सामान्य माणसाचे जगणे केंद्रस्थानी आणून तमिळ सिनेमाला नवी दिशा देणारे, ग्रामीण वास्तव प्रभावीपणे पडद्यावर आणणारे, तमिळ चित्रपटातील स्टुडिओराज मोडून काढत सिनेमाला इथल्या मातीत रुजवणारे दिग्दर्शक म्हणून भारतीराजा यांचे स्थान अढळ आहे. शेतकरी, मजूर अशी माणसे त्यांनी पडद्यावर जिवंत केली. तमिळ सिनेमाला मेलोड्रामामधून जिवंत माणसांच्या जगात आणले. या सगळ्यातून त्यांनी तमिळ व्यावसायिक सिनेमाची एक नवी भाषा घडवली, असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. ४० हून अधिक चित्रपट करून तमिळ चित्रपटसृष्टीवर आपला अमीट ठसा उमटवणार्या या दिग्दर्शकाचे नुकतेच ८४ व्या वर्षी निधन झाले. आजही त्यांचे वर्णन तमिळ सिनेमाच्या इतिहासात अत्यंत प्रभावशाली दिग्दर्शक असे केले जाते. भारतीराजा यांना सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, सहा तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार तसेच २००४ मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले होते.
भारतीराजा यांना स्टार मेकर असे म्हटले जात असे. अनेक नवे चेहरे त्यांनी पुढे आणले. विनोदी अभिनेते, तंत्रज्ञ यांच्यामधली प्रतिभाही त्यांनी ओळखली आणि जोपासली. अनोख्या पद्धतीने सिनेमाची कथा सांगणे आणि तितक्याच अनोख्या पद्धतीने तिचे सादरीकरण हे त्यांचे बलस्थान होते. त्यामुळेच तमिळ चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना ‘इयक्कुनर इमयाम’ म्हणजेच दिग्दर्शन विश्वातील शिखर असे म्हटले जात असे.
१९७७ मधला ‘१६ वयथिनिले’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. या चित्रपटात कमल हसन आणि श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर सुपरस्टार रजनीकांत यांनी खलनायकाची भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी संगीत दिले होते. या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली होती. १६ ‘वयथिनिले’ने बॉक्स ऑफिसवर बराच काळ वर्चस्व गाजवले. आजही तो सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटांपैकी एक मानला जातो.
‘सिगप्पू रोजक्कल’ (१९७८) या अत्यंत प्र्रभावी मानसशास्त्रीय थरारपटाचा त्यांच्या उल्लेखनीय तमिळ चित्रपटांमध्ये समावेश केला जातो. ‘अलायगल ओइवथिल्लई’ (१९८१), ही जात आणि धार्मिक अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित प्रेमकथा लोकांना प्रचंड आवडली. ‘मुदल मरियाथाई’ (१९८५), या नि:स्वार्थ प्रेमावर आधारित चित्रपटात शिवाजी गणेशन यांनी प्रमुख भूमिका केली होती. तर ‘करुथम्मा’ (१९९४) हा चित्रपट स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्री अर्भकहत्या या सामाजिक दुष्कृत्यांवर प्रहार होता. ‘किझाक्के पोगम रेल,’ ‘काधल ओवियुम,’ आणि हे देखील त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत.
भारतीराजा यांनी दिग्दर्शित केलेल्या सोलवा सावन (१९७९) या चित्रपटात हिंदी श्रीदेवी आणि अमोल पालेकर मुख्य भूमिकेत होते. तर रेड रोज (१९८०) हा मनोवैज्ञानिक थ्रीलर या प्रकारातील त्यांचा हिंदी चित्रपट राजेश खन्ना आणि पूनम धिल्लन यांच्यामुळे गाजला. ‘सवेरे वाली गाडी’ (१९८६) या चित्रपटात सनी देवल आणि पूनम धिल्लन यांना घेऊन त्यांनी ग्रामीण भारतातील प्रेमकथेतील जातीय संघर्ष चितारला होता.
दिग्दर्शनाबरोबरच त्यांना अभिनयाचीही आवड होती. मणिरत्नम यांच्या ‘आयुध एझुथु’ (२००४) या राजकीय चित्रपटात त्यांनी धूर्त राजकारण्याची अप्रतिम भूमिका केली होती. ‘पांडियानाडू’ (२०१३) आणि सुपरहिट ‘थिरुचित्रंबलम’ (२०२२) मधील त्यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. २०२० मधील ‘मींडम ओरू मेरीथाई’ हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. तर ‘पुलावर’ हा अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही.
