तारक काटे

गुलामी, आत्मग्लानी, जातिभेद, अस्पृश्यता इत्यादी उणिवांनी ग्रासलेल्या आपल्या समाजास धक्का देऊन जागे करण्याचे जे काम विवेकानंदांनी १९व्या शतकात केले त्याला कृतीची जोड देण्याचे काम गांधीजींनी विसाव्या शतकात केले.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले

स्वामी विवेकानंदांचा जन्म १८६३ सालचा. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे १८६९ साली महात्मा गांधी जन्माला आले. विवेकानंदांचा आयुष्यकाळ केवळ ३९ वर्षांचा म्हणजे तसा अल्पायुषीच. त्यामानाने गांधींना ७९ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले; त्यांची हत्या झाली नसती तर ते घेत असलेली आरोग्याची काळजी पाहता निश्चितच जास्त जगले असते. १२ जानेवारीला विवेकानंदांचा जन्म दिन, तर ३० जानेवारी हा गांधीजींचा निर्वाण दिन. जानेवारी महिन्याचे हे महत्त्व पाहता १९ व्या शतकाचा उत्तरार्ध आणि संपूर्ण विसावे शतक एवढय़ा मोठय़ा कालखंडात भारतीय जनमानसावर प्रभुत्व गाजविणाऱ्या या दोन विभूतींच्या जीवनाचा व कार्यकर्तृत्वाचा तौलनिक परामर्श घेणे उचितच होईल.

दोघांची कर्तृत्वक्षेत्रे वेगळी असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि त्यांनी केलेल्या कार्यातही बरीच साम्यस्थळे आहेत. दोघेही सनातन हिंदू धर्माचे उपासक. दोघांनीही धर्माकडे चिकित्सक नजरेने पाहिले. दोघांचाही धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होता. त्यांच्या धर्मकल्पनेचा आधार आध्यात्मिक होता व त्यामुळेच नैतिकही होता. मानवजातीचे मुख्य प्रश्न अद्ययावत भौतिक शास्त्रे वा शस्त्रात्रे या बाह्य साधनांनी सुटू शकणार नाही, तर त्यासाठी माणसाचे अंत:करण व बुद्धी यांच्या प्रत्ययास आलेल्या समता, न्याय, करुणा, प्रेम, त्याग, सेवा व करुणा या उच्चतर मूल्यांच्या आधारेच ते सुटू शकतील यावर त्यांचा विश्वास होता. विवेकानंदांनी धर्माची नवीन, अधिक व्यापक समज विकसित केली आणि गांधीजीनी एक प्रकारे हेच कार्य पुढे नेले.

आणखी वाचा – धर्म नाही, कुटिल राजकारणच जबाबदार!

धर्मविषयक, स्त्रीविषयक भूमिका

दोघांनीही जगातील महत्त्वाच्या प्रचलित धर्मविचारांचा सखोल अभ्यास केला आणि त्याविषयी ममत्वही बाळगले. विवेकानंद मुस्लीम धर्मातील समतेच्या मूल्याने अतिशय प्रभावित झाल्याचे दिसते. ‘‘वेदांतातील उदारमताचा भारतातील इस्लामवर परिणाम  होऊन तो सहिष्णु बनला आहे व त्यामुळे तो इतर देशांतील इस्लामपेक्षा वेगळा आहे,’’ असे त्यांचे मत होते. ‘‘भारताचा अभ्युदय व्हायचा असेल तर हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा’’ अशी मांडणी ते करतात. ‘‘या देशातील धर्मातरे ख्रिश्चन व मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झाली,’’ असे अतिशय परखड विश्लेषण ते करतात. गांधीजी तर स्वत:ला केवळ ‘सनातनी हिंदू’ नसून ख्रिश्चन, मुस्लीम, बौद्ध व जैनही आहोत असे मानत होते. देशात हिंदू आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये बंधुभावाचे नाते असावे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि यातच त्यांना आपले प्राणही गमवावे लागले.

