डीरॅम चिपमधली जपानी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी पार्किन्सन बंधूंनी सिम्प्लॉटच्या साथीनं कोणते प्रयत्न केले?

मायक्रॉनही आजघडीला मेमरी चिपची निर्मिती करणारी अमेरिकेतील क्रमांक एकची कंपनी आहे. जगात दक्षिण कोरियाच्या सॅमसंग आणि एसके हायनिक्स या दोन कंपन्यांनंतर मायक्रॉनचा नंबर लागतो. २०२३ साली आपल्या पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यानंतर गुजरातेत मेमरी चिपच्या जुळवणी व चाचणीप्रक्रिया (असेम्ब्ली व टेस्टिंग) करण्यासाठीचा कारखाना उभारण्याची घोषणा मायक्रॉननेच केली होती. चिपनिर्मिती क्षेत्रात मायक्रॉन ही आज एक दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जात असली तरीही तिची सुरुवात अडखळतीच होती.

lal killa India alliance responsibility in parliamentary work after lok sabha election results 2024
लालकिल्ला : सुंभ जळाला तरी पीळ कसा जाईल?
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!
Terror Attacks in Jammu and Kashmir,
अग्रलेख : दहशत आणि दानत!
article about controversy over shaktipeeth highway
अन्वयार्थ – शक्तिपीठ महामार्ग: प्राधान्यक्रमांचा प्रश्न!

जो आणि वॉर्ड पार्किन्सन या जुळ्या बंधूंनी अमेरिकेच्या पश्चिम भागातल्या आयडाहो राज्यात १९७८ साली स्थापन केलेल्या या कंपनीची पुढील दोन एक वर्षांतच जपानी डीरॅम मेमरी चिप-उत्पादक कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देताना पुरती दमछाक झाली होती. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मायक्रॉन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. जपानच्या नाकावर टिच्चून डीरॅम चिपनिर्मिती व्यवसायात यशस्वी होऊन दाखवण्याचा पार्किन्सन्स बंधूंचा निर्धार वाखाणण्याजोगा असला तरीही मायक्रॉनला तारण्यासाठी तो पुरेसा नव्हता. मेमरी चिपनिर्मिती क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी तसंच कंपनीचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मायक्रॉनला पैशांची तातडीची गरज होती. त्यासाठी एक तगडा गुंतवणूकदार शोधणं गरजेचं होतं आणि आयडाहो राज्यात जॅक सिम्प्लॉट इतका सुयोग्य गुंतवणूकदार शोधूनही सापडला नसता.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरुन : आता सगळी मदार विरोधकांवर!

स्वत:च्या शेतात बटाट्याची लागवड करून त्यापासून बनवलेल्या ‘पोटॅटो चिप्स’ मॅकडोनाल्ड, बर्गर किंगसारख्या शीघ्रान्न विकणाऱ्या उपाहारगृहांच्या साखळ्यांना विकून सिम्प्लॉट जरी आयडाहोमधल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनला असला तरीही त्याला सेमीकंडक्टर चिपसारख्या ‘हाय-टेक’ क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसल्यानं पार्किन्सन बंधू त्याच्याकडे मदत मागण्यासाठी फारसे अनुकूल नव्हते. पण मायक्रॉनची स्थापना करतेवेळी प्राथमिक निधीचा पुरवठा करणाऱ्या एका गुंतवणूकदारानं दिलेल्या सल्ल्यामुळे म्हणा किंवा त्या घडीला त्यांच्यापाशी दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे म्हणा, साशंक मनाने पार्किन्सन बंधू सिम्प्लॉटला भेटायला गेले.

व्यक्तिश: पार्किन्सन्स बंधूंना पटत नसला तरीही, अमेरिकी चिप-उत्पादक कंपन्यांचा डीरॅम मेमरी चिपनिर्मितीतून गाशा गुंडाळण्याचा निर्णय तार्किकदृष्ट्या पाहायला गेलं तर चुकीचा नव्हता. ज्या धंद्यात आपला बाजारहिस्सा आणि नफा निरंतर उतरणीला लागला असेल आणि पुढल्या पाच-दहा वर्षांत तो सावरण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नसेल तर अशा क्षेत्रात चिकटून राहण्यात कोणतंही हशील नव्हतं. सिलिकॉन व्हॅलीमधले गुंतवणूकदार, वॉल स्ट्रीटवरले विश्लेषक तसंच या क्षेत्रातील इतर तज्ज्ञांचंही हेच मत होतं. अशा परिस्थितीत जेव्हा डीरॅम चिपनिर्मिती उद्याोग आतबट्ट्याचा व्यवहार ठरत होता आणि सिलिकॉन व्हॅलीमधल्या जवळपास सर्व दिग्गज चिप-उत्पादक कंपन्या या क्षेत्रातून बाहेर पडत होत्या, त्यावेळी सिम्प्लॉटसारख्या मुरलेल्या व्यावसायिकानं मायक्रॉनमध्ये आपल्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य कशाला दाखवावं?

