शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं मोदींनी म्हटल्यापासून मोदी-पवारांच्या भेटीची दिल्लीत चर्चा होत असते. पवार ‘एनडीए’त जात नाहीत आणि मोदी पवारांचं बोट सोडायला तयार नाहीत. परवादेखील शरद पवार मोदींच्या संसदेतील दालनात भेटायला गेले तर मोदींनी पवारांचा हात धरून आपलेपणाने त्यांचं स्वागत केलं. या दोन दिग्गजांची अधूनमधून भेट होत असते. कधी स्वत: पवार आपल्या आमदार-खासदारांचे प्रश्न घेऊन मोदींना भेटतात. कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे खासदारांचे प्रश्न घेऊन भेटतात. कोणी भेटलं तरी हा पक्ष कधी ‘एनडीए’मध्ये सामील होतोय, अशी चर्चा होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही मोदींना भेटले. इतर मुद्द्यांवर चर्चा झालीच असेल पण, सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या लग्नाचा स्वागत समारंभ दिल्लीत होणार होता, त्याची रीतसर निमंत्रण पत्रिका दोघांनी मिळून मोदींना दिली होती. त्यानंतर या समारंभाला मोदी उपस्थितही राहिले होते. पण, ज्या दिवशी हा समारंभ झाला त्याच दिवशी सकाळी सुप्रिया सुळे आणि पक्षाचे इतर सात खासदारही मोदींना भेटले. त्यांची अर्धा तास भेट झाली. प्रत्येक खासदाराने आपापल्या मतदारसंघातील प्रश्न, समस्या मांडल्या. त्यांच्या मागण्यांबाबत मोदींनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं या खासदारांनी मोदींच्या दालनातून बाहेर आल्यावर सांगितलं. या खासदारांच्या भेटीमुळे तीन मुद्द्यांभोवती चर्चा रंगली. लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकाला पवारांच्या पक्षाने पाठिंबा दिला असावा आणि ते मोदींना कळवलं असावं. पण, अशा मुद्द्यांची चर्चा मोदींच्या दालनात करण्याची गरज नसते आणि मोदींना अशा चर्चेची गरज असेल तर ते थेट शरद पवारांशी आणि सुप्रिया सुळेंशी बोलू शकतात. त्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ बोलावण्याची मोदींना गरज नाही! दुसरी चर्चा होती, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची. या पक्षाच्या खासदारांचं म्हणणं आहे की, हा पवार कुटुंबातील प्रश्न आहे. त्यांना वाटलं तर पक्ष एकत्र येतील, नाही तर वेगळे राहतील. आम्ही सगळे शरद पवारांबरोबर आहोत, ते सांगतील ते आम्ही करू. पवारांना आम्ही दगा देणार नाही. शिवाय, आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊ. आम्ही एकमेकांशी चर्चा करत असतो. एकमेकांना सगळं सांगतो. आम्ही काहीही लपवून ठेवलेलं नाही… हे खासदारांचं म्हणणं खरं असेल तर विलीनीकरण होणार की नाही हे शरद पवारच ठरवतील. त्यांच्याकडून तरी थेट, ‘हा विषयच नाही’, असं सांगण्यात आलेलं आहे. मग, राहिला तिसरा मुद्दा… मग हे खासदार मोदींना भेटतात कशाला? हा पक्ष ‘एनडीए’मध्ये सामील होणार आहे का? खरंतर दोन वेगवेगळे राष्ट्रवादी काँग्रेस एकाच वेळी ‘एनडीए’मध्ये सामावून घ्यायला भाजपच्या नेतृत्वाचा विरोध आहे, असं सांगितलं जातंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यायचं की नाही हे त्यांनी ठरवावं. ते एकत्र आले तर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस ‘एनडीए’मध्ये सामील होऊ शकतो, या स्वरूपाला भाजपचा विरोध असण्याचं काहीही कारण नाही. पण, विलीनीकरण अजून झालेलं नाही. विलीनीकरण होत नाही आणि सत्तेत जाता येत नसेल तर विरोधी बाकांवर बसलेले खासदार अस्वस्थ होऊ शकतात. त्यांनाही मतदारसंघ सांभाळायचा आहे. विरोधी खासदारांकडं ना केंद्र वा राज्य सरकार लक्ष देतं. मतदारसंघातील विकास कामं अडतात, निधी मिळत नाही, तातडीची कामं होत नाहीत. मतदार दारात आले तर खासदार त्यांना काय सांगणार, हा प्रश्न आहे. मतदारांची नाराजी वाढत गेली तर पुढच्या निवडणुकीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही ही या खासदारांची खरी खंत आहे. त्यातून कुठल्या पक्षाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आपण सत्ताधारी का नाही, हा प्रश्न आणखी सतावू लागतो. त्यावर पर्याय एकच असतो, या सगळ्या खासदारांचं वेळोवेळी शंका समाधान करत राहणं, त्यांची अस्वस्थता कमी करणं, त्यांना एकत्र ठेवण्यासाठी थेट मोदींची भेट घालून देणं… शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रीय स्तरावरील ‘गुडविल’ खूप आहे. हे दोघे जेव्हा हवं तेव्हा मोदींना किंवा शहांना भेटू शकतात. खरंतर मोदी सरकारमधील कुठल्याही मंत्र्यांना भेटून आपल्या खासदारांच्या मतदारसंघातील कामांचा निपटारा करू शकतात. एखाद्या कामासाठी थेट मोदी-शहांकडं जाऊ शकतात. या वेळच्या भेटीतही हेच घडलं आहे. त्यातून दुसर्या पक्षांना इशाराही दिला जातो की, आमच्या खासदारांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका… या वेळच्या मोदीभेटीमध्ये ‘इशारो-इशारो’ में अनेक पक्षी मारले गेल्याचं सांगितलं जातंय.
