावाच्या पक्षाच्या एका सोनेरी अंड्यातून प्रेमदेवता इरॉस बाहेर पडली. अंड्याच्या वरच्या भागाचे आकाश बनले व खालच्या भागाची पृथ्वी बनली. बायबलनुसार देवाने सात दिवसांत विश्व निर्माण केले. तेव्हा पहिल्या दिवशी स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती केली. आयर्लंडमध्ये जेम्स अशर या नावाचे ख्रिाश्चन आर्चबिशप होऊन गेले. त्यांनी तर पृथ्वीची निर्मिती चार हजार वर्षांपूर्वी झाली, असे ओल्ड टेस्टामेंटच्या आधारे १६५० मध्ये एका पुस्तकात जाहीरच केले. पण पृथ्वीवरील सर्वात प्राचीन खडकाचे वय ४३० कोटी वर्षे आहे. म्हणजे पृथ्वी त्याच्याही आधी निर्माण झाली असावी, हे उघड आहे. या विषयासंबंधी असा वास्तव व शास्त्रीय विचार अठराव्या शतकापासून सुरू झाला.

हेही वाचा >>> बुकरायण : युद्धांनी माणसांवर लिहिलेला इतिहास…

१७५४ मध्ये काम्प्ट द बफन या शास्त्रज्ञाने मांडलेला टक्कर सिद्धांत (Collision theory) हा या दिशेने केलेला पहिला प्रयत्न होता. त्यांच्या मते पूर्वी सूर्य एक अतिविशाल वायुरूप गोल होता. त्या वेळी त्याची टक्कर एका विशाल ताऱ्याशी झाली. या टकरीत दोघांच्या पृष्ठभागावरील द्रव्याचे लहान-मोठे थेंब अंतराळात उडाले व थंड होऊन त्यांचे ग्रह बनले. त्यापैकीच एक आपली पृथ्वी. यानंतर इमॅन्युएल कान्ट या जर्मन तत्वज्ञाने १७५५ मध्ये सूर्यमालेच्या निर्मितीसंबंधी काही कल्पना मांडल्या. कान्ट यांच्याच कल्पनेचा विकास करून लाप्लास या प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञाने १७९६ मध्ये एक सिद्धांत मांडला. तो ‘अभ्रिका गृहीतक’ (Nebular hypothesis) म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानुसार पूर्वी सूर्य हा अतिप्रचंड, तप्त विशाल वायुमेघ किंवा अभ्रिकेच्या (Nebulं) रूपात होता. तो वेगाने फिरताना थंड होत गेला. हे होत असताना त्याची स्वत:भोवती फिरण्याची गती वाढत गेली. वाढत्या परिवलन गतीमुळे केंद्रत्यागी बल वाढत गेले. त्यामुळे या अभ्रिकेतील द्रव्य दूर फेकले गेले. त्या द्रव्याचे तुकडे पडून व ते थंड होऊन पृथ्वी व ग्रह निर्माण झाले. पुढे अमेरिकेच्या थॉमस चेंबरलेन व फॉरेस्ट मोल्टन यांनी १९०५ मध्ये ग्रहकणिका सिद्धांत (Planetismal theory) नावाचा सिद्धांत मांडला. त्यानुसार एक वेगाने जाणारा तारा सूर्याच्या जवळून पण त्याच्यावर न आदळता गेला. त्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यावरील वायूच्या धाग्यासारख्या शाखा ओढल्या गेल्या. त्या धाग्यामधील वायू थंड होऊन धनरूप ‘ग्रहकणिका’ तयार झाल्या. अशा अनेक ग्रहकणिकांच्या एकत्रीकरणातून ग्रह तयार झाले व सूर्याभोवती फिरू लागले. त्यापैकीच एक पृथ्वी होय. पुढे १९१९ मध्ये सर जेम्स जीन्स व जेफ्रिज या दोन इंग्रज शास्त्रज्ञांनी ‘भरती सिद्धांत’ (Tidal theory) नावाचा एक सिद्धांत मांडला. त्यात असे मानले आहे की दुसऱ्या एका ताऱ्यामुळे सूर्यावरील द्रव्याला भरती येऊन त्याचा काही भाग सूर्यापासून वेगळा झाला. या वायुरूप धाग्यातील वायू थंड होऊन त्याचे प्रथम द्रवरूप गोळे बनले व ते थंड होऊन ग्रह बनले. या सिद्धांतानुसार सूर्यापासून बाहेर पडणाऱ्या धाग्याचा आकार सिगारसारखा मध्यभागी फुगीर व दोन्ही बाजूस निमुळता होता. त्याचे क्रमाने लहान तुकडे झाले व ग्रह बनले. याचमुळे सूर्यमालेतील ग्रहांचे आकारही बुधापासून गुरूपर्यंत मोठे व पुढे क्रमाने लहान होत गेले आहेत.

