महेश सरलष्कर

भाजप राहुल गांधींच्या सावरकरांवरील टिप्पणीचा गुजरातच्या निवडणुकीसाठी काँग्रेसविरोधात चोख वापर करून घेण्याची शक्यता आहे. पुढील टप्प्यामध्ये हिंदूत्वाच्या कुठल्याही मुद्दय़ावरून विविध प्रकारच्या सेना भारत जोडो यात्रेची वाट अडवण्याचा धोका असू शकतो..

Congress, Uddhav Balasaheb Thackeray Shivsena,
सांगलीत कॉंग्रेस, उबाठा शिवसेनेत मनोमिलन ?
Sangli, Vishal Patil, vishal patil sangli,
सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल, विशाल पाटलांचा विश्वास; खासदार संजयकाका पाटलांना मैदानात येण्याचे आव्हान
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
Nana Patole
अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा प्लॅन; नाना पटोलेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात जेवढा उत्स्फूर्त आणि दांडगा प्रतिसाद मिळाला तेवढा कदाचित कर्नाटकमध्येही मिळाला नसेल. महाराष्ट्र हे राज्य कार्यकर्त्यांची प्रयोगशील खाण आहे, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले! ‘भारत जोडो’ यात्रेच्या सहा महिन्यांच्या काळात मला अधिक शहाणपण आलेले असेल असे राहुल गांधी म्हणाले होते. पण त्यांना शहाणपण एकटय़ा महाराष्ट्राने दिले असे म्हणता येईल. राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता असली तरी, अजूनही या राज्यात पुरोगामी विचारांचे लोक आहेत, ते विशिष्ट विचारांच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्याला स्वत: रस्त्यावर येऊन पािठबा देतात, हेही राहुल गांधी यांनी पाहिले. हा पाठिंबा बघूनच कदाचित राहुल गांधी यांनी सावरकरांवर टिप्पणी केली असावी. ही टिप्पणी म्हणजे खुल्या दिलाने यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना, त्यांच्या विचारांना दिलेला प्रतिसादही असेल. पण राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीचा फटका उत्तरेतील राज्यांमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेला बसू शकतो का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. गुजरातसारख्या राज्यामधील विधानसभा निवडणुकीत कोणता परिणाम होऊ शकेल, हा मुद्दादेखील महत्त्वाचा असेल. ‘भारत जोडो’ यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा संपलेला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमधून सुरू होईल. या दोन दिवसांमध्ये राहुल गांधी गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराला जातील. मग भाजप राहुल गांधींच्या सावरकरांवरील टिप्पणीचा गुजरातच्या निवडणुकीसाठी काँग्रेसविरोधात चोख वापर करून घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधींना महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले असले तरी, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून गुजरातमधील भाजपच्या मतदारांना तीच अपेक्षा असेल.

महाराष्ट्रामध्ये शिंदे-भाजपच्या युतीचे सरकार सत्तेवर असताना सावरकरांचा मुद्दा उघडपणे मांडण्याची धाडस राहुल गांधी यांनी दाखवले, हा काही जणांसाठी कौतुकाचाही विषय असू शकतो. पण अनेकांना या धाडसाची थोडी चिंताही वाटू लागली आहे. राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील टिप्पणीनंतर, सावरकरांच्या मुद्दय़ाला राहुल गांधींनी कशाला हात घातला, ‘भारत जोडो’ यात्रेला इतका मोठा प्रतिसाद मिळत असताना वाद कशासाठी निर्माण करायचा, असा सवाल उपस्थित केला गेला. हा सवाल काँग्रेसशी लागेबांधे नसलेल्या, पण यात्रेमुळे राहुल गांधींबद्दल सहानुभूती निर्माण झालेल्या वर्गसमूहाकडून आलेला आहे. त्यांना यात्रेची काळजी वाटू लागली आहे. भारत जोडो यात्रेचा निम्मा टप्पा झालेला आहे, आता पुढील टप्पाही कोणतेही विघ्न न येता पूर्ण झाला पाहिजे, असे या बिगरकाँग्रेसी सहानुभूतीदारांना मनापासून वाटते.

