बांगलादेशच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. स्थानिक मुक्ती वाहिनीतील कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जवान लढत होते. १३ दिवसांच्या युद्धानंतर पाकिस्तानने १६ डिसेंबर १९७१ला ढाका येथे भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली. २० तारखेला पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल याह्या खान यांनी राजीनामा दिला. त्याच दिवशी झुल्फिकार अली भुत्तो यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या आम सभेत सहभागी होऊन ते लंडनमार्गे पाकिस्तानात आले होते. त्यांचे विमान लंडन येथे इंधनासाठी १८-१९ डिसेंबर दरम्यान थांबले होते. पूर्व पाकिस्तानचे वरिष्ठ नोकरशहा आणि मुख्य सचिव मुजफ्फर हुसेन युद्धकैदी म्हणून भारतात होते. मुजफ्फर हुसेन दाम्पत्य भुत्तोंच्या अतिशय जवळचे आहे आणि बेगम लैला हुसेन लंडन येथे आहेत, अशी माहिती भारताची गुप्तहेर संघटना ‘रॉ’ला मिळाली होती.
‘रॉ’ने लगेच लैला हुसेन यांना संपर्क केला आणि भुत्तो यांना लंडनला भेटून त्यांना बंगबंधू मुजीबूर रहमान यांना मुक्त करण्याची विनंती करण्यास सांगितले. त्या विमानतळावर भुत्तो यांना भेटल्या. औपचारिक बोलणे झाल्यानंतर भुत्तो यांनी लैला हुसेन यांना सांगितले, ‘आपण मला भेटायला का आला आहात, याचा अंदाज मला आहे. तुम्ही नवी दिल्लीला कळवू शकता की चीफ मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटरची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी मुजीब यांना मुक्त करेन. इंदिरा गांधी यांना मला वेगळा संदेश पाठवायचा आहे. मी त्यांना तो स्वतंत्ररित्या पाठवणार आहे.’ २२ तारखेला मुजीब आणि त्यांचे सहकारी व वकील कमाल हुसेन यांना मियांवली तुरुंगातून रावळपिंडी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये आणण्यात आले. ७ जानेवारी १९७२ ला त्यांना एमआय-६ च्या मदतीने चकाला विमानतळावरून लंडनला पाठविण्यात आले. लंडनला मुजीब ब्रिटनचे पंतप्रधान एडवर्ड हीथ यांना भेटले. ९ जानेवारीला मुजीब दिल्ली येथे इंदिरा गांधी यांना भेटले आणि तिथून ते सरळ ढाक्याला गेले. बांगलादेशात राहिलेले भारताच्या शेवटच्या काही सैनिकांनी १२ मार्चला बांगलादेशचा निरोप घेतला.
‘बांगलादेश : ह्युमिलिएशन, कार्नेज, लिबरेशन, केऑस’ हे इकबाल चांद मल्होत्रा आणि सुब्रतो चट्टोपाध्याय यांचे पुस्तक अगदी योग्य वेळेवर आले आहे. आधी फारशी माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे. भारतीय लष्करासमोर पाकिस्तानला शरणागती का पत्करावी लागली, याची सविस्तर माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. त्यात संयुक्त राष्ट्रांत झालेल्या चर्चेची माहिती आहे. बांगलादेशला मुक्त करण्यासाठी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांनी गाजवलेले शौर्य व त्यांच्यातील परस्पर समन्वय आणि मुक्ती वाहिनीचा पराक्रम याच्या अनेक कहाण्या पुस्तकात आहेत. पूर्व पाकिस्तानच्या लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत होते. पूर्व पाकिस्तानच्या ताग व चहामधून होणार्या उत्पन्नाचा मोठा वाटा पश्चिम पाकिस्तानवर खर्च करण्यात येत होता. १९४७ मध्ये इस्लामच्या नावावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान अस्तित्वात आले. धर्माच्या नावाने एकत्र आलेल्या राष्ट्राला धर्म एकत्र ठेवू शकला नाही. धर्मनिरपेक्ष बंगाली भाषा आणि बंगाली संस्कृती अधिक महत्त्वाची असल्याचे तिथल्या लोकांना वाटू लागले. १९७०च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील १६९ जागांपैकी १६७ जागांवर मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगचा विजय झाला होता. पाकिस्तानात एकूण ३१३ जागा होत्या. अवामी लीगकडे बहुमत होते. मात्र पंजाबी आणि पश्चिम पाकिस्तानातील लोकांना अवामी लीगच्या हाती सत्ता द्यायची नव्हती. बंगाली लोकांनी पाकिस्तानच्या लष्कराचा सामना केला. पाकिस्तानच्या लष्कराने अनन्वित अत्याचार केले. जमात-ए-इस्लामीने त्यांना मदत केली. एकूण ३० लाख बंगाली लोकांची हत्या झाली. दोन लाख महिलांवर बलात्कार झाले होते.
