शेजारी असलेल्या या देशाच्या इतर सगळ्या गोष्टींबाबत प्रगतीच्या बातम्या जगभर प्रसारित होतात. त्यांच्या पुस्तक आणि वाचनजगताबाबत फार कमी माहिती असते. इंग्रजीत लिहिणारे चिनी-अमेरिकी लेखक भरपूर आहेत. पण अनुवाद होऊन जगभरात लोकप्रिय ठरलेले थोडे-थोडकेच. सध्या बीजिंगमधील चार अवाढव्य उद्यानांमध्ये महिनाभरासाठी चालणारा पुस्तक महोत्सव सुरू आहे. या पुस्तक महोत्सवात अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी म्हणून बीजिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी साटेलोटे करीत आयोजकांनी पुस्तकखरेदीवर सवलत कुपनांची व्यवस्था केली आहे. या महोत्सवाचे वार्तांकन असलेला व्हिडीओ आणि चीनमधील वाचकांची स्थिती सांगणारा वृत्तलेख.

https://tinyurl.com/5n85fz69

https://tinyurl.com/4xw8fdd9

पाच पूर्ण कथा…

कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, कॅनडा काऊन्सिल ऑफ आर्ट आणि याच देशाच्या विमान कंपन्याचे मासिक १९७९ पासून लेखनाचा उपक्रम राबवते. यांच्याकडून कथा-कविता आणि कलात्मक अ-कथनात्मक लेखनाला पारितोषिक देऊन गौरवले जाते. या निमित्ताने तीन हजारांहून अधिक स्पर्धक लिहिते होत कथा पाठवतात. त्यांतून पाच कथांची लघुयादी पुरस्कारासाठी केली जाते. पारितोषिक जरी सहा हजार डॉलरचे असले, तरी त्यांत निवडल्या गेलेल्या कथांची चर्चा मात्र कॅनडापुरती उरत नाही. तर यंदाची कथांची लघुयादी जाहीर झाली असून त्या पाचही कथा, त्याबाबतच्या लेखकांच्या लघुटिपण्या आणि अगदी गेल्या वर्षीच्या विजेत्या कथेचेही पूर्ण वाचन या दुव्यावर करता येईल.

https://tinyurl.com/42wxkcjs