रात्रीचे बारा वाजलेले. बंगल्यावर सामसूम पसरलेली. शयनकक्षात निशिकांतजी नेहरूंवरचे एक पुस्तक हातात घेऊन यातील कोणत्या विधानांची मोडतोड करता येईल यावर विचार करत बसलेले. प्रवेशद्वारावरचे सुरक्षारक्षक पेंगुळलेल्या अवस्थेत असलेले. तेवढ्यात हातात भरमार बंदुका घेतलेली एक टोळी अचानक समोर येऊन उभी ठाकली तशी एकच पळापळ उडाली. रक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला. हे बघून टोळीतील काहींनी ‘दुबेजीं की जय’ अशा घोषणा देताच वातावरणातला तणाव निवळला.

‘आम्ही चंबळच्या खोर्‍यातून आलोय. साहेबांना भेटायचे आहे’. मग निरोपाची देवाणघेवाण झाली. खांद्यावर बंदूक नसली तर आमच्या तोंडून शब्दच फुटत नाही हे दरोडेखोरांनी पटवून दिल्यावर त्यांना शस्त्रासकट आत प्रवेश देण्यात आला. दिवाणखान्यात निशिकांतजींचे आगमन झाल्यावर टोळीचा म्होरक्या अदबशीरपणे म्हणाला, ‘जेपी व विनोबाजींचा अपवाद वगळला तर भारतीय राजकारण्यांनी आमच्या समुदायाकडे फार तुच्छतेनेच बघितले. त्या दोघांनंतर आमची कदर करणारे फक्त तुम्हीच (हे ऐकताच दुबे आनंदाने मोहरलेच). चोर आणि दरोडेखोर उभे केले तरी ते आमच्या पक्षाकडून निवडून येतील हे तुमचे वक्तव्य वाचून आम्हाला अत्यानंद झाला. तुमच्या मनात आमच्याविषयीचा आदर बघून मन भरून आले.

मग आम्ही एक बैठक घेतली व दिल्लीकडे कूच केली. वाटेत काही भुरटे चोरही आम्हाला येऊन मिळाले (हे ऐकताच मागून काही हात वर झाले). आजवर आमच्या मनात तुम्हा नेत्यांविषयी चांगली प्रतिमा नव्हतीच. पांढर्‍या कपड्यातले दरोडेखोर असेच आम्ही म्हणायचो. आमच्या हाती बंदुका आहेत तर तुमच्या हाती आयुध. मात्र, काम एकच. कारण जनता आम्हाला तुमच्याविषयी तेच सांगायची. आम्हाला पोलिसांपासून दूर पळावे लागते. तर तुम्हाला पोलीस जनतेपासून दूर पळवून नेतात असेही आम्हाला वाटायचे. आमच्या धंद्यात जोखीम आहे तर तुमच्या व्यवसायातील जोखमीला संरक्षण आहे असेही आमचे मत बनलेले.

आम्ही दरोडा घातला की शिव्याशाप वाट्याला येतात तर तुमच्या वाट्याला पुष्पवृष्टी अशीही आमची समजूत होती. हे सारे भ्रम तुमच्या एका वक्तव्याने दूर केले (हे ऐकल्यावर निशिकांतजींनी एक लांब सुस्कारा सोडला). आता आमच्यासाठी एक करा. आम्हाला ठिकठिकाणाहून तुमच्या पक्षाची उमेदवारी द्या. आम्ही निवडून आलो की देशाची सेवा करू. थेट लुटीचा मार्ग कायमचा बंद करून टाकू. निवडून आल्यावर आयुष्यभर तुमचे समर्थक म्हणून वावरू. त्या महाराष्ट्रातील काही महिला खासदार कायम तुमच्या मागावर असतात. त्यांना टाळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे दरवाजे शोधावे लागतात. आम्ही तुमच्यासोबतच असलो की त्यांची माग काढण्याची वा तुम्हाला अडवण्याची हिंमतच होणार नाही.

आजवर आम्ही कडेकपारीत जीवन व्यतीत केले. आता पुढे तुमच्याभोवती कडे करून राहू. देशात काँग्रेसचा जोर असताना दगड उभा केला तरी निवडून येतो असे म्हटले जायचे. तुम्ही त्याहून पुढे जात थेट आमचे नाव घेतले. असे थेट बोलण्यासाठी हिंमत लागते. ती तुम्ही दाखवली. त्यामुळे राजकारणातले खरे ‘सत्यवचनी’ तुम्हीच आहात. आम्ही झारखंडचे आधुनिक जेपी म्हणून तुमच्याकडे बघू लागलो आहोत. तेव्हा लवकर आमच्या उमेदवारीची व्यवस्था करा.’ एवढे बोलून दरोडेखोर निघून गेले. चला, कुणीतरी आपल्याला सत्यवचनी म्हटले. आता नेहरूंवर केलेली टीका लोकांना सत्य वाटू लागेल. सोबतच या टोळीचा विचार करावा लागेल, असे म्हणत निशिकांतजी शयनकक्षाकडे निघाले.