मुजीबूर रहमान यांनी लंडनहून दिल्ली मार्गाने ढाक्याला जाण्याचा निर्णय घेतला होता. लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकारी त्या ऐतिहासिक प्रवासात मुजीबूर रहमान यांच्याबरोबर होते. तेव्हा अपा पंत तिथे भारताचे उच्चायुक्त होते. वेद मारवाह तेव्हा उच्चायुक्तालयात फर्स्ट सेक्रेटरी आणि शशांक बॅनर्जी राजकीय सचिव म्हणून काम करत होते. अपा पंत यांनी या दोघांना विमानात मुजीबूर रहमान यांच्याबरोबर जाण्यास सांगितले. मारवाह पोलीस अधिकारी होते आणि बॅनर्जी गुप्तहेर विभागात होते. त्या विमान प्रवासात नेमके काय घडले याची फारशी माहिती उपलब्ध नसल्याचे लेखकद्वयीने म्हटले आहे.
पत्रकार आणि स्वातंत्र्य आंदोलन
जगातल्या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याला बांगलादेश अपवाद असण्याचं कारण नाही. महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात भारतातले म्हणजे प्रामुख्याने पश्चिम बंगालचे पत्रकार सर्वात पुढे होते. आश्चर्य म्हणजे त्यात पश्चिम पाकिस्तानच्या कराची येथील एक पत्रकारदेखील होता. लेखकद्वयीने त्याबद्दलची माहिती सविस्तर दिली आहे. पूर्व पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बंगाली लोकांची कत्तल करण्यात येत असल्याची बातमी सर्वात आधी एस. हंडा नावाच्या यूएनआयच्या पत्रकाराने अगरतळा येथून दिली होती. लेखकद्वयीने ॲन्थनी मस्केरन्हस नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराबद्दल थोडी माहिती दिली आहे. त्याच्या वार्तांकनाचे युरोपमध्ये मोठे पडसाद उमटले. पूर्व पाकिस्तानात लष्कराकडून मोठ्या संख्येत बंगाली लोकांचा नरसंहार करण्यात येत असल्याच्या त्याच्या वृत्ताने युरोप हादरलं. २५ मार्चला पाकिस्तानने ऑपरेशन सर्चलाईट सुरू केलं. त्या अंतर्गत हत्या करण्यात येत होत्या.
२७ मार्चच्या सायंकाळी ‘द स्टेटसमन’ दैनिकाचा वार्ताहर मानस घोष बोनगाव सीमेवर होता. त्यांनी एका माणसाला पाकिस्तानच्या चेक-पोस्टकडून येताना पाहिले. तो भारतात आला. बीएसएफने त्याची चौकशी केली. बीएसएफच्या एका अधिकार्याने हा माणूस एका इटालियन कंपनीचा अधिकारी आहे आणि तो ढाक्याहून ट्रक, ऑटोरिक्षा, बोट, मोटरसायकल, ट्रेनने प्रवास करत येथे पोहोचला आहे असे घोष यांना सांगितले. कलकत्त्याला जाताना त्यांनी ट्रेनमध्ये २५ तारखेच्या रात्री आपण ढाक्यात हॉटेलच्या खिडकीतून काय पाहिले याचे वर्णन केले. ‘द पीपल’ नावाच्या दैनिकाचे कार्यालय बॉम्बस्फोटने उडवून दिल्याचे त्यांनी पाहिले होते. (‘द पीपल’मध्ये मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या आंदोलनाच्या बाजूने बातम्या व लेख प्रसिद्ध होत होते). दुसर्या दिवशी त्याला हॉटेलमधून हाकलून देण्यात आले. कुठल्याही परदेशी नागरिकांना हॉटेलमध्ये ठेवू नये, असा सरकारचा आदेश होता. २७ मार्चला ‘द स्टेटसमन’चे संपादक एन. जे. नानपोरिया यांनी घोषला बोलावले. घोष यांनी त्यांना सांगितले की, ‘येणार्या निर्वासितांचे प्रमाण सध्या कमी आहे. पुढच्या काही दिवसांत पूर्व पाकिस्तानातून मोठ्या संख्येने लोक येऊ लागतील. पाकिस्तानी लष्कराने हिंदूंवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. फरिदपूर, जेसोर, कोमिला, मेमेनसिंग, खुलना आणि बाहिशाल जिल्ह्यात पुढच्या काही दिवसांत परिस्थिती अधिक वाईट होणार आहे. या जिल्ह्यांत हिंदू मोठ्या संख्येत आहेत.’ घोष ७ एप्रिलला नुरुल कादर खान नावाच्या पाकिस्तानच्या बंगाली अधिकार्यांना भेटले. शस्त्र आणि दारूगोळा घेण्यासाठी आपण पाब्ना येथे आलो असल्याचे त्यांनी घोष यांना सांगितले. नुरुल यांनी घोष, फोटोग्राफर श्यामदास बासू आणि चंद्रशेखर सरकार यांना पाब्नाला नेण्याची तयारी दाखवली. सायंकाळी एका ट्रेनमधून शस्त्र आणि दारूगोळा नेण्याचे ठरले. ट्रेनमध्ये शस्त्र आणि दारूगोळा असल्याने १० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने ट्रेन न चालवण्याची मोटरमनला सूचना देण्यात आली होती. पाब्नाशेजारी असलेल्या ईश्वरदिह येथे पहाटे साडेचार वाजता ट्रेन पोहोचली. तिथून वाहनाने शस्त्र इत्यादी पाब्ना नेण्यात आली. ‘द स्टेटसमन’चे पत्रकार तिथल्या टेलिफोन एक्सचेंज, टेलिग्राम कार्यालय इत्यादी ठिकाणी गेले. आठवड्यापूर्वी त्याच ठिकाणी लोकांवर अत्याचार करण्यात आले होते. शहरात फिरून एकूण काय परिस्थिती आहे हे त्यांनी पाहिले. झालेल्या हत्याकांडाचे पुरावे गोळा केले. ‘द स्टेटसमन’च्या १० आणि ११ एप्रिलच्या अंकात मुक्ती जोध्धा, पाब्ना येथे झालेल्या लढाईच्या ठिकाणांंविषयी आणि जिथे हत्याकांड झाले त्या ठिकाणाविषयी छायाचित्रांसह सविस्तर अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
अन्य देशांतील सर्व पत्रकारांची पूर्व पाकिस्तानातून हकालपट्टी करण्यात आली. पाकिस्तानच्या लष्कराला बंड संपविण्यात ‘यश’ आल्याचे चित्र दाखविण्यासाठी जनरल टीकाखान यांनी १४ एप्रिलला पाकिस्तानातून सात पत्रकारांना बोलावले होते. त्यात अँथनी होता. बंड मोडून काढण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे अत्याचार केले, हे पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्यांनी अभिमानाने पत्रकारांना सांगितले. ते ऐकून अँथनी अस्वस्थ झाला. कराचीला परत गेल्यानंतर तो त्याच्या कुटुंबीयांसह लंडनला निघून गेला. प्रतिष्ठित ‘संडे टाइम्स’चे संपादक हेरोल्ड इव्हान्स यांना तो भेटला. इव्हान्सने अँथनीचे म्हणणे ऐकून घेतले व तेथील एकूण परिस्थिती समजून घेतली. नंतर ‘संडे टाइम्स’च्या मधल्या पूर्ण दोन पानांत पूर्व पाकिस्तानात लष्कराकडून होणार्या नरसंहारावर अँथनीचा अहवाल आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्याचा मथळा होता जेनोसाइड. अँथनी, घोष, हंडा व अनेकांनी अतिशय हिमतीने हा हिंसाचाराचे वार्तांकन केले होते. दीपक भट्टाचार्य आणि सुरोजित घोषाल या दोन मुक्त पत्रकारांना कोमिला येथे पाकिस्तानच्या लष्कराने पकडले आणि त्यांची हत्या केलेली. न्यूयॉर्क टाइम्सचे सीडनी शानबर्ग, द ऑब्झर्वरचे गेवीन यंग यांचा मुद्दामून उल्लेख केला पाहिजे. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून पूर्व पाकिस्तानातून वस्तुनिष्ठ बातम्या दिल्या होत्या.
