हिनाकौसर खान

बिल्किस बानोने दिल्लीत आंदोलन केलेल्या महिला कुस्तीगिरांना पत्र लिहिलं असतं तर ते असं असतं..

Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले, “रशियाचे पुतिन आणि मोदी…”
aap jantar mantar hunger strike
महात्मा गांधी ते ममता बॅनर्जी; उपोषण हे ‘राजकीय शस्त्र’ म्हणून कसे वापरले गेले?
Sudhir Mungantiwar
मोले घातले लढाया: अनिच्छेने दिल्लीच्या लढाईत
congress kisan morcha national coordinator shailesh agarwal meet mallikarjun kharge over wardha seat
“एकाही वरिष्ठ नेत्याने वर्धेची जागा काँग्रेसने लढावी म्हणून स्वारस्य दाखविले नाही,” कोण म्हणाले असे पक्षाध्यक्ष खर्गे यांच्यासमोर?

दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत कुस्तीपटूंचे १८ जानेवारीपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. चौकशी समितीचा अहवाल एप्रिलमध्येही जाहीर झाला नाही; ना कुठली कारवाई झाली. त्यामुळे २३ एप्रिलपासून कुस्तीपटू पुन्हा आंदोलनास बसले. या आंदोलनाचे नेतृत्व विनेश, साक्षी, संगीता करताना दिसताहेत.

धर्म, सत्ता आणि न्याय व्यवस्थेनं दमवलेल्या बिल्किस बानोनं त्यांना पत्र लिहायचं ठरवल्यास ते काय असेल, या भूमिकेतून लिहिलेलं हे अनावृत पत्र.

प्रिय,
विनेश, साक्षी, संगीता आणि इतर पैलवान मैत्रिणींनो..

तुम्ही कशा आहात? खरं तर हा प्रश्न अप्रस्तुत आहे. तुमचा संताप, चीड, त्रास आणि कधी कधी भावनेनं उचंबळून येणारे अश्रू रोजच पाहतेय, तरीही हा प्रश्न करावासा वाटतोय. कारण हा प्रश्न इथल्या मुर्दाड व्यवस्थेनं मला कधी केला नाही. (पण कुणी विचारलं असतं, तर मी काय उत्तर देणार होते? ‘जिंदा लाश’ या शब्दांशिवाय माझ्याकडे दुसरं काही उत्तर नाहीच. हे जगणं मृत्यूपेक्षाही भयाण आहे.) या व्यवस्थेच्या चक्रात मीदेखील न्यायासाठी तिष्ठत राहिली आहे. मला तुमची यातना कळते, म्हणून ही विचारणा..

खरं सांगू, मला माझ्या ठरलेल्या दायऱ्यात मुलाबाळांसह समरसून जगायचं होतं. मी कोण होते? एक सामान्य स्त्री. जगण्याची सामान्य उम्मीद असणारी. मी तुमच्यासारखी ना मशहूर होते, ना मी आंतरराष्ट्रीय पदकं मिळवून देशाला शोहरत मिळवून दिली होती. माझं साजरेपण माझं धोपटमार्गी साधारण आयुष्य जगण्यात होतं. पण २००२ पासून मी ‘किमान’ जगण्यासाठीच दरबदर फिरतेय. खुदा ना खास्ता ही वेळ तुमच्यावर येवो. तुमची फिक्र वाटतीये. तुम्ही रस्त्यावर उतरून अदबीनं न्यायाची मागणी करत आहात.. तरी लक्षात घ्या, सत्तास्थानी असणारी माणसं तुमचं दमन, शोषण आणि तुम्हाला रातोरात गायब करण्यासाठी वखवखलेली आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारतेय, ‘तुम्ही कशा आहात?’ जेणेकरून तुम्ही बेबाक होऊन सांगा.. सतत, सतत सांगा, तुमच्या वेदना, आतली उलथापालथ, तुमचा तणाव, धोके, तुमच्यावरची दडपणं, घुसमट, सब कुछ!

