टायमान ‘९/११’ च्या हल्ल्याबद्दल कोणतं चित्र काढणार, याबद्दल लोकांना अगदी उत्कंठाच वगैरे होती. पण यातलं दृश्य असं कसं? काय संबंध ‘स्टिल लाइफ’शी अमेरिकेवरल्या त्या हल्ल्याचा?

किशोर ठाकूर हे एरवी ब्राँझमध्ये सौष्ठवपूर्ण शिल्पं बनवणारे शिल्पकार. त्यांच्या शिल्पांमध्ये एक रांगडेपणा, मोकळेपणा जाणवतो. पण याच किशोर ठाकुरांनी मुंबईच्या जहांगीर कलादालनात २० वर्षांपूर्वी झालेल्या त्यांच्या प्रदर्शनात मांडलेली एक कलाकृती मात्र निराळी होती- तिरक्या स्टॅण्डवर उभी करून ठेवलेली सायकल, त्यावर अंडी वाहून नेण्यासाठी जे कागदी लगद्याचे ट्रे असतात त्यांची चळत, अशा त्या कलाकृतीत सायकल आणि ते ट्रे या नेहमीच्या वापरातल्या (रेडिमेड) वस्तूंचाच वापर होता. सायकल तश्शी तिरकी उभीच राहील यासाठी तिला जाड धातूच्या दिसेल/ न दिसेल अशा बेमालूम पायावर उभं करणं आणि खरी अंडी न वापरता हुबेहूब तशीच वापरणं, हे किशोर ठाकुरांचं तंत्रकौशल्य… पण या शिल्पाचे कर्ते म्हणून ठाकूर यांना भरभरून दाद द्यावी अशी गोष्ट म्हणजे, सायकलच्या कॅरियरवर ठेवलेल्या त्या दोन ट्रे-चळतींची उंची… ‘नाइन इलेव्हन’ अर्थात ११ सप्टेंबर २०२१ रोजीच्या दहशतवादी हल्ल्यात विमानानं पाडलेल्या ‘ट्विन टॉवर्स’ची आठवण करून देणारी! किशोर ठाकुरांच्या त्या कलाकृतीतून, क्षणभंगुर आयुष्याचं सारच जणू भिडत होतं प्रेक्षकाला… त्या अंड्यांमधल्या जिवांचं जगणं, ती सायकल चालवणाऱ्याचं जिणं, दैनंदिन धकाधकीतले धोके – अशा साऱ्याची सांगड ‘९/११’ सारख्या ‘जगप्रसिद्ध’ घातपातात झालेल्या जीवित/वित्त आणि अभिमानाच्या हानीशी या कलाकृतीतून घातली जात होती. विरोधाभासातून, विषयांतरातून आशय खुलवणारी कलाकृती म्हणून किशोर ठाकुरांची ती सायकल कायम लक्षात राहील.

पण त्या सायकलीचा इथं दिसणाऱ्या चित्राशी काय संबंध?

या चित्रात एक काचेचा ‘वॉटरजग’ दिसतोय, त्यात बहुधा पाणी ४०/४५ टक्के भरलेलं आहे आणि त्याच्या आसपास फळांसारखं, क्रोसाँ/ पावांच्या तुकड्यांसारखं काहीबाही. त्या वस्तू अनाकर्षक ठराव्यात इतक्या साध्या आहेत. ‘स्टिल लाइफ’ अर्थात ‘स्थिर वस्तुचित्रण’ हा चित्रप्रकार महाराष्ट्रात अगदी एलिमेंटरी, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षांमध्येही असतो. तसलंच दिसतंय हे इथलं चित्र. नाही का?

हेही वाचा >>> दिवास्वप्नांना स्वागतार्ह तडे!

नाही, असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे त्या चित्राचा आकार! इथं फोटोत कुणा माणसाचा हातबीत दिसतोय त्यावरनं लक्षात आलंच असेल, पण हे चित्र ३४७ सेंटिमीटर उंची आणि ५०० सेंटिमीटर रुंदीचं आहे… म्हणजे सव्वाअकरा फूट बाय सुमारे साडेसोळा फूट. दहा बाय बाराच्या खोलीपेक्षा लांबरुंद अशा या चित्रात बाकी काहीच नाही. म्हणजे या वस्तू कशावर ठेवल्यात? टेबलावर, की आणखी कुठे, या कशाचंही सूचन चित्रात नाही. सगळाच अवकाश पांढरा.

