साधारण दीड दशकापूर्वीची गोष्ट. अमेरिकी दूतावासातील एक अधिकारी दोन जणांना गोळ्या घालतो. त्याचे म्हणणे असते की, ते दोघे जण त्याला लुटण्याच्या उद्देशाने आल्याने स्वसंरक्षणार्थ त्याने हे कृत्य केले. हत्या झालेल्या एका पुरुषाची पत्नी आत्महत्या करून चिठ्ठीमध्ये, ‘खून का बदला खून’ अशी मागणी करते तेव्हा प्रश्न अधिक जटिल होतो. ज्या देशात हे घडलेले असते, तेथील राज्यव्यवस्था हादरते. अमेरिकी अधिकारी दूतावासातील असल्यास त्याला शिक्षेत सवलत मिळण्याच्या अधिकाराचा दाखला अमेरिकींकडून दिला जातो, तर घटना घडलेल्या देशातील माध्यमे अमेरिकी अधिकार्‍याची लष्करी पार्श्वभूमी वगैरे खणून काढतात आणि तो अमेरिकेच्या विशेष गुप्त मोहिमेवर आल्याचा संशय व्यक्त करून त्याच्या राजनैतिक सवलतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. प्रकरण उच्च न्यायालयात जाते, न्यायालय परराष्ट्र मंत्रालयाकडून अमेरिकी अधिकार्‍यासंदर्भातील कागदपत्रे मागवते. देशात या प्रकरणावरून गदारोळ, संताप होतो. या अमेरिकी व्यक्तीला व्हिसा कसा दिला गेला, यावरून गोंधळ सुरू होतो.

दरम्यानच्या काळात देशाचे अध्यक्ष सर्वपक्षीय बैठक बोलवतात. त्यात अमेरिकी व्यक्तीला कायद्यातील तरतुदीनुसार मृत्यूची भरपाई देण्याच्या शिक्षेवर एकमत होते. पण, परराष्ट्रमंत्री बाहेर येऊन भलतेच बोलतात. म्हणतात, ‘अमेरिकी व्यक्तीला राजनैतिक सवलत असल्याने त्याला या प्रकरणातून मुक्त करावे, असे अध्यक्षांचे मत पडले आहे.’ परराष्ट्रमंत्र्यांची ही अनाकलनीय भूमिका नेमकी कोणाला आणि का अडचणीत आणण्यासाठी असते, ही भूमिका घेण्याला काही काळापूर्वी घडलेल्या कोणत्या घटना कारणीभूत असतात, एकीकडे देशात निर्माण झालेला रोष आणि दुसरीकडे राजकीय पेच, यातून अध्यक्ष कसा मार्ग काढतात आणि अंतिमत: अमेरिकी नागरिकाच्या प्रकरणाचे काय होते, हे जाणून घ्यायचे असेल, तर ‘द झरदारी प्रेसिडेन्सी : नाउ इट मस्ट बी टोल्ड’ हे पुस्तक मुळातून वाचायला हवे. नाही, ही कादंबरी नाही. आसिफ अली झरदारी २००८ ते २०१३ या काळात पाकिस्तानचे अध्यक्ष असताना तिथे घडलेल्या अनेक घटना, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि झरदारी यांचे व्यक्तिगत आयुष्य यांचा एक दस्तावेज आहे. या संपूर्ण काळात अध्यक्षांचे प्रवक्ते असलेले फराहतुल्ला बाबर हे त्याचे लेखक.

राजकीय व्यक्ती, त्यांची कारकीर्द याबाबत त्यांच्याबरोबर काम करणार्‍यांनी लिहिणे ढोबळमानाने तीन हेतूंसाठी असू शकते. ज्या व्यक्तीवर लिहायचे, त्यालाच विरोध असेल, तर थेट किंवा अप्रत्यक्ष मानहानी व्हावी हा पहिला. त्यात तथ्य सत्य म्हणून कथन करताना कथन करणार्‍याच्या बाजूनेच पाहिले जाऊन व्यक्तीला दोष दिला जातो. दुसरा हेतू स्वत:च्या पुढच्या कुठल्या तरी वैयक्तिक लाभासाठी व्यक्तीचा उदोउदो करण्याचा, ज्यात तथ्याचीच मोडतोड होऊ शकते आणि तेच सत्याच्या जवळ नेऊन सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. तिसरा हेतू असू शकतो, खरेच एक दस्तावेज निर्माण करण्याचा, जेणेकरून ती व्यक्तीच नव्हे, तर त्याचे व देशाचे राजकारण, प्रतिमा आणि राजकीय संस्कृती यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या परिप्रेक्ष्यात मूल्यमापन होऊ शकेल. बाबर यांच्या लेखनात या तीनपैकी किंवा त्या पल्याड कोणता हेतू आहे, हे वाचकाच्या पाकिस्तानविषयक अभ्यासाच्या वकुबावरच ठरू शकते. त्यामुळे पुस्तक परिचय करून देताना त्यावर टिप्पणी करणे अयोग्य. मात्र, बाबर यांचे पुस्तक कोणत्याच वाचकाच्या दृष्टिकोनातून नीरस नाही, इतके नक्की. पुस्तकातील उपरोक्त प्रसंगाचा उल्लेख त्यासाठीच.