यात्रेचा कठीण काळ उत्तरेमध्ये सुरू होईल. महाराष्ट्रानंतर लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यावर यात्रेचे यशही अवलंबून असेल. त्यामुळे सावरकर वगैरे वादग्रस्त मुद्दे यापुढे ऐरणीवर न आणण्याची दक्षता राहुल गांधी यांनी घ्यावी असेही त्यांना वाटते. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपची ताकद नगण्य असल्यामुळे यात्रेला विरोध करण्याचे धाडस त्यांनी केलेले नव्हते. पण उत्तरेमध्ये भाजपवाले रस्त्यावर उतरून यात्रेला अडवण्याचा प्रयत्न करतील. राज्यातदेखील भाजपला यात्रेस विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) उपयोग करून घेता आला. राज्यात यात्रेला अटकाव केला पाहिजे अशी मागणीही केली गेली. महाराष्ट्रातील यात्रेचा टप्पा संपला असल्याने या मागणीला काही अर्थ उरलेला नाही. पण पुढील टप्प्यामध्ये हिंदूुत्वाच्या कुठल्याही मुद्दय़ावरून विविध प्रकारच्या सेना भारत जोडो यात्रेची वाट अडवण्याचा धोका असू शकतो. या भीतीपोटी कदाचित सहानुभूतीदारांना राहुल गांधींनी सावरकरांवर टिप्पणी करायला नको होती, असे वाटत असावे.

काही जण मात्र सजगपणे राहुल गांधींच्या विधानांवर असहमती व्यक्त करताना दिसले. राहुल गांधींनी स्वत:च्या आणि काँग्रेसच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने राज्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र आलेले दिसले. सावरकरांच्या मुद्दय़ावरून ठाकरे गटाला काँग्रेसने नाराज केले. त्याचा राजकीय फटका महाराष्ट्रात बसू शकतो. मुंबई महापालिकेसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजीक आल्या असताना, महाविकास आघाडी एकत्र लढली तर यश मिळू शकेल हे स्पष्ट दिसत असताना काँग्रेसने शिवसेनेला वेगळे पाडले, ही राजकीय परिपक्वता नव्हे. शिवसेनेमध्ये फूट पडण्यापूर्वी आत्तापर्यंत कधीही शिवसेनेकडे न बघणारा मुस्लीम आणि दलित समाज ठाकरेंकडे आशेने पाहू लागला आहे. शिवसेनेने भाजपशी युती तोडली या एका मुद्दय़ावर खूश झाल्यामुळे हे दोन्ही मतदार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता दिसू लागली आहे. मुस्लीम, दलित आणि मराठी असे तीन घटक ठाकरे गटाच्या मागे उभे राहिले आणि महाविकास आघाडी सरकारमधील दोन्ही काँग्रेसची मदत झाली तर शिंदे-फडणवीस युतीला ठाकरे गटाचा पराभव करणे कठीण होऊ शकते. मुंबई महापालिकेवरील ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहिले तर, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे शिवसेना फोडण्याचे पाऊल फारसे यशस्वी झाले नाही हेही सिद्ध होऊ शकेल. सत्ता आल्यानंतर शिंदे आणि फडणवीस गटांमधील मतभेद हळूहळू चव्हाटय़ावर येऊ लागले आहेत. याअंतर्गत संघर्षांत भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे गटाच्या पाठीशी नसेल तर, राज्यातील नव-युतीमध्ये कोणते रणकंदन माजेल, याची कल्पना केलेली बरी! राज्यातील अशा बदलत असलेल्या राजकीय वातावरणाचा लाभ महाविकास आघाडीला मिळण्याची संधी असेल तर त्यावर पाणी का सोडायचे, असा विचार काँग्रेसचे सहानुभूतीदार करत आहेत. राहुल गांधी यांच्या टिप्पणीमुळे महाविकास आघाडीमध्ये विनाकारण तणाव निर्माण झाला आहे. मित्रपक्ष दूर जातील असे कृत्य काँग्रेसने करू नये, असे या सहानुभूतीदारांना वाटते.

