हैदराबादेत नामपल्लीनजीकच्या आगापुर्यात राहणारे आणि अग्निशमन खात्यात कारकुनी करणारे गौस खान यांची सात अपत्ये एकापाठोपाठ दगावली. मग १९४३ साली आठवा मुलगा झाला तेव्हा, हा जगेल न जगेल या भीतीने त्याचे नावच ठेवले गेले नाही… पाचव्या वर्षीपर्यंत त्याला सगळे ‘बब्बन’च म्हणायचे. हा आठवा मुलगा मात्र जबरदस्त जीवनेच्छा घेऊन आला होता.
तो नुसता जगलाच नाही तर काहीतरी करून दाखवण्यासाठी झगडला, परिस्थिती बदलण्याचे बळ येण्यासाठी मुळात आधी परिस्थिती जोखून, ती का बदलायची हे ओळखावे लागते… तेही वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याच्याकडून घडले. आपण हास्यास्पद परिस्थितीत जगत आहोत, हे त्याने नेमके ओळखले.
तेच जगाला खुसखुशीतपणे सांगण्यासाठी त्याने एकपात्री नाटक लिहिले… ‘अद्रक केे पंजे’! हा एकपात्री प्रयोग जगभर-म्हणजे ६० देशांमधल्या, २७ भाषा बोलणार्या, सुमारे तीन कोटी प्रेक्षकांपर्यंत गेला. त्याचे १०,१८० खेळ झाल्यावर ११ फेब्रुवारी २००१ रोजी बब्बन खान यांनीच तो थांबवला, पण याच्या निम्म्या टप्प्यावरच १९८४ मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने त्यांच्या ५,१६९ व्या खेळानंतर ‘जगात सर्वाधिक खेळ झालेला एकपात्री प्रयोग’ अशी नोंद केली होती.
हे बब्बन खान परवाच, वयाच्या ८३ व्या वर्षी निवर्तले. स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या, पण कळत्या वयात स्वतंत्र भारताची वाटचाल पाहात ऐन विशीच्या वयात असताना युद्धग्रस्त भारताच्या अर्थझळा भोगाव्या लागलेल्या, तरीसुद्धा देशप्रेम जराही कमी होऊ न देता कर्तृत्व गाजवणार्या पिढीतला आणखी एक मोहरा गळाला. दूरचित्रवाणी नाही, फक्त रेडिओ- तीही सरकारी मालकीची (पण कमालीची स्वायत्त) ‘आकाशवाणी’ केंद्रे- अशा काळात बी. ए. होताहोताच बब्बन यांनी रेडिओसाठी ‘श्रुतिका’ लिहिणे सुरू केले होते.
त्या काळात सर्वसामान्यांच्या कारकुनी कुटुंबांतली नीरस हास्यास्पदता (मुंबईतल्या पु. ल. देशपांडे यांनादेखील ती जाणवतच होती आणि त्यातूनच ‘असा मी असामी’ १९६४ साली सिद्ध झाले होते; पण ) बब्बन खान यांना हैदराबादेतही जाणवली आणि त्यातून ‘अद्रक के पंजे’ हे एकपात्री नाट्य १९६५ सालच्या १५ ऑगस्ट रोजी तीन तासांच्या बैठकीत, एकटाकी लिहिले गेले! प्रयोगासाठी आईचा दागिना (गळ्यातले पदक) गहाण ठेवून २०० रुपयांचे थिएटर भाडे भरले, पण पहिला खेळ पडला… तरीही दुसरा लावलाच, तो मात्र चालला आणि तेव्हापासून ‘धावू’ लागला! ‘६५० रुपयांतही हा एकपात्री प्रयोग होऊ शकतो’ हा हिशेब समजलेल्या बब्बन यांनी पुढे स्वत:चा बंगला बांधला.
‘अद्रक के पंजे’ म्हणजे आल्यासारखी अस्ताव्यस्त वाढ. अशी कुटुंबे आगापुर्यात, हैदराबादेत, त्या वेळी संततिनियमनाला नावे ठेवणार्या भारतभरात भरपूर. पण अधिक मुले म्हणजे जिणे अधिक केविलवाणे, हे लोकांना हसवता-हसवता त्यांच्या गळी उतरवले ते बब्बन खान यांच्या या प्रयोगानेच! हा प्रयोग ब्रिटिश राणी, मार्गारेट थॅचर, इंदिरा गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी पाहिला. कुटुंबनियोजनाचा प्रचारच फक्त नव्हे, तर ‘तुमच्या जगण्यातला अर्थ शोधण्याची तुमची तयारी आहे का?’ हा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांना भिडवणारा हा प्रयोग होता.
