– प्रेम शुक्ला (राष्ट्रीय प्रवक्ता, भारतीय जनता पक्ष)
भारताचा भाग्योदय हा पूर्वेकडून होणार आहे. अंग, बंग, कलिंग हे एकत्रितपणे भारताच्या भविष्याचे शिल्पकार असतील आणि यामुळे भारताची वाटचाल आता विकसित देश होण्याकडे सुरू झाली आहे. पूर्व भारतामध्ये एक विशिष्ट खाद्यसंस्कृती आहे जी तुम्हाला पूर्व भारतातील राज्ये, त्यांची गुण-वैशिष्ट्ये, येथील नागरिकांची स्वभाव वैशिष्ट्ये, येथील प्रादेशिक अस्मिता याबद्दल सर्वकाही सांगते.
बिहारमधील ‘लिट्टी-चोखा’ हा खाद्यपदार्थ इथल्या लोकांच्या संघर्षाचे आणि कष्टाचे प्रतीक आहे. बंगालमधील प्रसिद्ध ‘मिश्टी दोई’ हा पदार्थ संयमाचे प्रतीक आहे. ओडिशात प्रसिद्ध असलेला आणि पवित्र मानला गेलेला ‘दालमा’ हा पदार्थ जगन्नाथ मंदिरात येणार्या भाविकांचे वर्षानुवर्षे पोषण करतो. तो सामाजिक एकता आणि प्राचीन संस्कृतीचे प्रतीक आहे. हे तीनही पदार्थ म्हणजे पूर्व भारताचा आत्मा आहेत जे या प्रदेशातल्या संस्कृतीच्या मुळांशी घट्टपणे जोडलेले आहेत.
वर्ष २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाने पूर्वेकडच्या या भारतीय भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि पूर्वेनेही भारतीय जनता पक्षाला सकारात्मक प्रतिसाद दिला. पूर्वेकडील या तीन राज्यांमध्ये पक्षविस्तार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या धोरणाचा उल्लेख पूर्वेकडील ‘त्रिशक्ती’ असा केला होता. भाजपचे हे ‘अंग-बंग-कलिंग’ मिशन आता पूर्ण झाले आहे. बिहारमध्ये रालोआ भक्कमपणे सत्तेत असताना, ओडिशामध्ये मागील निवडणुकांमध्येच भाजपाने यश मिळवले. आता पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भाजपाचा भगवा नकाशा भारताच्या संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर विस्तारला आहे. पूर्व भारतातल्या राज्यांमध्ये भाजपाने जेे नेत्रदीपक यश मिळवले आहे त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये मिळवलेला विजय सर्वांत उठून दिसतो. हा एक असा ऐतिहासिक विजय होता ज्याने या राज्याचा संपूर्ण राजकीय इतिहासच बदलून टाकला.
अनेक वर्षांपासून बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करताना राजकीय हिंसाचार आणि धमक्यांना तोंड दिले आणि वेळप्रसंंगी प्राणही गमावले. या प्रतिकूल परिस्थितीतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथ आणि प्रत्येक गावात कमळ जिवंत ठेवले. ज्या भूमीवर पिढ्यानपिढ्या विचारधारांची तीव्र लढाई सुरू होती तिथे पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले आणि बंगालच्या सत्तेवर कमळ फुलले. पश्चिम बंगालमधील विजय हा एका प्रचंड मोठ्या राजकीय यशाचे प्रतीक आहे. या विजयाकडे बघताना केवळ जिंकलेल्या जागांचे आकडे बघून या विजयाचे मूल्यमापन करता येणार नाही, हा विजय समजून घ्यायचा असेल तर या यशामागे दडलेल्या असंख्य माणसांच्या संघर्षकथा, असंख्य कार्यकर्त्यांचे बलिदान आणि पूर्व भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाची आश्वासने हे सर्व काही समजून घेणे आवश्यक आहे.
