‘रेनेसान्स’ ही मूळची युरोपातून उदयास आलेली संकल्पना. ‘बिंदेश्वर पाठक : अ रेनेसान्स मॅन’ हे पुस्तक वाचताना या संकल्पनेकडे भारतीय सामाजिक परिप्रेक्ष्यातून पाहणे गरजेचे आहे. पुस्तक आजच्या काळातील समाजसुधारकाची वाटचाल आणि त्याचा संघर्ष मांडते. १९व्या शतकातील अनिष्ट सामाजिक चालीरीतींना चूड लावण्याचे कार्य राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वामी दयानंद सरस्वती आदींनी केले, त्याच पातळीवरचे कर्तृत्व बिंदेश्वर पाठक यांच्या हातून घडले, असे लेखकाचे म्हणणे आहे.
बिहारमधील वैशाली जिल्ह्यात रामपूर बघेल गावात २ एप्रिल १९४३ रोजी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या बिंदेश्वरचा भवताल असा होता, की घरातील शौचकूप स्वच्छ करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा स्पर्श झालेली वस्तू व त्या व्यक्तीचा वावर असलेली जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध केली जात होती. आपल्यासारख्याच हाडामासाच्या जिवाला स्पर्श केला तर आपण अशुद्ध ठरू, हे धर्मसूत्र बालवयातील बिंदेश्वरला ठाऊक असण्याचे काही कारणच नव्हते. किंबहुना, शौचकूप साफ करून त्यातील मैला डोक्यावर वाहणार्या त्या महिलेला बिंदेश्वरने कुतूहलापोटी एक-दोनदा स्पर्शही केला होता. पण, तिसर्यांदा मात्र तो त्याच्या आजीच्या नजरेतून सुटला नाही आणि ती घटना गावभर वार्यासारखी पसरली. दु:खाने विदीर्ण झालेल्या आजीने आपला नातू बहिष्कृत केला जाईल, या भयाने पुरोहितांचे पाय धरले. मग त्यांनी बिंदेश्वरच्या शुद्धीसाठी गाईचे शेण, गोमूत्र व गंगेच्या पाण्याचे मिश्रण पिण्यास देऊन त्याला शुद्ध करून घेतले. हे सारे केले जात असताना बिंदेश्वरने मुठी करकचून आवळल्या होत्या आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
बिंदेश्वरच्या स्मृतींच्या खोल तळाशी ही घटना शीळा बनून राहिली होती. त्याने धुळाक्षरे गिरवण्याच्या काळापासूनच कुटुंबातील धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गंडांचे धडेही लक्षात ठेवले. आजोळात प्राथमिक शिक्षण झाले. मग तिथल्या शाळेतून काढून वडिलांनी त्याला स्वत:कडे ठेवले. यात बिंदेश्वरचे शैक्षणिक नुकसानच झाले. पण पुढे आईच्या संस्कारांनी तो समृद्ध झाला. वैराग्य, सरलता आणि परोपकार हे तीन गुण बिंदेश्वरने मिळवले. उच्च शिक्षणापर्यंत कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची झाली होती.
त्यांनी बाविसाव्या वर्षी समाजशास्त्रातून पदवी मिळवली. पुढे काही कारणांनी पदव्युत्तर शिक्षणात मागे पडल्याने आणि प्राध्यापक होण्याची इच्छा असूनही छोटी-मोठी नोकरी करावी लागल्याने बिंदेश्वरने घर गाठले. २ जुलै १९६५ रोजी बिंदेश्वरचा डॉ. हरिश्चंद्र झा यांची कन्या अमोला झा यांच्याशी विवाह झाला. त्या वेळी बिंदेश्वर यांच्याकडे नोकरी नव्हती. विवाहानंतर कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून बिंदेश्वर यांनी वडील डॉ. रमाकांत पाठक यांनी तयार केलेली आयुर्वेदिक औषधे घरपोच देण्यासाठी शहरे, गावे पालथी घातली. त्यामुळे चरितार्थास हातभार लागला, पण बिंदेश्वर यांना सरकारी नोकरी मिळाली नाही. म्हणून त्यांनी पूर्ण विचारांती ‘बिहार गांधी शतकोत्तर जन्म सोहळा समिती’बरोबर काम करण्यास सुरुवात केली. ही समिती बिहारच्या राज्यपालांच्या अध्यक्षेखाली स्थापन करण्यात आली होती. महात्मा गांधीचा संदेश देश-विदेशात पोहोचवण्याचे कार्य ही समिती करणार होती.