विवेकानंद स्त्रीमुक्तीच्या प्रश्नांबाबत अतिशय सजग होते. त्या काळात प्रचलित असलेल्या बालविवाहाच्या प्रथेच्या ते प्रखर विरोधात होते. त्यांच्या मते ‘‘स्त्री-पुरुष हे एकाच पक्ष्याचे दोन पंख आहेत. ते समतोल नसतील, तर घर, परिवार, समाज, राष्ट्र हे खऱ्या अर्थाने उभेच राहू शकणार नाही.’’ या संदर्भात अमेरिकेच्या समृद्धीचे व संपन्नतेचे कारण ते तेथील स्त्रिया मुक्त आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उभ्या आहेत याला देतात. त्यामुळे ‘‘मृत्यूपूर्वी अशा हजार स्त्रिया मी भारतात निर्माण करू शकलो, तर सुखाने मरेन,’’ अशी आकांक्षा व्यक्त करतात. गांधीजींनी आपल्या राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक अशा सर्वच कार्यक्षेत्रांत स्त्रियांना जाणीवपूर्वक सहभागी करून घेतले. गांधींच्या प्रेरणेने भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात प्रथमच समाजाच्या सर्व क्षेत्रांतील स्त्रिया हिरिरीने पुढे आल्या. त्या काळात वज्र्य असलेले आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, पुनर्विवाह यांना गांधीजींचे प्रोत्साहन होते. गांधींनी उभ्या केलेल्या वेगवेगळय़ा विधायक कार्यामध्येदेखील स्त्रियांचा समावेश दिसतो.

आणखी वाचा – स्वामी विवेकानंद सर्वव्यापी धर्मविचार!

चिंतनाच्या गाभ्यातील साम्यस्थळे

समाजातील दीन, दलित, पीडित, उपेक्षित वर्ग आणि त्यांची उन्नती हा दोघांच्याही चिंतनाचा गाभा होता. गुलामी, आत्मग्लानी, जातिभेद, अस्पृश्यता इत्यादी उणिवांनी ग्रासलेल्या आपल्या समाजास धक्का देऊन जागे करण्याचे जे काम विवेकानंदांनी एकोणविसाव्या शतकात केले त्याला कृतीची जोड देण्याचे काम गांधीजींनी विसाव्या शतकात केले. आपल्या समाजाने शेकडो वर्षे दलितांवर केलेल्या अत्याचारांविरोधात आपला तीव्र निषेध विवेकानंद नोंदवितातच, शिवाय दलितांच्या शैक्षणिक व रोजगारातील आरक्षणाबद्दल त्या काळात विवेकानंद आग्रही प्रतिपादन करतात हे वाचून आपल्याला आज आश्चर्य वाटू शकते.

देशातील जातीयवाद संपविण्यासाठी त्यांनी कथित खालच्या जातीतील लोकांच्या कामाचे महत्त्व सांगितले आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य केले. गांधीजींनी आपल्या देशातील दीन-दलितांना दरिद्रीनारायणाच्या स्वरूपात पाहिले आणि त्यांची अखंड सेवा हेच आपल्या जीवितकार्याचे एक ईप्सित मानले. वंचितांच्या उन्नतीच्या हेतूने त्यांनी गावोगावी ग्रामोद्धाराचे उपक्रम उभे केले आणि अस्पृश्यता निवारणार्थ स्वत:ला वाहून घेतले.  