महाभारतातील महान धनुर्धर कर्णाचे राज्य असलेला प्राचीन ‘अंग’ देश म्हणजेच आजचे बिहार राज्य. युती आणि आघाडीच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणजे बिहार अशी ओळख या राज्याची होती. अनेक राजकीय चढउतारानंतर विकासाचे स्वप्न आणि कायदा-सुव्यवस्था असलेले सुशासन यावर बिहारच्या जनतेने विश्वास दाखवला. डबल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेले रस्ते आणि पूल या माध्यमातून झालेला विकास आणि विरोधी पक्षांच्या घराणेशाहीच्या राजकारणाबद्दल मतदारांच्या मनात असलेला तीव्र असंतोष या दोन मुद्द्यांवर बिहारमधील ही निवडणूक लढवली गेली. बिहारच्या मतदारांनी मतपेटीतून एक थेट प्रश्न विचारला होता: तुमच्या सरकारमुळे माझे आयुष्य बदलले का? आणि बहुतांश मतदारसंघांतून त्याचे उत्तर ‘हो’ असेच आले. पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेसवेमुळे सुधारलेली दळणवळण व्यवस्था, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेल्या ‘पीएम आवास’, ‘जल जीवन मिशन’ यासारख्या केंद्र सरकारच्या योजना आणि जातीपातीच्या गणितांपेक्षा रोजगार मिळवण्यासाठी उत्सुक असलेला तरुण मतदार, या सर्वांनी मिळून रालोआची पकड मजबूत करण्यास हातभार लावला. बिहार ही ती ‘कोळशाची शेगडी’ ठरली, ज्यावर भाजपची पूर्व भारताच्या विजयाची भाकरी भाजली गेली.
जर बिहार म्हणजे धगधगती आग होती, तर ओडिशा म्हणजे संयमाची परीक्षा होती. ज्याप्रमाणे ‘दालमा’ मंद आचेवर शिजत असताना त्यातील पदार्थ एकजीव होऊन एक अप्रतिम चव निर्माण करतात, तसेच ओडिशामध्ये भाजपचे राजकीय परिवर्तन अत्यंत पद्धतशीर आणि नियोजनबद्ध होते. एकेकाळी नवीन पटनायक यांचा अभेद्य बालेकिल्ला मानले जाणारे हे राज्य अतिशय शांत आणि भक्कमपणे भाजपच्या धोरणांना साथ देत गेले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीने ओडिशामध्ये एक निर्णायक कौल दिला. सत्तेत येताच केवळ दोन वर्षांत ओडिशामधील भाजप सरकारने ‘डबल-इंजिन’ सरकारचा नेमका अर्थ काय असू शकतो हे औद्योगिक विकासामध्ये पिछाडीवर असलेल्या राज्यासाठी दाखवून देण्यास सुरुवात केली आहे.
ओडिशाची निवडणूक प्रामुख्याने आदिवासींचे कल्याण, खाणकाम रॉयल्टीचा मुद्दा आणि पुरीला जागतिक दर्जाचे वारसा व आध्यात्मिक पर्यटन स्थळ बनवण्याच्या आश्वासनावर लढली गेली. कलिंगाचा गौरवशाली वारसा, कोणार्क सूर्यमंदिराचे महात्म्य आणि ओडिया अस्मितेचा हुंकार देऊन भाजपने ओडिया अभिमानाला साद घातली. हे भावनिक आवाहन विरोधकांच्या पटनायक काळातील आठवणी जागवण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरले. ज्या प्राचीन कलिंग भूमीने भीषण रक्तपातानंतर सम्राट अशोकाचे हृदयपरिवर्तन केले होते, त्या भूमीच्या आधुनिक रूपाने परिवर्तनाला आणि विकासाच्या नव संकल्पनांना पसंती दिली. कमळाला रुजण्यासाठी आणि फुलण्यासाठी महानदीच्या खोर्यातील सुपीक माती गवसली होती.
…आणि मग वळण आले ते बंगालचे. हे ‘मिष्टी दोई’चे राज्य. वरून गोड वाटणारे, पण आतून आंबवलेले, ज्याला तयार होण्यासाठी अगदी योग्य परिस्थिती आणि वेळेची गरज असते. २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालवर मिळवलेला विजय हा जवळून पाहणार्यांसाठी अजिबात धक्कादायक नव्हता कारण तो सहज मिळवलेला विजय नव्हता. या विजयामागे तळागाळात केलेले काम आणि बांधलेली संघटना होती.
