रवींद्र माधव साठे

हिंदूंची बांधिलकी गुणात्मकतेशी व सांस्कृतिक जीवन मूल्यांचा निकष ठरलेल्या आदर्शाशी आहे. हिंदूत्व ही एक जीवनपद्धती आहे..

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

भारताचा विचार केला तर इथे प्राचीन काळापासून अनेक भाषा, संप्रदाय, रुढी व चालीरीती आहेत, परंतु या सर्वाना बांधून ठेवणारे आणि एकत्वाची भावना निर्माण करणारे जे चैतन्य तत्त्व आहे त्याचे नाव ‘हिंदूत्व’ आहे.

हिंदू हा शब्द उच्चारताक्षणी गेल्या काही हजार वर्षांपासून चालत आलेला हिंदूंच्या तेजस्वी परंपरेचा साक्षात्कार होतो. या ‘हिंदू’ शब्दापासूनच ‘इंडस’ झाला. ‘इंडस’ पासून ‘इंडियन’ झाले आणि ‘इंडियनचे’ भाषांतर ‘भारतीय’ झाले. भारतीय शब्दाला प्रादेशिक अर्थ अधिक  असून ‘हिंदू’ या विशेषनामाला एक गुणात्मक अर्थ प्राप्त झाला आहे. अती प्राचीन काळापासून आजपर्यंत इथे जे तत्त्वज्ञान, कला, साहित्य निर्माण झाले ते सर्व ‘हिंदू’ या नावाशी निगडित झाले आहे. येथील किंवा विदेशातील विद्वान जेव्हा ‘इंडियन हिस्ट्री’, ‘इंडियन फिलॉसॉफी’, ‘इंडियन लिटरेचर’ असा शब्दप्रयोग करतात तेव्हा त्यांच्या कल्पनेत ‘इंडियन’चा अभिप्रेत अर्थ ‘हिंदू’ हाच असतो.

भारतीय तत्त्वज्ञान म्हटले की त्यात केवळ हिंदूचेच ‘षट्दर्शन’ येते. भारतीय इतिहास म्हटला तर त्या ग्रंथांमध्ये वैदिक काळ ते चंद्रगुप्त, पुलकेशी, विक्रमादित्य, अशोक, पृथ्वीराज, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी, बाजीराव इत्यादींपर्यंत हजारो वर्षांची जी ऐतिहासिक परंपरा आढळते ती हिंदूंचीच आहे. भारतीय शब्दाला जेव्हा आपण गुणात्मक अर्थ देतो तेव्हा त्याचा अर्थ ‘हिंदू’ असाच होतो. हिंदू शब्दाला विशिष्ट अशा जीवनमूल्यांमुळे  गुणात्मक अर्थ प्राप्त झाला आहे. म्हणून हिंदूंचे आदर्श येथील जीवनमूल्यांचे आदर्श आहेत.  हिंदूंची बांधीलकी विशिष्ट गुणात्मकतेशी, मूल्यांशी व सांस्कृतिक जीवन मूल्यांचा निकष ठरलेल्या आदर्शाशी आहे. या सर्व गोष्टी हिंदूत्वातून उत्क्रांत होत गेल्या. हिंदूत्व ही एक जीवनपद्धती आहे. विचार आहे. येथील राष्ट्रवादाचा मूलाधार आहे.

ज. द. जोगळेकर आपल्या हिंदूस्थानचे राष्ट्रीयत्व या पुस्तकात म्हणतात. ‘हिंदू समाजपुरुषाच्या जीवनेतिहासाच्या या प्रदीर्घ कालौघात चमत्कृतिजन्य अशा विविध घडामोडी झालेल्या दिसतात. इतिहासाचे लुप्तस्मृती झालेले पान जर पुन्हा हाती लागले तर कितीतरी घटनांचा उलगडा होईल. याच काळात परकीयांच्या असंख्य स्वाऱ्या झाल्या, सामाजिक घडण-विघडण झाली. भिन्न सांप्रदायिक विचार, भौतिक व आध्यात्मिक तत्त्वज्ञानांची निर्मिती झाली. ऐहिक विभवाचा उन्माद चढला. त्याच ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवून चिदानंदांत विलीन झाल्याने धुंदीही निर्माण झाली. अशा प्रकारचे कधी परस्परपोषक, कधी परस्परविरोधी तर कधी एकमेकांशी समांतर असलेले असे अनेक ओघ निर्माण झालेले दिसतात! या ओघांच्या-संगमांतच वैभवशाली आणि दिव्य अशी हिंदू संस्कृती निर्माण झाली. या कालचक्रासमवेत हिंदू समाजही फिरत होता. परंतु एक घटना मात्र स्थिर होती. ती म्हणजे ‘हिंदू’ या शब्दाविषयीची ममत्व भावना आणि त्यायोगे निर्माण होणारे एकत्व! वंश, भाषा, परंपरा, इतिहास आणि संस्कृती या बंधांनी हिंदू समाजास नुसते एकरूप केले नाही तर, इतरांपेक्षा आपण भिन्न आहोत, याचीही जाणीव करून दिली. या बंधांमुळे हिंदू हेच हिंदूस्थानात राष्ट्र आहेत, हे सावरकर बंधू आणि गोळवलकर गुरुजी यांच्या ग्रंथांवरून दिसतेच.’

