प्रवाशांकडून बेडरोल चोरीच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या बातम्यांना बरोबर एक वर्ष पूर्ण झाल्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मंत्रालयात आढावा बैठकीला उपस्थित झाले तेव्हा आता नक्कीच काही तरी चांगले ऐकायला मिळणार ही आशा त्यांच्या मनात होती. ‘करा सुरू’ असे म्हणताच बोर्डाचा एक अधिकारी उभा राहिला. ‘सर, चोरी रोखण्यासाठी तीन उपाययोजना अमलात आणल्या. त्यातली पहिली होती बेडरोलमधील प्रत्येक वस्तू साखळीने बांधणे. देशात रोज रात्री आठ लाख प्रवासी वातानुकूलित कक्षातून प्रवास करतात. त्यातल्या तीन लाखांसाठी आपण डब्यांमध्ये ५० कोटी खर्चून ही व्यवस्था उभारली. शौचालयातला लोटा साखळीने बांधणे सुरू केल्यापासून त्याची चोरी कमी झाल्याने हा उपाय योजला. साखळीने बांधलेली उशी, चादर हिसका देऊन तोडण्याचा प्रयत्न कुणी केलाच तर सायरन वाजेल असे याचे स्वरूप होते. वर्षभरात रोज सरासरी ३० हजार सायरन वेगवेगळ्या ठिकाणी वाजले. मात्र पोलीस पोहोचायच्या आत प्रवासी पसार झाले. त्यांची नावे हुडकून गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध घेऊन तपास करायचा तर रेल्वे पोलीस दलात दहा हजार जवानांची तातडीने भरती करणे गरजेचे. त्याकरिता पद व निधी मंजुरीला त्वरित मान्यता द्यावी.’ हे ऐकून वैष्णव यांचा चेहराच पडला.
मग दुसरे अधिकारी उभे राहिले. ‘उरलेल्या पाचपैकी तीन लाख प्रवाशांसाठी आपण बेडरोल देताना व परत घेताना स्वाक्षरी घ्यायची असे ठरवले. त्यासाठी बेडरोल पुरवठादाराकडून नियुक्त कोच साहाय्यकांना प्रशिक्षण दिले. त्यावर १२ कोटी खर्च झाले. प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा दररोज ५० हजार प्रवाशांनीच स्वाक्षरी देत बेडरोल परत केले. स्वाक्षरीच्या मुद्द्यावरून कोच साहाय्यकांना मारहाण करण्याच्या रोज सरासरी तीनशे घटना ठिकठिकाणी घडल्या. स्वाक्षरी न करता बेडरोल घेऊन रोज साधारण २० हजार प्रवासी पसार झाले. या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मनुष्यबळ अपुरे असल्याने यातील केवळ एक टक्केच आरोपी शोधता आले. उर्वरितांचा शोध सुरू असून ते केव्हा सापडतील हे नक्की सांगू शकत नाही. मारहाणीच्या घटनांमुळे कोच साहाय्यक या डब्यांमध्ये कर्तव्य बजावण्यास इच्छुक नाहीत, असे पुरवठादारांचे म्हणणे असून त्यांनी साहाय्यकांना जादा वेतन देण्यासाठी कंत्राटाची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली आहे.’ हे ऐकून वैष्णव यांचा चेहरा आणखी पडला.
ते तिसर्याकडे वळले. ‘वातानुकूलित श्रेणीचे तिकीट कमी करून उर्वरित दोन लाख प्रवाशांकडून अनामत रक्कम घेत बेडरोल द्यायचे व उतरताना ते परत घेऊन रक्कम परत करायची असा उपाय प्रायोगिक तत्त्वावर काही मार्गांवर योजला. रोज सरासरी ४५ हजार प्रवाशांनी रक्कम देण्यास नकार दिला. उर्वरित प्रवाशांनी पैसे मोजले. मात्र वर्षभरात दहा हजार फेर्यांमधील साहाय्यकांनी त्याचा हिशेबच पुरवठादारांना दिला नाही. पाचशे साहाय्यक पैसे घेऊन पसार झाले. या सर्वांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. अनामत देणार्या ५० टक्के प्रवाशांनी रक्कम परत न घेताच बेडरोल सोबत नेले.’ हे ऐकून वैष्णव हताश झाले. एवढ्यात चौथा म्हणाला. ‘बहुतांश भारतीयांमध्ये चोरी करण्याची वृत्ती उपजतच! मग ते मंदिर, हॉटेल असो वा आपली रेल्वे. त्यामुळे जेवढे बेडरोल चोरले जातील तेवढे जाऊ द्यावे. इतका खर्च करून लोकांना सुधारण्याचे काम आपले नाही.’ हे ऐकताच सर्व उपाययोजना थांबवा असे आदेश देत वैष्णव निघून गेले.
