scorecardresearch

लालकिल्ला: भाजपच्या कुंपणावरील मते कोणाकडे?

कुंपणावरील मतांमुळे भाजपला यंदाच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळूही शकेल; पण शहरी गुजरातमधील भाजपची मते ‘आप’ने स्वत:कडे वळवली तर, अरिवद केजरीवाल यांचा दिल्ली-पंजाबमधील पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या यादीत समाविष्ट होऊ शकेल.

लालकिल्ला: भाजपच्या कुंपणावरील मते कोणाकडे?

महेश सरलष्कर

गुजरातमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला फुलटॉस चेंडू दिल्याने मोदी वगैरेंनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवसांमध्ये तुफान फलंदाजी केली. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मोदींना ‘रावण’ म्हणाले. मधुसूदन मिस्त्रींनी मोदींची लायकी काढली. गुजरातमध्ये मोदींवर इतकी कडवी टीका केली म्हणून काँग्रेसला काही फरक पडत नाही हे खरे. काँग्रेसचा बांधलेला मतदार कुठेही जात नाही, मोदींच्या झंझावातही १९-२१ टक्के मते काँग्रेसला मिळत आली आहेत. गुजरातमध्येही ही मते काँग्रेसला मिळणारच आहेत! खरगे असो वा अन्य कोणी, काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारांना खूश करण्यासाठी केलेली विधाने लाभाची ठरतील हे निश्चित. पण ही विधाने करून काँग्रेसने भाजपसाठी कुंपणावरील मते खुंटी हलवून बळकट केल्याने अखेरच्या क्षणी निवडणूक सोपी होऊ शकते.

प्रत्येक निवडणुकीत कुंपणावर बसलेले मतदार खूप असतात, ते शेवटच्या क्षणी निर्णय घेतात. हे अस्थिर मतदार भाजपवर नाराजही असू शकतील; पण काँग्रेस नेत्यांच्या विधानांमुळे भाजपला गुजराती अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आणण्याची संधी मिळाली. अलीकडच्या काही वर्षांमध्ये भाजपच्या केंद्रीभूत राजकारणामुळेच राज्या-राज्यांमध्ये अस्मितेला अधिक महत्त्व आलेले आहे. भाजपने मोदींची राजवट आल्यापासून गुजराती अस्मितेच्या आधारावर विधानसभा निवडणुका जिंकलेल्या आहेत. या वेळी आम आदमी पक्षामुळे (आप) तुलनेत अधिक अडचणीत आलेल्या भाजपला काँग्रेसने गुजराती अस्मितेचा मुद्दा आंदण देऊन टाकला. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये मोदींवर थेट टीका न करण्याचे धोरण काँग्रेसने आत्तापर्यंत कसोशीने पाळले होते. मोदींना लक्ष्य करण्याची चूक टाळण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. काँग्रेसचा समाजमाध्यम विभाग अलीकडच्या काळात अतिशय गतिशील झालेला आहे, भाजपच्या प्रत्येक टीकेला तितक्याच तीव्रतेने आणि तातडीने प्रत्युत्तर दिले जाते. काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाकडून थेट मोदींवर टीका केली जात नाही, भाजप नेत्यांच्या मुद्दय़ांना सडेतोड उत्तर दिले जाते वा केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमधील फोलपणा दाखवून दिला जातो. ‘भारत जोडो’ यात्रेमध्येही राहुल गांधींनी पूर्वी केलेली ‘चौकीदार चोर है’ची चूक केली नाही. मग, गुजरातमधील आपल्याकडे वळू शकणाऱ्या मतदारांना भाजपकडे ढकलण्याचे काम काँग्रेसने कशासाठी केले, असा प्रश्न सुज्ञांना पडू शकतो.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना मोदींनी मतदारांना भाजपच्या उमेदवारांकडे न बघता फक्त कमळाकडे पाहून मत देण्याचे आवाहन केले होते. भाजपच्या उमेदवाराकडे पाहिले तर कदाचित मतदार भाजपला मते देणार नाहीत, याची त्यांना भीती वाटत असावी. भाजपसाठी गुजरातमध्येही वेगळी परिस्थिती नाही. तिथेही मोदींनी, ‘मी गुजरात घडवला’, असे म्हणत मतदारांनी कोणाकडे बघून मते द्यायची हे स्पष्टच सांगून टाकले. गुजरातमध्येही भाजपचा उमेदवार कोण हे मतदारांना माहीत असण्याची गरज नाही. २००० पासून गुजरातमध्ये झालेला विकास (!) मोदींमुळे झालेला आहे, गुजरात म्हणजे मोदी हे समीकरण सिद्ध झालेले आहे; त्यामुळे मतदारांनी गुजरातमधील भाजपची पक्ष संघटना, त्यांचे नेते, भाजपचे याआधीचे आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्याकडे न बघता, त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता मोदींना आपल्या मतांमुळे गुजरातमध्ये आणि एक प्रकारे देशातही विजयी करत असल्याच्या श्रद्धेने मतदान करण्याचे आवाहन भाजपने केले आहे. यंदाच्या प्रचारात ‘मोदी फॅक्टर’मध्ये गुजरातच्या अस्मितेच्या मुद्दय़ाची कमतरता होती, ती काँग्रेसने अलगद मोदींच्या हाती देऊन टाकली. गुजरातमध्ये सुप्रशासनाचा सकारात्मक मुद्दा मांडून भाजपला विजय मिळू शकत नाही, हे तर गेल्या विधानसभा निवडणुकीतही सिद्ध झालेले होते. भाजपला गुजरातमध्ये सत्ता कायम राखायची असेल तर फक्त मोदीच उपयुक्त ठरतील, हे ओळखून भाजपने प्रचारात मोदींच्या पलीकडे कोणताही मुद्दा मांडला नाही! मोदी हा फॅक्टर काढून घेतला तर गुजरातमध्ये भाजप पराभूत होऊ शकतो, हे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्षाच्या स्पर्धेतील ‘आप’ या दोन्ही पक्षांना माहिती आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मोदींना वगळून प्रचार केलेला दिसला.

दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण, गुजरातमध्ये ‘आप’ हा भाजपच्या मतांतील वाटेकरी झाला तर मात्र, बालेकिल्ल्यामध्ये भाजपसाठी जमीन भुसभुशीत व्हायला वेळ लागणार नाही. त्याचा अंदाज आल्याने काँग्रेस हाच प्रमुख विरोधक असून ‘आप’चे गुजरातमध्ये अस्तित्वही नाही, असे भाजपचे नेते सांगू लागले होते. कुंपणावरील मतांमुळे भाजपला यंदाच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळूही शकेल; पण शहरी गुजरातमधील भाजपची मते ‘आप’ने स्वत:कडे वळवली तर अरिवद केजरीवाल यांचा दिल्ली-पंजाबमधील पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या यादीत समाविष्ट होऊ शकेल. मग, केजरीवाल यांच्या भाजपविरोधातील आक्रमकपणाला आणखी खतपाणी मिळेल. गेल्या आठ वर्षांमध्ये भाजपचे हिंदूत्वाचे वर्तुळ आणि बिगर-हिंदूत्ववादी विरोधी पक्षांचे वर्तुळ असे दोन्ही समांतर परीघ देशाच्या राजकारणात अस्तित्वात आलेले होते. या दोन्ही वर्तुळांच्या मधोमध जाऊन बसण्याची धडपड केजरीवालांनी गोवा विधानसभा निवडणुकीपासून केलेली आहे. गुजरातमध्ये ‘आप’ला दहा-बारा टक्के मते मिळाली तर, दोन्ही वर्तुळांना ‘आप’ धक्का देऊन मधली जागा काबीज करेल. ‘आप’ला हिंदूत्वाचे वावडे नाही, धर्माचे थेट राजकारण ‘आप’ने केलेले नसले तरी, काँग्रेस वा तृणमूल काँग्रेस वा दक्षिणेकडील पक्षांप्रमाणे धर्माधिष्ठित राजकारणाला केजरीवाल विरोध करत नाहीत. दिल्ली प्रारूपाचे आकर्षण असणाऱ्या शहरी गुजराती मतदारांना ‘आप’ चुचकारू शकतो, मतेही मिळवू शकतो. ज्यांना ‘आप’चे आकर्षण नसेल, त्यांना काँग्रेसने दोन दशकांच्या प्रतिकूल वातावरणात टिकाव धरणे आशावादी वाटू शकेल. म्हणून २०१७ प्रमाणे या वेळीही गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे महत्त्व कायम राहिलेले आहे. अशा वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली विधाने मोदींनी हसत-हसत स्वीकारली हे समजू शकेल.

