scorecardresearch

पहिली बाजू :  जनसामान्यांचा नेता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले

पहिली बाजू :  जनसामान्यांचा नेता
(संग्रहित छायाचित्र)

चंद्रशेखर बावनकुळे (प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. या सुधारणाऱ्या परराष्ट्र संबंधांचा लाभ देशातील सामान्य नागरिकांना मिळेल, याची काळजी ते घेतात.  त्यांच्या लोकप्रियतेमुळेच भाजप यशस्वी होत आहे..

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यावर आणि विविध देशांशी असलेली मैत्री अधिक दृढ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भर दिला आहे. अमेरिकेतील व्हाइट हाऊस या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापासून इंग्लंडमधील राजघराण्याच्या राजप्रासादापर्यंत सर्वत्र मोदी यांचा सन्मान केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत. त्यांच्या मताला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व आहे. त्यांनी इस्रायलशी असलेले भारताचे संबंध दृढ केले. मात्र हे करत असतानाच त्यांनी पॅलेस्टाइन या इस्रायलच्या शत्रुराष्ट्रालाही भेट दिली. त्यांनी पॅलेस्टाइनला भेट दिली त्या वेळी कोणताही धोका होऊ नये म्हणून त्यांच्या हेलिकॉप्टरला इस्रायलच्या लष्करी हेलिकॉप्टर्सनी संरक्षण दिले होते. २०१८ साली घडलेली ही घटना गाजली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मानाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सौदी अरेबियाने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविले. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. त्यानंतर या दोन देशांत सुरू झालेले युद्ध अद्याप सुरूच आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, अशी अपेक्षा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी यांची विश्वासार्हता आणि महत्त्व किती आहे, हे यावरून दिसते.

मोदी हे जागतिक नेते झाले असले आणि जगभर त्यांच्या शब्दाला महत्त्व असले तरी त्यांचे लक्ष मात्र भारतातील जनसामान्यांकडे असते. आपला जागतिक पातळीवरील प्रभावसुद्धा ते भारतातील सामान्य नागरिकांच्या हितासाठी वापरतात. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे २० हजार भारतीयांना सोडवण्यासाठी मोदी यांच्या प्रभावाचा देशाला उपयोग झाला. त्यांच्या विचारांचा आणि कामाचा केंद्रिबदू हा देशातील गरीब, वंचित, पीडित, शोषित, दलित, मागास माणूस हा असतो.

मोदी सरकारने देशात महामार्ग, विमानतळ, बंदरे अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले. देशात अनेक दशके प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्णय घेतले. हे सर्व करताना सरकारने सातत्याने सर्वसामान्य माणसाला थेट मदत होईल अशा कामांना महत्त्व दिले आहे.

प्रधानमंत्री जनधन योजना

बँक खात्यांचे उदाहरण घेऊ या. ५० वर्षांपूर्वी सामान्य माणसाला बँकांची सेवा मिळाली पाहिजे, असे सांगत गरिबी हटावच्या वातावरणात बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले. त्या वेळी काँग्रेस सरकारच्या या निर्णयाची खूप चर्चा झाली, पण गरिबी काही हटली नाही आणि बँकांनी गरिबांना दारातही उभे केले नाही. पण २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर चित्र बदलले. मोदी यांनी स्वत: सामान्य नागरिकांना बँकांत खाती उघडता येतील व बँकांच्या सेवांचा लाभ घेता येईल, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ सुरू केली. सामान्यातील सामान्य व्यक्तीचेही बँक खाते उघडले गेले. ज्या गरिबांना बँका दारात उभ्या करत नव्हत्या, त्यांना सन्मानाने बोलावून खाती उघडली गेली. आज देशात ४६ कोटी नागरिकांची जनधन खाती उघडली गेली आहेत. सरकारने केलेली आर्थिक मदत या खात्यांमध्ये थेट जमा केली जाते. करोना महासाथीच्या संकटात गोरगरीब- वंचितांना मोदी सरकारने मदत केली, त्या वेळी पैसे वितरित करण्यासाठी ही खाती उपयुक्त ठरली. स्वत:चे बँक खाते असल्यामुळे आपोआपच जनसामान्यांची बचतही होऊ लागली. त्यांना बँकेच्या सुविधा मिळाल्या आणि सन्मानही मिळाला. एखाद्या सामान्य कुटुंबातील महिलेचे स्वत:चे बँक खाते उघडले जाते आणि त्यात पैसे जमा होतात, तेव्हा तिला होणारा आनंद अमूल्य असतो.

