scorecardresearch

अन्वयार्थ: हवाई ‘महाराजां’वर कोणाचे नियंत्रण?

एअर इंडिया कंपनीच्या एका विमानामध्ये मद्यधुंद प्रवाशाने एका वयस्कर महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार धक्कादायक असून, प्रवाशांच्या मुर्दाडपणाबरोबरच उड्डाण कर्मचाऱ्यांमधील प्रशिक्षण, इच्छाशक्ती आणि काही प्रमाणात संवेदनांच्या अभावावरही बोट ठेवणारा ठरतो.

अन्वयार्थ: हवाई ‘महाराजां’वर कोणाचे नियंत्रण?
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

एअर इंडिया कंपनीच्या एका विमानामध्ये मद्यधुंद प्रवाशाने एका वयस्कर महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार धक्कादायक असून, प्रवाशांच्या मुर्दाडपणाबरोबरच उड्डाण कर्मचाऱ्यांमधील प्रशिक्षण, इच्छाशक्ती आणि काही प्रमाणात संवेदनांच्या अभावावरही बोट ठेवणारा ठरतो. सदर प्रकार गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात घडला, पण नुकताच माध्यमांमुळे प्रकाशात आला. एअर इंडियाचे हे विमान न्यूयॉर्कहून नवी दिल्लीकडे येत होते. पीडित महिला ज्येष्ठ नागरिक असून, बिझनेस श्रेणीमध्ये प्रवास करत होती. दुपारच्या वेळी जेवणानंतर दिवे मालवले गेले, एका मद्यधुंद प्रवाशाने संबंधित महिलेच्या आसनाजवळ येऊन मूत्रविसर्जन केले. यामुळे महिलेचे कपडे, बॅग आणि बूट मलिन झाले. यानंतरही तो काही काळ तेथेच तशा आक्षेपार्ह स्थितीमध्ये उभा राहिला आणि नंतर निघूनही गेला. महिलेने याविषयी तात्काळ उड्डाण कर्मचाऱ्यांना अवगत केले. शिसारी आणणाऱ्या या प्रकाराविषयी उड्डाण कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणाऱ्या होत्या. दोषी प्रवाशाचा शोध घेण्याचा कोणताही प्रयत्न न करता, पीडित महिलेला जुजबी बदली कपडे दिले गेले. तिच्या वयाशी पूर्णपणे विसंगत अशी अडचणीची बसण्याची पर्यायी जागा दिली गेली. विमान दिल्लीत उतरल्यानंतरही तिला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. या संपूर्ण प्रकाराची माहिती हवाईसेविका आणि संबंधितांनी तात्काळ विमानाचा कप्तान किंवा मुख्य वैमानिकास देणे अपेक्षित होते. तसे घडले नाही. विमान उतरल्यानंतरही या प्रकाराचे गांभीर्य वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत एकतर पोहोचविले गेले नाही किंवा त्याची म्हणावी तशी दखलच वरिष्ठ पातळीवरून घेतली गेली नाही. या महिलेने एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना याविषयी कळवल्यानंतर प्रकरणाच्या रीतसर चौकशीला सुरुवात झाली.

विमान प्रवासादरम्यान धिंगाणा घालणाऱ्या किंवा आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या प्रवाशांबाबत कोणती कारवाई करावयाची, याविषयीचे धोरण व नियम ठरलेले असतात आणि त्याचे पालन करणे उड्डाण कर्मचारी आणि वैमानिक वर्गासाठी बंधनकारक असते. एअर इंडियातील प्रकाराची माहिती संबंधित वैमानिकास मिळाली असल्यास, त्याने तात्काळ विमानात उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांकरवी दोषी प्रवाशाच्या मुसक्या आवळणे अपेक्षित होते. या प्रवाशाला विमान ईप्सित स्थळी उतरल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या ताब्यात सोपवून प्राथमिक गुन्हा नोंदवून घेण्याची जबाबदारीही विमान कंपनीची असते. परंतु हेही शक्य आहे, की हवाई सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांची दोषी प्रवाशाला जाब विचारण्याची हिंमतच झाली नसावी. इतका गंभीर आणि असाधारण प्रकार घडत असताना, तो एक किंवा दोनच सेवकवर्गाच्या लक्षात आला असेल हे संभवत नाही. आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या प्रवाशाला गाठून जाब विचारण्याची हिंमतच सेवकवर्गाला दाखवता आली नाही, ही शक्यता अधिक. त्याऐवजी सत्तरीतल्या वृद्धेची समजूत घालून तिला जुजबी मदत करण्याचा सोपा मार्ग निवडला गेला.

या ठिकाणी भारतीय विमान प्रवाशांचे – विशेषत: आंतरराष्ट्रीय उड्डाणांतील प्रवाशांचे – वर्तन या कळीच्या मुद्दय़ावर चर्चा घडून येणे अत्यावश्यक आहे. विमानाचे केबिन हे आपले साम्राज्य असते आणि तेथील सेवकवर्ग आपलाच चाकरवर्ग आहे अशा थाटात या देशातील कित्येक जण विमानात शिरतात. कधी काळी एअर इंडिया कंपनीचे बोधवाक्य ‘तुम्हाला आमच्या विमानात महाराजासम वागणूक मिळेल’ असे होते. ते बहुधा काहींनी फारच मनावर घेतले असावे. विमानातील प्रवाशांची वागणूक ही अनेकदा त्या देशातील सामाजिक उतरंडीची निदर्शक असते, असे एक अभ्यास सांगतो. आपल्याकडे आसनस्थ झाल्या-झाल्या सेविकेला फुटकळ कारणांसाठी पाचारण करणे, वारंवार विनंती करूनही आसनपट्टे न बांधणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरास मज्जाव असताना ती हटकून वापरणे, घरच्या जेवणाबाबत करावी तशी खळखळ विमानातील अल्पोपाहाराबाबत करणे असे प्रकार नित्याचे आहेत. तशात आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात मद्य मिळत असल्यामुळे त्याविषयीच्या अवास्तव मागण्या करताना कित्येक मद्यप्रेमींचे ‘मद्यमर्कट’ झालेले दिसून येतात! अशा वेळी उद्दाम प्रवाशांना जाब विचारणे सोडाच, पण समजावून सांगायला जाणाऱ्या विशेषत: सेविकांच्या वाटय़ाला निव्वळ शिव्याशापच येतात. भारतीय हवाई उड्डाण प्राधिकरण, बहुतेक सर्व विमान कंपन्यांची धोरणे याबाबत कडक असली, तरी प्रत्यक्षात सर्वाधिक मनस्ताप सेवकवर्गाच्याच वाटय़ाला येतात.

तेव्हा एअर इंडियातील झाल्या प्रकाराला सर्वाधिक जबाबदार संबंधित कायद्यांच्या अंमलबजावणीविषयी आग्रही नसलेली यंत्रणा आणि या कायद्यांची जराही चाड नसलेला मोठा प्रवासी वर्ग आहे. या हवाई ‘महाराजां’ना आवर कसा घालायचा, हा खरा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 02:27 IST

संबंधित बातम्या