बहिणींनो, तुम्ही मागच्या एक महिन्यापासून जंतरमंतरवर पाय रोवून उभ्या आहात, हे काबिले तारीफ आहे. पाय रोवून उभं राहण्याचा अर्थ तुम्हा खेळाडूंना मी काय सांगणार? इतकंच सांगू शकते, की ज्या आखाडय़ात तुम्ही आत्ता उतरलात, तिथं मी गेली २१ वर्ष उभी आहे. डटून! होय! या देशात लैंगिक अत्याचाराची खिलाफत करणं सोपं नाही. अत्याचारकर्त्यांना ललकारणं साधं नाहीये. स्वत:ची लैंगिक छळणूक झालीये हे खुलेआम सांगणं सहज नाहीये. माझा तर बलात्कार झाला होता, सामूहिक बलात्कार! मरणासन्न अनुभव ते मृतवत जगणं एकसारख्या कासवगतीनं सुरूय माझ्या आयुष्यात. पण तुम्ही निडरपणे पावलं उचला. आत्ता ज्या एकजुटीनं उभ्या आहात, तशाच राहा.

मला कल्पनाय, तुम्हाला ब्रिजभूषण शरण सिंहविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयानं फटकारल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, पण एफआयआर नाही केला अजून. अटक तर दूरची बात. याच प्रकरणात मेरी कोमच्या अध्यक्षस्थानी नेमलेल्या समितीचा अहवालही गुलदस्त्यात ठेवलाय. अशी काय गोम असेल की एफआयआर होत नाहीये.. हे सगळं हताशा आणणारं आहे. पण बहिणींनो, अजिबात मायूस नाही व्हायचं. मी या मन:स्थितीतून गेलेय. माझ्यासमोर घडलेल्या आणि माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगाची मी एकमेव साक्षीदार होते. तरी माझी कुठं तक्रार घेतली? मी तर आहे त्या अवस्थेत लगेच पोलीस स्टेशनात गेले होते. पण कुणी माझी फिर्याद ऐकली? पहिली अटक व्हायला दोन-अडीच वर्ष लागली. काही पुरावे तर पोलिसांनीच नष्ट केले. शवविच्छेदन न करता मृतदेह पुरले. माझ्या नशिबानं याही गोष्टींचं दस्तऐवजीकरण झालं म्हणून ठीक. आणखी एक कलेजा जाळणारी गोष्ट सांगू? माझी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी तर कोर्टात माझा बलात्कारच झाला नाही अशी साक्ष दिली होती. न्यायाच्या मार्गात खूप अडथळे आणले जातात बहिणींनो! तुम्ही खूप अवघड लढाई छेडलीय. धीर आणि हिंमत, तुम्हाला दोघांची गरज लागणारय. कंबर कसून घ्या!

अं, तुम्हाला असं तर नाही ना वाटत की आपले धर्म भिन्न आहेत तर प्रतिसादही वेगळा असेल. शक्य आहे. माझी इतकी वर्ष इंतजारमध्ये बर्बाद झाली तेही त्याच कारणानं. अलीकडे तर धर्माच्या जाणिवा रोजबरोज टोकदार होताहेत. गुन्हेगार कुठल्या धर्मात जन्माला आलाय या एकाच ‘पात्रतेवरून’ त्याची सुटकाही होतेय.

