‘बटर’ या जपानी कादंबरीची खास प्रत मुंबईच्या अधिकृत (आणि अनधिकृत) दालनांतही दाखल झाली आहे. तिथून ती घेण्याआधी असाको युझुुकी यांच्याविषयी भरपूरच ‘ज्ञानकण’ पुरविणार्‍या ‘गार्डियन’मधील मुलाखत वाचणे आवश्यक. बटर या कादंबरीच्या फक्त ब्रिटनमधील अधिकृत ग्रंथदालनांतून तीन लाख प्रती संपल्याने आंतरराष्ट्रीय खूपविकी बनलेली ही लेखिका मुराकामीनंतरच्या पिढीची. आंतरराष्ट्रीय निर्यात. सायाका मुराटा, मिईको कावाकामी आणि हिरोमी कावाकामी या जपानच्या बदलत्या स्त्री जगण्याची चित्रे मांडणार्‍या पंथात युझुुकी यांचा समावेश झाला आहे. जपानमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर ‘बटर’ ही कादंबरी आधारली आहे. एकट्या पुरुषांना चमचमीत भोजनाच्या फेर्‍यात अडकवून त्यांच्या हत्या करणार्‍या सुगरण शेफची ही गोष्ट थरार आणि अचाट खाद्यवर्णनांमुळे नावाजली गेली. या मुलाखतीत जपानच्या साहित्यविश्वाला ताब्यात घेणार्‍या लेखिकांच्या माहितीसह पुढल्या आठवड्यात युझुुकीच्या नव्या अनुवादित कादंबरीचाही तपशील असल्याने भरपूर नवे संदर्भ हाती लागतील.

वाचकांचा फ्रान्स…

पॅरिस नगरीला पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकी-दक्षिण अमेरिकी आणि युरोपातील साहित्यिकांनी लेखकांचे शहर बनविले. त्या प्रत्येक लेखकाने आपापले पॅरिस ग्रंथबद्धही केले. पण दुसर्‍या महायुद्धानंतर या कलासक्त नगरीने सिनेमा, चित्रकला आणि ग्रंथव्यवहारात भरपूर मजल मारली. अलेक्झांडर हर्स्ट हे ‘गार्डियन’चे युरोपातील प्रतिनिधी. गेल्या आठवड्यात संपादकीय पानांवर त्यांनी ओळख करून दिली आहे, ती वाचन करणार्‍या फ्रान्सची. ‘न्यू यॉर्कर’शी साधर्म्य असणारे तिथले मासिक कोणते यासह समांतर ग्रंथविक्री दालने किती, पुस्तक विक्रीचा गेल्या वर्षीचा आकडा किती याची आकडेवारी आणि तपशील अचंबित करणारे असल्याने इथे मुद्दाम.

पुस्तकांचे बचाववृत्त…

इटलीचा स्वायत्त प्रदेश असलेल्या सिसिली या प्रांतात गेल्या महिन्यात चार कि.मी. भूस्खलन झाले. बर्‍याच इमारतींची पडझड झाली. तिथल्या दीड हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. पण एक संपूर्ण दुर्मीळ पुस्तकांचे वाचनालयच दरड कोसळल्याने ढिगार्‍यात लुप्त झाले. गेल्या महिन्याभरात तिथल्या लेखक-विचारवंतांनी या ढिगार्‍यात दबल्या गेलेल्या वाचनालयातील पुस्तके वाचविण्यासाठी आवाहने आणि विनंत्या सरकारकडे केल्या. या आठवड्यात तेथील अग्निशमन दलाने त्या ढिगार्‍यांतून चारशे पुस्तके वाचवली. त्याचे हे वृत्त. पुस्तकांविषयी असोशी असणार्‍यांसाठी.