महेश सरलष्कर

ही यात्रा विरोधकांच्या ऐक्यासाठी नसून काँग्रेससाठीच असल्याची जयराम रमेश यांची स्पष्टोक्ती आणि भाजप-रा. स्व. संघाला त्यांच्याच पातळीवर उतरून विरोध करण्याची काही काँग्रेसजनांची मानसिकता पाहिल्यास, या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये काय फरक पडणार असा प्रश्न निर्माण होतो..

Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
Rahul Gandhi do a miracle
काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?
solapur lok sabha marathi news, vanchit bahujan aghadi solapur marathi news
सोलापुरात भाजप-काँग्रेसच्या लढतीत वंचित, एमआयएमची भूमिका महत्त्वाची
MP Navneet Rana
…तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू होऊन आठवडा उलटला. तमिळनाडू-केरळमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. त्यामुळे काँग्रेसमध्ये हुरूप आलेला आहे. प्रसारमाध्यमांनीही ‘भारत जोडो’कडे लक्ष दिल्यामुळे या यात्रेमध्ये काय-काय होत आहे, याची माहितीही लोकांपर्यंत पोहोचू लागली आहे. त्यामुळेही कदाचित काँग्रेसची दखल भाजप व माकप आदी इतर पक्षांना घ्यावी लागली असावी. ‘भारत जोडो’च्या निमित्ताने भाजपसह अन्य पक्ष काँग्रेसच्या विरोधात बोलतील तितका काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. हा आक्रमकपणा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना मानसिक बळ देण्यासाठी उपयोगी पडू शकेल आणि त्यातून काँग्रेस पक्ष मजबूत होईल, अशी या राष्ट्रीय पक्षाला आशा आहे.

हेही वाचा >>> अग्रलेख : देवेंद्रीय आव्हान : २.०

केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) डावी आघाडी आणि काँग्रेस आघाडी यांच्यामध्ये सातत्याने सत्तासंघर्ष होतो. ‘माकप’च्या आघाडीने सलग दोन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकून काँग्रेस आघाडीवर मात केली. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे या दोन्ही आघाडय़ांतील सत्तासंघर्ष पुन्हा उफाळून आलेला आहे. तमिळनाडूमध्ये कन्याकुमारीमधून यात्रा सुरू झाली, तिथे सत्ताधारी द्रमुकने काँग्रेसचे स्वागत केले. ‘द्रमुक’चे प्रमुख व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन यात्रेला राजकीय मदत केली. ही यात्रा केरळमध्ये गेल्यावर तिथल्या सत्ताधारी ‘माकप’ आघाडीने मात्र काँग्रेसवर टीका केली. ही टीका कदाचित केरळमध्ये काँग्रेसला मिळालेल्या लोकांच्या प्रतिसादामुळेही असू शकेल. राज्यातील विरोधक असणाऱ्या काँग्रेसच्या यात्रेवर ‘माकप’ने टिप्पणी करणे हा काँग्रेससाठी विजय मानला जाऊ शकतो. मात्र काँग्रेसला ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून भाजपविरोधातील लढाई बळकट करायची असेल, तर केरळमध्ये यात्रेने १८ दिवस देण्याचे कारण काय? उत्तर प्रदेशात मात्र काँग्रेसची ही यात्रा फक्त दोन दिवसच असेल. मग संघ-भाजपविरोधात काँग्रेस पक्ष कसा लढणार, असा आरोप माकपने केला. केरळमध्ये यात्रेच्या निमित्ताने राजकीय चिखलफेक सुरू झालेली आहे. काँग्रेसने केरळमधील माकपला भाजपचा ‘अ’ चमू ठरवले आहे. माकप विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष तूर्त तरी केरळपुरता मर्यादित आहे. या संघर्षांमध्ये माकपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पाठबळ दिल्याचे अजून तरी दिसलेले नाही. त्याला येचुरी आणि कारात गटांतील सुप्त स्पर्धाही कारणीभूत असू शकेल. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन हे प्रकाश कारात यांच्या गटातील मानले जातात. हा गट काँग्रेसविरोधात अधिक आक्रमक असतो. केरळ वगळले तर आम्ही इतर राज्यांमध्ये भाजपविरोधात संघर्ष करत आहोत. तिथेही लोकांचा केरळइतकाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘फेडरर रिपब्लिक’..

‘भारत जोडो’ यात्रेला लोकांची गर्दी होऊ लागल्याने काँग्रेसने भूमिकेत थोडा बदल केलेला दिसतो. काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेसला मजबूत करण्यासाठी असून विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी नाही. विरोधी पक्षांची भाजपविरोधात एकजूट करायची असेल तर काँग्रेस हाच मुख्य स्तंभ असेल! रमेश यांनी उघडपणे सांगितलेली बाब अध्याहृतच होती. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेस मजबूत झाला तर बिगरभाजप पक्षाचे हित साधले जाणार आहे. त्यामुळे रमेश यांचे विधान विरोधकांपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी होते असे मानता येते. पण ‘भारत जोडो’ यात्रा ही फक्त काँग्रेसची यात्रा ठरू नये, अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली होती! ‘या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत नसून ते सहयात्रेकरू आहेत,’ असे सातत्याने काँग्रेसकडून सांगितले जात आहे. या यात्रेमध्ये काँग्रेसचा झेंडा नसेल तर राष्ट्रीय तिरंगाच असेल, त्यामुळे या यात्रेला ‘काँग्रेसची यात्रा’ असे स्वरूप येणार नाही, असे दाखवण्याचाही प्रयत्न झालेला होता. ही यात्रा सुरू होण्याआधी नागरी संघटनांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रादेशिक पक्षांच्या सहभागाचीही अपेक्षा बाळगली गेली होती. त्यामुळे काँग्रेसच्या मजबुतीकरणाचा प्रयत्न एका बाजूला केला जात असताना इतरांना सहभागी करून यात्रेला व्यापक स्वरूप देण्याचाही प्रयत्न होत असल्याचे मानले जात होते.