विवेकानंद आणि गांधीजी यांना त्यांच्या विदेशातील वास्तव्यामुळे पाश्चिमात्य जीवनाची चांगली ओळख होती. या दोघांनीही भारतीय संस्कृतीचे जसे महत्त्व समजावून सांगितले, तसेच पाश्चिमात्य सभ्यतेच्या दुष्परिणामांची स्पष्टपणे मांडणी केली. तेथील चंगळवादी जीवनपद्धतीला त्या दोघांचाही विरोध होता. विवेकानंदांना तेथील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण झालेल्या सोयीसुविधांनी प्रभावित केले असले, तरी त्या काळातील औद्योगिकीकरणात होत असलेल्या यंत्रांच्या अतिरेकी वापराबद्दल आणि त्याद्वारे माणसांच्या होणाऱ्या शोषणाबद्दल  त्यांनी गांधीजींप्रमाणेच विरोध नोंदविला आहे.

आणखी वाचा – जयंती विशेष: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ध्यानधारणा! विवेकानंदांचा संदेश

सत्य हाच ईश्वर

विवेकानंद संन्यासी होते. त्यामुळे त्या काळातील राजकीय घडामोडींपासून ते दूर राहू शकले. गांधीजी मनाने संन्यस्त वृत्तीचे असले तरी गृहस्थजीवन स्वीकारल्यामुळे व्यवहारी जीवनाचा विचार करणे त्यांना अपरिहार्य होते. त्यांच्या जीवनात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांना भिडण्याचे बिकट आव्हान होते. ही आव्हाने गांधीजींनी ज्या विलक्षण संयमाने हाताळली ते पाहताना मन अचंबित होते. मनाची संयत अवस्था गाठल्याशिवाय हे शक्य नाही. बुद्धीपेक्षाही गांधीजींची प्रेरणा श्रद्धा हीच राहिली आहे, जी अनुभूतीतून येते. त्यांनी जीवनभर चित्तशुद्धीवर भर दिला आहे.

ही शुद्धी साधण्यासाठी साध्य आणि साधन यांचा अभेद असावा याचा आग्रह धरला, त्यासाठी सत्याची कास धरली. शेवटी तर सत्यालाच ईश्वर मानून त्या प्रकाशात ते जीवनाचा पुढील मार्ग शोधत राहिले. अध्यात्म आणि व्यवहार हे वेगळे न मानता व्यवहारात अध्यात्म्याचा साक्षात्कार झाला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न राहिला. आत्मप्राप्ती ही नुसत्या चिंतनाने होत नाही. त्यासाठी मानवजातीशी समरस होण्याची, प्राणिमात्राची सेवा करण्याची आवश्यकता आहे असे त्यांचे मत होते आणि ही सेवा अहिंसेशिवाय अशक्य आहे असा त्यांचा अनुभव होता. या स्वरूपात गांधीजींनी एक नवे जीवनदर्शन आपल्याला दिले आहे. गांधीजींचे जीवनविषयक चिंतन व त्याला अनुसरून त्यांनी केलेले अफाट कार्य हे पाहता त्यांच्यात संन्यासी व कर्मयोगी यांचा समन्वय झालेला दिसतो.

आज आपला समाज भरकटल्यासारखा झाला आहे. कधी नव्हे ती विलक्षण अस्वस्थता सर्वत्र भरून आहे. सामाजिक व आर्थिक विषमता वाढीला लागली आहे. बेकारी व गरिबीचे प्रश्न तीव्र होताहेत. समाज जाती-धर्माच्या नावाने दुभंगतो आहे. सर्वत्र असत्याचे आणि द्वेषाचेच राजकारण केले जात आहे. अशा वेळी पुन्हा एकदा समाजभान जागृतीसाठी, परस्पर-संवादासाठी आणि जनसामान्यांना नवी वाट दाखविण्यासाठी जगाला सत्य, करुणा व प्रेमाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी या दोघांच्या जीवनदर्शनाचाच मार्ग आपल्याला शोधावा लागेल यात शंका नाही.

स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी या दोघांचा काळ वेगळा, कामाचे स्वरूप वेगळे; पण विवेकानंदांनी धर्मविषयक जाणिवांचा पाया घातला आणि गांधीजींनी त्याचा विस्तार केला.

लेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या

 विषयांचे अभ्यासक आहेत.

vernal.tarak@gmail.com