– एकनाथ शिंदे
गेले काही महिने आंदोलनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणार्‍या आणि खोट्या आरोपांचे आक्रंदन करणार्‍या ‘इंडि’ आघाडीने रविवारी दिल्लीत लोकशाहीच्या रक्षणाच्या नावाखाली रॅली काढली. मला एक मूलभूत प्रश्न विचारावासा वाटतो की, ज्या काँग्रेसने १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला, त्याच काँग्रेसला आज लोकशाहीच्या रक्षणाचा एवढा पुळका का यावा? दिल्लीच्या रस्त्यारस्त्यांवर आंदोलनाच्या नावाखाली अराजक माजवणार्‍यांना लोकशाहीची भाषा शोभते का? विरोधकांना मोर्चे काढण्याचे, आंदोलने करण्याचे, सरकारवर टीका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. प्रसारमाध्यमांवर बोलताना ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवताना त्यांना कुणीही रोखत नाही. त्यांच्या नेत्यांना कुणीही जबरदस्तीने तुरुंगात डांबत नाही. तरीही लोकशाही धोक्यात असल्याचा कांगावा केला जात आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे, हे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाच आव्हान देणारे आहे. लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो. तो मान्य करण्याऐवजी देशात अस्थिरता निर्माण करण्याचे राजकारण सुरू असेल, तर त्याला ठामपणे प्रत्युत्तर दिलेच पाहिजे.

गेल्या आठवड्यातील दोन बातम्या विशेष लक्षणीय ठरल्या. देशभरात झालेल्या विधान परिषद निवडणुकांचे निकाल लागले. त्यात ‘एनडीए’ला घवघवीत यश प्राप्त झाले. काँग्रेस आणि इतर बारीक-सारीक विरोधक गेले काही महिने सतत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा आग्रह धरत आहेत. विधान परिषदेची निवडणूक बॅलेट पेपरवरच झाली आणि तरीही काँग्रेसने देशभरात फक्त एक जागा जिंकत नेहमीप्रमाणे दणदणीत पराभव पत्करला. दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी होती ती देशातील गरिबांच्या संख्येच्या संदर्भात. जागतिक बँकेने ‘पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात, भारतातील गरिबांच्या संख्येत गेल्या १५ वर्षांत प्रचंड घट झाल्याचे म्हटले आहे. २०११ साली भारतात एकूण लोकसंख्येपैकी गरिबांचे प्रमाण २७.१ टक्के होते, ते आता २.६ टक्के झाले असल्याचे हा अहवाल सांगतो. गरिबी कमी होण्याचा भारताचा हा वेग जगात सर्वाधिक असल्याचेही हा अहवाल सांगतो. स्वातंत्र्यानंतरची सहा दशके केवळ ‘गरिबी हटाव’चे नारे देणार्‍या काँग्रेसच्या कर्तृत्वशून्य कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हे यश उठून दिसते. काँग्रेसने गरिबांकडे कायम आपली ‘व्होट बँक’ म्हणूनच पाहिले. ‘गरिबी संपली तर आपणही संपून जाऊ’, अशी भीती काँग्रेसला वाटत होती. अर्धपोटी जनतेला भाकरीचे स्वप्न दाखवत झुलवत ठेवायचे हीच काँग्रेसची नीती होती, त्यात आजही बदल झालेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १३ वर्षांत भारताची प्रतिमा जगभरात उंचावली. गरिबी, राजकीय भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या कर्दमात गळ्यापर्यंत बुडालेल्या देशाला प्रगती आणि विकासाची नवी दिशा दिली. राहुल गांधी मात्र आजही रस्त्यावर येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि फॅशनेबल आंदोलने करणार्‍या, डाव्या विचारांनी आणि विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना हाताशी धरणे यातच अडकलेले आहेत. त्यामुळेच देशभरातील मतदार काँग्रेसला आजही नाकारत आहेत. आपल्या पराभवाच्या उंच शिखरांकडे न पाहता इतरांच्या पराभवाची छोटी टेकडी दाखवण्यात समाधान मानणारे, विघ्नसंतोषी आणि कोत्या मनाचे राजकीय सहकारी त्यांना महाराष्ट्रासह देशभरात लाभले आहेत.