काँग्रेसच्या खंद्या समर्थकांना राहुल गांधींच्या टिप्पणीमध्ये वावगे काही दिसलेले नाही. राहुल गांधी चुकीचे बोललेले नाहीत, भाजपवाल्यांना, सावरकरवाद्यांना टिप्पणी योग्य वाटली नसेल. या लोकांनी राहुल गांधींच्या मतांशी सहमत झाले पाहिजे असे काँग्रेसचे म्हणणे नाही. पण हे लोक विरोध करतात म्हणून त्यांना न आवडणारे मत मांडायचे नाही का? हा मुद्दा युक्तिवाद म्हणून योग्य ठरतो. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी त्या-त्या राज्यांशी निगडित मुद्दे जाहीर भाषणांमधून, पत्रकारांशी संवाद साधताना मांडत आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्दय़ाप्रमाणे अन्य मुद्देही ऐरणीवर आणले गेले तर फारसे नवल नव्हतेच. महाराष्ट्रामध्ये सावरकरांवर टिप्पणी करणार नाही तर कुठे करणार, असा विचार कदाचित काँग्रेसमधील राहुल गांधींच्या सल्लागारांनी दिला असावा.

या सल्लागारांना निवडणूक लढवायची नसते, त्यामुळे राजकीय तारतम्य न बाळगता सल्ले दिले जातात. महाराष्ट्रामध्ये सावरकरांवर विधान करणे जितके धाडसाचे तितकेच ते राजकीय कोलीत भाजपच्या हाती देणारे ठरू शकते, याचा अंदाज काँग्रेसला आला नाही का, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर कदाचित काँग्रेसला भान आले असावे. काँग्रेसकडून ठाकरे गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला गेला. शेगावमधील जाहीरसभेतही राहुल गांधी यांनी सावरकरांवर टिप्पणी करण्याचे वा टिप्पणीमुळे झालेल्या वादावर स्पष्टीकरण देण्याचे टाळले. भारत जोडो यात्रा ही काँग्रेसच्या मित्रपक्षांना नव्हे, तर काँग्रेसला मजबूत करण्यासाठी असल्याचे काँग्रेसनेत्यांनी वारंवार सांगितलेले आहे. सावरकरांवर टिप्पणी करताना आम्ही घटक पक्षांचा विचार केलेला नाही, काँग्रेस कोणत्या विचारांचा आहे, हे यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी जाणीवपूर्वक सावरकरांवर टिप्पणी केली गेली, असा युक्तिवाद काँग्रेसला करता येऊ शकेल. राज्यातील मतदारांपैकी सावरकरवादी नसलेल्यांना राहुल गांधींनी भाजपच्या हिंदूुत्ववादी आणि सावरकरवादी मतदारांविरोधात उभे राहण्याची ताकद दिलेली असू शकते. ‘भारत जोडो’ यात्रा कशासाठी, हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्यावर, देशांतर्गत संघर्षांत तुम्ही एकटे नाही, हा संदेश दिला गेल्याचे प्रत्युत्तर दिले जाते. सावरकरांवरील टिप्पणीमागे काँग्रेसचा हाही हेतू असू शकतो.

राहुल गांधी यांनी सावरकरांवर टिप्पणी केली म्हणून महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नजीकच्या भविष्यातील संभाव्य यशाकडे दुर्लक्ष केले तर मात्र, ते अधिक राजकीय अपरिपक्व ठरतील. हा धोका या पक्षांनी टाळला तर ‘काँग्रेस असा का वागतो,’ हा प्रश्नही फारसा महत्त्वाचा ठरणार नाही.
mahesh.sarlashkar@expressindia.com