नवरात्रात मांसाहार नको या मागणीला प्रतिसाद म्हणून मोबाइलमधील टॉर्च सुरू करा असे आवाहन केले, पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हरकत नाही, हळूहळू येतील सारे वठणीवर. दीदी नावाचा अडसर तर दूर झाला. आता बंगालींना आपल्या विचाराच्या मागे येण्याशिवाय पर्यायच काय, असा विचार करत बागेश्वर बाबा कोलकाता विमानतळाकडे निघाले. त्यांच्यासोबत बसलेले भाजपचे दोन नेते रागाने बघत असल्याचा भास बाबांना झाला, पण त्यांनी दुर्लक्ष केले. काहीही झाले तरी दहा वर्षांत देशाला शाकाहारी करायचेच असा निर्धार त्यांनी मनातल्या मनात पुन्हा एकदा केला.

तेवढ्यात एका नेत्याने फोनवरून देवीसाठी नैवेद्य म्हणून लागणार्‍या बकर्‍यांची खरेदी कुठून करावी याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली. सगळ्यात चांगले बकरे मिदनापूरला मिळतात. तिथून दोन ट्रक भरून घेऊन या. यावेळची ‘पाठाबोली’ (नैवेद्यासाठी लसूण कांद्याशिवाय शिजवलेला बकरा) धडाक्यात व्हायला हवी अशी सूचना ते देत होते. ऐकून बाबांनी नाकाला रुमाल लावला. मग दुसर्‍या नेत्याचे फोन सुरू झाले. त्यांनी थेट बांगलादेशातील मासोळी व्यापार्‍याशीच बोलणे सुरू केले. यंदा दहा हजार मंडपात पद्मा (भारतात गंगा) नदीत मिळणारा ‘इलीश’ मासा वाटायचा आहे. चार ट्रक पाठवा. या वेळी ‘जोडाइलीश’ (दोन मासे)चा नैवेद्य कमी पडू द्यायचा नाही. देवीच्या कृपेने आपली सत्ता आली आहे असे ते मोठ्याने सांगत होते.

ऐकून बाबांना मळमळू लागले. इतर राज्यांतील भाजपचे लोक आपण म्हणू तसे वागतात. पायावर लोटांगण घालतात. आवाहनानंतर क्षणात मांसाहार सोडतात. हे बंगाली नेते आपल्यालाच आव्हान द्यायला लागले. आता या दोघांचीही तक्रार दिल्लीला करायचीच. अगदी विमानतळावर उतरल्याबरोबर. समजतात काय हे स्वत:ला. बाबांना संताप अनावर होऊ लागला. तरीही त्यांनी संयम बाळगला. हे बघा, आपल्याला एक देश, एक संस्कृती, एक विचार, एक आहार, एक धर्म, एक नेता यावर काम करायचे आहे. माझे येथे येण्याचे प्रयोजन हेच होते. तरीही तुम्ही माझ्याच समोर उघडपणे मांसाहाराचे समर्थन करत आहात. हा केवळ माझाच नाही तर परिवाराने ठरवलेल्या धोरणाचा अपमान आहे असे बाबांनी त्या दोघांना सुनावले, पण त्यांच्याना काडीचाही फरक पडला नाही. ते खरेदीच्या सूचना देण्यात व्यग्र होते. हे बघून बाबांचा आणखी तिळपापड झाला.

विमानतळ येताच तिरमिरीतच ते वाहनातून उतरले. ऑस्ट्रेलियावरून घेतलेली महागडी सुटकेस स्वत:च्या हाताने बाहेर काढल्यावर त्यांनी ‘बाय’ म्हणण्यासाठी वाहनाकडे बघितले तर दोन्ही नेत्यांनी ‘बंगाली संस्कृती जिंदाबाद’ म्हणत त्यांचा निरोप घेतला. हा तर आपला अपमानच असे पुटपुटत ते विमानात बसले. मध्य प्रदेशातील धाममध्ये परतल्याबरोबर त्यांना दिल्लीहून निरोप मिळाला. कोलकात्यात जे तुमच्याबाबतीत घडले त्याकडे दुर्लक्ष करा. आपले ध्येय दीर्घकालीन आहे. तुमच्या दौर्‍यामुळे बंगालमध्ये विकासाचा मुद्दा मागे पडून खानपानावर चर्चा सुरू झाली. हीच आपल्या धोरणात्मक यशाची सुरुवात. आता तुम्हाला ज्या राज्यात पाठवायचे आहे तेथील मांसाहारी खाद्य कोणते याची यादी पाठवत आहोत. तिथेही असेच बोलायचे. निरोप ऐकून बाबांचा राग थोडा शांत झाला.