सुरुवातीला लोकभावनेचा आदर करणारे ममता बॅनर्जींचे सरकार २०२६ पर्यंत सिंडिकेट राज, निवडणुकीनंतरचा हिंसाचार, शिक्षक भरतीमधील घोटाळे आणि इतर राज्यांच्या तुलनेत खूपच मागे राहिलेली अर्थव्यवस्था या ओझ्याखाली दबले गेले होते. तरुण बंगाली मतदार या निवडणुकीत निर्णायक घटक ठरला. भाजपने जो ऐतिहासिक विजय मिळवला तो तीन प्रमुख मुद्द्यांवर आधारित होताा. पहिला- महिलांची सुरक्षा, ज्याची ठिणगी आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि खून प्रकरणाने पडली. दुसरा मुद्दा- गुंतवणूकविरोधी वातावरण संपवण्याचे आश्वासन देण्यात आले होते आणि तिसरा मुद्दा होता बंगालचा सांस्कृतिक अभिमान. हे राजकारण प्रगल्भ आणि सुनियोजित होते. ज्याप्रमाणे योग्य तापमानात रात्रभर ठेवलेले ‘मिष्टी दोई’ व्यवस्थित आंबवले जाते, तसेच बंगालचे राजकीय वळणही अखेर पूर्णत्वास आले. हा पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होणे, हे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे प्रदीर्घ काळापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्यासारखेच होते.
‘अंग-बंग-कलिंग’ या प्रदेशांत भाजपने मिळवलेला विजय ही गोष्ट केेवळ राजकारणापुरती किंवा निवडणुकांपुरती मर्यादित नाही. हा विजय भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सुमारे ३० कोटी लोकसंख्या असलेला हा भाग आतापर्यंत आपल्या विकासाच्या क्षमतेला न्याय देऊ शकलेला नाही. पूर्व भारताला देशाच्या विकासाचे नवे इंजिन बनवणे हा भाजपाचा ‘पूर्वोदय’ विचार राहिलेला आहे. या संकल्पनेला आता तिन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी राजकीय बळ मिळाले आहे. पूर्वोदयाचा विचार प्रत्यक्षात येताना तीन राज्यांमधील औद्योगिक कॉरिडॉरचा विकास अधिक वेगाने होऊ शकेल. हल्दिया, पारादीप आणि गंगा नदीतील अंतर्गत जलमार्गांना जोडणारे एकत्रित बंदर आणि लॉजिस्टिक धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारची मदत मिळेल आणि तिन्ही राज्यांत ‘रालोआ’ सरकार असल्याने, धोरणांची अंमलबजावणी अधिक सुलभ होईल, केंद्रीय निधीचा ओघ वाढेल आणि राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळेल. बंगालमधील कामगार संघटनांचा अतिआक्रमकपणा आणि बिहारमधील प्रशासकीय उणिवा यामुळे दीर्घकाळ लांब राहिलेला गुंतवणूकदार, आता अखेर पूर्व भारताकडे गुंतवणुकीचे हब म्हणून पाहू शकतो.
कोलकाता-रांची-पटना हा औद्योगिक त्रिकोण, पूर्व जलमार्ग कॉरिडॉर आणि प्रस्तावित ‘बंगाल कोस्टल इकॉनॉमिक झोन’ यांसारख्या प्रत्येक प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. विजयाचा हा उत्सव साजरा करताना, भाजपने दिलेल्या आश्वासनांचा व्याप किती मोठा आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात जे घडले आहे ते खरोखर ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच उत्तर बिहारमधील हिमालयाच्या पायथ्यापासून ते पूर्व किनारपट्टीवरील ओडिसाच्या चिल्का सरोवरापर्यंत आणि उत्तर बंगालमधील चहाच्या मळ्यांपासून ते सुंदरबनच्या खारफुटीच्या जंगलांपर्यंत- संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर एकाच राजकीय शक्तीची सत्ता आहे.
ज्या पूर्व भारताच्या संस्कृतीने भारताला भगवान बुद्ध, सम्राट अशोकाची करुणा, चैतन्य महाप्रभूंची भक्ती, टागोरांचा मानवतावाद आणि विवेकानंदांचे प्रखर तेज दिले, तो प्रदेश आता राजकीयदृष्ट्या एक झाला आहे. परंतु, ही राजकीय एकता विकासात रूपांतरित होणार का, ज्याची इथली जनता प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा करत आहे? कमळ केवळ भाजपच्या बॅनरवरच फुलणार की दरभंगाचा शेतकरी, मुर्शिदाबादचा विणकर आणि पुरीतील कोळी महिला यांच्या आयुष्यातही समृद्धी आणणार? हा तो प्रश्न आहे. ज्याचे योग्य उत्तर येणारा काळ देईल. पूर्व भारताने आपले मत दिले आहे. आता तो प्रतीक्षा करत आहे. बंगालच्या संयमी व गुंतागुंतीच्या मिष्टी दोईप्रमाणे, वेळेनुसार त्यांनाही समजेल की दिलेले आश्वासन खरे होते की होता केवळ वरवरचा गोडवा…