‘जेन-झीं’वरून भाजपमध्ये चर्वितचर्वण
जेन-झींचं करायचं काय हा प्रश्न भाजपला सतावू लागला आहे हे भाजप नेत्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. अशाच एका चर्चेमध्ये जेन-झींचं म्हणणं आम्हाला ऐकून घ्यावं लागेल अशी कबुली भाजपच्या एका नेत्यानं दिली. हा नेता मोदींच्या विश्वासातील असल्यानं भाजपमध्ये जेन-झींवरून चर्वितचर्वण सुरू झालेलं आहे याची खात्री पटली. भाजपची अडचण अशी आहे की, जेन-झी मोदी सरकारच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यांना कितीही टोमणे मारा, टीका करा, त्यांच्याशी संवाद साधा, नाही तर उपदेश द्या, ते काही भाजपच्या हाताला लागताना दिसत नाहीत. मोदींच्या इन्स्टाचा काही उपयोग झालेला नाही. ही परिस्थिती बदलली नाही तर काँग्रेस जेन-झींवर कब्जा मिळवेल अशी भाजपला भीती वाटू लागली आहे. भाजपचे नवे अध्यक्ष नितीन नवीन इन्स्टाग्रामवर आता अधिक सक्रिय झालेले आहेत. आणखी एखाद-दोन नेत्यांना इन्स्टाचं महत्त्व आधीच कळलं होतं. पण, इतर भाजप नेत्यांना इन्स्टावर रीळं बनवावी लागणार आहेत. हा झाला वरवरचा भाग. त्यातून काही जेन-झी भाजपकडं वळणार नाहीत. आत्तापर्यंत २०-२२ वर्षांचे तरुण ‘अभाविप’च्या माध्यमातून भाजपशी जोडले जात होते. व्हॉट्सॲप वगैरे माध्यमातून भाजपचा आयटी विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचत होता, त्यातून ‘व्हॉट्सॲप’ विद्यापीठं निघाली आणि दामटून माहिती पोहोचवली गेली. पण आता हे अस्त्र कुचकामी झालेलं आहे. जेन-झी पोरं काय सांगू पाहताहेत याचा अभ्यास सध्या भाजपमध्ये केला जात आहे. जेन-झींना पोरं सज्ञान होतील तेव्हाच त्यांना अभाविप किंवा भाजपच्या युवा मोर्चामध्ये घेतलं जाऊ शकतं. पण तोपर्यंत ती लांब गेली तर संभाव्य मतदारच निघून जातील ही भाजपची दुसरी भीती आहे. या मुलांना संघटनेत आणता आलं नाही तरी त्यांच्यापर्यंत कसंही करून पोहोचा, असा विचार आहे. हा मार्ग काय असेल यावर भाजपमध्ये चर्चा केली जात आहे. ही मुलं काँग्रेसकडं जाणार नाही याची दक्षता घेणं हा भाजपच्या रणनीतीचा मुख्य भाग आहे. हे कसं करायचं त्यावर सखोल विचार होत आहे. मग, प्रत्यक्ष अंमलबजावणी ठरेल. या जेन-झींनी फक्त मोदींचं राज्य पाहिलं आहे. इतर पक्षांच्या नेत्यांचं राज्य कसं वाईट होतं त्यांच्या हे गळी उतरवावं लागेल. मग, पुन्हा नेहरू-इंदिरा गांधी-मनमोहन सिंग आलेच. हिंदू-मुस्लीम आलेच. उत्तर प्रदेश वगैरे राज्यातील हिंसाचार वगैरे आलाच. हेच गुर्हाळ भाजपनं जेन-झींबाबतही चालू ठेवलं तर जेन-झी भाजपला मिळणार कसे? पण, भाजपमध्ये जेन-झींना आपल्या कळपात ओढण्यासाठी जोरदार विचारमंथन सुरूआहे हे नक्की!