तर, पुस्तकाचा परिचय करून देण्याआधी बाबर यांच्याविषयी थोडे. आसिफ अली झरदारी २००८ ते २०१३ या काळात पाकिस्तानचे अध्यक्ष असताना बाबर त्यांचे प्रवक्ते होते. या काळातील घडामोडींबद्दल त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले, ते त्यामानाने अलीकडे. म्हणजे, पहिली आवृत्ती आली २०२५ मध्ये – अशा काळात जेव्हा झरदारी यांनी पाकिस्तानचे १४ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेऊन एक वर्ष झाले होते. ‘झरदारी परत जा’ अशा घोषणा पाकिस्तानात घुमत असताना, अलीकडेच त्यांनी संसदेत भाषण केले आणि भारत पाकिस्तानविरुद्ध युद्धाची तयारी करत आहे, असे वक्तव्य करून टाकले. सुमारे पंचवीसेक वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्य भारतीयांना ज्यांची ओळख केवळ पाकिस्तानच्या दिवंगत माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती एवढीच होती, ते किती मुरलेले राजकारणी आहेत, हे त्यांनी केलेल्या या (अ)राजकीय वक्तव्यातून कळावे, म्हणून हा उल्लेख. बाबर यांचे पुस्तक वाचतानाही ओळींच्या दरम्यानचे अर्थ काढले की हेच प्रतीत होत राहते. बाबर यांनी झरदारी यांना अगदी जवळून पारखले असल्याने तर अधिकच.

बाबर मुळात पत्रकार. तेथून त्यांचा राजकारणाशी संबंध आला, तो बेनझीर भुट्टो यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकीर्दीत (१९८८-१९९०). ते भुट्टो यांची अधिकृत भाषणे लिहित. नंतर दुसर्‍या वेळी (१९९३-१९९५) ते बेनझीर यांचे प्रवक्ते होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर म्हणूनही बाबर यांनी नंतर काम केले. बेनझीर यांच्या हत्येनंतर काही काळाने झरदारी यांची पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांनी बाबर यांना आग्रहाने त्यांच्या वर्तुळात ठेवले. त्याबाबतचा रोचक प्रसंग या पुस्तकात आहे.

बाबर यांनी प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, हे पुस्तक म्हणजे झरदारी अध्यक्ष असताना त्यांच्याबरोबरच्या केलेल्या कामाच्या आठवणींचा दस्तावेज आहे. मुळात पत्रकार असल्याने बाबर यांनी तथ्यांशी तडजोड न करण्याचा काटेकोर प्रयत्न केल्याचे जाणवते, तसेच ती नीरसपणे न मांडता रंगवून सांगितली आहेत. वाचकाला एकूण दहा प्रकरणांत हा प्रवास घडतो. झरदारींचे व्यक्तित्व, त्यांचा परराष्ट्र धोरणात प्रवेश, मुशर्रफ यांच्यावरील महाभियोगाचा प्रयत्न ते गच्छन्ति, न्यायव्यवस्थेशी सामना, ओसामा बिन लादेनचे पाकिस्तानात सापडणे, रेमंड डेव्हिस प्रकरण (लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेले), मेमोगेट प्रकरण असे जात जात बाबर ‘काही’ भाग आणि ‘काही’ रहस्यांविषयी बोलतात आणि अखेरीस झरदारींच्या पुर्नउदयापर्यंत वाचकाला आणतात.

बाबर यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे, की हे काही फक्त झरदारी यांचे चरित्र किंवा आठवणी नाहीत. यात सत्तेच्या खेळातील चढ-उतार, सत्तेच्या वर्तुळातील लोकांच्या देहबोलीतून आणि संवादातूनही व्यक्त होणार्‍या आशा, भय आणि कुरघोड्याही आहेत. अध्यक्ष म्हणून दिसलेले त्यांचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचेही दर्शन यातून घडते. पाकिस्तानच्या गूढगर्भिततेचे आकर्षण अनेक विश्लेषक, रणनीतीकारांना असते. त्यांची ज्ञानक्षुधा काही प्रमाणात हे पुस्तक पूर्ण करते.

