चित्ततोष खांडेकर (नदी विषयक संशोधक अभ्यासक)
‘सौंदर्य हे विश्वाच्या सृष्टीत नाही तर बघणार्याच्या दृष्टीत असते’, असे शेक्सपिअर म्हणतो. असं असलं तरी आपल्या सौंदर्याच्या संकल्पना ठरतात कशा? निळीशार नदी, तिच्या बाजूला बसायला बाक, उंंच वृक्षांचे बगीचे, त्या बगीच्यांमधून रमत-गमत फिरताना नदीकडे बघणारे आपण… पण प्रत्येक नदी अशी असते? काही नद्यांचे रंग काळे दिसतात, तर काही हिरवे. प्रत्येक नदीकाठचे स्थापत्य वेगळं, वापरलेलं लाकूड वेगळं, मिळणारी फुलं वेगळी, कुठे काटेरी झुडपं असतील, तर कुठे गवताळ कुरणं! नदीचं सौंदर्य एकसाची नसतंच कधी. तिच्या परिसंस्थेनं, तिच्याकाठी शतकानुशतकं विकसित झालेल्या स्थापत्यशास्त्रानुसार, लोकांच्या घडत्या-बिघडत्या-बदलत्या संस्कृतीतून उमगतं ते सौंदर्य… पण असं हे नदीचं स्वयंसिद्ध सौंदर्य जपता येतं? बँकॉकच्या ‘छायो प्राया’ नदीची कथा याबद्दल काय संदेश देते हे समजून घेऊ या.
साधारण अडीचशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्यानमारच्या हल्ल्यांनी थायलंडची (पूर्वीचे सियाम) राजधानी अयुथ्था उद्ध्वस्त झाली होती. जिथं एकेकाळी ऐटदार घरं होती तिथे फक्त भग्नावशेष उरले. राज्यकर्त्यांनी नवीन राजधानीचा शोध सुरू केला, तेव्हा छाओ प्राया नदीच्या पूर्व किनार्यावर पाणथळ प्रदेशात वसलेल्या बँकॉक गावावर राजाची नजर पडली. नदीतून कालवा खणून या गावाच्या शेतांपर्यंत पाणी यायचं. या कालव्यातून नौकानयन करता यायचं आणि सिंचनाचा प्रश्नही मिटायचा. या नदीला खूप पूर येत असल्यामुळे कालव्यामार्गे पुराचं अतिरिक्त पाणी वळवलं गेलं होतं. याच पाणथळ प्रदेशात आपली राजधानी उभी करायचा निर्णय राजाने घेतला. संपूर्ण पाणथळ प्रदेशातून नदीला जोडणारे कालवे खोदले गेले. यातून शहरासाठी पाण्याची व्यवस्था तर झालीच; तसंच हे कालवे जलवाहतुकीसाठीही वापरलं जाऊ लागले. किंवा खरं तर, बँकॉकमध्ये प्रामुख्यानं जलवाहतूकच केली जात होती. या कालव्यांच्या आणि नदीच्या काठांवर लोकांनी घरं बांधली. जोत्याच्या जागी भरीव खांबांनी ही घरं उंचावली गेली. नदीला पूर आलाच तर या घरांखालून पाणी जायला जागा ठेवली होती. याशिवाय होडीत तरंगती दुकानंही थाटली गेली. बँकॉकची सगळी बाजारपेठच नदीवर आणि कालव्यांवर तरंगत होती. काठाकाठानं वसलेल्या शासकीय इमारती, मंदिरं, घरं, बाजारपेठा, मनोरंजनाची ठिकाणं, सैन्याच्या छावण्या, सगळ्या कालव्यांनी जोडलेल्या, ज्यातून रोज होडीतून प्रवास होई. बँकॉक वसलं होतं नदीच्या मुखाजवळ, सागराजवळ- त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारही अगदी सुकर होता. पाण्यात तरंगणारं हे शहर बघून पोर्तुगीज प्रवासी फर्नानो पिंटो यानं या शहराला पूर्वेचं व्हेनिस (पाण्यावर तरंगणारं युरोपातलं शहर) अशी उपाधी दिली. म्हणजेच नदी आणि कालव्यावरचं हे अनोखं स्थापत्य या शहराच्या सौंदर्याचं लक्षण आणि अस्मिता बनून गेलं.