याशिवाय पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी इतरही अनेक सिद्धांत मांडले गेले. उदाहरणार्थ रसेल यांचा जोडतारा सिद्धांत ( Binary star theory), रॉस व गन यांचा विखंडन सिद्धांत (Fission therory), ए. सी. बॅनर्जी यांचा सिफाईड सिद्धांत (Cefied theory), फ्रेड होईल व आर. ए. लिटिलटन यांचा नवतारा सिद्धांत ( Nova theory), डॉक्टर आल्फवेन यांचा विद्याुतचुंबकीय सिद्धांत (Electromagnetic theory) इत्यादी. १९४० ते ५० या दशकात संघनन सिद्धांत (Condensation theories) या नावाने पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी काही स्पष्टीकरणे मांडली गेली. ती बऱ्याच प्रमाणात स्वीकारली गेली.

वरील सर्व सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने सूर्यमाला व पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देतात. प्रत्येक सिद्धांतात काही महत्त्वाचे मुद्दे असले तरी प्रत्येकात काही उणिवाही आहेत. पण हे सर्व विचारमंथन आणि भूशास्त्रीय पुरावे, यामधून काही मुद्द्यांबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता निर्माण झाली. ते मुद्दे असे. पृथ्वीची उत्पत्ती सूर्यमाला व इतर ग्रहांसोबत एका अभ्रिकेसारख्या वायुमेघापासून (nebula) झाली. उत्पत्तीनंतर केव्हाही पृथ्वी द्रवरूप नव्हती. ती मुळात अतिशीत होती पण किरणोत्सर्ग प्रक्रिया व हरितगृह परिणामामुळे तिचे तापमान वाढत गेले.

एकूण पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधीचे सध्या मान्य असे स्थूल चित्र पुढीप्रमाणे आहे. पृथ्वीची उत्पत्ती एकाच ताऱ्याच्या उद्रेकातून झाली. त्या ताऱ्याचा स्फोट झाला व त्याचे बरेच द्रव्य अंतराळात विखुरले गेले. मागे राहिलेल्या द्रव्याचे रूपांतर एका अभ्रिकेत झाले. ही अभ्रिका स्वत:भोवती फिरत असताना आकुंचन पावू लागली व तिच्या केंद्रीय भागाचे रूपांतर सूर्यात झाले. त्याच्याभोवती विविध अंतरावरून धूळ व वायू यांचे समुच्चय फिरत होते. त्यांचे संघनन होऊन पृथ्वी व इतर ग्रह तयार झाले.

पृथ्वीच्या जन्माची घटना सुमारे ४५० ते ४६० कोटी वर्षांपूर्वी घडली हे आता जवळपास मान्य झाले आहे. वायूने घेरलेला एक जलविरहित व खडकाळ समुच्चय हे पृथ्वीचे सुरुवातीचे रूप होते. खडकामधील किरणोत्सारी पदार्थ व अंतर्भागातील वाढता दाब यामुळे उष्णता वाढू लागली व तिचे अंतरंग वितळू लागले. अशा प्रकारे द्रवरूप गाभा व भोवताली खडकांचे शिलावरण तयार झाले. उत्पत्तीनंतर पहिल्या १०० कोटी वर्षांत पृथ्वीवर जलावरण व वातावरण तयार झाले. शिलावरण प्लेट्सच्या हालचाली व भूखंड अपवहन होऊन खंड तयार होऊ लागले.

एकीकडे हे सर्व होत असताना २५० कोटी वर्षांपूर्वी केव्हातरी पहिले सजीव आणि नंतर त्यातून प्राणी व वनस्पती निर्माण झाले. त्यांच्यात उत्क्रांती होत, लाखो प्रकारांनी बहरलेली जीवसृष्टी भूतलावर नांदू लागली. एकेकाळचा खडकांचा एक विशाल समुच्चय. उष्ण वितळणारे अंतरंग, उल्कांचा मारा, ज्वालामुखींचे उद्रेक आणि तप्त लाव्हारसाचे पाट, अशा भयंकर अवस्थेत ही धरणी लाखो वर्षे होती. पण पुढे जीवसृष्टीच्या विकासामुळे ती विश्वातील एकमेव जीवधारी ग्रह व चैतन्यमयी भूमाता बनली.

अशी आहे लाखो सजीवांना आणि आपल्या मानव जातीला जन्म देणाऱ्या आपल्या भूमातेच्या जन्माची कहाणी.

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.