‘वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’, ‘दोघी’ किंवा ‘गणरंग’ या नाटकांमुळेही गंगाराम गवाणकर यांना ‘यशस्वी नाटककार’ म्हणून ओळखले गेले असते, पण ‘वस्त्रहरण’मुळे त्यांना कीर्ती मिळाली आणि ते ‘मालवणी नाटकांचे जनक’ ठरले. हे नाटक खरे तर १९७५ सालचे; त्यात मच्छिंद कांबळी १९८० पासून आले.

त्याआधी राजा मयेकर यांचे दिग्दर्शन आणि त्यांचीच प्रमुख भूमिका (पांडूतात्या सरपंच) असलेले हे मालवणी नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आपटले, म्हणून आंतरगिरणी नाट्य स्पर्धा आणि कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेत सादर झाले, तिथल्या बक्षिसांत बाजी मारल्याने ‘दूरदर्शन’वरून ते दिसले. पुन्हा व्यावसायिक रंगभूमीवर आले, तेव्हा पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या कौतुकानंतर ते चालू लागले. पुलंनी केलेले हे कौतुक बोली भाषेत प्रयोग करण्याच्या धाडसाचे होते, तसेच पात्रांच्या अस्सलपणाचेही होते. ही सारी अस्सल पात्रे- विशेषत: तात्या सरपंच- माडबन (ता. राजापूर) या गावातच गवाणकरांनी पाहिली होती.

माडबन हे अलीकडल्या काळात जैतापूर प्रकल्पास झालेल्या विरोधामुळे चर्चेत आलेले गाव. ‘त्याचे मूळ नाव ‘गवाणे’ आणि तिथले खोत म्हणून आम्ही गवाणकर’ हे गंगाराम गवाणकर यांनी ‘व्हाया वस्त्रहरण’ या आत्मचरित्रात विस्ताराने लिहिले आहे. पण खोती नावापुरतीच. वडिलांना मुंबईतही व्यसनापायी नोकरी गेल्याने फिरता चहा विक्रेता म्हणून गुजराण करावी लागत होती. गावातल्या शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले, पण वयाच्या १५- १६ व्या वर्षी ते वडिलांकडे मुंबईत आले.

चहावाला व्हायचे नाही, या हट्टापायी माल उचलण्याची कामेही गावच्या आखाड्यात बऱ्यापैकी शरीर कमावलेल्या गंगाराम यांनी केली. तोवर वडिलांनी कुणालातरी सांगून माझगावच्या रात्रशाळेत प्रवेश मिळवून दिल्यामुळे, शिक्षण घेणाऱ्या या मुलाला कंत्राटदारानेच मुनीमकीचे काम दिले. याच रात्रशाळेत लेखनगुणांचा प्रकाश निबंधांतून दिसला, वि. स. खांडेकरांनी केलेल्या कौतुकातून फुलला. इथेच चित्रकलेलाही वाव मिळाला आणि मॅट्रिकनंतर ‘चित्रकला शिक्षक होण्यासाठी’ गवाणकरांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदविका मिळवली. याच काळात नाटकाची आवड जागी झाली. गवाणकर ‘पंधरा रुपये नाइट’ मिळवत बॅकस्टेजची कामेही करू लागले. पुढे टपाल खात्यात मिळालेली नोकरीसुद्धा ‘राजासारखी’ करून नाटकांसाठीच ते वेळ देऊ लागले.

लहान वयातच टक्केटोणप्यांचे दशावतार पाहताना, कुणाशी कसे वागायचे हे ठरवावेच लागल्याने गंगाराम गवाणकरांची निरीक्षणशक्ती वाढली असावी. ती पुढे नाटककार म्हणून कामी आली. एकंदर १६ नाटके त्यांनी लिहिली, पण व्यावसायिक रंगभूमीपर्यंत यातली काही आलीही नाहीत. जी आली ती फार कमी प्रयोगांत बंद पडली. तरीही मनोहर नरे, रणजीत मसुरकर यांसारख्या निर्मात्यांची साथ मिळत राहिली आणि जिद्दीने गवाणकर लिहीत राहिले. ‘वस्त्रहरण’ची पुलंनी केलेली प्रशंसा आणि पुढे त्या नाटकाचे यश यांमुळेच ९६ व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे (२०१६) अध्यक्षपद आपल्याला मिळाल्याचे सांगण्याची विनम्रता गवाणकरांकडे होती. ‘मालवणी स्वभावाचा अर्क’ म्हणजे काय, याची जाण त्यांना होती आणि तीही ‘व्हाया वस्त्रहरण’ या आत्मचरित्रात आलेली आहे. राम नगरकरांच्या ‘रामनगरी’प्रमाणेच, मध्यमवर्गीय चौकटीबाहेरच्या कलावंताने स्वानुभवातून निर्माण केलेला तो सामाजिक दस्तावेज म्हणजे ‘व्हाया वस्त्रहरण’. हे पुस्तक वाचताना कलावंताची जिद्द काय असते याचे भान येणे, ही गवाणकरांना खरी आदरांजली ठरेल.