पण १९ व्या शतकाच्या शेवटी अनेक युरोपीय व्यापारी बँकॉकमध्ये येऊन वस्ती करू लागले. त्यांना त्यांच्या सोयीनुसार इथे उद्योग उभारायचे होते. कालव्यांऐवजी रस्ते बांधण्याची मागणी त्यांनी राजाकडे केली. तेव्हा थायलंडच्या औद्योगिकीकरणाच्या दृष्टीनं राजानं बँकॉकमध्ये रस्ते बांधायला सुरुवात केली. कालवे बुजवून बरेच रस्ते उभे केले. हळूहळू कालव्यांकाठची घरं, बाजारपेठा, सारंच नष्ट होऊ लागलं. नदीच्या काठावरील घरांची जागा उंच गगनचुंबी इमारतींनी घेतली. कालव्यातून आता वाहतूक होत नसल्यामुळे बर्याच कालव्यांमध्ये सांडपाणी सोडण्यात येऊ लागलं. तरीही काही कालवे आणि नदीचा काही भाग, त्यातली वाहतूक आणि काठावरची घरं, होडीतील दुकानं अबाधित राहिली; बँकॉकच्या गतसौंदर्याची साक्ष देत!
पण कालवे बुजवल्यामुळे शहरातली पुराची समस्या मोठी झाली. नदीच्या पुराचं पाणी रस्त्यांवर येऊ लागलं. तसंच १९६० नंतर औद्योगिकीकरणामुळे शहर प्रचंड वाढलं, रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न आ वासून उभा राहिला आणि पर्यायी वाहतुकीचे मार्ग शोधण्याची गरज भासू लागली. तेव्हा कालवे वाहतूक सुरू न करता, सरकारनं ‘नदी काठ सुधार प्रकल्प’ राबवण्याचा निर्णय घेतला. नदीच्या ज्या भागात अजूनही होडीनं वाहतूक होत होती आणि जुनी घरं होती, तिथंच एक १४ किमीचा उड्डाणपूलवजा रस्ता बांधण्याचा हा सरकारी निर्णय होता. या उंच रस्त्यावर सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक आणि अर्थात चारचाकी मोटारगाड्यांच्या वाहतुकीसाठी सोय होती. काँक्रीटच्या खांबानी उंचीवर हा रस्ता बांधला जाण्याचं ठरलं. तसंच पुलाखाली नदीच्या पुरापासून संरक्षण करणार्या भिंती (एम्बॅन्कमेंट्स) बांधायचं ठरवण्यात आलं. ‘यामुळे नदीचं सौंदर्य खुलून दिसेल आणि त्याचा आनंद सर्वांना घेता येईल’ अशी घोषणाच थायलंडच्या तत्कालीन राष्ट्रप्रमुख आणि लष्करशहा चान-ओ-चा यांनी २०१५ मध्ये केली.
पूर समस्या आणि वाहतूक कोंडीवर त्यांनी काढलेला हा त्यांच्या मते रामबाण उपाय होता. पण यामुळे नदीकाठच्या होडीवाहतुकीला फटका बसणार होता. होड्यांतली घरं आणि दुकानं नदीबाहेर फेकली जाणार होती. तसंच नदीच्या काठावरली घरं आणि परिसंस्था संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार होती. शहर वसण्याच्या आधीपासून नदीकाठी राहणार्या मित्रखाम समाजाला याचा सर्वाधिक फटका बसला. मासेमारी करणं आणि डुबकी मारून नदीच्या पुरात लुप्त झालेले प्राचीन ऐवज शोधून काढणं हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. या रस्ताप्रकल्पामुळे त्यांच्या घरांसकट ते बाहेर फेकले जाणार होते. तशीच परिस्थिती इतर समुदायांचीही होती.
