बिच्चारे अशोकराव… नसेल त्यांना ठाऊक नव्या परिवारातील परंपरेविषयी. देऊन टाकल्या त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा! तेही परिवाराच्या सर्वोच्च प्रमुखाला समाजमाध्यमावरून. म्हणून काय त्यांची एवढी टर उडवायची? अरे, ते राज्याचे प्रमुख राहिले आहेत एकेकाळी. आता माजी असले म्हणून काय झाले? किमान त्यांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीचा तरी मान राखा की जरा! नव्या पक्षात गेले की होते थोडीफार गडबड. पक्ष तसेच परिवारातील प्रथा, परंपरा काय हे कळायला वेळ लागतो थोडा. परिवारातील कोणत्या संघटनेत वाढदिवस साजरे करण्याची पद्धत आहे, कुठे नाही, नसेल तर का नाही? त्यामागची कारणे काय? इतिहास काय हे सध्या लोंढ्याच्या स्वरूपात परिवारात दाखल होणार्‍या प्रत्येकाला थोडेच कळणार? मग अशा वेळी अजाणतेपणे चूक झाली तर त्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण काय? अशोकराव तरी काय करणार? ते काँग्रेसच्या प्रथेप्रमाणे वागले. देऊन टाकल्या त्यांनी शुभेच्छा! ते आधी होते त्या पक्षात तर कोण सर्वात आधी शुभेच्छा देतो यावरूनच बढती ठरायची. नव्या ठिकाणी सुद्धा हीच पद्धत असेल व असे केल्याने परिवारप्रमुखाचे लक्ष वेधले जाईल असे वाटले असेल त्यांना. म्हणून काय त्यांच्या कृतीवर एवढे हसायचे? नव्याने दाखल झालेली व्यक्ती कुणीही असो, करते थोडीफार धडपड. सर्वोच्चांच्या नजरेत भरण्याची. तशी ती अशोकरावांनी केली तर त्यात गैर काय? आता कुणी म्हणेल, या वयात त्यांना हे शोभते का? अरे, राजकारणात कधीच वयाचा विचार केला जात नसतो. कोणत्या टप्प्यावर कुणाला काय मिळेल याचा अंदाजही बांधता येत नसतो. अशा स्थितीत अशोकराव आशावादी रहात असतील तर इतरांनी नाक मुरडण्याचे कारण काय? आणि हो, ते काँग्रेसवाले तर त्यांच्यावर टपूनच बसलेले. गेले आपल्याला सोडून, विसरा त्यांना हे मानायला तयारच नाहीत लेकाचे! टाकली अशोकरावांनी पोस्ट की तुटूनच पडतात त्यांच्यावर, टोळधाडीसारखे.

अरे, करू द्या की त्यांना त्यांच्या पद्धतीचे राजकारण, रमू द्या की त्यांना त्यांच्या नव्या संसारात. जोपासू द्या की त्यांना ‘आदर्श’वाद. उगीच खुसपटे कशाला काढता? नांदेडसारख्या वीरभूमीतील व्यक्तीने एवढी लाचारी पत्करायची गरजच काय ही काय भाषा झाली टीकेची? काही दिवसांपूर्वी आणीबाणीच्या संदर्भात त्यांनी पोस्ट टाकली तेव्हाही तसेच. काय गरज होती तेव्हा त्यांच्या वडिलांच्या आणीबाणीपर्वातील कृतींची आठवण करून देण्याची? पदावर बसलेला प्रत्येक नेता काळानुरूप वागतो. त्यालाच निष्ठा म्हणतात. राजकारणातले हे साधे तत्त्व कळत नाही का या टीकाकारांना? धरली असेल तेव्हा त्यांनी छत्री, धुतले असतील कुणाचे पाय, टाकले असेल अनेकांना तरुंगात. म्हणून काय त्यांचा दोष यांच्यावर लादायचा? भूतकाळ तरी किती उकरून काढायचा? त्यापेक्षा नव्या घरी सुखाने राहा, प्रगती करा असा सल्ला का देत नाही हे काँग्रेसवाले? परिवार आताचा असो वा आधीचा, अशोकरावांनी टिंगलटवाळी, टीकेकडे अजिबात लक्ष देऊ नये. नव्या ठिकाणी चुका होऊ नये यासाठी परिवाराच्या एखाद्या प्रबोधन वर्गात प्रवेश मिळवावा व चालीरिती, परंपरा जाणून घ्याव्यात हेच उत्तम! एकदा का या मुशीतून तयार झाले की सारे अशोकरावांनाच शुभेच्छा देतील.