आजवर कोणत्या विरोधी पक्षनेत्याने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेण्याचे पातक केले होते? न्याय मागण्यासाठी याचिका करा, चांगले वकील द्या, युक्तिवाद करा, पुरावे द्या आणि मुद्दे मांडा. ही सर्वमान्य न्यायालयीन प्रक्रिया असताना थेट सरन्यायाधीशांचाच राजीनामा मागण्याचा किती मोठा प्रमाद काँग्रेसने केला आहे. त्यांच्या या काळ्या कारनाम्याची इतिहासात काळा दिवस म्हणून नोंद झालेली आहे. ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचे आव्हान काँग्रेसला आणि काँग्रेसचे शेपूट धरून राजकारण करू इच्छिणार्‍यांना आजवर अनेकदा दिले गेले आहे, ते एकदाही स्वीकारले गेलेले नाही. परंतु एकच आरोप वारंवार करून तो खरा असल्याचा आभास निर्माण करण्याची गोबेल्स नीती काँग्रेसने स्वीकारलेली आहे.

हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा किंवा केरळसारख्या राज्यांत जेव्हा काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांचा विजय होतो, तेव्हा त्यांना ईव्हीएमवर कोणताही आक्षेप नसतो; तिथे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ वाटते आणि जनतेचा कौलही डोक्यावर घेतला जातो. परंतु, जिथे भाजप व महायुती जिंकते, तिथे ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचे रडगाणे सुरू होते. जिंकलो तर जनतेचा पाठिंबा आणि हरलो तर ईव्हीएम हॅक-विरोधकांचे हे दुटप्पी वागणे आता जनतेला समजले आहे. आता ‘व्होटचोरी’चा अत्यंत खोटा मुद्दा त्यांनी पुढे आणला आहे. एवढी वर्षे नोटचोरी करून या देशाला भ्रष्टाचाराच्या दरीत लोटणार्‍या काँग्रेसला व्होटचोरीवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? स्वत:च्या अपयशाचे खापर वारंवार यंत्रांवर फोडणे हा मतदारांच्या निर्णयाचा आणि त्यांच्या विवेकाचा अपमान आहे.

विकासप्रकल्पांना विरोध आणि समाजात दुफळी निर्माण करू पाहणार्‍या शक्तींच्या पाठीशी ताकद उभी करणे यातच विरोधकांनी धन्यता मानली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत एका हातात धरायची आणि दुसर्‍या हाताने त्याच वैधानिक व्यवस्थेला चूड लावण्याची कारस्थाने करायची, असा ‘इंडि’ आघाडीचा दुटप्पी व्यवहार आहे. ‘रेजिम चेंज’चा खरा अर्थ सत्ता बदल असा होत नाही; ‘रेजिम चेंज’चा अर्थ लोकशाही व्यवस्था उलथवून लावणे असा होतो. राहुल गांधी आणि ‘आंदोलनजीवी’ नेत्यांची खरी मानसिकता यातूनच लक्षात येते. डॉ. आंबेडकरांनी दिलेली प्रगल्भ लोकशाही, विचारस्वातंत्र्याचा आणि कृतीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी उदार राजकीय व्यवस्थाच यांच्या डोळ्यात खुपते आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे वय ८४ वर्षे आहे. ज्या वयात त्यांनी पुढील पिढ्यांवर संस्कार करायचे, त्या वयात ते स्वत:च पंतप्रधानांचा बाप काढत असतील तर काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा व्यर्थ आहे. हा दोष ते ज्या संस्कृतीतून आले त्या काँग्रेस संस्कृतीचा आहे. आपल्या घराण्यापेक्षा कोणी मोठे होता कामा नये, अशी यांची शिकवण आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मात्र आपल्या प्रतिमाभंजनावर मात करून लोककल्याणाच्या योजना राबवल्या. पायाभूत सुविधा, महामार्ग, मेट्रो आणि नवउद्योजकांचे जाळे निर्माण करत देशाच्या औद्योगिक भरभराटीचा मार्ग प्रशस्त केला. लष्करी सिद्धतेपासून ‘वंदे भारत’पर्यंत, ‘आयुष्मान भारत’पासून ‘शेतकरी सन्मान’पर्यंत सर्वत्र भारताची सातत्यपूर्ण प्रगती सुरू आहे. यूपीआयमुळे तत्काळ पैसे पाठवणे आणि स्वीकारणे सुलभ झाले. देशाची एकूण स्थापित वीजनिर्मिती क्षमता ४७६ गिगावॉटपर्यंत वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे २०१४ मधील ९१,२८७ किलोमीटरवरून २०२५-२६ मध्ये सुमारे १,४६,५७२ किलोमीटरपर्यंत वाढले. चांद्रयान-३ ने चंद्रावर यशस्वी अवतरण केले. त्यामुळे भारत चंद्रावर जाणारा चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिणेकडील उच्च अक्षांशांमध्ये उतरणारा पहिला देश ठरला. जानेवारी २०२५ रोजी ‘स्पेडेक्स’ मोहिमेत दोन उपग्रहांची अंतराळात यशस्वी जोडणी झाली. हे तंत्रज्ञान साधणारा भारत जगातील चौथा देश ठरला. यातून अवतरण, स्वयंचलित नियंत्रण आणि वैज्ञानिक प्रयोगांची देशाची क्षमता दिसून आली.

