scorecardresearch

साम्ययोग : पसायदान ते जय जगत्

लोकमान्यांनी संत साहित्याचे सखोल अध्ययन केले नव्हते तरी ते संतांच्या योगदानाचे महत्त्व जाणून होते

साम्ययोग : पसायदान ते जय जगत्
(संग्रहित छायाचित्र)

मराठय़ांचा इतिहास लिहिताना जेम्स ग्रँट डफ यांनी युद्धकेंद्री भूमिका घेतली. त्या मांडणीला उत्तर म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ हे पुस्तक लिहिले. त्याच वेळी इतिहासाचार्य राजवाडे यांनी समाजाच्या अवनतीसाठी संतांना जबाबदार धरले. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून न्या. रानडे आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुढे आले.

लोकमान्यांनी संत साहित्याचे सखोल अध्ययन केले नव्हते तरी ते संतांच्या योगदानाचे महत्त्व जाणून होते. गांधीजींनी तर आश्रम भजनावलीमध्ये मराठी संत वाङ्मयाचा जाणीवपूर्वक समावेश केला. तुकोबांचे अभंग अनुवादित केले. विनोबांनी इतिहासाचार्य राजवाडे यांचे महत्त्व सांगत त्यांनी संतांवर केलेल्या टीकेच्या मर्यादा दाखवून दिल्या.

हे सर्व आधुनिक भारताचे नेते संतांचे ऋणाईत होते. त्यांना अध्यात्माचे अधिष्ठान लाभले होते आणि त्याच वेळी ते सक्रिय राजकारणात आघाडीचे नेते म्हणून जनमान्य होते. परकीय आक्रमणाच्या काळात संतांनी समाजाचे चैतन्य जागे ठेवले. स्वातंत्र्य संग्रामात वरील नेत्यांना अध्यात्माचा आणि परंपरेचा जराही विसर पडला नाही.

आधुनिक काळातील या नेत्यांची मांदियाळी सर्वोदयाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या जोडली आहे हे सहजपणे ध्यानात येते. हे नेते काँग्रेसशीही संलग्न होते. संत बहिणाबाई सिऊरकर यांचा ‘संतकृपा झाली..’ हा प्रसिद्ध अभंग वर आलेल्या नामावलीतील नेत्यांनाही लागू होतो.

उभा महाराष्ट्र जेव्हा थंड गोळा झाला होता तेव्हा त्यात चैतन्य आणण्याचे कार्य माधवरावांनी केले हे लोकमान्यांचे मत प्रमाण मानले तर स्वराज्य आणि सर्वोदय विचारांचे बीज न्यायमूर्तीनी रुजवले असे म्हणावे लागते. न्यायमूर्ती आले की नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे नाव आपोआप येते. शांत पण ठाम असणारा हा राजकीय मुत्सद्दी न्यायमूर्ती रानडे यांच्या आध्यात्मिक संस्कारातच वाढला होता.

स्वराज्याची प्रेरणा महाराष्ट्रातील आणि देशातील बहुजनांपर्यंत नेण्याचे कार्य विठ्ठल रामजी यांनी केले. त्यांचा ‘बहुजन समाज पक्ष’ सात्त्विकतेच्या पायावर उभा होता. लोकमान्यांच्या राजकारणाबाबत मतभेद असले तरी त्यांचा व्यासंग आणि गीतेवरील त्यांची अभंग निष्ठा नाकारता येत नाही. सामाजिक प्रश्नांवरील त्यांची मते काहीही असोत पण तात्त्विक पातळीवर ते ‘साम्यनिष्ठ’ होते. शिवाय लोकमान्य होण्यासाठी परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालावाच लागतो.

महात्मा गांधी म्हणजे राजकीय आणि आध्यात्मिक परंपरेचा महासमन्वय होता. सर्वोदय ही त्यांची देणगी असली तरी तिच्यावरील पूर्वसुरींचा प्रभाव स्पष्ट दिसतो.

ही परंपरा विनोबांनी नेमकी ओळखली होती. साधारणपणे संत एकनाथांपासून विनोबांचे राजकीय चिंतन सुरू होते. संत एकनाथांची झलक त्यांना न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये दिसली. तुकोबा आणि समर्थ हे त्यांच्या दृष्टीने नाथांचे मानसपुत्र होते. या दोहोंची आध्यात्मिक भूमिका एक होतीच पण समाजाची घडण करण्याची रीतही समान होती. थोडक्यात ही मांदियाळी विचाररूपाने ‘सर्वोदय समाज’ स्थापनेच्या बैठकीला उपस्थित होती.

सर्वोदय म्हणजे गांधी, रस्किन पुढे विनोबा हे खरे आहेच तथापि तत्पूर्वीच्या अनेकांचा सर्वोदयाची जडणघडण करण्यात फार मोठा वाटा आहे. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे पारतंत्र्यात स्वराज्य हा मंत्र होता आता स्वराज्य मिळाल्यावर सर्वोदयाचे ध्येय गाठायचे आहे. हे ध्येय गाठण्यासाठी साम्ययोग हा मार्ग आहे. एकदा साम्ययोगाचा पर्याय स्वीकारला की भव्य असणाऱ्या भारतीय परंपरेचा आधार घ्यावाच लागतो.

त्यामुळे ज्ञानोबा ते विनोबा अथवा विचार म्हणून पसायदान ते जय जगत् हा मेळ म्हणजे निव्वळ योगायोग नाही. अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about vinoba bhave contribution to indian society zws

ताज्या बातम्या