तेव्हा ‘फ्रेन्ड्स ऑफ द रिव्हर’ संघटनेनं ‘हा नदी सौंदर्यीकरणाचा नाही तर नदी विद्रूपीकरणाचा प्रकल्प आहे’ अशी भूमिका घेतली. हा प्रकल्प झाला, तर बँकॉकचं उरलेसुरलं सौंदर्यही संपून जाईल असं त्यांना वाटत होतं. तसंच या प्रकल्पामुळे आधी मुक्त असलेली नदी आता बंदिस्त होणार होती. काँक्रीटच्या वापरामुळे नदीत प्रदूषण होण्याची शक्यता दाट होती. स्थानिक समुदायांच्या विस्थापनाचाही प्रश्न होताच. पण थायलंडमधील लष्करशाहीमुळे थेट रस्त्यावर उतरून भूमिका घेता येत नव्हती. तेव्हा नदी वाचवायला फ्रेन्ड्स ऑफ द रिव्हर संघटनेनं एक फेसबुक पेज काढलं. त्यावरून या सार्या प्रकाराचा निषेध केला. फक्त निषेध करून ते थांबले नाहीत तर बँकॉकमधल्या विद्यापीठांतल्या स्थापत्य शाखेच्या (आर्किटेक्चर) विद्यार्थ्यांचे काही गट त्यांनी तयार केले. या गटांना नदीकाठचा अभ्यास करायला सांगितला. तसंच नदीकाठचे समुदाय, परिसंस्था आणि स्थापत्य अबाधित राखून नदी काठ सुधार कसा करता येईल याचे पर्यायी आराखडे तयार करायला त्यांना सांगण्यात आलं. या गटांनी एकच नाही तर अनेक आराखडे तयार केले. या आराखड्यांमध्ये वाहतूककोंडी सोडवायला रस्तेही होते, तसंच नदीसंस्कृतीचं आणि पर्यावरणाचं संवर्धनही होतं. या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे आराखडे सरकारच्या आराखड्यांच्या तोडीसतोड होते. तेव्हा विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये या पर्यायी आराखड्यांची प्रदर्शनंच फ्रेन्ड्स ऑफ द रिव्हर संघटनेनं भरवली. या आराखड्यांची दखल ‘सियामीज आर्किटेक्ट असोसिएशन’ने घेऊन, ‘सरकारनं आपला आराखडा बदलावा’ अशी मागणी उचलून धरली. बँकॉकच्या न्यायालयात तसा खटलाही दाखल करण्यात आला. तसंच इतर ३५ संघटनांनीही या नवीन आराखड्यांना पाठिंबा दिला.
पण फक्त पर्यायी आराखडे देऊन फ्रेन्ड्स ऑफ द रिव्हर थांबले नाहीत. त्यांनी नदी-संस्कृतीचा एक नवीन अन्वयार्थही दिला. ‘लॉय क्राथोंग’ हा नदीचे आभार मानण्याचा पारंपरिक सण! या सणाच्या दिवशी थाई लोक नदीवर येतात, नदीनं दिलेल्या भरभराटीसाठी तिची कृतज्ञता व्यक्त करतात, तसेच तिचं काही नुकसान झालं असल्यास माफीही मागतात. त्यासाठी नदीत सजवलेले दिवे आणि मेणबत्त्याही सोडतात. पण असं काहीही न करता कार्डबोर्डचे तरंगणारे बॉक्स त्यांनी नदीत सोडले. या बॉक्समध्ये ‘मला भविष्यातली नदी कशी हवी’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या, या चिठ्ठ्या हजारो स्थानिक नागरिकांनी भरून दिल्या होत्या. शेकडो वर्षं नदीनं आपली काळजी घेतली, पण आता आपण नदीची काळजी घेऊन तिचं भविष्य सुनिश्चित करायला हवं, हा संदेश या उपक्रमातून दिला गेला. हाच ‘लॉय क्राथोंग’चा, नदी-संस्कृतीचा नवा अर्थ आहे.
फ्रेन्ड्स ऑफ द रिव्हरच्या प्रयत्नांमुळे ‘रिव्हर फ्रन्ट डेव्हलपमेंट’चं काम थंडावलं. नियोजित उड्डाणपुलाची लांबीही सरकारला कमी करावी लागली. पण काम पूर्णपणे थांबलं नाही. ते अजूनही सुरूच आहे. पण तरीही येणार्या काळासाठी दोन महत्त्वाचे संदेश त्यांनी दिले आहेत : नदीचं सौंदर्य काँक्रीटची तटबंदी उभी करण्यात नाही तर तिची परिसंस्था आणि पुरापासून संरक्षणाची परंपरागत शहाणीव जपण्यात आहे. आणि दुसरं म्हणजे, आपल्या नदीशी निगडित सणांचा, परंपरांचा नदी-संवर्धनासाठी नव्यानं अर्थ लावण्याची आज गरज आहे. तरच नदीच्या ‘सौंदर्याचं लेणं’ जपलं जाईल. अर्थात, हे लेणं जपण्याचे आणखीही काही मार्ग आहेतच, ते पुढल्या लेखांमधून समजून घेऊ.
chittatoshresearch@gmail.com