काँग्रेसमधून हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर हे तरुण-होतकरू नेते भाजपमध्ये गेले. गुजरातमध्ये काँग्रेसकडे राष्ट्रीय ओळख असलेले नेते नाहीत, स्थानिक नेत्यांच्या आपापल्या मतदारसंघातील ताकदीवर काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे. सौराष्ट्रमध्ये राहुल गांधींच्या दोन प्रचारसभा वगळता गांधी कुटुंबातील सदस्यांनी गुजरातमध्ये प्रचार केला नाही. तिथे राहुल-प्रियंका यांनी प्रचार न करणे काँग्रेसच्या पथ्यावर पडलेले होते. भाजपच्या नेत्यांना गांधी कुटुंबाला लक्ष्य करता आले नाही. काँग्रेसलाही गेल्या वेळी जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपविरोधात प्रचार करता आला. या वेळी गुजरातमध्ये तिहेरी लढत होणार असली तरी, जिंकण्याची शक्यता अधिक असलेल्या मतदारसंघांमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. भाजपच्या हाती थेट मुद्दा येणार नाही याची दक्षता घेत काँग्रेसने प्रचार केला होता. त्यातून अपेक्षित जागा मिळू शकतील, हा हिशेब मांडला गेला होता. गेल्या २७ वर्षांमध्ये भाजपची सत्ता पाहिलेल्या मतदारांना बदलाची अपेक्षा असेल तर, त्यांची मते मिळवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे होते. काँग्रेसने आपापल्या ताकदीनुसार तसे प्रयत्न केले. अहमदाबादसारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये मतदार उघडपणे ‘आप’ आणि काँग्रेसकडे पर्याय म्हणून बघत असतील तर, गुजरातमध्ये भाजपची पकड ढिली होत असल्याचे संकेत असू शकतात. ही भाजपसाठी आगामी काळात धोक्याची घंटा असेल! ‘आप’ने गुजरातमध्ये दिल्ली-पंजाबसारखा प्रचार केला. शाळा-महाविद्यालये, आरोग्याच्या सुविधा, रस्ते-वीज, महापालिका प्रशासनांतील भ्रष्टाचार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतनाचे जुने धोरण असे मध्यमवर्गाचे लक्ष वेधून घेणारे मुद्दे प्रचारात आणले. त्यामुळे भाजपला हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवता येत नव्हती. ‘आप’च्या मुद्दय़ांवर भाजपने प्रत्युत्तर देण्याचे टाळले. भाजपने ‘आप’कडे दुर्लक्ष करून काँग्रेसवर टीका सुरू केली होती. काँग्रेसनेही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत भाजपला मुद्दय़ांच्या आधारावर विरोध करण्याचे धोरण ठेवले होते. अस्मिता आणि हिंदूत्व हे दोन भाजपसाठी वातावरण फिरवणारे निवडणुकीतून बाजूला ठेवण्यात ‘आप’ आणि काँग्रेसला यश आले होते. पण, काँग्रेसमुळे ते प्रचारात आले. हे दोन्ही मुद्दे तसेच बाजूला राहिले असते तर, कदाचित गुजरातमध्ये निकालाची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळाली असती.
mahesh.sarlashkar@expressindia.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 00:55 IST

संबंधित बातम्या