अच्छा, तुम्ही गुन्हेगारांच्या नव्हे तर औरतच्या धर्मावरून उलझलात? पीडितेचा धर्म तिला न्याय मिळवून देईन असं वाटतं? नका गं अशा गोंधळात पडू! कुठल्याही धर्मातल्या औरतांचा अव्वल धर्म ‘औरत’ असण्यातच आहे आणि तोही असा धर्म, जो तिचा गुन्हाच ठरेल हे पाहण्यात, इथल्या व्यवस्था खूश आहेत. मान्य, की ती कुठल्या जात-धर्मात जन्मते यावरून तिच्या शोषणाची तीव्रता कळते. तिला मोकळय़ा आकाशाची फुटपट्टी मिळते, पण या सगळय़ानंतरही स्त्री प्रत्येक जात-धर्माच्या उतरंडीत सर्वात खालच्या स्थानावरच आहे. तिचं बायकांच्या समूहातलं स्थान वर-खाली-बरोबरचं होत असेलही, पण पितृसत्तेत ती एकजात दुय्यम आहे, मग धर्म/जात कुठलीही असो. आपण बायका जन्मानं मिळालेले धर्मपताके आपल्या शरीरावर घेऊन फिरत राहतो. आभूषणांसारखं मिरवतो. पण तेच बाईपण आपल्या गळय़ाशी आणलं जातं, तेव्हा कुठला धर्म आपली पाठराखण करतो?
रविवारी, २८ मे रोजी नव्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन झालं. मात्र संसदेबाहेर तुमच्यासोबत घडलेली घटना पाहून डोळय़ांत टचकन पाणी आलं. शोषणाविरुद्धची दुहाई देणाऱ्या संसदेबाहेरच तुमचा हरप्रकारे अनादर झाला. आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणाऱ्या तुमच्यासारख्या महिलांचं म्हणणं ऐकलं जात नाहीये, तर माझ्यासारख्या सामान्य बाईची काय गत झाली असेल? न्याय मागणाऱ्यांचा धर्म असा खरवडून नाही काढता येत. न्यायासाठी त्याच्या जिवाला लागलेला घोर तेवढा खरा असतो.

मुळात अन्यायाचा पर्दाफाश करणाऱ्या आणि स्वत:साठी बुजदिली सोडणाऱ्या स्त्रियांची जातकुळी एकच गं. आणि मुलींनो, इथं तर न्यायानं न्याय मिळवणं अवघड आहे. शिवाय आपल्याला सोपे मार्ग खुणावत नाहीत, मग आपण भिन्नधर्मी कशा? सांगा? आपले लढेसुद्धा एकच आहेत.
तुम्ही काय आणि मी काय, आपण एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला हवी. जगभरातल्या पुरुषी व्यवस्था सत्ता बळकट करण्यात गुंतल्यात आणि त्यासाठी त्यांनी स्त्रियांची शरीरं युद्धभूमी ठरवलीत. मग ती सत्ता राजकारणातली, धर्मकारणातली वा घरकारणातली असो. या पुरुषी मानसिकतेला स्त्रीचा देह त्याची जागीर वाटत आलीये. ते त्या जागिरीवर फक्त हुकमत मिळवू इच्छितात. पण त्याउपर त्यांना काही हाशील करता येत नाही. त्यांच्या दृष्टीने जागिरीवर जोर-जबरदस्ती केल्यावर कथित पुरुषत्व दाखवण्याची सिद्धी प्राप्त होते. आणि त्या तऱ्हेनं स्त्रियांचं स्त्रीत्व पायदळी तुडवल्याच्या आसुरी आनंदात राहता येतं. ते आणि त्यांचे धर्म तेवढे सुखावतात. त्यांच्या दृष्टीनं स्त्रियांचं दमन तिच्या देहयोनीवरच्या हल्ल्यात आहे, निव्वळ. त्यांची मर्यादा अशी की, त्यांना स्त्रियांचा मोहदेखील करता येत नाही, असो. त्यामुळे ही लढाई दीर्घकाळ चालली तरी तुम्ही आखाडा सोडू नका. कुणी कितीही भयभीत केलं तरी सामना करा. धमकावलं तर उसळून उभ्या राहा. तुम्ही हे करालच असा भरवसा आहेच गं.

पोरींनो, शेवटचं विचारू? म्हणजे तुम्हाला आपलं मानलंय तर मी तुम्हाला मोकळेपणाने विचारू शकते असं वाटतंय. मी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या देशात ‘रामराज्य’ येणार म्हणून ऐकतेय. तुम्हाला काही माहितीये का ते कधी येईल? कसंय, रामाचा वनवास १४ वर्षांनी संपला होता. माझी मात्र आवर्तनं संपेनात..! तुम्हाला काही कळलं तर सांगा.

तसंही मी माझ्या बिल्किस असण्यासह तुमच्यासोबत आहेच.. न्यायदेवतेकडे डोळे लावून!

तुमची बिल्किस

(‘बिल्किस बानो’ हे व्यवस्थेनं पोखरलेल्या देहाचं नाव आहे. ती कुठल्याही जाती/धर्मात न्यायाच्या प्रतीक्षेत दिसत असेल तर तो योगायोग भयंकर आहे.)