हवामान बदल हा जागतिक प्रश्न होऊनही आता अनेक दशके लोटली. थोड्या फार फरकाने आज जगातील अनेक देश या समस्येचा सामना करत आहेत. कुठे तीव्र उष्णतेच्या लाटा तर कुठे अतिवृष्टी. याबाबतीत विचार केल्यास यंदाच्या वर्षात हवामान बदल ही समस्या अधिक तीव्र होताना दिसत आहे. हवामान बदलामागील विज्ञान समजून घेणे ही काळाची गरज झाली आहे. कारण ते समजून घेतल्याशिवाय आपल्यातील प्रत्येकावर किती मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव होणे कठीण. ही जाणीव करून देण्यात पत्रकार राजन मेहता यांचे ‘बॅकस्टेज क्लायमेट’ हे पुस्तक मदत करू शकेल. हवामान बदलासंदर्भात गेल्या अनेक वर्षांत जगभर झालेल्या परिषदा, करार, महत्त्वाच्या बैठका आणि त्यांची फलश्रुती यांचे विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. पुस्तक केवळ समस्या मांडून थांबत नाही, तर समस्या गंभीर असली तरी सामूहिक कृतीतून त्यावरही प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असा आशावादही जागवते.

अदृश्य संघर्षाची कहाणी

हवामान बदल हा आजच्या काळातील सर्वांत गंभीर जागतिक प्रश्नांपैकी एक आहे. मात्र त्याची चर्चा बहुधा वैज्ञानिक अहवाल, आकडेवारी किंवा बातम्यांपुरतीच मर्यादित राहते. या संकटामागील विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण, सार्वजनिक धोरणे आणि त्यांचे समाज-अर्थव्यवस्थेवरील परिणाम यांविषयी बहुतेक व्यक्ती अनभिज्ञ असतात. मात्र, अगदी सहज सोप्या भाषेत हा व्यापक पट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मेहता यांनी या पुस्तकातून केला आहे. हवामान बदलाकडे केवळ पर्यावरणीय प्रश्न म्हणून न पाहता ती विकास, अर्थकारण आणि जागतिक सत्तासमीकरणांची अपरिहार्य निष्पत्ती असल्याचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. 

 गेल्या काही वर्षांत देशातील अनेक भागांनी अतिवृष्टी, शहरी पूर, दरडी कोसळणे, उष्णतेच्या लाटा आणि वादळांचा अनुभव घेतला. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसात अनेक शहरांत पाणी साचले, हजारो झाडे उन्मळून पडली, वाहतूक विस्कळीत झाली आणि वित्तहानी झाली. अशा घटना आता अपवाद राहिलेल्या नसून त्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. आपण आता अशा काळात जगत आहोत जिथे पर्यावरणीय प्रश्न, त्यांचे आरोग्यासह अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या सार्‍याविषयी योग्य माहिती मिळवणे अपरिहार्य झाले आहे. मेहता यांनी नेमकी हीच माहिती देण्याचा प्रयत्न पुस्तकातून केला आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच हवामान बदलाचे विज्ञान रंजक पद्धतीने उलगडत जाते. पृथ्वीभोवती असलेल्या हरितगृह वायूंची तुलना लेखकाने पांघरुणाशी केली आहे. जसे पांघरूण स्वत: उष्णता निर्माण करत नाहीत, मात्र शरीरातील उष्णता बाहेरही जाऊ देत नाही, त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरितगृह वायू पृथ्वीवरून बाहेर पडणारी उष्णता अडवतात. हे नैसर्गिक कवच जीवनासाठी आवश्यक असले तरी मानवी हस्तक्षेपामुळे त्याची जाडी वाढत चालल्याने पृथ्वीचे तापमान धोकादायक वेगाने वाढत असल्याचे लेखक स्पष्ट करतो. औद्योगिक क्रांतीपूर्वी वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सुमारे २८५ पीपीएम होते, ते आज ४२५ पीपीएमपर्यंत पोहोचल्याचा दाखला देत हवामान बदलाचे गांभीर्यही अधोरेखित केले आहे. याचबरोबर ‘अल्बेडो इफेक्ट’, महासागरांची उष्णता शोषून घेण्याची क्षमता, आ्क्टिटकमधील बर्फ वितळणे आणि परमाफ्रॉस्ट वितळल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर हरितगृह वायू वातावरणात मिसळण्याचे दुष्टचक्र समजावून सांगितले आहे.