पाकिस्तानातील राजकीय व्यवस्था आणि लष्कर व गुप्तचर संघटना यांतील संबंध नक्की कशा प्रकारचे आहेत, होते, यावर या पुस्तकातून काही प्रमाणात प्रकाश पडतो. विशेषत: मुशर्रफ यांची गच्छन्ती आणि ओसामा बिन लादेनचा अमेरिकनांनी अबोटाबादमध्ये येऊन खात्मा केल्यानंतर निर्माण झालेले ताणेबाणे मुळातून वाचण्यासारखे आहेत. लादेनबाबतच्या मोठ्या प्रकरणात बाबर यांनी या घटनेच्या अनेकविध कंगोर्‍यांना स्पर्श केला आहे. अमेरिकेने पाकिस्तानात येऊन ज्या पहाटे कारवाई करून लादेनला मारले, त्याच्या काही तास आधी झरदारींच्या घरी पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग (क्यू) यांच्यात सत्तेतील वाट्यांबाबत चर्चा सुरू होती. मुस्लीम लीगने केलेल्या मागण्या, अंतिम मसुद्यातील वाक्यरचनेत होणारे बदल, कळीच्या काही निर्णयांसाठी उपस्थितांपैकी पुन्हा निवडकांनी बाजूला जाऊन केलेली चर्चा असे सगळे वर्णन बाबर यांनी केले आहे. सत्तेच्या वाटाघाटींची ही रात्र सरताना देशाला नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, याची कल्पनाही नेत्यांच्या मनात नसणे हे चित्र त्यांनी फार प्रभावीपणे रंगवले आहे. या वाटाघाटींनंतर काही तासांतच निर्माण झालेल्या स्थितीने राजकीय नेतृत्वाचा किती कस पाहिला, याचा लेखाजोखा पुढे येतो.

लादेन सुमारे दशकभर अबोटाबादमध्ये असल्याची माहिती पाकिस्तानातील राजकीय व्यवस्थेतील सर्वोच्च नेतृत्वाला होती का नव्हती, लष्कर वा गुप्तचर संस्थेला तरी त्याबाबत किती माहीत होते, अमेरिकींना ती कुठून मिळाली आणि त्यांनी राजकीय नेतृत्वाला अजिबात विचारात न घेता लादेनचा पाकिस्तानच्या भूमीत घुसून खात्मा केल्यानंतर देशाच्या सार्वभौमत्वावर उभी राहिलेली प्रश्नचिन्हे किती भेदक होती, या सगळ्याचा ऊहापोह बाबर करतात. वाचकाने पुस्तकात न लिहिलेला, पण ओळींदरम्यान दडलेला मजकूर तेवढा वाचायला हवा. अर्थात, त्या वेळच्या परिस्थितीत झरदारींच्या कुशल हाताळणीमुळे पाकिस्तानातील लोकशाही राजकीय व्यवस्था शाबूत राहिली, या मताकडे बाबर झुकतात, हेही जाणवतेच.

बाबर यांच्या मते, पाकिस्तानी भूमीवर ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने केलेल्या कारवाईची राजकीय नेतृत्वाला किंवा लष्कराला साधी कुणकुणही न लागणे, त्यातून सत्ताधारी व लष्करात निर्माण होत असलेला बेबनाव आणि त्याची परिणती म्हणून उपटलेले ‘मेमोगेट’ प्रकरण हा झरदारी यांच्या पहिल्या अध्यक्षीय कारकीर्दीत आलेला अत्यंत अवघड काळ होता. तशीच त्यांची कसोटी लागली, ती १८वी घटनादुरुस्ती आणताना, ज्यात केंद्र सरकारच्या अधिकारांच्या विकेंद्रीकरणाद्वारे प्रांतांना अधिक अधिकार दिले जाऊन सरकारची संसदीय रचना पुनस्र्थापित करण्याचा प्रयत्न होता. बाबर यांनी राजकीय प्रसंग, वाटाघाटी, कुरघोड्या आणि राजनैतिक पेचांचे धागे जसे उलगडले आहेत, तसे झरदारी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही ते ओघवत्या शैलीत कथन करतात. मित्रांशी प्रामाणिक असणारे, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे झरदारी मित्रांच्या चुकाही कशा पोटात घालतात, मुलांबद्दल कसे हळवे होतात, बेनझीर यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा कसा व्यक्त करतात, हे बाबर खुबीने मांडतात.

पुस्तकात २००८ मधील मुंबईवरील हल्ल्यांचा संदर्भ येतो, पण त्यावर सविस्तर भाष्य नाही. भारत-पाकिस्तान संबंधांवरही फारसे विवेचन नाही. पण, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या छुप्या कारवायांना उघडे पाडून लोकशाही राजकीय व्यवस्था मजबूत करण्याची संधी या काळात गमावल्याची खंत ठिकठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यक्त होत राहते. झरदारींकडे तो वकुब असून, ते झाले नाही, असे लेखकाला सुचवायचे असावे, असे वाटत राहते. तसे वाटण्याचे कारण पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणाच्या शेवटच्या परिच्छेदात आहे. बाबर म्हणतात, ‘अपघातानेच नेतृत्व मिळालेल्यांसमोर अजब आव्हाने असतात. पण, म्हणूनच त्यांना तितक्याच अपघाती पद्धतींनी आपली छाप उमटविण्याचीही संधी असते. झरदारींनाही अचाट आव्हाने पेलावी लागली. ती पेलताना त्यांनी आपली छाप सोडली का, याचा निर्णय मात्र जनता आणि इतिहास करील. इतिहासकारांना हा निर्णय करण्यासाठी मी जे लिहिले आहे, ते कदाचित उपयोगी पडेल, इतकेच…’

द झरदारी प्रेसिडेन्सी : नाउ इट मस्ट बी टोल्ड

लेखक : फराहतुल्ला बाबर

प्रकाशन : रूपा पब्लिकेशन्स

पृष्ठे : ४६२, किंमत : ९९५ रु.