अखेर येत्या ४ जुलै रोजी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीची निवडणूक खरोखरच होऊ घातली आहे! वस्तुत: ही निवडणूक गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला होणार होती. पण काही राजकीय पक्षांनी ही संस्था आपल्याच ताब्यात राहावी या अट्टहासाने मतदारांची खोगीर भरती मोहीम राबविली, चक्क पक्षाच्या खात्यातूनच सभासदांचे शुल्क भरण्याची रचना केली आणि त्यामुळे संस्थेच्या प्रशासनाला निवडणूक वेळेवर घेता आली नाही. पुढे अवैध पद्धतीने झालेल्या सभासद नोंदणीचे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे गेले आणि नंतर मार्चमध्ये सदोष मतदार याद्यांसह होऊ घातलेली निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली. मग न्यायालयीन लढाई झाली. त्यात धर्मादाय आयुक्तांचा निर्णय वैध ठरला आणि नंतर नव्या प्रशासक मंडळाच्या देखरेखीखाली मतदार याद्यांचे शुद्धीकरण झाले, खोगीर भरती अवैध ठरली. सुमारे १५ दिवसांपूर्वी निवडणुकीचे नवे वेळापत्रकही जाहीर झाले. दुर्दैवाने त्यालाही आव्हान देऊन निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याचे अश्लाघ्य प्रयत्न काही गटांनी केले, पण न्यायालयात त्यांची डाळ शिजली नाही. परिणामी आता येत्या शनिवारी निवडणुकीसाठीचे मतदान खरोखरच घडून येत आहे!
एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ही एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी स्थापन झालेली संस्था म्हणजे मुंबई शहराचा एक मानबिंदू म्हणायला हवा. या संस्थेकडे खूप मोठा असा दुर्मीळ दस्तावेजांचा खजिना आहे, दुर्मीळ मौल्यवान ग्रंथ आहेत आणि काही प्राचीन नाणी व तत्सम वस्तू संग्रहदेखील आहे. मुख्य म्हणजे एक अतिशय संपन्न ग्रंथसंग्रह असलेले ग्रंथालयसुद्धा आहे. संस्थेच्या गेल्या २२२ वर्षांच्या इतिहासात या संस्थेने अनेक संशोधन प्रकल्प पार पाडले आहेत आणि त्यातील काहींची दर्जेदार पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. भूतकाळात बी. जी. देशमुख आणि डॉक्टर अरूण टिकेकरांसारख्या अनेक नामवंतांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा वाहिली आहे आणि महामहोपाध्याय पां. वा. काणे आणि दुर्गाबाई भागवतांपासून ते अरविंद जामखेडकरांपर्यंत अनेक संशोधकांच्या वावरामुळे या ज्ञानमंदिराच्या लौकिकात भर पडत आली आहे.
पण असे असले तरी अशी एखादी जुनी, संशोधनाला प्राधान्य देणारी पण रूढ अर्थाने शिक्षण संस्था नसलेली संस्था चालवणे सोपे नाही. त्यासाठी संस्थाबांधणी शास्त्राची योग्य जाण असलेले नेतृत्व, त्याला साथ देणारी अभ्यासक-कार्यकर्त्यांची आणि व्यवस्थापन-कुशल अशा व्यक्तींची एक टीम या दोन्हींची आवश्यकता आहे. हे साध्य न झाल्याने आज एशियाटिक- मुंबईची अवस्था अतिशय बिकट आहे. संस्थेच्या सध्याच्या कार्यकारी मंडळाच्या आर्थिक गैर-शिस्तीवर भारताच्या लेखानियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग)ने अनेक ताशेरे ओढणारे अहवाल दिले आहेत. आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांची वसुली करण्याबाबत नोटिसा काढल्या आहेत. महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांनी नियमबाह्य पद्धतीने पदाधिकारी निवड झाल्याचे कारण देऊन पदाधिकारी बदलाचा परिवर्तन- अहवाल (चेंज रिपोर्ट) फेटाळून लावला आहे. किमान २०० दुर्मीळ पुस्तके संस्थेच्या संग्रहातून गहाळ झाल्याची प्रकरणे घडली आहेत. दुर्मीळ दस्तावेजांच्या देखभालीकडेही संस्थेला पुरेसे लक्ष देता आले नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
ही राजकीय विचारधारा नको?
