scorecardresearch

Premium

तिथे ‘शेख हसीनांशिवाय आहेच कोण?’

भारत आणि बांगलादेशात ऐतिहासिक आणि जुने संबंध आहेत. १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला त्यात भारताचा मोठा वाटा होता.

bangladesh pm sheikh hasina general election in bangladesh parliamentary elections in bangladesh
शेख हसीना

जतिन देसाई
विरोधकांना ‘दहशतवादी’ ठरवून, अमेरिकी वा पाश्चात्त्य बाजारपेठांच्या मागणीवर बांगलादेशाची अर्थव्यवस्था दृढ करणाऱ्या शेख हसीना हुकूमशहासारख्या वागत असल्या तरी त्यांचाच विजय निश्चित कसा?

बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणूक ७ जानेवारीला होणार असल्याची घोषणा नुकतीच झाली. बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांच्या कन्या आणि विद्यमान पंतप्रधान शेख हसीना वाजेद याच सलग चौथ्यांदा पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित आहे. बांगलादेशात आज प्रभावी विरोधी पक्ष नाही. एके काळी बांगलादेशाचे राजकारण अवामी लीगच्या शेख हसीना आणि बांगलादेश नॅशनल पार्टीच्या (बीएनपी) खालेदा झिया यांच्याभोवतीच फिरत असे. आता शेख हसीना बांगलादेशच्या सर्वात मोठय़ा नेत्या आहेत. निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीपासूनच बांगलादेशात राजकीय वातावरण तापू लागले होते. विरोधी ‘बीएनपी’ने ‘शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा आणि ‘हंगामी तटस्थ सरकार’च्या नेतृत्वाखाली निवडणुका व्हाव्यात’ या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासूनच आंदोलन सुरू केले. अमेरिका व अन्य पाश्चिमात्य देशांनाही ही निवडणूक महत्त्वाची वाटत असून ‘निवडणुका निष्पक्ष, न्याय्य आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात’ अशी अपेक्षा त्या देशांनी व्यक्त केली आहे. बीएनपी आणि अन्य विरोधी पक्षांच्या आंदोलनात काही तरुणांनी जीव गमावले आहेत. त्यामुळेच बीएनपीचे अब्दुल मोमीन खान यांचे ‘या निवडणुकीचा निकाल काय असणार हे बांगलादेशच्या सर्वांना माहीत आहे,’ हे उद्गार लक्षवेधी ठरतात. 

canada
कॅनडाचे भारतातील कर्मचारी मलेशिया, सिंगापूरमध्ये
Afghanistan Embassy in India
अफगाणिस्तानने भारतातला दूतावास केला बंद, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
beggars in saudi arabia
पाकिस्तान भिकाऱ्यांची निर्यात करणारा देश कसा बनला? परदेशात ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे
india rejects justin trudeau allegations
खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचे प्रकरण : ट्रुडोंचा पुराव्यांचा दावा भारताला अमान्य

हेही वाचा >>> अन्वयार्थ : समूह विद्यापीठे : बेरोजगारांचे समूह

भारत आणि बांगलादेशात ऐतिहासिक आणि जुने संबंध आहेत. १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला त्यात भारताचा मोठा वाटा होता. ढाका येथे पाकिस्तानच्या लष्कराने भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांसमोर १६ डिसेंबर १९७१ ला शरणागती पत्करली होती. पाकिस्तानने शेख मुजीबुर रेहमान यांना कैदेतून मुक्त केल्यानंतर लंडनमार्गे बांगलादेशला जाण्यापूर्वी मुजीबुर रेहमान काही तास दिल्लीत थांबले होते. विमानातून उतरताना त्यांनी ‘जोय बांगला’ अशी घोषणा दिली होती. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ दिल्ली विमानतळावर या ‘बंगबंधूं’च्या स्वागतासाठी उपस्थित होते. पुढे १४-१५ ऑगस्ट १९७५ च्या रात्री शेख मुजीबुर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली. शेख हसीना तेव्हा जर्मनीत असल्यामुळेच वाचल्या. मग भारतात येऊन, इथून १७ मे १९८१ रोजी त्या बांगलादेशात परतल्या, त्या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठीच. आजही दक्षिण आशियात भारताचा सर्वात जवळचा मित्र बांगलादेश आहे. शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातही चांगली मैत्री आहे. ३० ऑक्टोबरला दिल्लीत वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) झालेल्या बैठकीत दक्षिण पूर्व आशियाच्या विभागीय संचालक म्हणून शेख हसीना यांच्या कन्या सायमा वाजेद निवडून आल्या. भारताने सायमा यांच्या बाजूने मतदान केलं होतं. शेख हसीना यांनी बांगलादेशच्या विकासाचा भारत ‘सर्वात मोठा भागीदार’ असल्याचे म्हटले आहे.

