‘आमच्या पक्षात तर पाचशे अजित पवार’ या विधानावरून राज्यभर नेहमीप्रमाणे गदारोळ उठल्याने गोपीचंदराव तसे मनातून आनंदलेच होते. वक्तव्याला २४ तास उलटल्यावर अपेक्षेप्रमाणे श्रेष्ठींकडून दटावणीचा सूर कानी पडताच कामगिरी फत्ते म्हणत समाधानाचा भलामोठा सुस्कारा सोडत ते झोपायला गेले. रात्री दीडच्या सुमारास एकाच वेळी अनेक हात त्यांना गदागदा हलवून जागे करत असल्याचे जाणवताच ते उठून बसले. डोळे चोळून झाल्यावर सर्वत्र आपलाच चेहरा असलेली माणसे बघून त्यांना जबर धक्का बसला. सर्वत्र आरसे लावलेल्या जत्रेतल्या एका खोलीत आलो की काय असेही त्यांना क्षणभर वाटून गेले.

साऱ्यांच्या शरीराची ठेवण आपल्यासारखीच असली तरी प्रत्येकात एक व्यंग ठळकपणे दिसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातला एक ठेंगणा गरजला, ‘कधी वाढणार तुझी उंची? सतत वादग्रस्त बोलून तू माझ्यासारखा होत चाललास हे लक्षात कसे येत नाही?’ हे ऐकून त्यांची मान खाली गेली. मग विस्कटलेले केस असलेली एक प्रतिकृती समोर आली. ‘कशाला असे बोलतोस? मीही तुझ्यासारखा बरळायचो, शेवटी डोक्यावरचे केस उपटण्याशिवाय काही पर्यायच राहिला नाही. त्यामुळे आता तरी शहाणा हो व छान घडी केलेल्या केसाची इभ्रत राख.’ नंतर लगेच वाकडे तोंड झालेला एक चेहरा समोर आला. ‘बघ, सतत वाईट बोलून माझ्या तोंडाची कशी अवस्था झाली ते. आधी मीही तुझ्यासारखाच दिसायचो, पण लोकांचे शिव्या, शाप, जोडे, चपला खाऊन माझी ही अवस्था झाली.’ हे ऐकताच त्यांनी डोळे घट्ट मिटले. तितक्यात ओठांचे चंबूगवाळे झालेला एक चेहरा समोर आला. ‘सतत वादग्रस्त बोलण्याने माझे स्वरयंत्रच खराब झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana verification process
Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण…

हेही वाचा >>> उलटा चष्मा : उपोषणाचे कवित्व

आता चांगलेही बोलायला गेले तरी भुंकण्याचाच आवाज बाहेर पडतो. फार वाईट अवस्था झाली रे माझी.’ मग खाली मान घातलेला एक समोर आला. ‘नेहमी वाईट बोलल्याने मला खूप शिव्या खाव्या लागल्या. त्यामुळे मान खाली गेली ती कायमचीच. आता ती प्रयत्न करूनही ताठ होत नाही. उपचार करून थकलो रे बाबा!’ हे ऐकताच त्यांनी झटकन मान ताठ करून बघितली. तसे करताना थोडा त्रास झाल्याचे त्यांना जाणवले. नंतर एक चपटे नाक असलेला चेहरा समोर आला. ‘मीही तुझ्यासारखाच, मनात येईल ते बोलायचो. त्यामुळे लोक संतापून मागे धावायचे. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेता घेता अनेकदा पडलो. तेही नाकावर. त्यामुळे ते चपटेच झाले. आता चपटय़ा म्हणून सारे हिणवतात.’ मग एक सतत हलणारे शरीर समोर आले. ‘उचलली जीभ- लावली टाळय़ाला या माझ्या कृतीमुळे मला अनेक पक्षबदल करावे लागले. मी ती सवय सोडली, पण भीतीमुळे मला आता कोणत्याच पक्षात घेत नाही. त्याचा परिणाम शरीरावर झालाय.’ हे ऐकणे असह्य झाल्याने ते जोरात ओरडले. ‘थांबा, तुम्ही सारे माझ्यासारखे दिसता, तरी तुम्ही मी नाही हे लक्षात घ्या. तुम्ही नक्कीच बहुरूपी आहात. तेही बारामतीहून पाठवलेले.’ हे ऐकून साऱ्या प्रतिकृती संतापल्या. ‘आम्ही तुझीच प्रति-रूपे आहोत. तुझ्या लक्षात कसे येत नाही?’ असे म्हणत या साऱ्यांनी त्यांच्या डोक्यावरले एकेक केस उपटायला सुरुवात केली. समाधान झाल्यावर ते एका सुरात म्हणाले, ‘जा, आता पोलिसांत तक्रार दे, गोपीचंदला गोपीचंदांनी सतावले म्हणून.’ या सतावणाऱ्या गोपीचंदांकडे पाहात राहणेच अशा वेळी गोपीचंदरावांना शक्य होते!

Story img Loader