फ्रान्त्झ काफ्काच्या स्मृतिशताब्दीनिमित्त, त्याच्या वर्तमान अमेरिकी वाङ्मयीन वारसदारांच्या या कथा…

जर्मन लेखक फ्रान्त्झ काफ्काची स्मृतिशताब्दी या महिन्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जात आहे. म्हणजे युरोपात तर एप्रिल महिन्यापासूनच काफ्का महोत्सव वगैरेचे आयोजन झाले. जून महिन्यात काफ्काच्या साहित्यावरील व्याख्यानांपासून ते त्याच्या साहित्यातील मौलिक उताऱ्यांच्या वाचनापर्यंत कार्यक्रम देशोदेशी होताहेत. मृत्यूपूर्वीच्या आजारपंथात ज्याने आपली एकूणएक लेखनसाधना जाळून टाकण्याचे आदेश मित्राला दिले, त्या मित्राने काफ्काच्या इच्छेशी प्रतारणा करून त्याला सर्व खंडांत अजरामर करून टाकले. काफ्काचा हा मित्र लेखकच होता. मॅक्स ब्रॉड त्याचे नाव. त्याच्या ‘प्रतारप्रेरणे’तून काफ्का वाचकांना कळाला आणि पुढे काफ्काच्या साहित्याला मुरवत मुरवत ‘काफ्काएस्क’ हा शब्द जगाने तयार केला. इंग्रजी शब्दकोशांत या शब्दाचा- विशेषणाचा- अर्थ सापडतो. पण तसा अर्थ न जाणणाराही प्रत्येकजण आयुष्यात अनेकदा ‘काफ्काएस्क’ परिस्थितीतून गेलेलाच असतो! अतिशय भयावह आणि विचित्र परिस्थितीत-संकटात अडकलेल्या व्यक्तीची स्थिती दर्शविणाऱ्या या शब्दाचा अर्थ सर्वव्यापी आहे. जगभरच्या साहित्याने, सिनेमाने ‘काफ्काएस्क’ स्थितीचा वारसा इतका नेटाने चालविला की गेल्या शंभर वर्षांत ‘काफ्का मेलाच कुठे होता?’ असा प्रश्न पडावा. क्वेन्टीन टेरेन्टीनोच्या फसलेल्या दरोडेपटांतील गुन्हेगार काय किंवा ‘जाने भी दो यारों’ या सिनेमातील दोन नायकांसह प्रत्येक व्यक्तिरेखा ‘काफ्काएस्क’ स्थिती विशद करण्यात गुंतलेला दिसतो. (अशी चित्रपटोदाहरणे कित्येक सांगता येतील. पण) या टिपणाचा विषय हा काफ्काच्या मृत्यू शताब्दीनिमित्ताने खास तयार झालेल्या कथागुच्छाविषयी आहे.

‘ए केज वेण्ट इन सर्च ऑफ ए बर्ड : टेन काफ्काएस्क स्टोरीज’ या नावाचा कथासंग्रह काही दिवसांपूर्वी कॅटापुल्ट बुक्सतर्फे प्रकाशित झाला. वॉशिंग्टन पोस्टच्या नॉनफिक्शन एडिटर बेक्का रोथफिल्ड यांची या संग्रहाला प्रस्तावना आहे. या संग्रहासाठी एकत्र करण्यात आलेले सर्व कथालेखक हे सुपरिचित आणि नावाजलेले आहेत. ब्रिटिश लेखिका ॲली स्मिथ, सध्या गाजत असलेला अमेरिकी लेखक टॉमी ऑरेंज, नायजेरियन-ब्रिटिश लेखिका हेलेन ओयेमी, चिनी वंशाची अमेरिकी लेखिका यियन ली, रशियन पुस्तकांची अमेरिकी अभ्यासक- कादंबरीकार आणि न्यू यॉर्करची पत्रकार एलिफ बाटूमन आदी दिग्गज यात आहेतच. पण अमेरिकी पटकथाकार म्हणून गेल्या तीन दशकांत सर्वाधिक गाजलेला चार्ली कॉफमनदेखील आहे. त्याची ‘धिस फॅक्ट कॅन इव्हन बी प्रूव्ह्ड बाय मिन्स ऑफ द सेन्स ऑफ हिअरिंग’ ही दीर्घशीर्षकी दीर्घकथा इथे आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘काफला’ ते भस्म