मोदी यांच्या धोरणांमुळे गेल्या १३ वर्षांत देशभरातील शेतकर्‍यांना एकूण ५० लाख कोटी रुपयांची प्रत्यक्ष मदत दिली गेली आहे. देशातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना किसान सन्मान निधी म्हणून चार लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले; तर हमीभावाच्या माध्यमातून २४ लाख कोटी रुपये देण्यात आले. संपूर्ण जग आखाती प्रदेशातील तणावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा सामना करत असताना खते आणि गॅसच्या तुटवड्याबाबत अफवा पसरवल्या जात होत्या. विरोधकांना मोदीजींची बदनामी करायची होती. मोदीजींनी आखाती प्रदेशातील तणाव असूनही शेतकर्‍यांवर त्याचा भार पडू दिला नाही; खतांच्या किमती मर्यादेत ठेवल्या. युक्रेन युद्धाच्या बाबतीत भारताची मध्यस्थी चालेल, असे रशिया म्हणत आहे. सतत नडणार्‍या पाकिस्तानची तर भारताने पार नांगी ठेचून काढलेली आहे. इतर शेजार्‍यांशी सौहार्दाचे संबंध कायम राखण्यावर भर दिला जात आहे.

भारत जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. भारताचा वाढता जागतिक प्रभाव स्पष्ट आहे. त्यामुळेच देश सर्वसमावेशक समृद्धीकडे वाटचाल करणारा देश झाला आहे. हे वास्तव ज्यांना पटत नाही ते आकांडतांडव करतात. त्यांच्या जोडीला काही परदेशी शक्तीही आहेत. त्यांना भारताचे हे महत्त्व खुपते आहे. देशात अराजक माजवण्याची त्यांची मनीषा कधीही पूर्ण होणार नाही. मोदीजींचे नेतृत्व आता केवळ एका राजकीय पक्षाचे वा सरकारचे नेतृत्व राहिलेले नाही, तर ते कोट्यवधी भारतीयांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक ठरले आहे. ‘सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माण’ या त्रिसूत्रीवर देश वाटचाल करत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मोदींच्या प्रशासकीय धोरणांचा गाभा आहे.

अपशब्द, अपप्रचार, आंदोलने आणि अपमान या शस्त्रांचा जेवढा अधिक वापर विरोधक करतील, तेवढा मोदीजींच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक दृढ होत जाईल. ‘मोदी है तो मुमकीन है’ ऐवजी यापुढे ‘मोदीजी है, इसीलिए मुमकीन है’ असे म्हणावे लागेल, हे त्यांच्या विरोधकांनाही ठाऊक आहे. राहुल गांधींसारखे भरकटलेले, अपरिपक्व विरोधक एक प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वाला अधिक भक्कम, खंबीर आणि सक्षम करत राहतील यात शंका नाही. मोदीजी आणि देशातील १४५ कोटी जनता यांच्यात कोणीही येऊ शकणार नाही. देशविरोधी, राष्ट्रद्रोही शक्तींनी कितीही आदळआपट केली, तरी विकसित, बलशाली भारताचे स्वप्न मोदींच्या नेतृत्वात पूर्ण होणारच, याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.