‘विचारधारेशी एकनिष्ठता हीच भाजपची ताकद!’ हा ‘पहिली बाजू’मधील रविंद्र चव्हाण यांचा लेख (७ एप्रिल) वाचला. अलीकडच्या काळातील विशेषत: महाराष्ट्रातील भाजपच्या वाटचालीनंतर हे म्हणणे हे ‘अजब’ म्हणावे असे धाडस आहे. केवळ – ‘पक्षशिस्तीसाठी काहीही’ – या एकाच गोष्टीने याचे समर्थन होऊ शकेल. ‘विचारधारेशी एकनिष्ठता’ सध्याच्या भाजपमध्ये कितपत आहे, याची फक्त दोन उदाहरणे :

१. ‘न खाउंगा न खाने दुंगा…’ – हे भाजपच्या विचारधारेचे मुख्य सूत्र. भोपाळच्या एका जाहीर सभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर (नाव न घेता ) केलेला ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप. आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांत अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या गटाने थेट राजभवनात मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी दाखल होऊन सत्ताधारी युतीत केलेला प्रवेश. त्यात खुद्द अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणे आणि अगदी अलीकडे, अजितदादांनी स्वत: या गोष्टीचा केलेला उल्लेख; – की बघा, – ‘माझ्यावर घोटाळ्याचे आरोप झाले, आणि मी आज त्यांच्यासह सत्तेत आहे’ (!) (यामध्ये, खुद्द पंतप्रधानांच्या विधानाची खिल्ली उडवली गेली, याकडे कोणीही फारसे लक्ष दिले नाही.)

२. ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ – या विषयावर अक्षरश: महाराष्ट्र पेटवला – अशा शब्दात गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख केला आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या सरकारी योजनेतील सदनिका, चक्क खोटी कागदपत्रे सादर करून मिळवण्याचे आरोप ज्यांच्यावर कोर्टात सिद्ध झालेत, ते कोकाटे. त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किती आटापिटा करावा लागला? संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; आणि नंतर मुंडे यांना मंत्रीपद सोडण्यास भाग पाडताना मुख्यमंत्र्यांना किती आटोकाट प्रयत्न करावे लागले?

भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरणाला विरोध हे दोन भाजपच्या विचारधारेचे प्रमुख घटक मानले, तर राष्ट्रवादीच्या एका गटाला युतीत सामावून घेताना या मुद्द्यांशी केवढी तडजोड करावी लागली आहे, ते महाराष्ट्रातील सामान्य लोकांना, विशेषत: भाजपच्या पारंपरिक मतदाराला खटकत असेल, असे रविंद्र चव्हाण यांना वाटत नाही का? या सर्वांवर कळस म्हणजे, अजूनही – ‘विचारधारेशी एकनिष्ठता हीच भाजपची ताकद !’ – असे खुशाल ठोकून देणे?!

‘पक्षशिस्तीसाठी काहीही’ – हे ब्रीद क्षणभर बाजूला ठेवून, रविंद्र चव्हाण यांनी थोडे प्रामाणिक आत्मचिंतन केले असते तर बरे झाले असते. भाजपने आपल्या विचारधारेशी खरेच एकनिष्ठ राहावे, अशीच भाजपच्या मतदारांची इच्छा आहे.

श्रीकांत पटवर्धन, कांदिवली, मुंबई

कुठली विचारधारा? कशाशी एकनिष्ठता?

‘विचारधारेशी एकनिष्ठता हीच भाजपची ताकद!’ हा रविंद्र चव्हाण यांचा लोणीयुक्त लेख वाचून भडभडून आले. देशाविषयी ‘जाज्वल्य अभिमानाचे’ सतत इव्हेंटीकरण आणि ‘राष्ट्र प्रथम’ म्हणत भ्रष्ट नेत्यांना धुलाई यंत्रात (वॉशिंग मशीन) स्वच्छ करून स्वपक्षीय एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून, महत्त्वाची पदे देणे आणि त्यांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीला पक्ष्याची ताकद म्हणून वापरणे ही भाजपची गेल्या ४७ वर्षांत विकसित केलेली खरी ताकद आहे. सामान्य लोकांचा कराचा पैसा लुटून अडीच हजार करोड रुपयाची ओवाळणी अपात्र बहिणींना दान देताना कोणत्या विचारधारेला भाजपने कवटाळले होते हे त्यांनी लिहिले असते तर सामान्य जनतेला सत्पात्री दानाचे पुण्य मिळाले असते. लेखकाने लिहिलेल्या ‘नेहरू-गांधींची अल्पसंख्यांककेंद्री समाजवादी पद्धती’ आणि ‘परमश्रद्धेय श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलजी’ या सगळ्याचा खरा इतिहास चव्हाण यांनी सखोल अभ्यासण्याची गरज आहे. शिक्षण, विज्ञानापेक्षा भोंदू धर्मवाद, नेत्यांनीच न अभ्यासलेले धर्मग्रंथ, देशाच्या भल्याशी कोणतेही औचित्य नसलेल्या कुंभमेळा, यज्ञ-याग, महाआरत्या यांची जाहिरातबाजी हा देशाविषयी जाज्वल्य अभिमान नसून निरागस जनतेच्या भावनेशी आणि मतांशी केलेला घात आहे. देश काँग्रेसमुक्त करण्याच्या ‘विचारधारेच्या एकनिष्ठतेची’ परिणती २०१४ पासून काँग्रेसयुक्त भाजपत विकसित झाली आहे.