कॉफमन या नावाचे अमेरिकी सिनेमाक्षेत्रात वलय इतके मोठे आहे, की त्याने काफ्काएस्क कथांच्या गुच्छात आपली कथा देणे हेदेखील बातमीच्या ताकदीचे. फारसा सिनेमा न पाहता फक्त वाचणाऱ्यांना कोण हा चार्ली कॉफमन असा प्रश्न पडला असेल, तर ‘इटर्नल सनशाइन ऑफ स्पॉटलेस माइंड’, ‘बीइंग जॉन माल्कोविच’, ‘ॲडाप्टेशन’ या चित्रपटांचा पटकथाकार. याने ‘सिनेकडकी न्यू यॉर्क’ (Synecdoche, New York) हा चित्रपटही दिग्दर्शित केला. याशिवाय अलीकडेच ‘ॲण्टकाइण्ड’ ही कादंबरी लिहिली आहे. सारेच विचित्र आणि विक्षिप्त गटात मोडणारे त्याचे काम. ‘बीइंग जॉन माल्कोविच’मधला जॉन माल्कोविच या हॉलीवूड अभिनेत्याच्या डोक्यात काही मिनिटांसाठी शिरकाव करण्याचे प्रकरण, ऑर्किड फुलांवर न्यू यॉर्करच्या सूझन ऑर्लिन यांनी लिहिलेल्या पुस्तकाची कठीण रूपांतर प्रक्रियेची कहाणीच चित्रपटाच्या पटकथेत उतरवणारा ‘अॅडाप्टेशन’ हे सिनेमा कल्टहिट ठरलेत. कॉफमनच्या या आणि इतर चित्रपटांमधील विक्षिप्ततेत समानता काय असेल तर त्यातील व्यक्तिरेखा बहुतांशवेळा ‘काफ्काएस्क’ अवस्थेत दिसण्यातली.

आता इतक्या लोकप्रिय पटकथाकाराने कथा लिहून काफ्काला आदरांजली वाहण्याच्या उपक्रमात भाग घेऊनही आणखी एक गंमत केलीच आहे. या पुस्तकाचे स्वरूप दहा कथाकारांच्या कथा, त्याला प्रस्तावना, काफ्काची काही गाजलेली उद्धृते. लेखकांची ओळख अशी आहे. तर इतर लेखकांची ओळख त्यांच्या कथा-कादंबऱ्यांच्या नावांपासून ते त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीपर्यंत आहे. फक्त चार्ली कॉफमनची ओळख ‘प्रस्तुत पुस्तकातील एका कथेचा लेखक’ अशी करून देण्यात आली आहे. (ही कॉफमनच्या आग्रहास्तव केली असणार यात शंकाच नाही) काफ्काच्याच एका प्रसिद्ध उद्धृताचा वापर करून कॉफमनच्या या कथेचे शीर्षकच सजले नाही, तर कथाही उतरलेली आहे.

या कथेत नुकतेच पुस्तक प्रसिद्ध झालेला एक लेखक आहे. पुस्तक प्रकाशनाच्या घटनेनंतर अचानक त्याला जाणीव होते की आपण अनवधानाने किंवा अतिसहजपणे काफ्काच्या भाषेचे अनुकरण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये करू लागलो आहोत. या जाणिवेने उलटेपालटे होणारे लेखकाचे आयुष्य कॉफमनने पुढे रंगवत नेले आहे.