विरोधी ‘बीएनपी’चा सर्वात मोठा सहकारी पक्ष जमात-ए-इस्लामी आहे. बीएनपी आणि ‘जमात’ धर्माचे राजकारण करतात. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बंगाली लोकांवर अत्याचार करण्यात ‘जमात’ पाकिस्तानच्या लष्करासोबत होती. त्या युद्ध गुन्ह्यांसंदर्भात चौकशी करून जमातच्या काही जणांना शेख हसीना यांच्या सरकारने फाशी दिली आहे. दोनदा पंतप्रधान राहिलेल्या ‘बीएनपी’नेत्या खालेदा झिया आता नजरकैदेत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे त्यांच्या पक्षाचे म्हणणे आहे. त्यांचा मुलगा तारिक रेहमान देश सोडून गेला आहे. तो पक्षाचा हंगामी प्रमुख आहे आणि त्याच्यावरही अनेक खटले सुरू आहेत. १९९१च्या निवडणुकीत खालेदा झिया यांनी शेख हसीना यांचा पराभव केला होता. नंतर तटस्थ हंगामी सरकारच्या नेतृत्वाखाली १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांचा विजय झाला होता, मात्र पुढल्या निवडणुकीत २००१ मध्ये शेख हसीना पराभूत झाल्या. त्यानंतर २००९ पासून शेख हसीना सत्तेत आहेत. बीएनपीने २०१४ च्या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. आणखी एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे ‘जातीय पार्टी’. या पक्षाची स्थापना १ जानेवारी १९८६ ला माजी हुकूमशहा हुसेन मोहम्मद इर्शाद यांनी केली होती. यावेळी जातीय पार्टी निवडणूक- बहिष्कार पुकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक सुरळीत व्हावी यासाठी अमेरिकेने तिन्ही महत्त्वाच्या पक्षांची रुजवात घालण्याचे प्रयत्न आरंभले आहेत. परंतु शेख हसीना यांनी ‘बीएनपी दहशतवादी संघटना आहे’ असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे! अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री डोनाल्ड लू यांनी अवामी लीग, बीएनपी आणि जातीय पार्टी यांना पत्र पाठवून, विनाअट एकमेकांशी बोलून मार्ग काढण्याची सूचना केली होती. जातीय पार्टीचे प्रमुख जी. एम. कादर यांनी काही दिवसापूर्वी अमेरिकेचे राजदूत पीटर हास यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर लू यांच्या पत्राबद्दल पत्रकारांना माहिती दिली. बांगलादेशात लोकतांत्रिक निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात काम करणाऱ्यांना व्हिसा न देण्याचे अमेरिकेने ठरवले आहे. पीटर हास निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगालादेखील भेटले होते. अमेरिका बांगलादेशच्या निवडणुकीत अधिक सक्रिय असल्याचे यातून स्पष्ट होते. अवामी लीगने अमेरिकेच्या पत्राला उत्तर पाठवले आहे. अमेरिकेला बांगलादेशच्या निवडणुकांबद्दल असलेली चिंता योग्य असल्याचे सांगून, ‘अवामी लीगची सर्व पक्षांशी विनाअट चर्चा करण्याची तयारी होती. परंतु ‘बीएनपी’ने शेख हसीनांनी आधी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा आणि हंगामी सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणुका घ्याव्यात असा आग्रह धरला होता. या कारणामुळे अशी बैठक होऊ शकली नाही,’ असा दावा अमेरिकेला धाडलेल्या पत्रोत्तरात केला आहे.

