scorecardresearch

Premium

पहिली बाजू : मेट्रो पर्यावरणाच्या रक्षणासाठीच!

मेट्रोमुळे मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या दूर होईलच, शिवाय इंधनाचीही बचत होऊन पर्यावरणरक्षणास हातभार लागेल..

metro train
(संग्रहित छायाचित्र)

मंगलप्रभात लोढा ( आमदार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष )

मेट्रोमुळे मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या दूर होईलच, शिवाय इंधनाचीही बचत होऊन पर्यावरणरक्षणास हातभार लागेल..

gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

मुंबईचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास पाहिल्यास प्रशासकीयदृष्टय़ा उत्तम पद्धतीने विकसित केलेले शहर, असे वर्णन करावे लागेल. मुंबईकरांचे जीवनमान सुखकर व्हावे यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने केलेली बंदिस्त सांडपाणी व्यवस्था, मलनि:सारण व्यवस्था, वीजपुरवठा अशा अनेक उपाययोजनांचे फायदे आजही मुंबईकरांना होत आहेत. सार्वजनिक बस वाहतूक आणि रेल्वे यामुळे मुंबई हे वेगवान शहर म्हणून ओळखले जाते.

बदलत्या मुंबईत मेट्रोचे महत्त्व

गेल्या ३०-४० वर्षांत मुंबईच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. शहरातील निवासी वस्तीची धाटणी बदलत चालली आहे. मुंबईचा परीघ कुलाब्यापासून वांद्रे वा शीवपर्यंत सीमित न राहता दहिसर, विरार, मुलुंड, ठाणे, कल्याण-भिवंडीपर्यंत तो विस्तारला आहे. हे पाहता, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे याच परंपरागत रेल्वे मार्गावर अवलंबून राहून मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, हे ओळखून महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी सुरू केली. सध्या अस्तित्वात असलेल्या वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर या मेट्रो मार्गाचे नियोजन होऊन तो प्रत्यक्षात येण्यास किती वर्षे लागली हे आपण जाणतोच. भविष्यकालीन विचार डोळय़ासमोर ठेवून मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग-३ची आखणी करण्यात आली. या मार्गाने कफ परेडपासून गजबजलेल्या सिप्झ या औद्योगिक क्षेत्रापर्यंतचा परिसर जोडण्यात आला आहे. विधान भवन, चर्चगेट, काळबादेवीचा व्यापारी परिसर, महालक्ष्मी, वरळी, माहीम-धारावी मार्गे वांद्रे-कुर्ला संकुलातून पुढे जात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गे जात सिप्झ येथे हा मार्ग संपतो. ज्या ठिकाणी मध्य आणि पश्चिम रेल्वेने सहज पोहोचता येत नाही, रिक्षा, टॅक्सी किंवा स्वत:चे खासगी वाहन हाच पर्याय उरतो अशा मोक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सुजाण नेतृत्वाने या प्रकल्पातील अडथळे दूर करून त्याचा श्रीगणेशा केला. मात्र मेट्रो तीन मार्गाची आरे कॉलनीमध्ये होणारी कारशेड हा वादाचा मुद्दा कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे चर्चेत राहील अशी सोय करून मुंबईच्या विकासाचे मारेकरी असलेल्या पक्षांनी याबाबतचे राजकारण तापवले.

मुंबईकरांची खरी गरज खासगी वाहनांसाठीचे मोठे रस्ते नसून वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हीच आहे. जगातल्या सर्व मोठय़ा शहरांमध्ये कित्येक वर्षांपासून भुयारी व जमिनीवरील अशा दोन्ही प्रकारच्या मेट्रो मार्गाचे जाळे अस्तित्वात आहे. मुंबईमध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. आकडेवारीच्या जंजाळात न अडकता हे कबूल करावे लागेल, की रेल्वेतून लटकून प्रवास करताना दररोज काही दुर्दैवी जीव आपला प्राण गमावतात. ज्यांना ऑफिसला जाण्यासाठी रेल्वे हा पर्याय सोयीचा नाही त्यांच्यासाठी रिक्षा, टॅक्सी किंवा खासगी वाहन हाच पर्याय उरतो. त्यातून वाहतूककोंडी आणि त्याहीपेक्षा धोकादायक म्हणजे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. किमान आठ-दहा तास ऑफिसमध्ये काम केल्यानंतर मुंबईकर धक्के खात किंवा स्वत:चे वाहन चालवत घरी जातात. याचे कारण मुंबईमध्ये अजूनही सक्षम वाहतूक यंत्रणा नाही आणि यासाठीच मुंबई मेट्रो-३  हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. दिल्लीत तयार झालेल्या मेट्रोच्या जाळय़ाने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत क्रांती झाली आहे. ज्यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाते, अशा ई श्रीधरन  यांनीही मुंबई मेट्रो-३ या मार्गाची जाहीर स्तुती केली होती. 

चैन नव्हे आवश्यकता

लोकांचे  आयुष्य अधिक सुखकर व्हावे, रोजच्या प्रवासाचा वेळ वाचावा, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वातानुकूलित अत्याधुनिक मेट्रोतून प्रवास करून जीवनमानाचा दर्जा राखणे शक्य व्हावे, हाच भाजपप्रणीत सरकारचा  प्रामाणिक प्रयत्न होता. मुंबईच्या सतत वाढत जाणाऱ्या लोकवस्तीचा विचार करता पारंपरिक रेल्वे मार्गावर अवलंबून राहून चालणार नाही. मुंबई मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाला आणि भविष्यातील अनेक प्रस्तावित मेट्रो मार्ग सुरू झाले की मुंबई एक जागतिक दर्जाचे शहर व्हायला हातभार लागेल.