व्याख्या अनेक, भाव एक

हिंदूत्वाच्या व्याख्या अनेकांनी केल्या. मांडणीत कदाचित थोडी भिन्नता असू शकेल परंतु मूळ भाव हा एकाच समान तत्त्वाचा आहे. ज्ञानकोशकार डॉ. केतकर म्हणतात, ‘भारतीय संस्कृति एकाच मानव वंशांतून आलेली नाही; तर वैदिक परंपरेच्या लोकांच्या आचारांशी आणि धर्माशी इतरांच्या आचारधर्माचे एकीकरण होऊन आजचे हिंदूत्व निर्माण झाले आहे.’ (ज्ञानकोश : जग व हिंदूस्थान, खंड १, पृष्ठे ४४) मुद्दा हा की हिंदूत्व ही उत्क्रांत होत गेलेली संकल्पना आहे. अनेकदा हिंदूत्व आणि हिंदू धर्म हे शब्द समानार्थी आहेत अशी समजूत झालेली असते. परंतु हिंदूत्व आणि हिंदू धर्म हे संपूर्णपणे भिन्न आहेत. हिंदूत्व आणि हिंदू धर्म हे पर्यायशब्द नाहीत, हे सावरकरांनी आपल्या हिंदूत्व या प्रबंधात उपोद्घातात तर्कशुद्धपणे मांडले आहे. सावरकर लिहितात, ‘हिंदूत्व हा काही साधा शब्द नव्हे, ती एक परंपरा आहे, तो एक इतिहास आहे आणि तोही, कित्येक वेळा, ‘हिंदूत्व’ या शब्दाचा हिंदू धर्म या त्याच्यासारख्याच भासणाऱ्या नावाशी घोटाळा करून योजला जाणारा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिकच नव्हे, तर सर्वसंग्रही इतिहास आहे!’ ‘हिंदू धर्म’ हा शब्द हिंदूत्वातूनच निघालेला हिंदूत्वाचा अंश आहे. या शब्दाची स्पष्ट कल्पना आली नाही तर, हिंदू धर्म हाही शब्द तसाच दुबरेध आणि अनिश्चित राहील. या दोन शब्दांतील परस्पर वेगळेपणा न समजल्यामुळेच हिंदू संस्कृतीचा अमूल्य वारसा ज्यांना लाभला आहे त्यांच्यातही परस्पर साशंकता निर्माण झाली आहे. येथे इतकेच सांगितले म्हणजे पुरे की, ‘हिंदू धर्म या शब्दाने जे काही मोघमपणे दाखविले जाते ते आणि हिंदूत्व एक नव्हे. कोणत्या तरी आध्यात्मिक किंवा भक्तिमार्गी संप्रदायाच्या मताला उण्या- अधिक प्रमाणात अनुसरून रचलेली उपपत्ती किंवा आचारविचारविषयक नीतिनियमांचे शास्त्र एवढाच अर्थ, साधारणपणे, ‘धर्म’ या शब्दाने दर्शविला जातो. हिंदूत्व या एकाच शब्दामध्ये एकराष्ट्र हिंदू जातीच्या अस्तित्वाच्या विचारांची आणि पराक्रमांची सर्व दालने समाविष्ट होतात.’

हिंदुत्व द्वेषाधारित नाही

सावरकरांनी ज्या हिंदूत्वाची मांडणी केली ती काही मुस्लिमांच्या द्वेषातून झाली नव्हती. हिंदू मन मूलत: प्रतिक्रियात्मक नाही. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माआधी हिंदू धर्म अस्तित्वात होता आणि त्याच वेळी हिंदूत्व जन्मास आले होते. ते काही कोणाचा द्वेष करण्यासाठी नव्हते. इस्लामचे आक्रमण झाले तेव्हा हिंदूत्व विचाराला लढाऊ रूप द्यावे लागले. छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे जिवंत उदाहरण. परंतु हे प्रासंगिक व नैमित्तिक आहे. शांततापूर्ण सहजीवन हा हिंदूंचा स्थायीभाव आहे.

भा. कृ. केळकर यांनी ‘टिळक विचार’ हा ग्रंथ लिहिला आहे. ते म्हणतात, ‘टिळकांना हिंदूंचे धर्ममूलक ऐक्य हे राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या संवर्धनार्थ वापरावयाचे होते आणि मुस्लिमांना व इतर धर्मीयांना राजकीय समानहितत्त्वाच्या पायावर व भारत ही मातृभूमी आहे या भावनिक आधारावर नव्या राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घ्यावयाचे होते. सारांश, हिंदूत्व व राष्ट्रीयत्व यांचे पूर्वापार संबंध कायम ठेवून भारतातील अन्य धर्मीयांना आधुनिक राष्ट्रवादाची दीक्षा द्यावयाची होती.’ (पान २९) हिंदूंच्या धार्मिक ऐक्याचा पाया हे या राष्ट्राचे अधिष्ठान आहे. अहिंदूनाही या राष्ट्रप्रवाहात सामावून घेण्याची लोकमान्यांची जी भूमिका होती त्यास सावरकर व डॉ. हेडगेवार यांनी अधिक पुढे नेली.