‘सर्वपक्षीय बैठकी’त न झालेलं हस्तांदोलन
अलीकडं संसदेच्या आधी होणार्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये फार काही होत नाही, या बैठकीला फारसा काही अर्थ उरलेला नाही. पण, कधी कधी अशा खेळीमेळीत ‘सर्वपक्षीय’ बैठका भरतात की संसदेमध्ये असं सौहार्दाचं वातावरण का नसतं असं विचारावंसं वाटतं. अशीच एक ‘सर्वपक्षीय’ बैठक गेल्या आठवड्यामध्ये ‘सहा जनपथ’वर भरलेली होती. त्यामध्ये कधी नव्हे ते पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झालेले होते! त्यांच्या आदरातिथ्याला अख्खा पक्षच उभा होता. या बैठकीत बर्याच जणांनी हास्यविनोद केले, हस्तांदोलन केलं. गप्पा मारल्या, गॉसिप केलं. पण, एक हस्तांदोलन मात्र राहून गेलं. हेच ते ठिकाण होतं, जेव्हा पूर्वीच्या एका हस्तांदोलनाची चर्चा झाली होती. त्या हस्तांदोलनाचं छायाचित्रं कोणी काढणार नाही आणि ते प्रसिद्ध होणार नाही याची अचूक दक्षता घेतली गेली होती. अशी चतुराई दाखवावीच लागते. निमित्त होतं शरद पवारांच्या वाढदिवसाचं. त्या वेळी अजित पवारही होते, त्यांच्या उपस्थितीने तर कार्यक्रम गाजला होता आणि दोन पक्षांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झालं होतं. तेव्हा त्या सोहळ्याला पहिल्यांदा आले ते मोठे उद्योजक- घनिष्ठ मित्र गौतम अदानी. त्यानंतर आले राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा. त्या वेळीही कार्यक्रमामध्ये गप्पा रंगल्या. राहुल-प्रियंका दोघेही शरद पवारांशी बोलत असल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झालं होतं. या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी आणि गौतम अदानी यांचं हस्तांदोलन झालं होतं. राहुल गांधी अदानींवर किती टीका करतात हे सगळ्यांना माहीत आहे. तरीही शिष्टाचाराचा भाग म्हणून दोघांनी हस्तांदोलन केलं असेलही. पण, चर्चा तर होणारच! तशी झालीही… या वेळीही ‘सहा जनपथ’वरील कार्यक्रमाच्या वेळी हे दोघे एकाच वेळी उपस्थित होते. राहुल, प्रियंका, त्यांची दोन मुलं, सोनिया गांधी असं सगळं गांधी कुटुंब होतं. त्याच वेळी गौतम अदानीही होते. या वेळी मात्र राहुल-अदानी हस्तांदोलन झालं नाही. तसं होणारच नव्हतं म्हणा. मोठ्या मंडपात ढीगभर पत्रकार कॅमेरे घेऊन उभे होते. अदानी वधु-वरांना भेटले. तेव्हा गांधी कुटुंब बाजूला एका टेबलावर गप्पा मारत बसले होते. तिथं खरगे वगैरे काँग्रेसचे नेते होते. ‘राष्ट्रवादी’चे जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी नेते होते. अदानी निघून गेले तरी गांधी कुटुंब बसून होतं. नंतर पंतप्रधानांच्या स्वागताचीही वेळ झाली, त्यामुळं ते उठले असावेत. ते मंडपातून बाहेर पडले आणि आवारातच त्यांना मोदी भेटले. संसदेत नाही पण ‘सहा जनपथ’वर एकमेकांची भेट झाली आणि संवादही झाला! पवार राजकारणातील दुवा कसा ठरतात हे पुन्हा दिसलं. असो. गांधी कुटुंब येऊन गेलं, अदानीही निघून गेले, मोदी वीस मिनिटं थांबून गेले. मग, कार्यक्रमात संगीत सुरू झालं आणि मैफल थोडी सैलावली. गटागटानं गप्पा सुरू झाल्या, त्या होत्या सर्वपक्षीय. सत्ताधारी-विरोधक हास्यविनोद रंगले. कार्यक्रम संपला. दुसर्या दिवशी हेच नेते संसदेच्या मकरद्वारासमोर एकमेकांना भिडले, हमरातुमरीवर येऊन. मग, सुरक्षारक्षकांना मध्ये पडून त्यांची भांडणं सोडवावी लागली होती. असो.