१३ दिवसाचे युद्ध
पाकिस्तानने ३ डिसेंबरला भारतीय हवाई दलाच्या विमानतळांवर हल्ले केले. भारताला त्याचा अंदाज असल्याने आधीच तेथील विमाने अन्यत्र सुरक्षित रवाना करण्यात आली होती. ६ डिसेंबरला इंदिरा गांधी यांनी संसदेत केलेल्या निवेदनात म्हटले, ‘वर्तमान परिस्थितीमुळे आणि बांगलादेश सरकारकडून (निर्वासित सरकार) करण्यात येणार्या विनंतीमुळे भारत सरकारने खूप विचार करून गणो प्रजातंत्रो बांगलादेशला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.’ भारतीय जवानांच्या साहसामुळे १६ डिसेंबरला सायंकाळी ४.३१ वाजता पाकिस्तानने शरणागती पत्करली. शरणागती करारावर पाकिस्तानच्या वतीने ए. ए. के. नियाझी आणि भारताच्या वतीने लेफ्टनंट-जनरल जगजित सिंग अरोरा यांनी स्वाक्षरी केली.
इंदिरा गांधी आणि बांगलादेश
मुजीबूर रहमान यांचे सहकारी तजुद्दीन अहमद (निर्वासित सरकारचे ते पहिले पंतप्रधान होते) यांना बीएसएफचे प्रमुख रुस्तमजी बीएसएफच्या विमानाने १ एप्रिलला दिल्लीला घेऊन गेले. २-३ एप्रिलला इंदिरा गांधींशी त्यांच्या दोन गुप्त बैठका झाल्या. तजुद्दीन यांनी एकूण परिस्थितीची केलेली मांडणी पाहून गांधींनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. मात्र मदतीचे स्वरूप स्पष्ट केले नाही. निर्वासित सरकारचा विचार करण्यात आला. या बैठकांआधीच रुस्तुमजी यांना बंडखोरांना अनौपचारिकरित्या मर्यादित स्वरूपात मदत करण्यास सांगण्यात आले होते.
हेन्री किसिंजर यांनी ७ जुलै रोजी दिल्लीत इंदिरा गांधींची भेट घेतली. ते नंतर पाकिस्तानला जाणार होते आणि नंतर चीनला गुप्त भेट देऊन ते चाऊ एन लाय व अन्य नेत्यांना भेटलेले. इंदिरा गांधी यांनी किसिंजर यांना भेटीत ७० लाख निर्वासितांमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि अमेरिकेकडून पाकिस्तानला होणार्या शस्त्रांचा पुरवठाबद्दल चिंता व्यक्त केली. पाकिस्तान प्रत्येक मुद्द्याला हिंदू-मुस्लीम स्वरूप देत असल्याचे त्यांनी सांगितले, असे या लेखकद्वयीने नमूद केले आहे. गांधीनी लष्करप्रमुख सॉम माणेकशॉ यांनाही बैठकीला बोलवले. पूर्व पाकिस्तानात भारताने हस्तक्षेप करू नये, अशी अप्रत्यक्ष धमकी किसिंजर यांनी दिली. इंदिरा गांधी त्यावर म्हणाल्या की भारत कुठलेही अतिरेकी पाऊल टाकू इच्छित नाही. तिथे परिस्थिती कशी निर्माण होते त्यावर सारे काही अवलंबून आहे. किसिंजर यांनी तुम्ही काय करू इच्छित आहात, असे विचारले. त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘अमेरिकेने परिस्थिती नियंत्रणात आणली नाही, तर मी लष्करप्रमुख जनरल माणेकशॉ यांना आवश्यक ती कारवाई करण्यास सांगणार आहे.’ ती कारवाई करण्यात आली आणि इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले.
बांगलादेश : ह्युमिलिएशन, कार्नेज, लिबरेशन, केऑस
लेखक : इकबाल चांद मल्होत्रा आणि सुब्रतो चट्टोपाध्याय
प्रकाशन : ब्लूवन इंक प्रा. लि.
पृष्ठे : ३६८ किंमत : ८९९ रु.