सुधीर गोडबोले, दादर, मुंबई

भाजप खुर्द आणि भाजप बुद्रूक

‘विचारधारेशी एकनिष्ठता हीच भाजपची ताकद!’ हा लेख वाचला. संघाच्या विचारधारेतून आलेले कार्यकर्ते ही भाजपची ताकद आहे हे उघड वास्तव आहे; परंतु सत्ताधारी भाजपची सध्याची अवस्था ही निष्ठावंतांची भाजप खुर्द आणि केवळ निवडणूक येनकेनप्रकारेण जिंकण्याची क्षमता याच एकमेव निकषावर पक्षप्रवेश करणार्‍यांची भाजप बुद्रूक अशी झालेली आहे.

खुर्दमधील नेते, कार्यकर्ते मोक्याच्या क्षणी कायम डावलले जातात. तर तीन पिढ्यांपासून काँग्रेसी असणारे माजी मंत्री, केवळ एका जिल्ह्यातील वर्चस्व वाचवण्यासाठी पक्षप्रवेश करणारे माजी मुख्यमंत्री, सर्व पक्ष फिरून आलेले माजी मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्यांनी आरोप केलेले, कथितरीत्या ट्रकभर पुरावे असणारे अनेक नेते भाजपवासी भाजपवासी होताच केंद्रीय यंत्रणांची आरोपपत्रे बंद केली जातात. नंतर हेच नेते थेट सत्तेत जाऊन शांत झोपेचा आनंद घेतात.

पक्षशिस्त केवळ तळागाळातील कार्यकर्त्याने पाळावी आणि नेते मंडळींनी विचारधारेला तिलांजली देऊन सत्तालालसेने कोणालाही प्रवेश द्यायचा हे चित्र थांबले नाही तर पक्ष इतिहासजमा होईल!

ॲड. किशोर रमेश सामंत, भाईंदर, ठाणे</p>

शांत तेवत्या समईला एलईडी दिवा

रविंद्र चव्हाण यांचा भाजपच्या कामगिरीचा आढावा घेणारा लेख म्हणजे तुतारी फुंकण्याचा प्रयत्न आहे. भाजपकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आणि संघ ही ताकद आहेच. पण हे सगळे कार्यकर्ते त्यांच्या मते जी भारतीय संस्कृती आहे त्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. खरोखरच्या भारतीय संस्कृतीमध्ये जसा चार्वाक आहे तशीच खजुराहोची मंदिरेही आहेत. लवचीकता आणि आपापल्या विचारानुसार आचरणाचे स्वातंत्र्य हे खरे भारतीय रूप. पण ते भाजप पुरस्कृत संस्कृतीच्या व्याख्येत बसत नाही. ते त्यांच्या विचारात जे बसत नाहीत त्यांच्यावर तुटून पडणे म्हणजेच एकनिष्ठता असे चव्हाण यांना अभिप्रेत असावे. या तथाकथित विचारसरणीशी तथाकथितपणे एकनिष्ठ असल्याचा दावा करताना आपण कोणतीही जबाबदारी न स्वीकारता राष्ट्रातील वातावरण बिघडवत न्यायचे, मग या आत्ताच्या संविधानप्रणीत भारताचे काहीही झाले तरी चालेल असेच वर्तन सर्व तथाकथित सांस्कृतिक स्वयंसेवकांचे दिसून येते. दुसरी जी कोणती व्यवस्था अभिप्रेत आहे ती कशी असेल, कोणत्या स्वरूपाची असेल याविषयी मुद्दाम ठेवलेली अस्पष्टताच सगळे सांगून जाते. मंद, स्थिर आणि शांतपणे तेवणार्‍या भारतीय संस्कृतीच्या समईला या तथाकथित विचारसरणीच्या तथाकथित एकनिष्ठ लोकांनी बटबटीत आणि भगभगीत एलईडी दिवा लावलेला आहे, हेच आजचे वास्तव आहे.

विक्रम अवसरीकर

सर्वात मोठी शोकांतिका

विध्वंसातील ‘विकास’ ! हे संपादकीय (७ एप्रिल) वाचले. ‘यस्य मूलं विषं तस्य शाखा फलं किम् शुभम् ?’ म्हणजे ज्याचे मूळच विषारी, त्याची फळे गोड कशी असतील? जेव्हा संरक्षणमंत्र्यांच्या दरबारातच हितसंबंधांचा इतका उघड आणि उर्मट गुंता असतो, तेव्हा त्या देशाचे परराष्ट्र धोरण म्हणजे ‘शस्त्र विकण्याची सुनियोजित जाहिरात’ बनते. इराणवर हल्ला करायचा की नाही, हे ठरवताना टेबलावर नकाशे असतात, पण व्यूहरचना ही ‘चक्रीय’ नफ्याला पूरक आखली जाते. तोंडाने लोकशाही, न्याय, मानवाधिकार आणि ‘रूल ऑफ लॉ’च्या गप्पा मारायच्या आणि पोटात मात्र शस्त्र कारखान्यांचे हिशेब, गुंतवणुकीचे तक्ते आणि नफ्याचे आडाखे बांधत बसायचे. डोनाल्ड ट्रम्प यांची कूट चलनातील गुंतवणूक, हेगसेथ यांच्या वेगवेगळ्या घोषणा आणि बाजारातील चढउतारांचा उपयोग स्वत:च्या गुंतवणुकीसाठी करणे यावरून थोडक्यात सांगायचं तर लोकशाहीचा गाडा हाकणारे गाडीवानच जेव्हा वाटमारी करायला लागतात, तेव्हा वाटेवरच्यांनी कुठे दाद मागायची ? न्यायाच्या दरबारात ? तोही त्यांचाच ! माध्यमांकडे ? तीही विकत घेतलेली ! जनतेच्या रेट्याने ? तो रेटा येईपर्यंत ही लाभलोलुप मंडळी मात्र ‘देशभक्त’ म्हणून इतिहासात नोंदलेली असतात. हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि सर्वात मोठी थट्टाही !शुभम बंडगर, बारामती