पण उपजतच ‘बनिया बुद्धी’ असलेल्या सिम्प्लॉटनं इतरांप्रमाणे सरधोपट विचार केला नाही. त्याला सेमीकंडक्टर, ट्रान्झिस्टर किंवा एकंदर इलेक्ट्रॉनिक विषयाची पार्श्वभूमी नसल्यानं त्याचे विचार पूर्वग्रहदूषित नव्हते. त्याच्यासाठी ‘पोटॅटो चिप’ काय किंवा ‘सेमीकंडक्टर चिप’, दोन्हीही मूलत: व्यवसायच होते आणि त्यामुळे त्यांच्या परिचालनासाठी किंवा त्यामध्ये करायच्या गुंतवणुकीसाठी असलेले नियम हे एकसारखेच असणार होते.

पार्किन्सन बंधूंशी झालेल्या पहिल्या दोन-तीन भेटींतच त्याच्या लक्षात आलं की गेली काही वर्षं डीरॅम मेमरी चिपच्या कार्यक्षमतेत भरघोस वाढ होत होतीच पण त्याचबरोबर जपानी कंपन्यांनी घाऊक प्रमाणावर उत्पादन करून या चिपच्या किमतीही पुष्कळ कमी करून ठेवल्या होत्या. यामुळे मेमरी चिपचं उपयोजनही विविध क्षेत्रांत व्हायला सुरुवात झाली होती. थोडक्यात एक उत्पादन म्हणून डीरॅम चिप आता नावीन्यपूर्ण (इनोव्हेटिव्ह) उत्पादन राहिलं नव्हतं तर आता ते सहजपणे उपलब्ध असलेलं किफायतशीर असं ‘कमॉडिटी’ उत्पादन बनलं होतं. बटाट्याचे चिप्स आणि मेमरी चिप्स निर्मितीच्या प्रक्रिया विभिन्न असल्या तरीही व्यापक अर्थानं दोनही व्यवसाय हे कमॉडिटी उत्पादनाशी निगडितच होते.

हेही वाचा >>> कलाकारण: रंग उतरेल का हो या कापडाचा?

कमॉडिटी वस्तूंच्या धंद्यात पारंगत असलेल्या सिम्प्लॉटला आता मेमरी चिपनिर्मितीमध्ये व्यावसायिक संधी दिसू लागल्या. तो हे जाणून होता की कोणत्याही प्रकारच्या कमॉडिटी उत्पादनाशी निगडित असलेल्या व्यवसायात उतरण्याची किंवा त्याला विकत घेण्याची सर्वोत्तम वेळ यायला दोन गोष्टींची पूर्तता व्हावी लागते – (१) जेव्हा त्या वस्तूची किंमत मुबलक उपलब्धतेमुळे उतरणीला लागलेली असते, आणि (२) त्या व्यवसायात असलेल्या टोकाच्या स्पर्धेमुळे त्यात कार्यरत असलेल्या बहुतेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात किंवा त्यांनी त्या व्यवसायाला कायमस्वरूपी सोडचिठ्ठी दिलेली असते. डीरॅम चिपच्या बाबतीत वरील दोनही अटींची शत प्रतिशत पूर्तता होत होती. इथेच सिम्प्लॉटने मायक्रॉनमध्ये गुंतवणूक करण्याचा निश्चय पक्का केला.