आणखी चिंताजनक म्हणजे भारतातील राजकीय विचारधारांपैकी हिंदुत्व हा विचार संशोधनाचा विषय असू शकत नाही असे कारण देऊन संस्थेने वैचारिक अस्पृश्यता पाळत ज्ञानोपासना क्षेत्रात संकुचिततेला थारा दिला आहे. सदस्य-नोंदणी संदर्भातही अनेक चुकीच्या गोष्टी अलीकडे घडल्या आहेत. आपल्या समर्थक मतदारांची खोगीरभरती करण्याच्या प्रयत्नात एका राजकीय पक्षाच्या बँक खात्यामार्फत घाऊक शुल्क-भरणा करून सुमारे ५५ जणांना सदस्यता दिल्याचे प्रकरण उघडकीस येऊनसुद्धा व्यवस्थापनाने त्याकडे काणाडोळा केला आहे.
वर उल्लेखिलेल्या सर्व गैरव्यवहारांची महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन चौकशी केली तेव्हा हे सर्व आरोप खरे आहेत हे सिद्ध झाले. परिणामी क्वचितच उचलले जाणारे पाऊल त्यांनी उचलले आणि अगदी ऐनवेळी १४ मार्च रोजी होऊ घातलेले पूर्व-घोषित निवडणुकांचे मतदान त्यांनी निरुपायाने पुढे ढकलले. हे मतदान पुढे ढकलण्याच्या धर्मादाय -आयुक्तांच्या निर्णयाला काही मंडळींनी आव्हान दिले पण उच्च न्यायालयाने त्यांची भूमिका फेटाळून लावली ! त्यामुळे आता पूर्णपणे वैध पद्धतीने ज्यांची नोंदणी झाली आहे अशा मतदारांच्या नवीनीकृत यादीच्या आधारावर ४ जुलै रोजी निवडणूक होईल हे नक्की.
‘सीएसआर’साठी इच्छाशक्ती
या निवडणुकीत तीन स्वतंत्र पॅनल्स सदस्यांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापैकी आमच्या ‘एशियाटिक टुमॉरो’ या पॅनलचे इरादे स्पष्ट आणि प्रामाणिक आहेत. राजकीय पक्षबाजीपासून संस्थेला अलिप्त ठेवून संस्थेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा घडवून कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या महत्त्वाच्या संस्थेला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मार्फत आर्थिक संसाधने गोळा करणे अवघड नाही. त्यासाठी गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्ती आणि व्यापक जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्या नेतृत्वाची. शिवाय एशियाटिकचा दैनंदिन कारभार प्रभावी करण्यासाठी आणखी शिस्त आणणे, उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे, दस्तावेजांच्या वैज्ञानिक पद्धतीने करावयाच्या जतनाची शास्त्र-शुद्ध रचना लावणे, समकालीन महत्त्वाच्या विषयांचा समावेश करून विशुद्ध संशोधनाला आणखी प्राधान्य देणे, संस्थेचा परीघ विस्तारून दक्षिण मुंबईतील या संस्थेचे कार्यक्रम मुंबईच्या उपनगरांपर्यंत घेऊन जाणे, संस्था संचालनात इंग्रजीबरोबरच मराठीसह सर्व स्थानिक भाषांना उचित स्थान देणे, वैचारिक अस्पृश्यतेचे उच्चाटन करून सर्वसमावेशकता जोपासणे आणि संस्थेला अधिकाधिक लोकाभिमुख करणे असे अनेक मुद्दे आमच्या कृती-कार्यक्रमात आहेत. शिवाय संस्थेत नव्या पिढीच्या अभ्यासकांचा वावर वाढवा यासाठीही काही खास उपक्रम योजण्याची कल्पना आहे. कोळी, पाठारे प्रभू आणि पारशी अशा काही समुदायांनी मुंबईच्या लौकिकात भर घालणारे जे काम केले त्याचेही चित्रण करणार्या कायम प्रदर्शनांची रचना हाही कार्यसूचीचा एक भाग आहे.