आणि (तरीही) हे चित्र, समकालीन कलेच्या वाटचालीत लक्षणीय ठरलेल्या चित्रांपैकी एक मानलं जातं. यामागचं कारण त्या चित्राच्या दृश्य-मजकुरात नव्हे, तर संदर्भांमध्ये सापडतं. लुक टायमान (आडनावाचा स्पेलिंगबरहुकूम पण चुकीचा उच्चार ‘टुयमान्स’) हे कॅनव्हासवर तैलरंगांनीच चित्रं रंगवण्याचा निश्चय १९९० नंतरही पाळणाऱ्या मोजक्या युरोप/अमेरिकाप्रसिद्ध चित्रकारांपैकी एक. युरोपातल्या अतिप्रतिष्ठित कलाशिक्षण संस्थांमध्ये (उदाहरणार्थ अॅमस्टरडॅमची राइक्सअकॅडमी) अभ्यागत प्राध्यापक. एकंदर बडं प्रस्थ म्हणावं असं नाव; (तरीसुद्धा) अत्यंत प्रांजळपणे बोलणारे, ‘चित्रकार गेऱ्हार्ड रिख्टर यांनी फक्त रंगचित्रांतच प्रयोग करू इच्छिणाऱ्या आणि चित्राचा सपाट द्विमितपणा महत्त्वाचा मानणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांसाठी वाट रुंद करून दिली’, ‘इंटरनेट आल्यावर आणि कॅमेरावाले फोन सर्वांहाती पोहोचल्यावर दिसण्याचं/ पाहण्याचं महत्त्व टिकवायचं कसं हा माझ्यापुढला महत्त्वाचा प्रश्न असल्याचं मी मानलं’, ‘काही वेळा मुद्दाम इंटरनेटवरूनच एखादी प्रतिमा घ्यायची, ती चित्रामध्ये इतकी बदलवायची की ‘रिव्हर्स सर्च’मध्ये ती अथवा तिच्यासारखी कोणतीही प्रतिमा मिळू नये, असा खेळ मी प्रयोग म्हणून नेटानं केला’, ‘अमेरिकेच्या बर्कले विद्यापीठातल्या माउरो मार्टिनो इटालियन संशोधकानं १९५१ ते २०११ या कालखंडातल्या डेमोक्रॅट व रिपब्लिकन लोकप्रतिनिधींनी कोणत्या केंद्रीय कायद्यांना पक्षीय भूमिका मागे सारून पाठिंबा दिला आणि कुठे पक्षभेद दिसला बिंदु-आलेख २०१५ मध्ये केले होते. ते आडवे आलेख मी उभे केले (या आलेखांमध्ये बिंदू ठसठशीत, पण भूमिका मवाळ झाल्याचे निदर्शक असे फिक्या रंगाचे पारदर्शक फटकारे आहेत) आणि ही मी माझी चित्रमालिका- ‘पोलरायझेशन (२०२१)’ म्हणून प्रदर्शित केली.’ अशा प्रकारच्या कबुल्या दोन/तीन मुलाखतींत लुक टायमान यांनी दिल्या आहेत (आणखी मुलाखतींत आणखी दिल्या असतील! पण मूळचे बेल्जियमचे टायमान यांच्या बऱ्याच मुलाखती फ्रेंच आणि जर्मनमध्ये आहेत).

लुक टायमान यांच्या चित्रकारितेचा परीघ त्यांच्या या कबुल्यांतूनही लक्षात येतो. अशीच एक ‘कबुली’ त्यांनी सोबत दिसणाऱ्या ‘स्टिल लाइफ’बद्दल दिली, त्यामुळे या चित्राचा संबंध ‘९/११’ च्या हल्ल्याशी (आणि या मजकुरापुरता, किशोर ठाकूर यांच्या त्या सायकलीशीही) जोडला गेला.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : बिनकामाचे ‘कौशल्य’!

