मराठी प्रकाशन व्यवसायात अल्पावधीत जम बसवणार्या प्रकाशकांपैकी अरविंद पाटकर हे महत्त्वाचे. प्रकाशनगृहाने ठरवलेल्या मार्गाशी तडजोड न करताही व्यवसाय चालवता येतो हे अरविंद पाटकर यांनी, ‘आजकाल वाचते कोण?’ हा प्रश्न कर्कश होण्याच्या काळातही दाखवून दिले. त्यांच्या ‘मनोविकास प्रकाशना’ने महाराष्ट्रात आजही ज्ञानलक्ष्यी, प्रागतिक वाचनाची भूक आहे हे पुन्हा सिद्ध केले. त्यामुळे गेल्या आठवड्यात पाटकर यांची निधनवार्ता आल्यानंतर सहवेदना व्यक्त करताना, ‘मनोविकास’चा प्रवास यापुढेही अशाच प्रकारे सुरू राहावा अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त झाली.
लोकवाङ्मय गृह, सुगावा प्रकाशन या महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीला आपल्या वाटणार्या प्रकाशन संस्थांप्रमाणेच ‘मनोविकास प्रकाशना’ने धर्म, देव, बुवाबाजी, अंधश्रद्धा यांना दूर ठेवले. त्याऐवजी तरुण विद्यार्थ्यांनाही वाचावीशी वाटावीत अशा विषयांवरच्या पुस्तकांकडे त्यांनी लक्ष पुरवले, हे त्यांचे अन्य ‘परिवर्तनवादी’ प्रकाशकांपेक्षा निराळेपण. ‘‘लेखकाने मांडलेला विषय तुम्ही प्रकाशक म्हणून वाचकांसमोर घेऊन जाता. तो वाचकांना रुचेल की नाही हे प्रकाशक म्हणून तुम्हाला समजलं पाहिजे. प्रकाशकांचा नेमका इथेच कस लागतो’’ याचे भान सतत जागे ठेवून पाटकर वावरले.
पुस्तक विक्रेता ते मान्यवर प्रकाशक हा प्रवास पाटकर यांनी केलाच, पण त्याआधी १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, म्हणजे ऐन तिशीपर्यंत त्यांचे आयुष्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाला वाहिलेले होते. या पक्षाचा ‘फुलटायमर’ (पूर्णवेळ कार्यकर्ता) म्हणून त्या वेळच्या नांदत्या गिरणगावात त्यांनी माणसे जोडली. आंदोलने केली आणि कामगार चळवळीची तलवार तळपती ठेवली. दत्ता सामंत यांच्या गिरणीसंपाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून पक्षात मतभेद झाले, अखेर कामगार चळवळही संपली आणि मंत्रालयामागच्या ‘आमदार निवासा’च्या वळचणीला पाटकर यांनी पुस्तकविक्री सुरू केली. तिथून प्रकाशन व्यवसायात येताना, जोडलेली माणसे हेच त्यांचे खरे भांडवल होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाडे व लावण्यांच्या संग्रहापासून सुरू झालेला व्यवसाय फक्त चळवळीपुरता न ठेवता व्यापक झाला पाहिजे, हे त्यांना दीडदोन वर्षांत उमगले. नंदा खरे हे ‘मनोविकास’चे बिनीचे लेखक. त्यांची १४ पुस्तके पाटकर यांनी प्रकाशित केली, त्यात ‘कहाणी मानवप्राण्याची’ हे (युआल नोआ हरारीच्या ‘सेपिअन्स’पेक्षा दशकभर आधीच आलेले) पुस्तक आहे, तसेच आधी ‘ग्रंथाली’ने काढलेल्या ‘अंताजीची बखर’ची पुढली आवृत्तीही आहे. अच्युत गोडबोले यांची १३ पुस्तके, बाळ फोंडके यांचीही १३ पुस्तके ‘मनोविकास’ने प्रकाशित केली. दत्तप्रसाद दाभोळकर २०२१ पासून ‘मनोविकास’शी जुळले, तर जयंत नारळीकरांसारख्या वैज्ञानिकापासून ते नाशिकजवळ मुक्तशाळा चालवणारे शिक्षक-कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्यापर्यंत अनेकांची पुस्तके पाटकरांकडे आली. डॉ. अनंत फडके, अरुणा बुरटे यांसारख्या परिवर्तनवादी चळवळीतल्या माणसांनी बालआरोग्य, बालसंगोपन अशा मानवी पैलूंवर ‘मनोविकास’साठी पुस्तके लिहावीत, यामागेही पाटकरांचे कर्तृत्व होते.
‘आम्ही चांगले आयुष्य जगू इच्छितो, आमची मुले शिकावीत, त्यांनी प्रगती करावी, यासाठी आम्ही धडपडतो’ ही मुंबईतल्या अस्तंगत, संघटित कामगार चळवळीची १९६० नंतरची प्रेरणाच जणू पाटकरांनी, प्रकाशन व्यवसायातून जिवंत ठेवली होती. ती प्रेरणा आजही आहे, तिला आजही प्रतिसाद मिळतो आहे, हे त्यांनी काढलेल्या पुस्तकांच्या यशाने दाखवून दिले.

