बांधवगड आणि कुनो राष्ट्रीय उद्यानांच्या सीमावर्ती भागातील एका जंगलात अखिल भारतीय मार्जार कुळाची सभा सुरू झाली तेव्हा तिथे जमलेल्या वाघ व चित्त्यांचे चेहरे चिंताग्रस्त होते. वर्तुळाकार पद्धतीने भरलेल्या या सभेत मध्यभागी दीड वर्षाचा एक वाघाचा बछडा व बाजूला एक चित्ता मान खाली घालून बसलेले. त्या दोघांकडे रागाने बघून डरकाळी फोडत एका ज्येष्ठ वाघाने सुरुवात केली…

‘खूप विचार केल्यावर मी या मताशी आलो की बांधवगडमधील बछड्याचे मोहाच्या फुलांचे गाठोडे चोरण्याचे कृत्य पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाचे आणि चोरीचा उद्देश अधोरेखित करणारे आहे. यामुळे आपल्या कुळाच्या प्रतिमेला जबर धक्का बसला असून प्रचंड बदनामी झाली. चोरलेल्या गाठोड्यातील मोहफुलांपासून वाघांनी दारू तयार केली व शिकारीचा आस्वाद घेत प्याली अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. बछड्याच्या या कृत्याने सार्‍या कुळाला मानवाच्या पातळीवर आणून ठेवले आहे. आपण हिंस्र असलो तरी नीतिमान आहोत.

नैतिकतेचे ढोल बडवून ती न पाळणार्‍या मानवात व आपल्यात हाच फरक आहे. माणूस आपला शत्रू नाही पण मित्रही नाही. त्यामुळे त्याच्या वाईट सवयी आपल्याला लागायलाच नकोत. आपल्या कुळात दारू वर्ज्य. मानव धैर्य एकवटण्यासाठी त्याचा आधार घेतो. आपल्यात निसर्गत:च हा गुण. भलेही या बछड्याने दारू गाळली नसेल पण मोहफुले चोरून तसा संशय मात्र निर्माण केला. त्यासाठी त्याचे पालकही तेवढेच जबाबदार. मानव असो वा आपण, मुलांकडे लक्ष ठेवणे, त्यांना वाईट सवयी लागू न देणे हे कर्तव्यच विसरून गेलेलो.

या वयात बछड्यांमध्ये कुतूहलमिश्रित भाव असतात. त्यातून त्याने हे कृत्य केले असेल हे मी समजू शकतो पण जगाला कोण सांगणार? त्याला भूक लागली असेल तर ती भागवण्याची जबाबदारी त्याच्या पालकाची. त्यांनी ती का पार पाडली नाही? आपल्या अधिवासात भरपूर सावज उपलब्ध आहेत. भूक लागल्याशिवाय आपण शिकार करत नाही. ती कितीही सपाटून लागली तरी दुसर्‍याची शिकार खात नाही. मग मानवाने गोळा केलेली मोहफुले चोरण्याचे कारण काय? शिकार ही जिवंत प्राण्यांची करायची असते हे या बछड्याला पालक कधी शिकवणार? भुकेपेक्षा जास्त गोळा करणे हा मानवाचा स्वभाव झाला, आपला नाही हे लक्षात ठेवा. अल्पसंख्य असलो तरी सार्‍या देशात आपल्याला मान आहे. त्याचा विचार करून वागा.

भविष्यात मानवाशी गाठ वारंवार पडणार. त्याच्याकडे त्रयस्थ नजरेनेच बघा. त्याच्या सवयी स्वत:ला चिकटवू नका.’ एवढे बोलून ज्येष्ठ थांबला. मग चित्त्याकडे वळून म्हणाला ‘काय रे, माणसे मागे लागली म्हणून तुला पळ काढायची काय गरज होती? तुझे नाव वेगळे असले तरी कूळ एकच व या कुळाला पराक्रमाचा वारसा आहे, पळपुटेपणाचा नाही.

आफ्रिकेतून आला असलास तरी गेल्या काही वर्षांत तू भूधारकापासून भूस्वामी झाला आहे. येथे राहायचे असेल तर तुला कुळाचार शिकून घ्यावाच लागेल. मानव समोर आला वा मागे धावला तर हिंमतीने त्याला सामोरे जायचे. हे करताना स्वत:हून हल्ला करायचा नाही. तो घाबरून पळून जाईल असे वर्तन करायचे. आता परदेशीपण विसरा व स्वदेशी असल्यासारखे वागायला शिका. चला निघा सर्व आपापल्या अधिवासात.’ हे ऐकताच सारे पांगले. दुसर्‍या दिवशी बछड्याने चोरलेले मोहाचे गाठोडे जिथून नेले तिथे आणून ठेवत ‘मोहत्याग’ केला, तर चित्त्यांनी मार्जार कुळाची परंपरा समजून घेण्यासाठी वाघांना साकडे घालणे सुरू केले.