हे ‘स्टिल लाइफ’ मुळात २००२ सालच्या ‘डॉक्युमेण्टा’ या महाप्रदर्शनात दाखवलं गेलं होतं. नेहमीप्रमाणे जर्मनीच्या कासेल शहरातच तो ११व्या खेपेचा ‘डॉक्युमेण्टा’ जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाला, तोवर ‘९/११’ च्या हल्ल्याला कलाकृतीतून प्रतिसाद देण्यासाठी दृश्यकलावंतांना साताठ महिने तरी मिळालेले होते. ‘डॉक्युमेण्टा’ हे राजकीय/ सामाजिक आशयाच्या कलाकृतींसाठी जगातलं अव्वल महाप्रदर्शन मानलं जात असल्यानं, गुंफणकारांनाही तशी अपेक्षा होती. बरं, लुक टायमान हे जगाशी संबंध जोडू-शोधू पाहणारे… त्यांच्या चित्रांमध्ये १९८० च्या दशकात हिटलरी छळछावण्यांसारखी (पण आता भक्क मोकळ्या दिसणाऱ्या छावण्यांची) दृश्यंही दिसलेली होती, त्यामुळे तर टायमान ‘९/११’ च्या हल्ल्याबद्दल कोणतं चित्र काढणार, याबद्दल लोकांना अगदी उत्कंठाच वगैरे होती. तेव्हा टायमान यांनी लोकांना ‘डॉक्युमेण्टा’त दाखवलं ते हे चित्र. अवाढव्य, पण अनाकर्षक वस्तूंचं चित्रण करणारं चित्र. ते चित्रण अर्थातच भारी ठरणार होतं, कारण रंगांचे छोटे (अर्धा ते अडीच इंचांपर्यंतचे) फटकारे मारणं, त्या हालचालीतून ब्रशचा दाब किती दिला होता याच्याही खुणा दिसणं ही त्यांची शैली याही चित्रात दिसली. शिवाय, चित्रातलं दृश्य ही प्रत्यक्ष वस्तू नाही- त्यात त्रिमितीचा आभास उत्पन्न करण्यासाठी छटाकाम

(शेडिंग) असलं तरीही ते मूलत: द्विमित रंगचित्रच आहे अशी ठाम भूमिकाही या चित्रातून दिसली. पण त्यातलं दृश्य असं कसं?

काय संबंध ‘स्टिल लाइफ’शी अमेरिकेवरल्या त्या हल्ल्याचा?

‘काहीही नाही. कशाला असायला हवा… मी इतक्या झटकन नाही देऊ शकत या हल्ल्याला प्रतिसाद… आणि मी आत्ता प्रतिसाद देऊ शकत नसल्याची कबुली म्हणूनच हे मोठ्ठं चित्र इथं प्रदर्शित करतोय’ अशी कबुलीवजा भूमिका लुक टायमान यांनी मांडली. ती लोकांनी मान्य केली, हे या चित्राला आजही मिळणाऱ्या महत्त्वातून सिद्ध होतंय.

या चित्रासमोर उभं राहण्याचा अनुभव (स्वानुभव) हिंसेचा वा दहशतीचा नव्हता. टायमान यांच्या अन्य ७९ चित्रांसोबत हेही चित्र त्यांच्या सिंहावलोकनी प्रदर्शनात पाहायला मिळालं, पण तेव्हाही – त्याची पूर्वपीठिका माहीत नसतानाही- ते लक्षात राहिलं… आकार इतके मोठे करण्यातून पार निरर्थकता जाणवतेय सगळ्याचीच, असं वाटणं हा ‘जगन्मिथ्या’ संकल्पनेचा आपल्याहीपर्यंत पोहोचलेला खोल ओरखडा असावा असा विचार तेव्हा चमकून गेला होता… या चित्राचा ‘९/११’शी असलेला न्यूनसंबंध बराच नंतर, त्या चित्राबद्दल वाचनबिचन करताना समजला. आता असंही उमगतंय की, रंगचित्रांकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अद्यापही ‘सरळ वर्णन करा राव…’ अशाच असतात. लुक टायमान हे आकृतिप्रधान (फिगरेटिव्ह) चित्रकार असले तरी ते वर्णननिरपेक्ष (नॉन-नॅरेटिव्ह) दृश्यरचना करणारे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ‘दहशत’ किंवा परिणामी झालेली हानी दाखवायची तर अमुकच दृश्य हवं असं ते मानत नाहीत.

‘दिसण्या’च्या आपल्या क्षमतांवर ‘नाव/ वर्णन/ गोष्ट’ यांची असलेली दहशत कमी करण्यासाठी लुक टायमान यांची चित्रं आपल्याला उपयोगी पडतात.