अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कोणताही चित्रपट महोत्सव असो वा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा- गाझाचा मुद्दा निघाला नाही असं होत नाही. एक वर्ग आहे, जो हा मुद्दा लावून धरू पाहतो, तर दुसरा त्यावर पांघरूण घालण्यासाठी धडपडताना दिसतो. सध्या सुरू असलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सवातही या मुद्द्यावरून वाद उफाळून आला आणि परिणाम असा, की बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिला.
त्याचं झालं असं की, रॉय लिखित, अभिनित – ‘इन विच ॲनी गिव्ह्ज इट दोज वन्स’ (१९८९) हा चित्रपट महोत्सवात पुनर्संचयित स्वरूपात दाखवण्यात येणार होता आणि त्यानिमित्त त्यांना बर्लिनला आमंत्रित करण्यात आलं होतं. महोत्सवासंदर्भातल्या एका पत्रकार परिषदेत परीक्षकांपैकी एक असलेले विम वेंडर्स (Wim Wenders)यांना गाझामधल्या नरसंहारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वेंडर्स यांनी ‘आपण राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे. पूर्णपणे राजकीय आशयाचे चित्रपट तयार केले, तर राजकारणात उतरल्यासारखंच होईल, पण आपण राजकारणविरोधी संतुलन साधणारा घटक (Counterweight) आहोत.’ असं म्हटलं. वेंडर्स यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली. काहींनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. वेंडर्स यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, चित्रपटांत जग बदलण्याची, जगण्याविषयीच्या लोकांच्या कल्पना बदलण्याची क्षमता असते, असंही ते पत्रकार परिषदेत म्हणाले होते, अशी सारवासारव केली गेली.
या पार्श्वभूमीवर अरुंधती रॉय यांनी एक निवेदन जारी केलं. त्याचा आशय असा आहे की, बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या परीक्षकांचं- कला राजकीय असू नये- हे मत धक्कादायक आहे. आपल्यादेखत मानवतेविरोधात एवढा गंभीर गुन्हा घडला असताना कलाकार, लेखक, चित्रपट निर्मात्यांनी आपापल्या परीने जे शक्य ते करत राहणं गरजेचं आहे. त्याऐवजी क्रौर्याची चर्चा थांबवण्याचा प्रयत्न महोत्सवात होत आहे. गाझातल्या नरसंहाराला जर्मनीसह विकसित देशांनीच अर्थिक पाठबळ दिलं आहे. जर्मनीचं सरकार आणि तिथल्या विविध सांस्कृतिक संस्थांनी पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे मी अस्वस्थ आहे, मात्र जर्मनीतल्या सामान्य प्रेक्षकांसमोर ज्या-ज्या वेळी मी या मुद्द्यावर मतं मांडली, तेव्हा त्यांचा मात्र मला पूर्ण पाठिंबा मिळत आला आहे. त्यांच्या प्रतिसादामुळेच मी महोत्सवात सहभागी होण्याचा विचार तरी केला होता. आजच्या काळातले महान चित्रपट निर्माते आणि कलाकार या मुद्द्यावर आपली मतं ठामपणे मांडू शकले नाहीत, तर इतिहास त्यांना माफ करणार नाही. हे सांगताना अतिशय खेद वाटतो की, मी महोत्सवात सहभागी होऊ शकत नाही.’
बर्लिन महोत्सवाच्या आयोजकांनी याला प्रतिसाद देणारं निवेदन प्रसिद्ध करत अरुंधती रॉय यांच्या निर्णयाचा आदर करतो. त्यांचं स्वागत करण्याची संधी मिळाली नाही, याचा खेद आहे. त्यांच्या उपस्थितीने महोत्सव अधिक समृद्ध झाला असता, असं म्हटलं आहे. महोत्सवात गाझाच्या मुद्द्यावर धारण करण्यात आलेल्या मौनाचा तसंच जे बोलू इच्छितात त्यांची गळचेपी केल्याचा अनेक प्रथितयश कलाकारांनी निषेध केला आहे. महोत्सवाच्या आयोजकांना खुलं पत्र लिहिण्यात आलं असून त्यावर ८० कलाकारांनी स्वाक्षरी केली आहे. राजकारण आणि कला यांना परस्परांपासून वेगळं करता येणार नाही असं त्यात म्हटलं आहे. ‘जगभरातल्या पाच हजारांहून अधिक कलाकारांनी इस्रायलमधल्या चित्रपटनिर्मिती कंपन्या आणि संस्थांबरोबर काम करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. बर्लिन महोत्सवाने यापूर्वी इराण आणि युक्रेनमधल्या संघर्षावरही अशीच बोटचेपी भूमिका घेतली होती. आता तरी आपलं उत्तरदायित्व ओळखून इस्रायलला पाठीशी घालणं थांबवा’, असं आवाहन या पत्रात आहे. या सार्यात समाधानाची बाब एवढीच की, अद्याप काही कलाकार, लेखक, विचारवंतांचा कणा शिल्लक आहे.