पर्यावरण बदलामागील वैज्ञानिक कारणांचा वेध घेतानाच टोकाच्या घटना हा केवळ निसर्गाचा लहरीपणा नसून पृथ्वीच्या ऊर्जा संतुलनात झालेल्या बिघाडाचा परिणाम असल्याचे यातून त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या ‘एल निनो’सह हवामानाची स्थिती हा वारंवार बातम्यांचा विषय ठरत आहे, पण अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की, जगाच्या एका टोकावर सक्रिय होणार्‍या हवामान स्थितीचा आपल्या परिसरावर परिणाम होऊ शकतो का? याच संदर्भात माहिती देताना लेखक ‘एल निनो’, ‘अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सक्र्युलेशन’ यांसारख्या गुंतागुंतीच्या हवामान प्रणालींचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देतात. पृथ्वीचे तापमान वाढल्याने हे वायुप्रवाह आणि समुद्री प्रवाह मंदावतात किंवा त्यांच्या मार्गांत बदल होतो. परिणामी, एखाद्या भागात पाऊस दीर्घकाळ रेंगाळतो, तर दुसर्‍या भागात उष्णतेची लाट किंवा दुष्काळ अधिक तीव्र होतो आणि दीर्घकाळ टिकतो. भारतातील मोसमी पाऊस, अमेरिकेतील चक्रीवादळे आणि युरोपातील उष्णतेच्या लाटा यांसारख्या घटनांचा संदर्भ देत लेखक या बदलांचा जागतिक परिणाम स्पष्ट करतात. लेखकाने केवळ वैज्ञानिक सिद्धांत मांडलेला नाही, तर त्यांची प्रत्यक्ष उदाहरणांशी सांगड घातली आहे. केदारनाथमधील २०१३ मधील पूर, ‘एल निनो’चा भारतीय मोसमी पावसावर होणारा परिणाम, चक्रीवादळांची वाढती तीव्रता यांचा उल्लेख करत लेखकाने हवामान बदल आणि अतिवृष्टी यांचा परस्परसंबंध उलगडून दाखवला आहे. यामुळे पुस्तक वाचताना साहजिकच आपण सद्य:स्थितीत ही परिस्थिती अनुभवत असल्याची जाणीव होते आणि त्याचबरोबर अशा नैसर्गिक घटनांची तीव्रता किती असू शकते याविषयीही माहिती मिळते.

पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे त्याची मांडणी. हवामान बदलाची मूलभूत संकल्पना आणि जागतिक तापमानवाढीमागील विज्ञान समजावून सांगताना लेखक क्लिष्ट वैज्ञानिक परिभाषेचा आधार घेत नाही. उलट, हरितगृह वायू, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, आरोग्यावर होणारे परिणाम यांसारख्या विषयांची सहज उकल केलेली दिसते. पॅरिस करार, स्वच्छ हवा, कार्बन ऑफसेट, सौर भू-अभियांत्रिकी अशा विविध विषयांचीही या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे. विज्ञानाची मांडणी करताना आकडेवारीचा आधार घेतला असला तरी ती कोरडी न वाटता वाचकाला विषयाशी जोडून ठेवते. त्यामुळे ती अत्यंत सोपी आणि रंजक वाटते. पॅरिस करारासारखा गुंतागुंतीचा आंतरराष्ट्रीय विषयदेखील लेखकाने अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत उलगडला आहे. हिंदू पुराणातील ‘समुद्रमंथन’ या कथेशी तुलना करून कराराची गरज स्पष्ट केल्यामुळे विषय अधिक रंजक आणि आणि सहज लक्षात येतो. त्यानंतर लेखकाने ‘क्योटो प्रोटोकॉल’, ‘क्लायमेट फायनान्स’ आणि विविध देशांची जबाबदारी यांचा मागोवा घेतला आहे. त्यामुळे वाचकाला पॅरिस कराराचा इतिहास, उद्दिष्टे आणि जागतिक हवामान बदलातील त्याचे महत्त्व सहज समजण्यास मदत होते. म्हणजेच पुस्तकाच्या सुरुवातीला हवामान बदलामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगितल्यानंतर लेखकाने पुढे हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी जगाने केलेल्या सामूहिक प्रयत्नांची, म्हणजेच पॅरिस कराराची, सुसंगत आणि क्रमवार मांडणी केली आहे.

राजन मेहता यांनी पुस्तकात हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांचाही प्रश्न असल्याचे प्रभावीपणे मांडले आहे. चिपको आंदोलनापासून सुरुवात करत विकास, प्रदूषण आणि हवामान बदलाचा सर्वाधिक फटका गरीब, आदिवासी आणि वंचित समुदायांनाच कसा बसतो, हे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आहे. श्रीमंत आणि विकसनशील देशांमधील जबाबदार्‍यांतील असमानता, ‘जस्ट ट्रान्झिशन’ आणि ‘लॉस अँड डॅमेज फंड’ यांसारख्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगताना लेखक हवामान न्यायाची जागतिक गरज अधोरेखित करतात. हवामान बदल हा फक्त तापमानवाढीचा विषय नसून न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठेशी निगडित जागतिक प्रश्न आहे, ही जाणीव लेखक वाचकांच्या मनात ठसविण्यात यशस्वी झाले आहेत असे म्हणता येईल.