त्याचबरोबर आयडाहो राज्यात चिपनिर्मितीसारखा हाय-टेक व्यवसाय करणं परिचालनाच्या दृष्टीनं सिलिकॉन व्हॅलीच्या तुलनेत पुष्कळ स्वस्त होतं. पार्किन्सन बंधूंच्या सेमीकंडक्टर तंत्रज्ञानातल्या पात्रतेचा तसंच त्यांच्या कंपनीसंबंधातील धोरणांचा आणि मेमरी व्यवसायात टिकून राहण्याच्या तत्त्वनिष्ठेचा एकंदरच सिम्प्लॉटवर सकारात्मक प्रभाव पडला होता. या सर्वांमुळे पार्किन्सन बंधूंशी चर्चेच्या काही फेऱ्यांनंतर सिम्प्लॉटनं मायक्रॉनमध्ये लगेच १० लाख अमेरिकी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयावर चिपनिर्मिती क्षेत्रातल्या इतर कंपन्यांच्या नेतृत्वाकडून किंवा अन्य विश्लेषकांकडून प्राप्त झालेल्या नकारात्मक प्रतिक्रियांचा जराही परिणाम सिम्प्लॉट, पार्किन्सन बंधू किंवा मायक्रॉनमधील उच्चपदस्थांवर झाला नाही. सिम्प्लॉटनं गुंतवणूक केलेल्या दिवसापासून कंपनीचं धोरण अत्यंत स्पष्ट होतं – ‘सर्वोत्तम गुणवत्तेचं उत्पादन कमीतकमी खर्चात तयार करणं’. जपानी स्पर्धेसमोर टिकून राहायचं असेल तर हे धोरण अंगीकारण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे ‘खर्चात कपात’ (कॉस्ट कटिंग) हा मायक्रॉनसाठी परवलीचा शब्द बनला. या गोष्टीचा ध्यास हा केवळ सिम्प्लॉट, पार्किन्सन बंधू किंवा अन्य उच्चपदस्थांपुरताच सीमित नव्हता; तर कंपनीतील प्रत्येक कर्मचारी त्याच्या दैनंदिन कामकाजात खर्चात कपात करण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागला.

अशा ध्यासामुळे जरी मायक्रॉन डीरॅम चिप या कमॉडिटी वस्तूच्या उत्पादनाचं कार्य करत असली तरीही त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये मात्र कंपनी नावीन्यपूर्णतेचा अंगीकार करत होती. आणि याबाबतीत मायक्रॉनचा हात सिलिकॉन व्हॅलीतल्या कंपन्याच काय, जपानी कंपन्याही धरू शकल्या नसत्या. त्यावेळी सर्व चिप कंपन्यांचं लक्ष हे चिपची साठवण-क्षमता किंवा वेग वाढवण्यासाठी त्यातल्या ट्रान्झिस्टर किंवा कॅपॅसिटरचा आकार कमीतकमी करण्यावर केंद्रित झालं होतं. हे साध्य करण्यासाठी प्रगत फोटोलिथोग्राफी किंवा तत्सम उपकरणांची गरज होती, जी अत्यंत खर्चीक गोष्ट होती. मायक्रॉनची सांपत्तिक स्थिती अशी प्रगत उपकरणं खरेदी करण्याइतकी सक्षम नक्कीच नव्हती. त्यामुळे ट्रान्झिस्टरचा आकार कमी करण्याऐवजी चिपचा आकार कमी कसा करता येईल यावर मायक्रॉननं लक्ष केंद्रित केलं. या प्रयत्नांचा फायदा म्हणजे एका सिलिकॉनच्या चकतीवर अधिक संख्येनं चिपची निर्मिती करणं शक्य झालं असतं, ज्यामुळे चिपनिर्मिती प्रक्रियेची कार्यक्षमता तर वाढलीच असती, पण सिलिकॉन चकत्या कमी संख्येनं लागल्यामुळे खर्चातही कपात करणं शक्य झालं असतं.

खर्चात कपात करण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे मायक्रॉननं चिप-उत्पादन प्रक्रियेत लक्षणीय संख्येनं कमी केलेले टप्पे! जितके टप्पे कमी, तितका उत्पादनाला कमी वेळ तर लागणारच होता, पण त्याचबरोबर कमी उपकरणंही लागली असती म्हणजेच खर्चात कपात! कमी टप्प्यांमुळे संपूर्ण चिपनिर्मिती प्रक्रियेमध्ये चुकांची शक्यताही पुष्कळ कमी झाली असती, म्हणजेच कार्यक्षम उत्पादनाबरोबरच कच्च्या मालाचा कमी अपव्यय होऊन पुन्हा एकदा खर्चात कपात झाली असती.

एका वेळेला किती सिलिकॉनच्या चकत्या मशीनमध्ये चढवू शकतो यातही मायक्रॉनने पुष्कळ सुधारणा केल्या. इतर चिपनिर्मिती कंपन्या जिथे जेमतेम १५० चकत्या एका वेळेला चिपनिर्मिती यंत्रात चढवू शकत, तिथे मायक्रॉनची मजल २५० हूनही अधिक चकत्यांपर्यंत गेली होती. अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यात मायक्रॉननं चिपनिर्मितीसाठी लागणारा वेळ कमी करून खर्चात लक्षणीय कपात करून दाखवली होती. पार्किन्सन बंधूंची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि सिम्प्लॉटचं व्यावसायिक कौशल्य या जोरावर मायक्रॉननं डीरॅम चिपमधली जपानी मक्तेदारी यशस्वीरीत्या मोडून काढली. अमेरिकी चिप उद्याोगाचं पुनरुत्थान व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यात मायक्रॉनचा सिंहाचा वाटा होता.

चिप उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.