करू देत कितीही ट्रोल, उडवू दे खिल्ली पण जे बोलले ते योग्यच. कोण त्या दोन भावांच्या भांडणात वा एकत्र येण्यात पडेल. त्यापेक्षा राजकीय चातुर्य दाखवत आपण केवळ शेलारांना ओळखतो हेच उत्तर बरोबर. चला, म्हणजे माध्यमांच्या कचाट्यातून सुटका कशी करून घ्यायची ते आपल्यालाही जमू लागले तर! असा विचार करत ताई खुदकन हसल्या. तेवढ्यात जोरदार वाऱ्यामुळे त्यांच्या लोणावळ्यातल्या फार्महाऊसमधील एका खिडकीचे तावदान वाजू लागले तशी त्यांनी ती खिडकीच बंद केली. केली असेल त्या ठाकरे नावाच्या ब्रँडने कधीकाळी आपल्याला मदत. म्हणून काय सदैव त्यांच्याच ऋणात राहायचे. तसेही आपले घराणे आधीपासूनच उजवे. सध्या असलेली या विचाराची सत्ता आणखी काही वर्षे तरी जात नाही. मग कशाला इकडेतिकडे बघायचे, असा प्रश्न स्वत:लाच विचारत त्या निद्राधीन व्हायचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात ‘खळ्ळ खटॅक’ अशा आवाजाने त्या दचकल्या.
या ब्रँडपैकी मोठा आपल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करेल, पण लहान्याचा काही भरवसा देता येत नाही असा विचार करून त्यांनी आजूबाजूला बघितले तर पलंगाशेजारी ठेवलेल्या मेजावरची पाण्याची काचेची बाटली खाली पडून फुटलेली. नक्कीच हे उंदराचे काम. तरीही त्यांच्या घशाला कोरड पडलीच पण उठून नवी बाटली आणण्याचे धाडस त्यांना होईना! उगीच इथे आले, काही दिवस पेडर रोडलाच राहायला हवे होते असे म्हणत त्यांनी ‘बाळ’ला फोन लावला. ‘हे बघ. आपण उजवे असलो तरी प्रत्येक सत्तावर्तुळाला आजवर सांभाळत आलो. तू आशीषच्या अंगावर त्या वक्तव्यातून जसा शेला पांघरलास तशी एक शाल त्या दोन्ही बंधूंच्या खांद्यावर टाकली असतीस तर बरे झाले असते. लोकांना चघळायला विषय मिळाला नसता. शेवटी प्रश्न मराठीसंदर्भात होता.’ – बाळच्या या युक्तिवादावर काय बोलावे हे ताईंना कळेना! त्या राजच्या दिवाळी कवितावाचनाच्या कार्यक्रमातसुद्धा आपण फार तुटकपणे बोललो हे आठवून त्या आणखी व्यथित झाल्या. ‘आता काय करायचे? पुढच्या दिवाळीत मोफत संगीत रजनी करते असे म्हणू का?’ यावर बाळचा स्वर करडा झाला. ‘ताई, ‘उचित’ मानधनाशिवाय काहीही करायचे नाही ही आपणा भावंडांची परंपरा. तीही इतकी वर्षे कसोशीने जोपासलेली. ती अजिबात मोडायची नाही.’
हे उत्तर ऐकल्यावर ताईंचा नाइलाज झाला. ‘अरे पण काही तरी उपाय सुचव ना. मागे मोदींना आपण पुरस्कार दिला तेव्हा मुख्यमंत्री असूनही उद्धवला बोलावले नव्हते. तेव्हापासून ते नाराज. आता हा दुसराही. सत्तेच्या नादी लागून हे जरा अतिच होते असे तुला वाटत नाही का? या एका वक्तव्यापासून साधा उंदीर दिसला तरी मला घाबरल्यासारखे होते. नाही त्या शंका मनात येतात. त्या लहान्याकडे एखादा पुष्पगुच्छ पाठवून देऊ का?’ ‘नको, हे जर सत्ताधाऱ्यांना कळले तर आपल्याही निष्ठेवर शंका घेणारे आहेत ते. त्यापेक्षा तू आशीषलाच फोन कर. तसाही तो सध्या भलताच खूश आहे तुझ्या एका वाक्यामुळे. तोच काही तरी मार्ग दाखवेल. जे काही पाऊल उचलायचे ते आम्हाला विचारून अशी पद्धतच त्यांनी विकसित केलेली. कर फोन.’ बाळचे उत्तर ऐकताच ताईंनी शेलारांना फोन लावला. सारे सांगून झाल्यावर शेलार हसत म्हणाले, ‘काही काळजी करू नका. आपण दोघेही राजच्या घरी जाऊ. तो भेटायला तयार नसला तरी त्याच्या घराच्या गॅलरीत जाऊन माध्यमांसमोरचे फोटोसेशन करू. प्रश्न आपसूकच मिटेल. आम्हाला सवयच आहे त्यांच्या घरी जाऊन असे करण्याची.’ हे ऐकल्यावरच ताई पाणी पिण्यासाठी उठल्या.