पर्यावरणस्नेही पर्याय

मुंबई मेट्रो मार्ग-३ कफ परेड- सीप्झ असा दक्षिणोत्तर जातो. प्रकल्पाची भौगोलिक व्याप्ती, मेट्रो रेल्वेच्या तांत्रिक बाबी यांचा व्यवस्थित विचार करून सिप्झच्या उत्तरेला आरे कॉलनीतील जागी कारशेड उभारायचे ठरले होते. त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्यासुद्धा घेण्यात आल्या होत्या. कारशेडसाठी जंगल तोडावे लागणार नाही असे नाही, मात्र मुंबईचे एकूण क्षेत्रफळ, त्यावर असलेली झाडांची संख्या, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा घनदाट अरण्याचा भाग व त्याच्या एका बाजूला असलेल्या आरे कॉलनीतील जमिनीच्या थोडय़ा भागावरच कारशेड होणार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्र शासन मुंबईकरांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही उपाय म्हणून मुंबई मेट्रो आणू इच्छित होते. मात्र काहीही करून मेट्रो रेल्वेत खोडा घालायचा, असे मेट्रो विरोधकांनी ठरवलेच होते.

कारशेडसाठी केवळ ५० हेक्टर जागा

२०१९ मध्ये सत्तापालट झाल्यावर कोणतीही आवश्यकता नसताना कारशेड बांधण्याचा निर्णय एका रात्रीत फिरवला गेला. त्याऐवजी ती कांजुरमार्गला नेण्याचा प्रस्तावसुद्धा पुढे आला. सरकारनेच एक समिती नेमून याबाबतीत सल्ला द्यावा असे ठरवले आणि आश्चर्य म्हणजे या समितीने आरेतून कारशेड हलवणे हा सुयोग्य उपाय नाही, उलट तिथेच झाली तर आर्थिकदृष्टय़ा आणि प्रकल्पाच्या पूर्णतेच्या दृष्टीनेसुद्धा फायदेशीरच ठरेल असा निष्कर्ष काढला, पण याकडे साफ दुर्लक्ष करून मेट्रो रेल्वेचे काम वेळेत पूर्ण होऊच द्यायचे नाही, असा चंगच बांधला गेला. मेट्रोची कारशेड आरेमध्ये बांधल्यामुळे मुंबईतील जंगलाचा मोठा भाग नष्ट होत आहे, असा गैरसमज मुंबईकरांमध्ये जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ११ हजार ६८७ हेक्टर आहे. आरे मिल्क कॉलनी एक हजार २८७ हेक्टरवर आहे व त्यातील ५० हेक्टर जागासुद्धा कारशेडसाठी वापरली जाणार नाही, याचाच अर्थ कारशेडमुळे मुंबईतील वनसृष्टीला कोणताही मोठा धोका संभवत नाही. आरे कॉलनी परिसरात असलेली अनधिकृत वस्ती त्याचप्रमाणे आधीच झालेली बांधकामे याविषयी सोयीस्कर मौन बाळगून फक्त कारशेडसाठीच्या छोटय़ाशा तुकडय़ासाठी संपूर्ण मेट्रो- ३ प्रकल्पाला बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे. कारशेडमुळे नदीपात्राची रचना बदलून मुंबई जलमय होईल, हा आणखी एक कांगावा! मात्र वास्तवात कारशेड परिसरातील ७५ टक्के जागा पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे, त्यामुळे असा कोणताही दावा करता येत नाही. मेट्रो-३  संपूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर १५ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांना रोज सेवा देणार आहे. तीन ते चार मिनिटांनी एक फेरी होईल. त्यातून कफ परेडहून सिप्झला जाण्याचा कालावधी एका तासाने कमी होणार आहे.

कोटय़वधी रुपयांच्या विजेची बचत

हा मेट्रो प्रकल्प ‘जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी’ यांच्याकडून मिळालेल्या अल्प व्याजदरातील कर्जावर उभारला जात आहे. उरलेले वित्त साहाय्य केंद्र आणि राज्य सरकार व अन्य संस्थांकडून मिळणार आहे. हा मेट्रो मार्ग १०० टक्के विजेवर चालणारा असल्यामुळे पर्यावरणस्नेही आहे. मेट्रोच्या डब्यांमध्ये असलेले तंत्रज्ञान अत्याधुनिक असल्यामुळे दरवर्षी कोटय़वधी रुपयांच्या विजेची बचतसुद्धा होणार आहे. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तिकिटाची व्यवस्था केली जाणार आहे. विजेची बचत होण्यासाठी स्मार्ट लाइट आणि स्मार्ट वातानुकूलित यंत्रणा लावण्यात येणार आहे. या मेट्रो रेल्वे मार्गाने सहा व्यापारी ठिकाणे, ३० महत्त्वाची शैक्षणिक केंद्रे आणि ३० पेक्षा अधिक मनोरंजन आणि सार्वजनिक वर्दळीची केंद्रे जोडली जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी भूसंपादन करून हा प्रकल्प राबवला जात आहे. कमीत कमी विस्थापन आणि जास्तीत जास्त लोकांना थेट फायदा हेच याचे उद्दिष्ट आहे. मेट्रो रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्यावर त्यातून जेवढे अधिक प्रवासी प्रवास करतील तेवढा इंधनावरचा खर्च तर कमी होईलच त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड हवेत कमी प्रमाणात सोडला जाईल. त्यातून मुंबईचे पर्यावरण राखण्यात यश येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2022 at 05:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×