बिहारमधील अत्यंत अस्थिर राजकीय स्थितीने राज्यात अनेक समस्यांना जन्म दिला होता. १९६७ ते १९७० या कालावधीत राज्याने नऊ मुख्यमंत्री पाहिले. दोनदा राष्ट्रपती राजवटही लादली गेली. अनेक पोलाद कारखाने, रासायनिक कंपन्या, औष्णिक प्रकल्प ठप्प होण्याच्या मार्गावर आले. याचा फायदा अर्थात राजकारणातील परजीवी प्रथम घेतात. ‘बिहार गांधी शतकोत्तर जन्म सोहळा समिती’ने ‘गांधीजी को प्रणाम’ नामक पुस्तकाच्या चार हजार प्रती छपाईस देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ‘गांधीजी कुठे व कोणाला भेटले, याखेरीज त्या पुस्तकात कोणताही तपशील नाही,’ असा थेट अभिप्राय समितीचे सदस्य असलेल्या बिंदेश्वर पाठक यांनी सचिवांसमोर मांडला आणि चार हजारांऐवजी २०० प्रतीच खरेदी करण्याच्या सूचना केल्या. स्वत:चे मत सडेतोडपणे मांडणार्या बिंदेश्वर यांची सूचना महासचिवांनी ग्राह्य धरून ऑर्डर रद्द केली, त्यामुळेच समितीचे महासचिव शरयुप्रसाद यांनी बिंदेश्वर यांच्यावर विश्वास टाकला तो कायमचा. त्यांच्यावर समितीतील ‘भंगी मुक्ती कक्षा’ची जबाबदारी सोपवण्यात आली.
शौचकूप हाताने साफ करून वर मानवी मैला डोक्यावरून वाहून नेणारा समाज ‘भंगी’ नावाने ओळखला जात होता. या कक्षाचा भार स्वीकारल्यानंतर बिंदेश्वर यांनी त्यातील सूक्ष्म तपशील अभ्यासले. ही पद्धत मानवाला मानव म्हणून जगू देणारी नव्हती, हे बिंदेश्वर यांचे निरीक्षण होते. म्हणूनच त्यांना घरगुती व सार्वजनिक शौचकूपांतील मैला पाण्याच्या जोरदार प्रवाहासरशी वाहून जाईल, अशी सुविधा त्यांना विकसित करायची होती. यासाठी बिंदेश्वर त्या समाजातील लोकांमध्ये वावरू लागले. तेव्हा त्यांना असे जाणवले, की मैला डोक्यावरून वाहून नेणे, हे केवळ कर्तव्यच नाही, तर हक्कही आहे. म्हणजे, या समाजाप्रति उच्चवर्णीयांनी सहानुभूती दाखवणे म्हणजे, आपला सरकारी रोजगार गमावल्यात जमा आहे, असा या समाजाचा घट्ट समज होता. समाजाच्या हाडामासांत मुरलेली ही भावना बिंदेश्वर यांना आतून खचवणारी होती. परंतु, गांधीजींच्या अंत्योदय सिद्धांतासाठी, तळागाळातील व्यक्तीच्या उन्नयनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या बिंदेश्वर यांनी हा प्रश्न सोडवायचाच असा निश्चय केला होता.
त्यांनी बादलीच्या आकाराचा शौचकूप बदलून त्याजागी सुलभ शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. बिहार सरकारने आपल्या काखा वर केल्या. शिवाय, राज्यातील अस्पृश्यता निवारणाच्या मुद्द्यावर ब्रसुद्धा काढला नाही. बिंदेश्वर यांना शौचकुपात पाण्याचा वापर हवा होता. शिवाय, दोन खड्ड्यांचे शौचालय हवे होते. त्यासाठी त्यांनी कमी पाण्यात मैला वाहून जाईल, अशा शौचकुपाची दीर्घ अभ्यासानंतर रचना ठरवली. परंतु त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक सुविधा आणि निधीची चणचण भासू लागली. बिहार सरकारच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकल्प पुढे जाणे शक्य नव्हते. यासाठी त्यांनी १९७४ मध्ये एका आमदाराच्या मदतीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना साकडे घालून प्रकल्प मार्गी लावला.
सुलभ शौचालयाच्या बांधणीसाठी बिंदेश्वर यांचे एक धोरण होते. त्यात त्यांनी कधीच तडजोड केली नाही. म्हणजे एखादे कंत्राट मिळविण्यासाठी दर पाडून कामे करण्याचे गणित त्यांना कधीच मान्य नव्हते. शौचालयाचा दर्जा किमान पाच वर्षांपर्यंत टिकून राहावा, यासाठी कारागिराने सांगितलेला ४९ रुपयांचा दर वाढवून ५५ रुपयांपर्यंत देण्याची तयारी बिंदेश्वर यांच्या सुलभ शौचालय संस्थानने दाखवली. तरीही सुलभ शौचालय संस्थानचे शौचकूप स्वस्त ठेवण्यात आले. सरकारी मदतीच्या अपेक्षेवर संस्था चालविण्याऐवजी बिंदेश्वर यांनी वापर करा आणि पैसे द्या, या तत्त्वावर सुलभ शौचालय संस्थान चालवले. त्यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे सुलभ शौचालय संस्थानने तयार केलेले शौचकूप मागविण्यात आले. काही ठिकाणी शौचालये उभारण्यात आली.
श्रीलंका सरकारने देशभरात सुलभ शौचालये उभारण्याची तयारी दर्शवली. युनिसेफ आणि यूएनपीडी यांच्यासह २१ विकसनशील देशांतील शिष्टमंडळांनी १९८० साली भरवलेल्या परिषदेत सुलभ शौचालय संस्थानच्या क्रांतिकारी निर्मितीला एकमुखाने मान्यता दिली आणि सुलभ शौचालय संस्थान ‘सुलभ इंटरनॅशनल’ने म्हणून नावाजले जाऊ लागले.