सावरकरांनीही सुरुवातीला मुस्लिमांना ‘याल तर तुमच्यासह’ असेच आवाहन केले होते. पुढे ते म्हणाले ‘न याल तर तुमच्यावाचून आणि विरोध कराल तर तुमचा विरोध मोडून हे राष्ट्र पुढे जाईल.’ त्यामुळे हिंदूत्व म्हणजे विशिष्ट समुदायाला नकार व विरोध नव्हे. ‘अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह हे हिंदू दर्शनाचे यम-नियम आहेत. परंतु व्यावहारिक जगात केवळ याच नियमांचे पालन करायचे ठरवले तर श्वाससुद्धा घेता येणार नाही. भगिनी निवेदिता यांनी विवेकानंदांना एकदा प्रश्न विचारला की, ‘समजा आपल्या घरावर कोणी हल्ला केला तर विरोध करायचा की नाही?’  विवेकानंदांनी उत्तर दिले की, ‘तुम्ही संन्यासी असाल तर विरोध नको, पण गृहस्थाश्रमी असाल तर अवश्य प्रतिकार करा.’  

हर्बर्ट स्पेन्सर यांचे ‘अ‍ॅब्सोल्यूट एथिक्स अँड रिलेटिव्ह एथिक्स’ हे पुस्तक आहे. हिंदूत्व जेव्हा म्हणतो त्यावेळी हिंदूत्वनिष्ठांना निरपेक्ष नीतीशास्त्र व सापेक्ष नीतीशास्त्र याचे सहजीवन अपेक्षित असते. लोकमान्यांनी गीतारहस्यात याचे चपखल उदाहरण दिले आहे. ते लिहितात, ‘तुमच्या डोळय़ांसमोर एक गाय पळत-पळत दूर निघून गेली आणि एका विशिष्ट िभतीच्या आड लपली. पाठोपाठ एक खाटीक हातात सुरा घेऊन धावत आला आणि तुम्ही त्याच्या दृष्टीस पडलात. समजा त्याने तुम्हाला विचारले- गाय येथून पळत गेली का? जर आपण त्यास उत्तर दिले- होय मी बघितले की गाय माझ्या डोळय़ासमोरून गेली आणि तिथे भिंतीआड लपली तर आपल्याला सत्यवचनाचे पुण्य मिळेल पण गोवधाचे पाप लागेल. मला माहीत नाही, मी गाय बघितली नाही असे उत्तर दिले तर गाय वाचेल पण तुम्ही खोटे ठराल. सत्यवचनाशी तडजोड करायची यास सापेक्ष नैतिकता म्हणतात आणि हिंदूत्वास ती अपेक्षित आहे.’ 

राष्ट्रीय एकात्मतेचा भाव स्थिर स्वरूपाचा असला पाहिजे असे नेहमी म्हटले जाते, परंतु मुद्दा असा की, एकात्मता कोणाशी व कशाशी साधायची? ऐकात्म्य साधावयाचे म्हणजे सामायिक असे एक आत्मतत्त्व असले पाहिजे आणि हे आत्मतत्त्व हिंदूत्वाचे आहे.

अनादी काळापासून इथे राष्ट्रीय आत्मरूप असलेला एक मुख्य राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे. या राष्ट्रीय प्रवाहात पूर्वीपासूनच अनेक जण मिसळले आहेत. पण त्यामुळे प्रवाहाचे नाव बदलले गेले नाही. जसे गंगेला अनेक नद्या मिळतात, त्यामुळे कदाचित गंगेचे जे मूळ स्वरूप गंगोत्रीस आहे, ते काही प्रयागला राहणार नाही, काशीला राहणार नाही, ते आणखी खाली पाटण्याला नाही; मधल्या भागात कितीतरी नद्या, नाले गंगेला मिळाले; त्यांतले काही शुद्ध असतील, काही अस्वच्छ असतील, परंतु जो प्रवाह वहात गेला, त्या प्रवाहाचे नाव बदलले नाही. गंगा हेच नाव राहिले. यमुनाही तिला मिळालेली मोठी नदी आहे. तिचा वर्णही गंगेपेक्षा वेगळा आहे म्हणतात; परंतु यमुना मिळाल्यावर पुढे गेली ती गंगाच आहे. त्याप्रमाणेच आपल्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये असंख्य लोक आले, तरी या प्रवाहाचे नाव हिंदू हेच राहिले आहे आणि हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.

ravisathe64@gmail.com

(लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.)