दिल्लीहून फोन आल्यापासून नारायणराव अस्वस्थच होते. निरोप देऊन दोन तास लोटले तरी नितेश भेटायला न आल्याने त्याच अवस्थेत त्यांनी दिवाणखान्यात येरझाऱ्या घालण्यास सुरुवात केली. ‘येऊ दे त्याला, आता चांगला खडसावतोच,’ असे पुटपुटत असतानाच तो ‘हाय पप्पा’ म्हणत आत आला. मंत्री असला म्हणून काय झाले, शेवटी मुलगाच आपला असा विचार करत ते सुरू झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘काय, चालवले काय तू हे, त्या राहुल, प्रियंकाला डिवचण्याच्या नादात केरळची ओळख ‘मिनी पाकिस्तान’ करून टाकलीस. याचे गंभीर पडसाद उमटतील हे कळले नाही का तुला? अरे, काश्मीरचाच प्रश्न सोडवता सोडवता आपल्या नाकीनऊ आले. त्यात आणखी केरळची भर. उद्या पाकिस्तानने याही राज्यावर दावा केला व हा मुद्दा पुन्हा युनोत नेला तर देशासमोर नवीन डोकेदुखी निर्माण होईल याची कल्पना आली नाही का तुला? तुझ्या निशाण्यावर असलेल्या ‘त्या’ धर्माची लोकसंख्या देशाच्या इतर भागांतसुद्धा अनेक ठिकाणी जास्त आहे. मग त्याही भागांना तू हेच विशेषण लावशील का?’

हेही वाचा : कर्तृत्वमर्यादांमुळे भाजपचे पतन निश्चित!

‘ते योगी किती चिडलेत माझ्यावर. सध्या आपण ज्या पक्षात आहोत त्याचे ध्येय अखंड भारत निर्माण करण्याचे. ते साध्य झाले की पाकिस्तानच नष्ट होईल. मग भारतातच पाकिस्तान आहे असे तू कसे काय म्हणू शकतो? याचा अर्थ आपला देशच अखंड नाही असा काढून विरोधकांनी हल्लाबोल केला तर पक्षाची पंचाईत होईल त्याचे काय? आपले लाडके विश्वगुरू देशाची एक इंचही जमीन शत्रूला देणार नाही, असे छातीठोकपणे म्हणत असताना आपलाच एक भूभाग पाकिस्तान, असे तू म्हटलेच कसे?’

प्रश्नांच्या या सरबत्तीने हैराण झालेल्या नितेशने, ‘धर्मजागरण व त्यातून एकीकरण लवकर व्हावे यासाठी मी बोललो,’ असे म्हणताच ते पुन्हा भडकले. ‘धर्माचा हृदयसम्राट व्हायची इतकी घाई झालीय का तुला? अरे, नागपूर, लखनौचे खूप ज्येष्ठ लोक या पदाच्या रांगेत आधीपासूनच आहेत. या परिवारात तू तर अजून बच्चा! ज्येष्ठतेत आपण कुठे आहोत याचे तरी भान ठेवायचे. पक्षाला गरज होती म्हणून त्यांनी आपल्याला जवळ केले. आता ती संपल्यातच जमा.’

हेही वाचा : तंत्रकारण : तंत्रज्ञाना… तुझा रंग कसा?

‘तू असेच अडचणीचे बोलत राहिलास तर हळूच बाहेरचा रस्ता दाखवतील ते आपल्याला. मग नेहमीसारखे ओरडताही येणार नाही कारण आपले हात वाळूत दबलेले. तिकडे ईडी टपलेलीच. मग काय करशील? आधी आपल्याकडे केंद्रात मंत्रीपद होते. आता राज्यातल्या मंत्रीपदावर समाधान मानून घ्यावे लागले. ही एकप्रकारची अवनतीच. तू असेच बोलत राहिला आणि तेही हातून गेले तर करायचे काय? मग कुणालाच अंगावर घेता येणार नाही. ‘म्याऊ म्याऊ’ करत घरी बसावे लागेल. तो आवाज ऐकून विरोधक कोंबड्या फेकतील अंगणात. त्यापेक्षा तू त्या संजय राऊत व आदूबाळावर लक्ष केंद्रित कर. तेच तुझे खरे काम. मंत्री राज्याचा अन देशाचा विचार कसला करतोस? तुझ्याकडे मासे व बंदराचे खाते आहे ना! मग म्हण की केरळपेक्षा जास्त मासेमारी करू. नवीन बंदरे विकसित करू. आजवर झाले ते झाले. आता विकासाची दृष्टी असलेले अशी प्रतिमा आपल्याला तयार करायची आहे. जा आता आणि ते भगवे उपरणे कायम गळ्यात असू दे.’ विचारात पडलेले नितेश बाहेर निघाले. पप्पांच्या म्हणण्याचा अर्थ हाच की आजवर मी त्यांना फॉलो केले, आता नाही करायचे. हे लक्षात येताच ते तातडीने मासळी बाजाराकडे रवाना झाले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader narayan rane son nitesh rane calls kerala mini pakistan critics on congress leader priyanka gandhi css