हंगामी सरकारच्या मागणीला इतिहास आहे. बीएनपी सरकारने १९९६ मध्ये बांगलादेशच्या राज्यघटनेत १३ वी दुरुस्ती करून सार्वत्रिक निवडणुका तटस्थ, हंगामी सरकारच्या नेतृत्वाखाली घेण्याची तरतूद केली होती. परंतु २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती दुरुस्ती घटनाविरोधी ठरवली. त्याच वर्षी शेख हसीना सरकारने १५ वी घटनादुरुस्ती करून हंगामी, तटस्थ सरकारची तरतूद रद्द केली.

बांगलादेशात एकूण ३०० मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. २०१८ मध्ये काही कारणाने २९८ मतदारसंघात मतदान झाले होते आणि अवामी लीगचा २८७ मतदारसंघात विजय झाला होता. अवामी लीगने सत्तेचा दुरुपयोग करून विजय मिळवल्याचा आरोप विरोधी पक्षाने तेव्हा केला होता. या ३०० व्यतिरिक्त ५० जागा महिलांसाठी राखीव आहेत. कुठल्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली यानुसार त्या-त्या पक्षाच्या महिलांना संसदेत प्रतिनिधित्व दिले जाते. येथे डाव्या पक्षांकडेही काही प्रमाणात जनाधार आहे. असे असले तरी धार्मिक कट्टरवाद वाढताना दिसत आहे. अधूनमधून अल्पसंख्याक (हिंदू, ख्रिस्ती व अन्य) समाजावर हल्ले करण्यात येतात. मात्र अवामी लीग सरकार अशा वेळेस अल्पसंख्याकांच्या बाजूने सतत उभे राहिले आहे. ‘शेख हसीना भारताला बऱ्याच सवलती देतात पण भारताकडून बांगलादेशला फार काही मिळत नाही,’ असा बीएनपी आणि ‘जमात’चा प्रचारातील मुद्दा असतो. तीस्टा नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

शेख हसीनांच्या राजवटीत बांगलादेशची अर्थव्यवस्था सुधारली. सामाजिक निर्देशांकातही बांगलादेशाने प्रगती केली. तयार कपडे उद्योगासाठी (गार्मेट) बांगलादेश प्रसिद्ध आहे. जगभर बांगलादेशात तयार झालेले पाश्चात्त्य पोशाख मिळतात. अमेरिका त्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. बांगलादेशातील अंदाजे ४००० छोटय़ामोठय़ा कंपन्यांत जवळपास ४० लाख कामगार अत्यल्प मजुरीत काम करतात. अलीकडे त्यांनी संप केला. सरकारी समितीने त्यांच्या पगारात ५६.२५ टक्के वाढ मान्य केली, त्यामुळे पगार १२५०० टाका (११४ अमेरिकन डॉलर) झाला.. म्हणजे भारतीय रुपयांत साडेनऊ हजार रु. महिना! पगार याहून अधिक वाढवण्यास शेख हसीनांनी ठाम नकार दिला. बांगलादेशच्या कंपन्या एचअ‍ॅण्डएम, झारा, लेवाईससारख्या मोठय़ा ब्रॅण्डला तयार कपडे पुरवतात. कामगारांमध्ये सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे; पण त्यांच्याकडे विकल्प नाही. शेख हसीना बऱ्याच प्रमाणात धार्मिक संघटनांशी तडजोड करत असल्या तरी सगळय़ा समाजाला एकत्र घेण्याचे त्यांचे धोरण आहे. धार्मिक कट्टरतेच्या त्या विरोधात आहेत. हुकूमशहासारख्या त्या वागत असल्या, तरी शेख हसीना यांना पर्याय नाही.

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.  

jatindesai123@gmail.com@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bangladesh pm sheikh hasina general election in bangladesh parliamentary elections in bangladesh zws

First published on: 21-11-2023 at 05:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×