हवामान बदलाच्या लढ्यात केवळ सरकारे किंवा उद्योग नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते असे लेखकाचे ठाम मत आहे. महात्मा गांधींच्या ‘बी द चेंज यू वॉन्ट टू सी’ या विचाराचा आधार घेत लेखक दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या कृतींमधून मोठा बदल घडू शकतो, असा आशावादी संदेश देतात. मेहता यांनी ‘ए टू झेड’ या अक्षरमालिकेनुसार हवामानपूरक जीवनशैलीचा आराखडा मांडला आहे. जागरूकता, हरित व्यवसायांना पाठिंबा, ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, वृक्षारोपण, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि शाश्वत जीवनशैलीला पाठिंबा अशा अनेक कृतींचा सोप्या भाषेत ऊहापोह केला आहे. त्यामुळे यापूर्वी आपल्याला माहीत नसलेल्या अनेक संज्ञा आणि संकल्पना यांची हळूहळू ओळख होत जाते. वाचकाला केवळ माहिती मिळत नाही, तर स्वत:पासून बदलाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते. लेखकाने हवामान बदलावर मात करण्यासाठी सरकारची भूमिका किती निर्णायक आहे, याची सविस्तर मांडणीदेखील करतात.

हवामान बदलासारख्या जागतिक समस्येचा सामना केवळ वैयक्तिक प्रयत्नांनी शक्य नसून, त्यासाठी कायदे, सार्वजनिक धोरणे, आर्थिक संसाधने आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता असल्याचे मेहता यांनी नमूद केले आहे. यामध्ये त्यांनी अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन आणि हवामानपूरक पायाभूत सुविधा यांसारख्या उपाययोजना हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी किती प्रभावी ठरू शकतात, हे स्वीडन, ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड आणि भारतातील उदाहरणांच्या आधारे स्पष्ट केले आहे. इथे विशेष म्हणजे, विविध देशांची धोरणे मांडताना वस्तुनिष्ठ दृष्टिकोन कायम ठेवला आहे. तसेच त्यांनी हवामान बदलाच्या लढ्यात राष्ट्रीय धोरणे आणि जागतिक सहकार्य यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला आहे. हवामान बदलाविरोधातील लढा हा केवळ नागरिकांचा किंवा उद्योगांचा नाही, तो सक्षम, उत्तरदायी आणि दूरदृष्टी असलेल्या शासनव्यवस्थेचाही आहे. त्यामुळे हवामान बदलाचा विचार करताना पर्यावरणीय उपायांइतकाच धोरणात्मक निर्णयप्रक्रियेचाही विचार आवश्यक असल्याचे ते पटवून देतात. 

 ‘बॅकस्टेज क्लायमेट’ हे पुस्तक हवामान बदल या गुंतागुंतीच्या विषयाकडे केवळ वैज्ञानिक किंवा धोरणात्मक दृष्टीने पाहत नाही, तर त्यामागील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मानवी पैलूही उलगडून दाखवते. पॅरिस करार, कार्बन बाजारपेठ, जैवविविधता तसेच प्रत्येक नागरिकाची भूमिका अशा विविध अंगांचा लेखकाने सहज, सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह घेतलेला वेध पुस्तकाला वेगळेपण देतो. लेखकाची ओघवती आणि संवादात्मक मांडणी, क्लिष्ट संकल्पना सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची हातोटी आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी कृतीची प्रेरणा देणारा दृष्टिकोन ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून मानवी अस्तित्वाशी निगडित प्रश्न आहे, याची जाणीव हे पुस्तक प्रकर्षाने करून देते. आजच्या काळात हवामान बदल समजून घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी, धोरणकर्त्यांसाठी, पर्यावरण अभ्यासकांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी ‘बॅकस्टेज क्लायमेट’ हे माहितीपूर्ण, विचारप्रवर्तक आणि कृतीची दिशा दाखवणारे संदर्भपुस्तक ठरते. हवामान बदलाकडे केवळ चिंतेने नव्हे, तर जबाबदारीने पाहण्याची, त्यावर योग्य कृती करण्याची प्रेरणा हे पुस्तक निश्चितच देते. हवामान बदलामागील विज्ञान समजून घेण्यासाठी हा भक्कम पाया ठरेल, यात शंका नाही.

बॅकस्टेज क्लायमेट : द सायन्स अँड पॉलिटिक्स बिहाइंड क्लायमेट चेंज

लेखक – राजन मेहता

प्रकाशक – वेस्टलँड नॉन-फिक्शन

पृष्ठे – २१५, किंमत – ५९९ रु.