‘ऑस्कर क्लाइन पदक’ मिळणे आणि ते स्वीकारणार्‍या भौतिकशास्त्रज्ञाला त्या वर्षीचे ‘ऑस्कर क्लाइन व्याख्यान’ देण्याचा मान मिळणे हे किती महत्त्वाचे असते, हे समजण्यासाठी एक उदाहरण- ‘हिग्ज बोसॉन’ या अतिसूक्ष्मकणाचा सिद्धान्त मांडणारे पीटर हिग्ज यांनी २०१३ सालचे नोबेल पारितोषिक (विभागून) मिळण्याआधी २००९ मध्ये हे ‘ऑस्कर क्लाइन पदक’ मिळाले होते. तो मान यंदा अशोक सेन यांना मिळाला आणि १९८८ पासून ‘नोबेल समिती’ आणि स्वीडनची सायन्स अकॅडमी यांनी सुरू केलेल्या या पदकाचे सेन हे पहिलेच भारतीय मानकरी आहेत.

पुंजभौतिकी, स्ट्रगिं सिद्धान्त, कृष्णविवरांचे वर्तन-मापन या विषयांतील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून सेन यांची ख्याती आहे. स्ट्रगिं सिद्धान्त हा पुंज-गुरुत्वाकर्षणाच्या सुसंगत सिद्धान्तापर्यंत जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे, स्ट्रगिं सिद्धान्ताच्या अभ्यासामुळे कृष्णविवरांच्या पुंज-सिद्धान्ताशी संबंधित अनुत्तरित कोडी सोडवण्यास मदत होते आणि कृष्णविवरांचे गुणधर्म स्पष्ट करण्यासाठी स्ट्रगिं सिद्धान्तच आवश्यकही ठरतो, असे प्रतिपादन त्यांनी २२ ऑक्टोबर रोजी हे पदक स्वीकारल्यानंतर, ‘ऑस्कर क्लाइन व्याख्याना’त जगभरातील भौतिकशास्त्रज्ञांपुढे केले.

हा बहुमान देणार्‍या संस्थेने सेन यांना ‘आधुनिक स्ट्रगिं सिद्धान्ताचे शिल्पकार’ म्हटले असून अनेक सैद्धान्तिक शोध त्यांच्या नावावर असल्याचाही उल्लेख केला आहे. यापैकी, त्यांनी १९९० च्या दशकात (मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन केंद्रात असताना) मांडलेला आणि पुढे २००० नंतर अनेकांच्या अभ्यासातून सिद्ध झालेला ‘सेन कन्जेक्चर’ हा महत्त्वाचा अनुमानवजा सिद्धान्त ‘स्ट्रगिं’च्या कंपनांशी निगडित होता. ही ‘स्ट्रगिं’ म्हणजे अर्थातच, इलेक्ट्रॉनच्याही सूक्ष्मकणांना एकरेषीय, एकमितीय मानल्यामुळे कल्पिता येणारी, पण सतत कंप पावत असलेली भौतिकशास्त्रीय अवस्था.

बेंगळूरुच्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरेटिकल सायन्सेस’मध्ये इन्फोसिस-माधवा अध्यासनावर ते २०२१ पासून आहेत. कोलकात्यात महाविद्यालयीन शिक्षण, मग आयआयटी कानपूरमध्ये शिकून अमेरिकेत न्यू यॉर्कच्या विद्यापीठात पीएच.डी. असा त्यांचा प्रवास झाला. ‘मॅसाच्युसेट्स इ्स्टिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’सह अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांत ते अभ्यागत प्राध्यापक होते. भारत सरकारनेही या गुणी शास्त्रज्ञाकडे दुर्लक्ष न करता, भटनागर पुरस्कार (१९९४); पद्मश्री (२००९) आणि पद्मभूषण (२०१३) असे मानसन्मान त्यांना दिले होते, हे विशेष.