‘चित्त’, ‘लक्ष’, ‘ध्यान’ आणि ‘एकाग्रता’ यावर पुढील काळात या गोष्टी साध्य करण्यासाठी अधिकाधिक दाम मोजावे लागणार अशी आजची परिस्थिती. कारण मोबाइल-समाजमाध्यमात अद्ययावत राहण्यात आणि सतत तिथल्या आपल्या प्रतिमेची रंगसफेदी करण्यात आपण दिवसातल्या चोवीस तासांत किती बुडून जातो, याचा खरा विदा (तपशील) आपल्याचपाशी असतो. गॅझेट्समध्ये व्यापताना त्यांचे गुलाम बनत असल्याची जाणीव अद्याप तरी बहुतांशांना नाही. पण २०१८ पासून ‘फ्रेण्ड्स ऑफ अटेन्शन’ नामक चमू यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या आठेक वर्षांच्या कामाचा म्हणजेच ‘अटेन्शन’ वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपायांचा दस्तावेज म्हणजे ‘अटेन्सिटी : अ मॅनिफेस्टो ऑफ द अटेन्शन लिबरेशन मूव्हमेण्ट’ हा नव्या वर्षात प्रकाशित झालेला महत्त्वपूर्ण ग्रंथ. या ग्रंथाचे हे परीक्षण-समीक्षण नाही. पण मेगन नोलन या आयरिश कादंबरी लेखिकेने या चळवळीची करून दिलेली ओळख. डोळ्यांत ‘अंजन’ वगैरे टाकून घेण्याच्या पातळीवर पोहोचल्याचे वाटत असल्यास…

व्याकरणप्रमादी गीतांजली श्री

गीतांजली श्री यांची हिंदीत २००१ साली प्रकाशित झालेली एक कादंबरी- ‘रूफ बिनीथ इन देअर फीट’ या शीर्षकाने तपभरापूर्वी इंग्रजीत आलेली. राहुल सोनी यांनी तिचा अनुवाद केला होता आणि पुस्तकाकडे हिंदीतून आलेल्या नव्या पुस्तकापलीकडे इंग्रजी वर्तुळाने तिची दखल घेतली नव्हती. नुकतीच भारतेतर जगतासाठी या कादंबरीचे हक्क विकत घेण्यात येऊन ती नव्या रूपड्यासह पुन्हा आलीय. तर त्यानिमित्ताने गेल्या आठवड्यात गीतांजली श्री यांची मुलाखत ऑब्झर्व्हरमध्ये प्रकाशित झालीय. इंटरनॅशनल बुकर मिळालेली ‘रेतसमाधी’ (टूम्ब ऑफ सॅण्ड) मराठीत अनुवादित झाल्यानंतर आपल्याकडे बर्‍याच वाचकांनी त्यातली मोठी वाक्ये वाक्यरचनेच्या किमान अपेक्षाही पूर्ण न करणारी आहेत, एकंदर भाषा व्याकरणबरहुकूम नाही, याबद्दल तोंडे वासली असतील. पण हिंदीत पूर्वीपासून त्यांच्यावर तो आरोप होता! – ‘हीच माझी भाषा आहे’- असे गीतांजली श्री या मुलाखतीत सांगतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण पूर्ण केलेली एक पिढी आपल्या मातृभाषेशी कशी टिकून राहिली, यासह आजच्या आंग्ल भारतीय लेखकांची मातृभाषेविषयीची अनास्था आदी मुद्द्यांवर त्या व्यक्त झाल्यात. या दुव्यावर नावनोंदणी करून ही मुलाखत पूर्ण वाचता येईल. त्याशिवाय पुस्तकाचा अंश दुसर्‍या दुव्यावर.

पार्सलबॉय ते खूपविका लेखक

‘आय डिलिव्हर पार्सल्स इन बीजिंग’ हे चिनी कुरिअर बॉयचे पुस्तक २०२५च्या सप्टेेंबरात इंग्रजीत आले. ब्लॉगपोस्टच्या एकत्रीकरणाचे फलित असलेले पुस्तक गेल्या चारेक महिन्यांत आंतरराष्ट्रीय खूपविक्या गटात गाजतेय. इतके की पुढल्या काही महिन्यांमध्ये ते भारतातील रेल्वे-बसस्थानकांजवळच्या खूपविक्या पुस्तकांच्या गर्दीतही गाजेल. आपल्या भवताली पार्सलभावांची संख्या अलीकडे वाढलीय आणि पुढेही वाढत राहणार. तूर्त या नवलेखकाची ताजी मुलाखत या दुव्यावर वाचता येईल.