‘भारत जोडो’ यात्रेचा मार्ग दक्षिण-उत्तर तेही सरळ रेषेत असल्याने पश्चिम बंगाल, बिहार, ईशान्येकडील राज्यांमध्ये ही यात्रा जाणार नाही. तमिळनाडू, महाराष्ट्र व झारखंड या तीन राज्यांतून ही यात्रा जाईल व याच तीन राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीतील घटक पक्षांचे अस्तित्व आहे. बिगरभाजप प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व असलेल्या राज्यांतून काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा जाणार नाही. त्यामुळे बिगरभाजप प्रादेशिक पक्षांना या यात्रेत सहभागी करून घेण्याची संधी काँग्रेसला मिळणार नाही वा तसे निमंत्रणही देण्याची गरज नाही. या राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत असून तिथे पक्षाला मजबूत करण्यासाठी संलग्न यात्रा काढल्या जाणार आहेत. घटक पक्षांच्या राज्यांमध्ये ही यात्रा प्रवेश करेल तेव्हा काँग्रेसकडून या पक्षांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाते का, हे स्पष्ट होईल.

संघाच्या खाकी चड्डीला आग लावणारे ट्वीट करून काँग्रेसने भाजपलाही आश्चर्यचकित केले. भाजपविरोधात भूमिका घेण्याबाबत काँग्रेसमध्ये मतभेद झालेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका न करता केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली पाहिजे, असे काहींचे म्हणणे होते. तर राहुल गांधी व त्यांच्या निष्ठावानांचे म्हणणे परस्परविरोधी होते. आता संघ-भाजप व मोदी यांच्याविरोधात थेट हल्लाबोल केला जाईल असे दिसते. संघाच्या खाकी पोशाखाला लक्ष्य बनवून काँग्रेसने भाजपच्या समाजमाध्यमांवरील युद्धात जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले असावे. जयराम रमेश यांचे म्हणणे होते की, भाजप सातत्याने समाजमाध्यमांतून काँग्रेसवर उग्र टीका करतो. काँग्रेसने आत्तापर्यंत भाजपला तितक्या आक्रमकपणे उत्तर दिलेले नव्हते. काँग्रेसकडून प्रत्युत्तर दिले जाईल याची भाजपला अपेक्षा नव्हती. पण आता काँग्रेस तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देईल. भाजपनेही आता इतरांचे बोल ऐकण्याची सवय ठेवावी, हे रमेश यांनी खाकी चड्डीच्या ट्वीटवर दिलेले स्पष्टीकरण महत्त्वाचे मानता येऊ शकेल.

भाजपने गेल्या आठ वर्षांमध्ये समाजमाध्यमांतून लोकांचा राजकीय दृष्टिकोन तयार करण्यात कौशल्य मिळवलेले आहे. समाजमाध्यमांचा अत्यंत चाणाक्षपणे वापर करून भाजपने संघ-भाजप आणि मोदी यांची विशिष्ट प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्याचा २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळाला होता. याच समाजमाध्यमांचा भलाबुरा वापर करून भाजपने काँग्रेसह विरोधी पक्षांच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेलाही धक्का लावला. राहुल गांधींविरोधात प्रचारातून राजकीय नेता म्हणून त्यांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसने पूर्वीही केला होता. समाजमाध्यमांवर खेळल्या जाणाऱ्या राजकीय खेळात भाजपला टक्कर देण्याची ताकद कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नाही. भाजपला या व्यासपीठांवरून टक्कर द्यायची असेल तर, इतर पक्षांनाही खालच्या स्तरावर उतरून खेळ खेळावा लागेल. त्यातून राजकारणाचे अवमूल्यन होईल, याचे भान बिगरभाजप पक्षांतील नेत्यांनी ठेवले होते. पण आता भाजपच्या (गैर)प्रचार आणि प्रसाराविरोधात आक्रमकपणे संघर्ष करण्याचे बहुधा काँग्रेसने ठरवले असावे. या प्रयत्नामध्ये काँग्रेसला कितपत यश येते हेही यथावकाश दिसेल. पण काँग्रेसने कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांवरून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा संदेश दिला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये दक्षिणेकडील टप्प्यात तरी लोकांचा सहभाग दिसू लागला आहे. हाच उत्साह उत्तरेकडील राज्यांमध्ये टिकला तर मात्र, भाजपलाही यात्रेतून होणाऱ्या संभाव्य राजकीय नुकसानीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. दुसऱ्या बाजूला, गुलाम नबी आझाद वगैरे सामान्यजनांशी संबंध नसलेले नेते पक्षातून गेलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होणार नाही. पण, अशोक गेहलोत, भूपेंद्र हुडा असे एखाद-दोन अपवाद वगळले तर काँग्रेसकडे लोकांशी नाळ जोडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची कमतरताच आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून येऊ शकतील अशा नेत्यांची उणीव काँग्रेस कशी भरून काढणार, हेही या यात्रेतून समजू शकेल. mahesh.sarlashkar@expressindia.com