घरोघरी शौचालये

जनधन खाती उघडून सर्वसामान्यांना आर्थिक क्षेत्रात मुख्य प्रवाहात आणण्याबरोबर मोदी सरकारने अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आली, तरीही कोणत्याही काळातील सत्ताधाऱ्यांनी हा विचार केला नाही की देशातील प्रत्येक व्यक्तीला शौचालयाची सुविधा मिळाली पाहिजे. खेडय़ापाडय़ांतील सामान्य कुटुंबांतील महिलांना शौचासाठी बाहेर जावे लागत असे. त्यांना किती मानसिक त्रास होत असेल, याची चिंता कोणीही केली नाही, पण मोदी यांनी ती केली. त्यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’त घरोघरी शौचालये बांधण्यास प्रोत्साहन दिले आणि मदतही केली. मोदी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत देशात ११ कोटी ६३ लाख घरांमध्ये शौचालये बांधण्यात आली. सर्वसामान्य लोकांसाठी विशेषत: महिलांसाठी ही खूप महत्त्वाची योजना आहे.

उज्ज्वला’, ‘उजालाआणि इतर

गरीब महिलांना मोफत गॅस जोडणी देणारी ‘उज्ज्वला योजना’, विजेच्या दिव्यांनी प्रत्येक घर उजळून निघावे म्हणून ‘उजाला योजना’, सामान्य लोकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळावेत यासाठी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’, सर्वसामान्यांना विम्याचे कवच मिळावे म्हणून विमा योजना, पेन्शन योजना.. अशा अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुढाकार घेऊन सुरू केल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कामांमुळे जनसामान्यांचे आधार झाले. त्यांच्या योजनांच्या अंमलबजावणीत जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव केला जात नाही. अत्यंत पारदर्शी आणि प्रभावी अंमलबजावणी हे मोदी सरकारच्या योजनांचे वैशिष्टय़ आहे. प्रत्येक योजना स्पष्टपणे जाहीर केली जाते, तिची माहिती संकेतस्थळावर सर्वासाठी उपलब्ध असते. जो पात्र असेल त्याला हमखास लाभ होतोच. कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, हे मोदी सरकारच्या कामाचे वेगळेपण आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील गरीब, वंचित, पीडित, शोषित, दलित, मागास यांच्यासाठी आपला हक्काचा माणूस झाले आहेत. ते जनसामान्यांचे नेते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे. भाजपला २०१४ व २०१९ या सलग दोन लोकसभा निवडणुकांत स्वबळावर बहुमत मिळाले. भाजपने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत निवडणुका जिंकून सरकारे स्थापन केली. ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळविला. पक्षाचा इतका अफाट विस्तार झालेला असताना आणि यश मिळालेले असताना मोदी यांना पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांची काळजी असते. पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळेल, असे वातावरण आहे. त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांना नवी दिल्ली येथे सहकुटुंब भेटण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी त्यांनी आस्थेने माझी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची चौकशी केली. ज्या कार्यकर्त्यांना त्यांना भेटायची संधी मिळाली त्यांना मोदी यांची आपुलकी अनुभवायला मिळाली. सामान्य कुटुंबातील अनेक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची संधी मिळते. सर्वसामान्य जनतेप्रमाणेच पक्षातील कार्यकर्त्यांनाही ते कुटुंबप्रमुखासारखे आधार वाटतात आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp maharashtra president chandrashekhar bawankule article praising pm narendra modi zws

ताज्या बातम्या