आमच्या पॅनेलमध्ये अनेक तोलामोलाची माणसे आहेत. यात ज्येष्ठ पत्रकार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचे अभ्यासक रमेश पतंगे, माजी कुलगुरू आणि वैज्ञानिक डॉ. संजय देशमुख, अभिनेते-दिग्दर्शक आणि अभ्यासक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी तसेच नितीश भारद्वाज आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्रदीर्घ कारकीर्द असलेले विवेक गणपुले हे या आमच्या पॅनेलचे बिनीचे शिलेदार आहेत. हे सर्व जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील अभ्यासक-संशोधक आणि संस्था बांधणीचे जाणकार आहेत. त्यांच्या सहभागामुळे एशियाटिकच्या कारभाराच्या गुणवत्तेत निश्चितपणे भर पडणार आहे. आमच्यापैकी अनेकांना विविध शिक्षण-प्रशिक्षण संस्था, प्रकाशन संस्था अथवा सांस्कृतिक संस्था – संघटना दर्जेदार पद्धतीने चालवण्याचा दीर्घ अनुभव आहे हेही उल्लेखनीय.
वैचारिक अस्पृश्यतेची कीड नको
मुंबईच्या वैभवाचे घटक म्हणजे केवळ गगनचुंबी इमारती किंवा कोस्टल रोड अथवा मेट्रोसारखे दळणवळणाचे प्रकल्प नाहीत. असे संरचना प्रकल्प महत्त्वाचे आहेतच पण विविध संस्थांच्या माध्यमातून साकारलेले समृद्ध संस्था-जीवन हेदेखील महानगरांना आणखी संपन्न आणि समृद्ध करीत असते. त्यासाठीच एशियाटिकच्या लौकिकात भर घालण्याची आणि संस्थेला वैचारिक अस्पृश्यतेची कीड लागू न देता तिथले संस्थाजीवन अधिक निकोप, व्यवसायनिष्ठ पण तरीही मनुष्य स्पर्शाने संवेदनशील झालेले, सर्व समावेशी आणि व्यापक दृष्टी बाळगणारे असण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी सलोख्याचा संवाद निर्माण करूनच या संस्थेला तिचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवून देता येईल यात शंका नाही. हे सर्व घडवून आणण्याची क्षमता ‘एशियाटिक टुमॉरो’मध्ये आहे आणि म्हणूनच संस्थेतील अनागोंदीच्या बातम्यांनी व्यथित होणार्या सर्व एशियाटिक प्रेमी आणि ज्ञानोपासना-निष्ठ मतदारांनी आमच्या पॅनेलला आपली मौल्यवान मते द्यावीत असे आमचे कळकळीचे आवाहन आहे . गौरवास्पद इतिहास असलेल्या या संस्थेचे भवितव्य भूतकाळापेक्षाही अधिक उज्ज्वल करण्याच्या इराद्याने, ‘एशियाटिक’मधील गैरकारभार निपटून काढण्यासाठी नव्या दमाची, नव्या आकांक्षांची आणि प्रबळ इच्छाशक्तीची टीम ही ‘एशियाटिक’ची गरज आहे. आमचे पॅनेल ही गरज पूर्ण करण्याच्या क्षमतेचे आहे.
(लेखक हे ‘एशियाटिक टुमॉरो’ या पॅनेलतर्फे अध्यक्षपदाचे उमेदवार)
