वयाच्या ३२व्या वर्षी कसोटी पदार्पण केल्यानंतरही एखाद्याने कसोटी क्रिकेटमध्ये शंभरहून अधिक बळी घेतल्याची उदाहरणे दुर्मिळात दुर्मीळ. भारताचे डावखुरे फिरकी गोलंदाज दिलीप दोशी अशांपैकी एक. १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी पदार्पण केले, त्या वेळी दोन प्रमुख आव्हाने होती. भारताची सुप्रसिद्ध फिरकी चौकडी अस्ताला जात असताना त्यांची जागा घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. तशात बिशनसिंग बेदी या निष्णात डावखुऱ्या गोलंदाजाने निर्माण केलेले वलय भेदून स्वत:चे स्थान निर्माण करणे कर्मकठीण होते.
शिवाय त्या संक्रमण काळात एकदिवसीय क्रिकेटचा प्रभाव वाढू लागला होता. त्यामुळे फिरकी गोलंदाजांची भूमिका धावा रोखण्यापुरतीच मर्यादित ठरत होती. या काळात भारतीय संघाकडून खेळू लागलेले दिलीप दोशी यांची ३३ सामन्यांमध्ये ३०च्या सरासरीने ११४ बळी ही कामगिरी मूळ आकडेवारीपेक्षा किती तरी अधिक दखलपात्र ठरते. त्या काळात कपिल देव यांचाही उदय झालेला होता. पण द्रुतगती कपिल देव यांना फिरकी गोलंदाज असूनही उत्तम साथ दिली, ती दोशी यांनीच. त्यांनी १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ बळीही मिळवले आणि षटकामागे चारपेक्षा कमी धावा दिल्या. तरी फलंदाजी कच्ची होती आणि क्षेत्ररक्षण बेतास बात होते. दोन्ही प्रकारांमध्ये त्यांची फलंदाजी सरासरी पाचच्याही पलीकडे जाऊ शकली नाही. निव्वळ गोलंदाजीच्या जोरावर तिशी ओलांडलेल्या कोणासही कसोटी सामन्यांच्या बाबतीत यापेक्षा अधिक मजल मारता आली नसती. हे वास्तव दोशी यांनी सुरुवातीपासूनच स्वीकारले होते, पण त्याचा परिणाम त्यांनी कामगिरीवर होऊ दिला नाही.
दोशी हे ‘क्लासिकल’ प्रकारातील डावखुरे फिरकी गोलंदाज. मंदगतीने पंचांच्या उजवीकडे मागून सुरुवात करत, पंच व यष्टींच्या मधल्या जागेतून ओव्हर द विकेट ते यायचे. चेंडूला भरपूर उंची देण्याची त्यांची खासियत. फिरकी खूप तीव्र नव्हती, पण टप्प्यावर फलंदाजांना चकवा द्यायचे. चश्मा घातलेली त्यांची छबी, पांढरा शुभ्र पोशाख घातलेला कुणी सरकारी कार्यालयात निघाल्यासारखी भासायची. गोलंदाजी करताना ते दोन्ही हातांनी चेंडू पकडत आणि हातांचे दोन्ही कोपरे सातत्याने वरखाली करत. एकंदरीतच संथगती कारभारात तेवढीच काय ती झटपट हालचाल. दुर्दैवाने त्यांची ही छबी बरीचशी बिशनसिंग बेदी यांच्याशी साधर्म्य दर्शवायची. बेदी अर्थात अधिक धिम्या गतीने खेळपट्टीकडे सरकायचे. गोलंदाजीचे डावपेचही जवळपास सारखेच. त्यामुळे बेदी ऐन भरात असल्यामुळे पद्माकर शिवलकर, राजिंदर गोयल यांच्या वाट्याला आले तसे भोग दोशींच्याही वाट्याला आले असते.
दोशी सौराष्ट्राकडून खेळायचे. पण राष्ट्रीय संघात संधी मिळणार नाही याची चाहूल लागताच त्यांनी इंग्लंडचा रस्ता धरला. या बाबतीत ते समकालीनांपेक्षा वेगळे नि चतुर ठरले. दोशी यांनी प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये सुरुवातीस सौराष्ट्र, पण नंतर बराच काळ बंगालचे प्रतिनिधित्व केले. इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये ते नॉटिंगहॅमशायर आणि वॉर्विकशायरकडून खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी जवळपास ९०० बळी मिळवले. गोयल आणि शिवलकर यांच्याप्रमाणेच, ‘बेदी’युगात संधी न मिळाल्याने निराश न होता दोशी यांनी इतरत्र ठसा उमटवलाच. त्यांचे व्यक्तिमत्त्व विचारी होते आणि मते रोखठोक होती. ऑस्ट्रेलियाचे विख्यात फिरकी गोलंदाज बिल ओरायली, वेस्ट इंडिजचे विख्यात अष्टपैलू सर गारफिल्ड सोबर्स, ब्रिटिश पॉप गायक मिक जॅगर्स हे दोशी यांचे चाहते होते. त्यांना भारतात मात्र चाहते नि प्रभावी हितचिंतक लाभले नाहीत. सुनील गावस्कर यांच्याशी त्यांचे अनेक मुद्द्यांवर तीव्र मतभेद होते. भारतीय क्रिकेट व्यवस्था केवळ धनकेंद्री आहे, असे त्यांचे त्या वेळी मत होते! त्यांच्या अचानक निधनामुळे उमटलेली सार्वत्रिक हळहळ हेच त्यांच्यासाठी आता चिरंतन संचित ठरते.