रविंद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजप महाराष्ट्र)
भाजपला स्थापनेपासूनच शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून हिणवले गेले, मात्र तो राज्यात जाती-पातीचे राजकारण करणार्या काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या नॅरेटिव्हचाच भाग होता. अति उजवा पक्ष म्हणूनही संबोधले गेले, पण आपल्या देशाविषयी पराकोटीचा जाज्वल्य अभिमान हा जर अवगुण असेल तर त्या अवगुणात कायमस्वरूपी राहण्यास आम्ही तयार आहोत. कारण राष्ट्र प्रथम हाच आमच्या पक्ष तत्त्वज्ञानाचा गाभा आहे…
विचारधारेच्या घट्ट मुळांनी मातीत खोलवर रुजलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला भारतीय जनता पक्षाचा वटवृक्ष आज ४७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. ६ एप्रिल १९८० रोजी पेरलेले हे बीज आज जवळपास २५ कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या घामातून देशभर विस्तारले आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, भाजयुमोचा उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, कॅबिनेट मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने जेव्हा मी पक्षाच्या इतिहासाकडे पाहतो, तेव्हा मला जाणवते की जसे विचारधारेने एक-एक कार्यकर्ते घडवले आणि त्याचप्रमाणे असंख्य ध्येयवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या रक्ता-घामाने गुरुदक्षिणा म्हणून पक्षाला घडवले. नाही तर नेहरू-गांधींची अल्पसंख्याककेंद्रित समाजवादी पद्धती, साम्यवादी चळवळ यांचा आंतरराष्ट्रीय बोलबाला असताना ७५ वर्षांपूर्वी जनसंघाच्या माध्यमातून बहुसंख्य पण पिचलेल्या शोषित समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याची आणि तरीही प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जिद्द परमश्रध्येय श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलजी यांनी दाखवली, हे फार दूरदर्शी होते. म्हणूनच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी विचारधारेचे आणि पक्षाचे संस्थापक दीपस्तंभासारखे दिशादर्शक आहेत.
वैचारिक पाया आणि नेतृत्वाची परंपरा लाभलेल्या भाजपच्या या प्रवासात अनेक ऋषितुल्य नेत्यांचे योगदान आहे. महाराष्ट्र भाजपचाच विचार करायचा झाला तर १९८० मध्ये उत्तमराव पाटील यांनी पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचा पाया रचला. खानदेशच्या या सुपुत्राने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर गोपीनाथराव मुंडे यांनी पक्षाला खर्या अर्थाने ‘गावकुसाबाहेर’ नेले. बहुजन आणि ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज केले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण या मुद्द्यावर त्यांनी अक्षरश: महाराष्ट्र पेटवला आणि १९९५ मध्ये काँग्रेसची राजवट उलथून टाकली. प्रा. ना. स. फरांदे यांच्यासारख्या नेत्याने पक्षाला वैचारिक अधिष्ठान दिले, तर सूर्यभान वहाडणे पाटील यांनी अत्यंत संयमी आणि शिस्तबद्ध नेतृत्वाने संघटनेला बळकटी दिली.
विदर्भाच्या मातीतील भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपला वावरातल्या बांधावर नेले. शेतकर्यांसाठी आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला. नितीन गडकरी यांनी प्रमोद महाजन यांच्या आकस्मिक निधनानंतर भाजप कार्यकर्त्यांना आधाराचा हात दिला आणि कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवली. सुधीर मुनगंटीवार यांनी जनसंपर्काचा नवा अध्याय सुरू केला. २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्षाने मोठी झेप घेतली आणि प्रदेशाध्यक्षपदावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा अनोखा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. पुढे रावसाहेब दानवे, चंद्रकांतदादा पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे या अनुभवी नेत्यांनी पक्ष आणि सरकारमध्ये उत्तम समन्वय राखून भाजपला तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले.
ज्या भारतीय जनता पक्षाला, शेटजी-भटजींचा पक्ष असे पक्ष स्थापनेपासून हिणवले जात होते, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेऊन राज्यात जाती-पातीचे राजकारण करणार्या काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या नॅरेटिव्हचाच हा एक भाग होता. त्याच भाजपने ४६ वर्षांत महाराष्ट्रामध्ये तब्बल ११ प्रदेशाध्यक्ष बहुजन समाजातून दिले हे जातीचे राजकारण करणार्या सर्वच राजकीय पक्षांना दिलेले खणखणीत उत्तर आहे.
आज एक कार्यकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना मला अभिमान वाटतो की, सामान्य कार्यकर्ता ते थेट प्रदेशाध्यक्ष ही झेप केवळ भाजपमध्येच शक्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळवलेले यश हे भाजपसाठी केवळ आकड्यांचा खेळ नसून, ती जनतेच्या मनातील आमच्या पक्षाविषयीची विश्वासार्हता आहे.
भारतीय जनता पक्षाची संघटना केवळ बॅनर आणि सभांपुरती कधीच मर्यादित नव्हती. विचारधारेशी एकनिष्ठ कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आहे. त्यामुळेच भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत नेऊ शकलो. आम्हाला अनेकदा अति उजवे (हायपर नॅशनॅलिस्ट) असे संबोधण्यात येते.
आपल्या देशाविषयी पराकोटीचा जाज्वल्य अभिमान हा जर अवगुण असेल तर त्या अवगुणात कायमस्वरूपी राहण्यास आम्ही तयार आहोत. कारण राष्ट्र प्रथम हाच आमच्या पक्ष तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. असे असले तरी आजूबाजूला होणारे नैसर्गिक, राजकीय, भौगोलिक, तंत्रज्ञानातील बदल स्वीकारून आमचा पक्ष मार्गक्रमण करत आलेला आहे. त्यामुळेच आम्ही भाजपला एक ‘तंत्रस्नेही’ संघटना बनवत आहोत. प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्याशी सदैव (रिअल-टाइम) संपर्कात राहता येणे आम्हाला पक्ष म्हणून शक्य असते. कारण हा भाजपचा संघटन कारभाराचा भाग आहे.
ज्याप्रमाणे विकासाचा वेग म्हणजे रस्ते, तसेच अन्य दळणवळणाची, संपर्काची साधने (कनेक्टिव्हिटी) जास्तीत जास्त असणे महत्त्वाचे, त्याच अनुषंगाने कार्यकर्त्याने जनतेशी आणि पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांशी सदैव संपर्कात राहणे हा आमच्या पक्षशिस्तीचा भाग आहे. केंद्रातील मोदीजींचे सरकार आणि राज्यातील देवाभाऊंचे सरकार यांच्या योजना, सरकार करत असलेली विकासकामे जनतेपर्यंत सातत्याने पोहोचवणे गरजेचे आहे, भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या प्रवासात महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलरचा वाटा सुनिश्चित करण्यावर शासनाचा भर आहे.
या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षमपणे काम करेल याची मला खात्री आहे. त्याचबरोबर गावपातळीवर निर्माण होणार्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणे हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे काम आहे. कारण हाच तर खरा ‘अंत्योदय’ तत्त्वाचा विचार आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे ते कर्तव्य आहे. कारण आमचा कार्यकर्ता निष्ठेने काम करेल तेव्हा विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. विकसित महाराष्ट्राशिवाय हे शक्य नाही हेही तितकेच खरे.