शेवटाला असलेल्या या कथेपर्यंत जाण्याआधी याच संग्रहात ‘टॉमी ऑरेंज’च्या ‘द हर्ट’सारखे मोठे आकर्षण आहे. या शीर्षनामाचा जवळपास करोनासारखा नवा विषाणूू जगाला घेरून बसलेला असताना उडणाऱ्या त्रेधा-तिरपिटीची अवस्था न्यू यॉर्कच्या ‘अमेरिकन म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’मधल्या निअँडरथाल आदिमानवाच्या तोंडून टॉमी ऑरेंजच्या कथेत आली आहे.

याखेरीज एका कथेमध्ये घरमालकाने कोंडून ठेवलेला भाडेकरू, तर दुसऱ्या कथेत करोनानंतरच्या परिस्थितीत उघडलेल्या वस्तुसंग्रहालयात घडणारे नाट्य आहे. एक कथा नाटकासारख्या निवेदन घाटातही सादर झाली आहेे. साऱ्यांमधील समानपण हे वाचकाला काफ्काच्या अतिवास्तववादी लेखनस्मृतींशी जोडून देणारे आहे. काफ्काच्या व्यक्तिरेखांना जिवंतच ठेवण्याचा विडा गेल्या शतकभरात कोरियन, चिनी, अमेरिकी, दक्षिण अमेरिकी (अशा कुठल्याही देशाच्या आणि तिथल्या भाषेच्या) लेखकांनी उचललेला पाहायला मिळतो. मराठीत सारंगांनी ग्रगर साम्साला जसे आणले, तसेच जपानीत मुराकामीने ‘साम्सा इन लव्ह’ नावाची दीर्घकथाच लिहिली आहे. त्याच्या एका कादंबरीच्या शीर्षकातच काफ्का आलेला आहे. ‘ए केज वेण्ट इन सर्च ऑफ ए बर्ड’ हे काही खूपविके बनू शकणारे पुस्तक नाही. पण काफ्काप्रेमींना आवडू शकणारे नक्कीच आहे. इतरांना मृत्यूपश्चात शंभर वर्षांनंतरही एखाद्या लेखकाचा प्रभाव कसा टिकून राहू शकतो, याची कथारूपी समज यातून येऊ शकेल.

हेही वाचा…

टेड चँग या अमेरिकी विज्ञानकथा लेखकाला कथांसाठी पेन फॉकनर जीवनगौरव पुरस्कार या आठवड्यात जाहीर झाला. बहुतांश मराठी वाचकांना हे नाव परिचित नसले, तर काही वर्षांपूर्वी ऑस्कर स्पर्धेत गाजलेला ‘अरायव्हल’ हा चित्रपट या लेखकाच्या ‘स्टोरी ऑफ युअर लाइफ’वरून बेतला होता. पुरस्कारानिमित्ताने या लेखकाची अधिक ओळख करून देणारे विस्तृत वृत्त.

https://shorturl.at/VUq5e

व्ही.व्ही. गनेशनाथन या श्रीलंकेच्या लेखिका. या आठवड्यात प्रकाशझोतात आल्या त्या ३० हजार पौंड रकमेच्या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केल्यावर. गेली वीस वर्षे त्या श्रीलंकेतील धुमश्चक्रीपूर्ण वातावरणावर लिहीत आहेत. ‘ब्रदरलेस नाइट’ या त्यांच्या कादंबरीचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या लेखनाचा नमुना म्हणून त्यांची ‘द मिसिंग आर कन्सिडर्ड डेड’ ही कथा इथे वाचता येईल.

https://shorturl.at/Dlnfj

जून महिना अमेरिकेसाठी उन्हाळसुट्टीच्या आरंभाचा आणि त्यात पुस्तके अक्षरश: खाण्याचा म्हणून ओळखला जातो. या सुट्टीत सर्वाधिक नवी पुस्तके दाखल होतात. यंदाच्या खास उन्हाळपुस्तक याद्या सुरू झाल्या असून ही त्यातल्या त्यात सर्वात मोठी. यातील निम्मी (उन्हाळसुट्टी नसली तरी) आपल्याही दुकानांत दाखल होणारी इतक्या महत्त्वाच्या लेखकांची असल्याने वाचणे आवश्यक.

https://shorturl.at/GIoXS